२६ जानेवारी आणि १५ ऑगस्ट या दोन्ही राष्ट्रीय सणांचं महत्त्व आणि गांभीर्यही आपण विसरत चाललो आहोत. शाळेतल्या शिक्षकांना आणि मुख्याध्यापकांना तर हे दोन्ही दिवस शिक्षेसारखे वाटतात. गेल्या २६ जानेवारीच्या आदल्या दिवशी शाळेचे मुख्याध्यापक दिसले. त्यांना नमस्कार केला. म्हटलं, ‘सर! उद्या २६ जानेवारी शाळेत ध्वजवंदन असेल ना? काही कार्यक्रम वगैरे आहे की नाही?” सर थांबले. अगदी बिच्चाऱ्या चेहऱ्यानं त्यांनी उत्तर दिलं, ‘काही कार्यक्रम नाही. दरवर्षी नवीन नवीन काय करायचं? या राष्ट्रीय सणांच्या सुट्ट्यांचा कंटाळा आलाय. काहीतरी कार्यक्रम करावाच लागतो म्हणून करायचा.
‘अहो, पण मुलांना तरी काही करावंसं वाटत असेल ना? त्यांनी काही आग्रह नाही केला?’ माझ्या या प्रश्नावर सर कीव करावी तसे हसले. म्हणाले, ‘अहो, ही आजकालची मुलं! त्यांना कुठ आवडतात असे राष्ट्रीय सण? हे दिवस शनिवारी किंवा सोमवारी आले तर त्यांची मज्जाच असते. दोन दिवसांची ट्रिप ठरवतात आणि पळ काढतात.’ सरांचं बोलणं मला पुढे ऐकवेना. खरं तर या दोन्ही दिवशी शिक्षकांनी, मुलांनी शाळेत हजर राहिलं पाहिजे, असा नियम आहे. शिक्षक नाईलाजास्तव हजर राहतात. पण विद्यार्थी? त्यांना इतर खूपच उद्योग असतात. अशावेळी असले सण साजरे करण्यात रस कुणाला?
हे पाहून मी खरं तर निराश झालो. तसाच पुढे मुंबईच्या रस्त्याला लागलो. रस्त्यावर एका गरीब गावात बरीच धावपळ दिसली. बरीच तरुण मुलं-मुली हातात खराटे घेऊन गावातले रस्ते झाडत होती. कोणी पताका लावत होती. काही मुली ध्वजाच्या खांबाभोवती रांगोळी काढण्यात गुंतल्या होत्या. मी उत्सुकतेने थांबलो. जवळच्या एका तरुणाला थांबवून विचारलं, ‘काय आहे हो या गावात?’ माझ्या या प्रश्नाबरोबरच बरीच मुलं-मुली माझ्याभोवती जमली. एकजण खूप उत्साहानं माहिती द्यायला लागला. म्हणाला, ‘काका, उद्या २६ जानेवारी, आम्ही तरुणांनी एकत्र येऊन रक्तदान शिबीर आणि आरोग्य शिबीर घ्यायचं ठरवलंय. त्याची तयारी करतोय. शहरातून स्पेशालिस्ट डॉक्टरांची टीम येणारेय. सगळ्या गावकऱ्यांची तपासणी करणार आहोत, आणि रक्तगटाची माहिती करून घेऊन त्याची नोंद करणार आहोत.’ हे ऐकून मी भारावलो. काही वेळापूर्वी मनाला आलेलं नैराश्य कुठल्याकुठे पळून गेलं. अजूनही आशेला जागा आहे, हे मनाला पटलं.
– वेणूगोपाल धूत
Leave a Reply