कुठे जातो हा रस्ता
कुठेच नाही
इथेच पडून असतो नुसता !
कुठे नेतो हा रस्ता
कुठेच नाही
जागचा हलतही नाही नुसता !
अजबच म्हणायचा
हा रस्ता
भुईला म्हणायचा भार नुसता !
रस्ता कुठे जात नसतो
रस्ता कुठे नेत नसतो
रस्ता जागच्या जागीच असतो
प्रवासी मात्र चालत असतो
रस्ता जरी स्वस्थ असतो
तरी त्याला शेवट असतो
प्रवाशाने चालायचे असते
रस्त्यारस्त्याची गोष्टच वेगळी असते
आपला कोणता रस्ता ते
आपण ओळखायचे असते
भलत्याच रस्त्याने जाऊन
खड्ड्यात पडायचे नसते
रस्ता कुठे जात नसतो
रस्ता कुठे नेत नसतो
कुठल्या रस्त्याने चालायचे ते
आपले आपणच ठरवायचे असते
— विनायक अत्रे
Leave a Reply