प्रमोशन मिळाल, ग्रेड वाढली तसं तो ‘वन आर.के.’ मधून ‘वन बी.एच.के’ क्वार्टर साठी एलिजिबल झाला. तसा अर्ज केल्यावर थोड्याच दिवसांत त्याला वन बी.एच.के. क्वार्टर मिळाला, आणि आठवडाभरात तो नवीन क्वार्टरमधे रहायला गेला.
पत्ता बदलल्यावर सर्व बँका, वीमा कंपनी, गुंतवणूक केलेल्या कंपन्या, गॅस एजन्सी इत्यादींना नवीन पत्ता कळवणं जसं आवश्यक होतं, तसंच ते रेशनिंग ऑफीसलाही कळवणं आवश्यक होतं – दुकान आणि पत्ता बदलण्यासाठी. अगदी पांढरं रेशनकार्ड असलं आणि त्यावर काहीही मिळत नसलं तरीही.
मग एके दिवशी हाफ डे घेऊन तो किंग्ज सर्कलच्या रेशनिंग ऑफीसमधे गेला, आणि क्वार्टर अॅलोटमेंट लेटरची झीरॉक्स प्रत जोडून अर्ज सादर केला. अर्जाची स्थळप्रत परत देतांना खिडकीतला कारकून म्हणाला –
“आज गुरूवार आहे. येत्या सोमवारी रेशनिंग इन्पेक्टर घरी येतील. शक्यतो बाराच्या आतच येतील. तेंव्हा ओरिजनल अॅलॉटमेंट लेटर आणि फोटो आय.डी. तयार ठेवा. आणि हो, स्वतः घरी रहा.”
“बरं” म्हणून तो घरी आला. अपेक्षेप्रमाणे नंतरच्या सोमवारी रेशनिंग इनस्पेक्टर घरी आले. कागदपत्रं तपासून आणि अर्जावर तपासणी केल्याचा शेरा मारून परत गेले. जाताजाता म्हणाले –
“पुढच्या सोमवारी ऑफीसला या, येतांना जुनं रेशनकार्ड घेऊन या आणि १० नंबरच्या खिडकीतून नवीन रेशनकार्ड घेऊन जा.”
आभार मानून आणि सौ. नं केलेला कपभर चहा देऊन त्यानं इनस्पेक्टर साहेबांना निरोप दिला.
पुढच्या सोमवारी जुनं रेशनकार्ड घेऊन तो रेशनिंग ऑफीसच्या १० नंबरच्या खिडकीवर हजर झाला आणि रांगेत उभा राहिला. गर्दी तशी फारशी नव्हती. पाच सहाच माणसं होती रांगेत. समोरच्या भिंतीवर लावलेल्या वेगवेगळ्या सूचना वाचण्यात तो वेळ घालवत होता. पुढे सरकत सरकत जसा त्याचा दुसरा नंबर आला, तसा तो सावध झाला. आता त्याला खिडकीतल्या कारकूनाचं बोलणं ऐकू येत होतं.
” हं, पावती आणि जुनं कार्ड द्या.”
पुढच्या माणसानं पावती आणि कार्ड दिलं. कारकूनानं गठ्ठ्यातून त्याचं रेशनकार्ड काढलं.
“काय नाव तुमचं?”
पुढच्या माणसानं नाव सांगितलं. कारकूनानं प्रकरणाची कागदपत्रं पाहिली, आणि म्हणाला –
“तुम्ही आत येऊन साहेबांना भेटा.”
“आलो” म्हणून पुढचा माणूस आत जायला निघाला, तसं त्यानं आपली पावती आणि जुनं कार्ड खिडकीतून आत सरकवलं. ते घेता घेता कारकुनानं विचारलं –
“गेला का तो?”
“हो, गेला.”
“लांब गेला का?”
“हो, लांब गेला. का हो?”
“काय आहे, रेशनिंग इन्पेक्टर साहेबांनी त्याच्या अर्जावर रिमार्क मारलाय की ह्या कुटुंबातील अमुक नावाचा माणूस मयत आहे म्हणून.”
“बरं, मग?”
“त्याच नावाचा माणूस नवीन कार्ड मागायला आलाय.”
-संजीव गोखले,
१४ जून २०२२.
Leave a Reply