नवीन लेखन...

रात्र अजून भिजत होती !

रात्र अजून भिजत होती. पावसाच्या सरी एका लयीत आणि धीम्या गतीने बरसत होत्या. तो त्या पुलाचा एका टोकाला, आपल्या कारमध्ये बसून अदमास घेत होता. या पुलावर अपरात्री कोणी फिरकले अशी अपेक्षा नव्हती, तरी तो सावधगिरी बाळगून होता. पुलाखालून गढूळ पाण्याचे थैमान घालत, नदी दुथडी वाहत होती, भयाण आणि भयंकर आवाज करत, भुकेल्या श्वापदासारख्या डरकाळ्या फोडत! पुलाच्या कमरे इतक्या उंचीच्या कठड्याला लागून असलेले विजेचे खांब उजेड पडण्याचा निरर्थक प्रयत्न करत होते. त्यांच्या प्रकाशाने अंधार अधिक गडद भासत होता. रात्र किर्रर्र होती. पुलाच्या रस्त्याचे दुसरे टोक उघड्या डोळ्यांना दिसत नव्हते.

त्याने हेड लाईट न लावताच आपली कार सावकाश सुरु केली. पुलाच्या मध्यावर आल्यावर, त्याने गाडी पुलाच्या कठड्या लगतच्या एका लाईटच्या पोल जवळ पार्क केली. पोलवरील ‘पोल न. १७’ या अक्षरांनी त्याचे लक्ष खेचून घेतले. सीट बेल्ट सोडून तो गाडीतून खाली उतरला. गाडीला वळसा घालून तो डिकी जवळ आला. त्याने डिकी उघडून तेथे ठेवलेले गाठोडे बाहेर काढले. एव्हाना तो पावसाने बऱ्यापैकी भिजला होता. गार पडलेल्या त्याच्या हाताला, त्या बोचक्याची उब जाणवत होती. ‘आपण करतोय ते योग्य आहे ना?’ हा प्रश्न कितव्यांदा तरी मनात चमकून गेला. कितीही झिडकारलं तरी तो प्रश्न, लोचटा सारखा त्याच्या मनाला पुन्हा पुन्हा डंख मारतच होता! ‘या क्षणी कच खाल्ली तर आयुष्यभर पस्तावशील!’ बुद्धीचा हा घोषा कायम होता. बुद्धिनिष्ठ हीच वस्तूस्थिती होती! त्याने क्षणभर हातातल्या बोचक्याकडे टक लावून पहिले. डिकी बंद केली. बुद्धीचा कौल प्रमाण मानला. तो पुलाच्या कठड्या जवळ आला. हातातले बोचके डोक्यापर्यंत उंच उचलले. ‘अरे, थोडं थांब! पुन्हा विचार कर!’ या मनाच्या आक्रोशाकडे दुर्लक्ष करून डोक्यापर्यंत उचललेले ते बोचके विक्राळ आणि खवळलेल्या नदीच्या पात्रात फेकून दिले! मेंदूने मनावर विजय मिळवला होता! तरी त्याच्या हृदयाची धडधड कानापर्यंत धडका मारत होती!

०००

” हॅल्लो, शशांक, अरे, आहेस कोठे? भेटत नाहीस हल्ली. या शनिवारी वेळ आहे का तुला ?”

शशांक सेल्स मॅनेजर, प्रामाणिक कष्ट, अंगची हुशारी आणि कोणासही न दुखावता सोबत घेऊन जाण्याची वृत्ती, या गोष्टींनी त्याला ‘प्रॉमिसिंग ‘ यंग एक्सझेक्युटीव्ह’च्या रांगेत उभे केले होते. या तरुणाचे करियर बहरात होते. जवळचे मित्र त्याला उद्याचा CEO म्हणूनच पहात होते. शिखा सारखी सुंदर बायको, साक्षी सारखी गोड मुलगी आणि रग्गड पगारच पॅकेज! आणि काय हवाय? तरी तो पुढच्या प्रमोशन साठी धडपडत होता.

“कोण? शऱ्या!, यार, तुला सेल्स आणि मार्केटिंग मी वेगळं सांगायला नको. ‘ जीव ‘ माग देतो, वेळ मात्र मागू नकोस!”
“तुझं नेहमीच रडगाणं मला माहित आहे! पण या वेळेस तुला सवड काढावीच लागेल. पोराचं बारस परवाच झालं. आपलं सेलिब्रेशन शनिवारी ठेवलंय. तू आणि शिखावहिनी दोघेही यायचं! बाकी वश्या, दीक्षित, भास्कर सहकुटुंब येणार आहेत! आणि हो तुझी ती क्युट राजकन्या साक्षी, इज मस्ट! तिला घरी ठेवून येऊ नकोस! व्हेन्यू लिहून घे. रिसॉर्ट ‘रुद्राक्ष’. आठला अपेक्षित आहेस. बाय, शनिवारी भेटूच!” शऱ्याने शशांकचा होकार गृहीत धरून फोन बंद केला.

शशांकच्या कपाळावर आठ्या पसरल्या. या शरदच काम असच. आयत्या वेळेस ‘ये’ म्हणतो. त्याने डायरी काढली. शनिवारी सकाळी वरिष्टांन सोबत मिटिंग आणि लंच होता. पण संध्याकाळ मात्र मोकळीच होती. रविवारी पुन्हा सकाळी फॉरेन डेलिगेट्स अटेंड करावे लागणार होते.

शिखा तिच्या पहिल्या डिलेव्हरी पासून थोडीशी अबोल झाली होती. पहिलं मुलं ‘मृत’ जन्मल्याच तिने मनाला लावून घेतले होते. पण साक्षीच्या जन्मांनंतर मात्र ती बरीच सावरली होती. शशांक मात्र शिखा बद्दल, तेव्हा पासून जो हळवा झाला होता, तो आत्ताही तसाच होता. तिची इच्छा तो सहसा मोडत नसे. शरदच्या बायकोचे आणि शिखाचे, एक घट्ट नाते होते. ती तिला लहान बहीणच समजायची. शरदाचे आमंत्रण नाकारल्याचे तिला आवडणार नव्हते. दुसरे, त्याच ‘पिल्लू’ साक्षी!, शरदकाका म्हणजे तिला जीव कि प्राण! शऱ्या या पोरीसाठी काय पण करतो. ख्रिसमसला लाल कपड्यातला पांढऱ्या दाढीचा सांताक्लास होऊन गिफ्ट काय आणतो. कधी दूर बीचवर जाऊन आईस्क्रीम काय खाऊ घालतो! यांची वेगळीच गट्टी आहे. साक्षी आहेच म्हणा तशी. ती म्हणजे पाच-सहा वर्षाचं साक्षात चैतन्यच! सुंदर,गोड, तिला फुलराणी,परी,राजकुमारी हि सारी विशेषण तोकडीच आहेत! शारदकाका कडे नेलं नाही हे तिला कळले तर, तिची समज काढणे कठीण काम होते! आणि शशांकला —पण शऱ्याची कम्पनी आवडायची. शऱ्या म्हणजे गप्पांची मैफिल! या साऱ्या कारणानं साठी शऱ्याचे आमंत्रण, टाळण्या पलीकडचे होते. शशांकने डायरीत बारा जुलै शनिवारच्या समोर—-शऱ्याचे डिनर लिहून टाकले! आणि शिखाला फोन करून निरोप दिला. आजून चार दिवस बाकी होते तरी शिखाची तयारी सुरु झाली!

०००

अपेक्षे प्रमाणे शऱ्याची पार्टी धमाल झाली. शिखा आणि साक्षी जाम खुष होत्या. शशांक पण रिचार्ज झाला होता. रिसॉर्टवर मुक्कामासाठी कॉटेजस शऱ्याने बुक केले होते,पण दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारीच फॉरेन डेलिगेट्स येणार होते. त्यामुळे शऱ्याची परवानगी घेवून शशांकला परत निघाला. तसा फारसा उशीर झाला नव्हता. रात्रीचे फक्त अकराच वाजले होते. रस्ता माहितीतला होता. साठ -सत्तर किलोमीटरचा, म्हणजे तासा भराचाच तर प्रश्न होता.
शशांकने गाडी काढली. आभाळ भरून आले होते. शिखा मागच्या सीट वर बसली, कारण साक्षीला नेहमी प्रमाणे पप्पाच्या शेजारी, फ्रंट सीटवर बसायचे होते! ती आता सीट बेल्ट लावून बसण्याजोगी मोठी झाली होती. खरे तर तिच्या डोळ्यात झोप घिरट्या घालत होती. तरी पण ती हट्टाने समोरच बसली. शशांकने पण तिचे मन मोडले नाही.

“शशांक,पिल्लू समोर बसलंय,अन झोपेला पण आलाय! तेव्हा काळजीपर्वक चालावं! आणि पिल्लू, पप्पाला ड्राइव्हिंग करताना डिस्टरब करू नकोस! शशांक, मला पण झोप येतीय. मी जरा डोळे मिटून पडतीय! टेक केयर!” शिखाने नेहमी प्रमाणे सूचना दिल्या.

दोन-चार किलोमीटर गाडी आल्यावर पावसाला सुरुवात झाली. पाऊस रात्रीचा ‘पाहुणा’ असावा. त्याने आता चांगलीच लय पकडली होती. पावसाच्या सरी एका लयीत आणि धीम्या गतीने बरसत होत्या. शशांक डोळ्यात प्राण आणून, रस्त्यावर नजर रोखून गाडी चालवत होता. तो पुलाच्या एका टोकावर पोहोंचला होता. त्याने सावधगिरी म्हणून गाडीची गती कमी केली. पावसाने पुलाचे दुसरे टोक उघड्या डोळ्यांना दिसत नव्हते. पुलाच्या कठड्या लगतचे लाईटचे पोल यथाशक्ती उजेड पडण्याचा प्रयत्न करत होते. विशेष म्हणजे इतका पाऊस असूनही वीज गेलेली नव्हती. एव्हाना त्याची कार पुलाच्या मध्यावर आली होती. पुलाखालून गढूळ पाण्याचे थैमान घालत नदी दुथडी वाहत होती, भयाण आणि भयंकर आवाज करत, भुकेल्या श्वापदासारख्या डरकाळ्या फोडत!

“पप्पा!” साक्षीने थरथरत्या आवाजात हाक मारली. शशांकने गाडीतील छोटा बल्ब लावला. साक्षी सीटबेल्ट मध्ये थरथर कापत होती! तिला खूप घाम पण आला होता! कशाला तरी, ती खूप घाबरली होती! शशांकने गाडी पुलाच्या कठड्याजवळ एका लाईटच्या पोल जवळ थांबवली.

“काय झालं पिल्लू?” त्याने काळजीच्या सुरत साक्षीला विचारले.

“पप्पा मला,खूप भीती वाटतीयय!”

शशांकने तिला सीट बेल्ट मधून सोडवून जवळ घेतले.

“पिल्लू, मी आहे ना जवळ? मग कशाला घाबरतेस? तूच तर म्हणतेस ना कि ‘ माझा पप्पा, सुपरमॅन आहे म्हणून!” तिला पोटाशी घट्ट धरत शशांक म्हणाला.
“हो! मला ते माहीतच आहे! त्या दिवशी पण तूच सोबत होतास ना? तरी पण —–”
“तरी पण —! काय पिल्लू?”
“तरी पण, तूच मला फेकून दिलंस ना, या इथून, खाली, रिव्हर मध्ये! —– आज पण, नाही ना पुन्हा फेकून देणार?!!!”
शशांकला साक्षीच्या डबडबलेल्या डोळ्याकडे बघवेना. त्याच्या अंगावर सरसरून काटा आला! कपाळावर घाम जमा होऊ लागला! हातापायातले बळ कोणीतरी शोषून घेतले होते! आजही साक्षीची उब त्याच्या गार पडलेल्या हाताला जाणवत होती! अगदी तशीच त्या रात्री सारखी!!
” काय झालं शशांक? गाडी का थांबवलीस? अन पिल्लू काय करतंय तुझ्या जवळ? साक्षी, पिल्लू, तुला सांगितलं होतना, पप्पाना ड्रायव्हिंग करताना डिस्टरब करायचं नसत म्हणून. ”
“मी न एक इम्पॉर्टन्ट गोष्ट पप्पाना सांगत होते!”
” इतकं काय महत्वाचं सांगत होतीस?” शिखाने झोपाळू आवाजात विचारले.
“काही नाही! तुला नाही ठावूक! माझी अन पप्पाची एक जम्माडी जम्मत आहे!” साक्षी गोड आवाजात म्हणाली.

तशा हि परिस्थितीत शशांकचे लक्ष गादीजवळच्या लाईटच्या पोलवरील ‘पोल क्रमांक १७’ने खेचून घेतले. जणू ‘आहे ना लक्षात हा क्रमांक?’ हाच प्रश्न तो हि शशांकला विचारत होता!

जन्मजात एक पाय विकसित न झालेलं, दोन्ही डोळ्याच्या पापण्या नसलेलं कुरूप मुलं शशांक(आणि शिखातरी) कस सांभाळणार होता? म्हणून त्याने ———आणि शिखास ‘मृत मुलं’ जन्मले म्हणून सांगितले होते.

रात्र अजून भिजतच होती!

— सु र कुलकर्णी.

आपल्या प्रतिक्रियांची वाट पहातोय. पुन्हा भेटूच. Bye.च. Bye.

Avatar
About सुरेश कुलकर्णी 176 Articles
मी सुरेश कुलकर्णी. . साधारण कथा , लेख ,जुन्या सिनेमाच्या (हिंदी )गण्यावर माझे लिखाण असते . एखादे छानसे पुस्तक वाचण्यात आले तर त्यावर हि लिहतो . माझ्या वाचकास एक नम्र विनंती माझे लिखाण आवडले तरी ,आणि नाही आवडले तरी जरूर कळवा माझ्या लिखाणाचा पोत त्या शिवाय सुधारणार नाही .माझे सर्व लिखाण काल्पनिक असते .. mb.6361255994. किवा srk101252@gmail --संपर्का साठी

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..