नवीन लेखन...

अँडिझवरचे उंदीर

अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ नेब्रास्का (लिंकन) या विद्यापीठातील जे स्टॉर्झ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी यानंतर अँडीझ पर्वतातील, अतिउंचीवरील उंदरांचा तपशीलवार अभ्यास हाती घेतला. यासाठी त्यांनी अँडीझ पर्वतरागांतील ल्युल्लाइल्लॅको शिखर आणि त्याच्या आसपासच्या परिसराला भेट दिली. ही भेट म्हणजे अर्थात एक खडतर गिर्यारोहणच होतं. या गिर्यारोहणात या संशोधकांना उंदरांचे एकूण ८० नमुने मिळाले. हे उंदीर चार वेगवेगळ्या जातींचे होते. या जातींचे उंदीर ज्या उंचीवर सापडले, तितक्या उंचीवर त्या जातींचे उंदीर पूर्वी कधीच सापडले नव्हते. या चार जातींपैकी ‘यलो-रम्प्ड लिफ-इअर्ड माऊस’ या सर्वसाधारण नावानं ओळखला जाणारा उंदीर तर तब्बल ६,७३९ मीटर (सुमारे २२,११० फूट) उंचीवर सापडला. इतक्या उंचीवर आतापर्यंत उंदीरच काय, परंतु कोणताच सस्तन प्राणी सापडला नव्हता. या उंचीवर हवेतील प्राणवायूचं प्रमाण हे, समुद्रसपाटीवरील हवेतील प्राणवायूच्या तुलनेत अवघं चाळीस टक्के भरतं.

अशा अतिउंचीवर वावरणारे वेगवेगळ्या जातींचे उंदीर सापडल्यावर, जे स्टॉर्झ आणि त्यांच्या सहकारी संशोधकांनी आपलं हे संशोधन अधिक व्यापक केलं आणि इथल्याच अटाकामा पठाराच्या परिसरातील अनेक पर्वतशिखरांवरील मोहिमा हाती घेतल्या. अतिदूरपर्यंत पसरलेल्या पर्वतरांगांवरील या अवघड मोहिमांसाठी, या संशोधकांना गिर्यारोहणातील अनेक तंत्रं वापरावी लागली. यांतील प्रत्येक मोहीम ही तीन आठवडे वा त्यापेक्षा अधिक काळाची असायची. हे संशोधक आपल्या प्रत्येक मोहिमेत, कमी उंचीवरून उंदरांचा शोध घ्यायला सुरुवात करीत आणि त्यानंतर हा शोध घेतघेत शिखरापर्यंत जात असत. या मोहिमांत खडकांतल्या बिळांत, कपारींत, खबदाडींत उंदीर शोधले जायचे. सन २०२० ते २०२२ या काळात, या संशोधकांनी अटाकामा पठाराच्या परिसरातील एकूण २१ वेगवेगळी शिखरं पालथी घातली. या एकूण २१ शिखरांपैकी १८ शिखरांची उंची ही सहा हजार मीटरपेक्षा (म्हणजे सुमारे १९,७०० फूटांपेक्षा) अधिक होती. या सर्व मोहिमांत, या संशोधकांना एकूण १८ जातींच्या सुमारे ५०० उंदरांचा शोध लागला. या जिवंत उंदरांबरोबरच इथे, सहा हजार मीटरहून अधिक उंचीवर, सालिन, कॉपिपो आणि पुलर या शिखरांवर लिफ-इअर्ड माऊसचे शुष्कावस्थेतील, तेरा अवशेष सापडले. शुष्कावस्थेतील उंदरांचे हे अवशेष म्हणजे एका अर्थी, या मृत उंदरांचं ममीत झालेलं रूपांतर होतं.

आता हे उंदीर केव्हापासून इथे वास्तव्याला आले असावेत याचा अंदाज घेण्यासाठी, जे स्टॉर्झ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उंदरांच्या अवशेषांची वयं काढली. त्यासाठी या संशोधकांनी कार्बन डेटिंग या तंत्राची मदत घेतली. उंदरांच्या या अवशेषांतील किरणोत्सर्गी कार्बनच्या प्रमाणावरून ते मृत होऊन किती काळ लोटला, ते समजू शकलं. या अभ्यासातून इथल्या सालिन आणि कॉपिपो या दोन शिखरांवर सापडलेले अवशेष, हे उंदीर फक्त सहा-सात दशकांपूर्वीच मृत झाल्याचं दर्शवत होते. तिसऱ्या पुलर या शिखरावर सापडलेला उंदीर मात्र जुन्या काळातला होता – सुमारे साडेतीन शतकांपूर्वीचा. हे सर्व उंदीर लिफ-इयर्ड माऊस या प्रकारचे उंदीर होते. खरं तर हे उंदीर कमी उंचीवर आढळणारे उंदीर आहेत. पण त्यांचं वास्तव्य इतक्या उंचीवरही असल्याचं आता आढळलं होतं. पुरातत्त्वतज्ज्ञांकडून एक शक्यता व्यक्त केली गेली की, हे उंदीर पूर्वी या भागात अस्तित्वात असलेल्या इंका संस्कृतीद्वारे इथे आले असावेत. इंका संस्कृतीनुसार पूर्वी, मृतांचे अत्यंसंस्कार पर्वत शिखरांवर केले जायचे. त्यात काही प्राण्यांचे बळीही दिले जायचे. इंका संस्कृतीतील या लोकांबरोबर हे उंदीर या शिखरांवर पोचले असावेत. परंतु एक म्हणजे हे उंदीर जिथे सापडले, त्या ठिकाणांजवळ इंका संस्कृतीच्या कुठल्याही खुणा आढळल्या नव्हत्या. दुसरं म्हणजे, ही संस्कृती सुमारे पाच शतकांपूर्वीच नष्ट झाली. इतक्या प्राचीन काळातल्या उंदरांचे अवशेष इथे अजून तरी सापडलेले नाहीत. त्यामुळे हे उंदीर नक्की केव्हा इथे आले, ते यावरून स्पष्ट होऊ शकलं नाही.

जे स्टॉर्झ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी यानंतर हे उंदीर कमी उंचीवरून, थोड्या काळासाठीच या उंच शिखरांवर येत असावेत का, ते तपासायचं ठरवलं. त्यासाठी त्यांनी या अतिउंचीवरील उंदरांचं जनुकीय विश्लेषण केलं. शिखराजवळ आढळणाऱ्या उंदरांत त्यांना जनुकीयदृष्ट्या एकमेकांशी खूपच साम्य असल्याचं दिसून आलं. इतकं साम्य हे या अतिउंचीवरील उंदरांची जनुकीय उत्क्रांती, या इथेच स्वतंत्रपणे झाल्याचं दर्शवत होतं. यावरून, हे अतिउंचीवरचे उंदीर इथे तात्पुरत्या मुक्कामाला आलेले नसून, अतिउंचीवरच त्यांचं कायमचं वास्तव्य असल्याचं स्पष्ट होतं. अतिउंचीवरील उंदरांतल्या नर व माद्यांची जवळपास सारखी असणारी संख्या, हीसुद्धा या शक्यतेला दुजोरा देते. या संशोधकांनी या अतिउंचीवरील उंदरांच्या जनुकीय आराखड्याची त्याच जातीच्या, कमी उंचीवरील उंदरांच्या जनुक आराखड्याशीही तुलना केली. आश्चर्य म्हणजे कमी उंचीवरील उंदीर आणि हे अतिउंचीवरील उंदीर यांच्यात त्यांना आढळलेला फरक हा माफकच होता. साधारणपणे वाढत्या उंचीबरोबर सजीवांच्या जनुकीय रचनेत परिस्थितीला अनुसरून बदल होत जातात व त्यातून नव्या उपजाती निर्माण होत जातात. लिफ-इअर्ड प्रकारातल्या उंदरांच्या बाबतीत हा फरक दिसून येत नाही. कमी उंचीवरचे लिफ-इअर्ड उंदीर आणि अतिउंचीवरचे लिफ-इअर्ड उंदीर हे एकाच मोठ्या कुटुंबाचे घटक असल्यासारखा हा प्रकार होता!

जे स्टॉर्झ आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांचं हे संशोधन ‘प्रोसिडिंग्ज ऑफ नॅशनल अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेस’ आणि ‘करंट बायॉलॉजी’ या शोधपत्रिकांत प्रसिद्ध झालं आहे. अतिउंचीवरच्या उंदरांबद्दल या संशोधकांनी माहिती मिळवली असली तरी, त्यानंतरही काही प्रश्न मागे राहिले आहेत… त्यातला पहिला प्रश्न म्हणजे हे उंदीर जगण्यासाठी कोणता आहार घेत असावेत. कारण या अतिउंचीवर, आपलं शरीर उष्ण राखण्यासाठी बऱ्याच उर्जेची आवश्यकता असते. या ठिकाणी तर आहारासाठी पुरेसे ठरतील असे सजीव वा वनस्पतीही दिसत नाहीत. दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे, कमी उंचीवर राहू शकणारे हे उंदीर, तिथल्या सुसह्य परिस्थितीत राहायचं सोडून, इतक्या उंचीवरील प्रतिकूल परिस्थितीत का राहत असावेत? जे स्टॉर्झ यांच्यासारख्या संशोधकांना आता हे आणि इतर काही प्रश्न सोडवायचे आहेत. हे प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न जे स्टॉर्झ आणि त्यांचे सहकारी अर्थातच करणार आहेत. आणि हे प्रश्न सुटल्यावरच, या आत्यंतिक परिस्थितीत राहणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण उंदरांचं संपूर्ण चित्र स्पष्ट होईल.

(छाायाचित्र सौजन्य –  Marcial Quiroga-Carmona/Jay Storz , Mario Pérez Mamani)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..