नवीन लेखन...

मला कळलेला रावण

आजीने सांगीतलेली कथा

 

आज मला अचानक माझ्या स्वतःच्या सत्तर वर्षे वयाच्या आजीची आठवण आली. अतिशय प्रेमळ व आम्हा नातवंडावर जीव लावणारी ती होती. माझ्या वयाच्या चौदा वर्षे पर्यंत मला तीचा सहवास लाभला.  आजींच्या दोन गोष्टी मला फार आवडायच्या. एक चांगले चटकमटक खावयास नेहमी देणे. दुसरे रोज रात्री झोपण्यापूर्वी कथा सांगणे. रामायण, महाभारत यातील छोट्या छोट्या अनेक गोष्टी आम्ही ऐकल्या. दररोज  त्याच त्या कथा ऐकताना एक विलक्षण आनंद आम्हास होत असे. त्यावेळी फक्त कथा ऐकणे हे होत असे. कंटाळा केव्हांच आला नाही.

राम अतिशय चांगला, प्रेमळ, आई वडीलांना आदर देणारा हे वर्णन ऐकत होतो. त्याच प्रमाणे रावण दुष्ट होता, कपटी होता. त्याने सीतेला पळवून नेले. राम रावण युद्ध झाले. राम जींकला. दुष्टाचा नाश झाला. इत्यादी प्रसंग आजी अतीशय चांगल्या रीतीने सांगत असे. तीच्या वर्णनांत आम्ही गुंगून जात असू. शुर्पणखा रावणाची बहीण. तीने लक्ष्मणाबरोबर लग्न करण्यासाठी विचारले. ती राक्षसीन होती. लक्ष्मणाने तीचे नाक कापून टाकले. व हाकलून दिले.— किती खो खो करुन हे सारे ऐकत होतो. कां ?  कशासाठी? असले प्रश्न कधीच मनांत आले नव्हते.

वयाप्रमाणे ज्ञान वाढत गेले, आजीच्याच सांगीतलेल्या कथा शाळा, कॉलेजच्या काळांत व पूढील जीवनांत ऐकत गेलो. वाचत गेलो. सिनेमा दुरदर्शन यावर बघत गेलो. सारे प्रसंग तेच. घटना त्याच होत्या. फक्त शब्द अर्थ आणि मतीतार्थ वेगवेगळा असल्याचे जाणवू लागले. कथानकांचे मुळ शोधू लागलो. त्याच विषयांना विद्वानानी आपापल्या विचारसरणी नुसार भावनात्मक बदल केल्याचे जाणवले. तीच घटना, तेच प्रसंग परंतु कलाकाराचे संबंध वेगवेगळ्या दिशेला नेऊन ठेवल्याचे दिसले. ध्येय तेच, फक्त मार्ग बदलत होता.

रामायणातील पात्रांचा विचार करता रामाला महान,भव्य, दिव्य ह्या द्दष्टीकोणातून समजणे आवडले. परंतु रावणाच्या व्यक्तीरेखेला इतके तुच्छ लेखणे, दुष्ट म्हणने हे मुळीच पटले नाही. जशी समज वाढू लागली, विचार आला की रावणाला दुष्ट कशासाठी ठरविले. फक्त त्याने रामाची बायको सीता हीचे अपहरण केले म्हणून. विश्लेषनात्मक बुद्धीने रावणाबद्दल जेवढी माहीती लिहीली गेली, सांगीतली गेली, त्याचा अभ्यास करु लागलो.

 

२)   रावणाची तपश्चर्या 

एक उप कथानक सांगते की रावणाने ब्रह्मदेवाला अमरत्वाचे वरदान मागीतले. त्यावेळी त्याने आपले एक एक शिर कापून ब्रह्मदेवाला समर्पण केले. ९ शिर कापून समर्पण केल्या नंतर ब्रह्मदेव रावणाच्या तपश्चर्या व आन्तरीक ईच्छेवर प्रसन्न झाला. येथे जेंव्हा रावण आपले शिर समर्पीत करीत होता, त्यावेळी त्याला त्या मुखांत अवगत असलेली ज्ञान संपदा ब्रह्मदेवाच्या चरणी ठेवू लागला. हा एक महान त्याग होता. ( शिर अर्पण हे शारीरिक स्थरावरचे नव्हते. )

ब्रह्मदेवाने त्याला एका अटीवर अमरत्व मिळाले होते. त्याला एक अमृताची कुपी दिली गेली. ती त्याच्या नाभिच्या खाली ठेवली गेली.

२.                               ब्रह्मदेव रावणाला म्हणाले  ” फक्त ह्या कुपीचे रक्षण कर. तुझ्याजवळ मृत्यु येणार नाही. ही जर फुटली तरच मृत्यु ओढवेल.”   त्याचा आत्मशक्तीवर पूर्ण विश्वास होता. कुणीही त्याला हानी पोहंचवणार नाही ह्याची खात्री होती. ह्या वरदानाला त्याने गुपित ठेवले. कारण ते त्याच्या मृतुशी संबंधीत होते. फक्त एक चुक रावणाकडून झाली. तो आपला धाकटा भाऊ बिभीषण ह्याच्यावर फार प्रेम करीत असे. तसाच त्याचा त्याच्यावर खूप विश्वास होता. त्याच विश्वासाने ब्रह्मदेवाचे वरदान त्यास सांगितले. त्याच्या नाभिजवळच्या अमृत कुपी विषयी त्यास सांगितले. कदाचित् ही देखील ब्रह्मदेवाचीही ती योजना असावी कां ? कारण कोणताही मानव अमरत्व पावू शकत नसतो. कालांतराने त्याचाच तो प्रिय बंधू त्याच्या विरोधांत गेला. रामाला तो जाऊन मिळाला. रावणाच्या मृत्युचे गुपित त्यानेच रामास सांगितले. रावणाचा त्यातच अंत झाला.

एका कथा भागांत रावणाने शिवाला आपल्या तपश्चर्येने प्रसन्न केले. वरदान म्हणून शिवाचे आत्मलिंग मागीतले. ही सारी शिवाची अंतरीक शक्ती समजली जाते. हीच रावणाने मागीतली. शिवाने ती देऊ केली. रावण शिवाच्या त्या शक्तीला आपल्या जवळ बाळगण्यासाठी लंकेस घेऊन जाणार होता. शिवाने आत्मलिंग देतानाच फक्त एक अट घातली होती.   ” हे लिंग तू स्वतः बाळग. त्याला केंव्हाही जमीनीवर ठेऊ नकोस. ज्या क्षणी ते जमीनीवर टेकेल त्याची सारी शक्ती परत मज कडे येईल.”      आत्मलिंग हे जगाच्या कल्याणाच्या दृष्टी कोणातून रावणाच्या ताब्यांत लंकेत असणे हे केंव्हाही उचीत नव्हते. मग कांही घटना घडल्या. श्री विष्णूनी सुर्यप्रकाश झाकला. अंधार झाला. संध्याकाळ ही रावणाच्या संध्या करण्याची वेळ. गणपती याने ब्राह्मण बालकाचे  रुप घेतले. रावणाने संध्या होईपर्यंत शिवात्मलिंग त्याच्या हाती दिले. मी येईपर्यंत ते जमीनीवर ठेऊ नकोस हे सांगीतले. त्याच वेळी गणपती म्हणाला   ” मी तीन वेळी तूला बोलावीन. जर तू आला नाहीस तर मी ते खाली ठेवेन ”  अर्थात असेच घडले. रावणाच्या संध्येमधल्या व्यस्त असण्याचा फायदा उठवत ते लिंग जमीनीवर ठेवले गेले. ती जागा आज कर्नाटकांत मुरुडेश्वर ह्या नांवाने ओळखली जाते.

३)       रावणाचे व्यक्तीमत्व

तो एक ब्राह्मण राजा होता. त्याचे वडील विश्रवा ऋषी हे ब्राह्मण कुळातले तर त्याची आई केकसी ही दैत्य कुळामधली. रावणाचे आजोबा पुलस्ती ऋषी हे अत्यंत थोर व्यक्तीमत्व होते. ब्रह्मदेवाच्या कल्पनेतून साकारलेल्या सप्त (सात) ऋषीं मंडळातील ते एक.  हींदूनी त्याला खलनायक, एक नकारात्मक, एक प्रतिस्पर्धी, विरोधी भूमिकेमध्ये प्रक्षेपित केले गेले. रावणाचा जीवनपट एक दंत कथा असे स्थान रामायण ह्या महान ग्रंथामध्ये साकारले आहे. ह्याला एक अख्यायिका, दंतकथा वाङमय, एक पुराण समजले गेले. It is a Legend, a myth, a traditional story.

रावण” ह्या नावाचा देखील शाब्दीक अर्थ दिला गेला आहे. ” रु” रुवयती- इती- रावणाह अर्थात जो आपल्या अनुकंपेने दयाबुद्धीने देवाला प्रेम करावयास लावतो. ( One who makes god love by his compassion Actions ) रावणामधील  “रा” म्हणजे सुर्य दर्शवितो. आणि वणा म्हणजे पीढी अर्थात Generation  हा अर्थ सांगीतला

३                           रावणाचे निजी जीवन फक्त ऐकण्यासारखेच नाही. ते समजण्यासारखे, अभ्यासण्या सारखे आहे. जगाच्या इतिहासांत एवढे भव्य दिव्य व्यक्तीमत्व दुसऱ्या कुणाचे असेल असे वाटत नाही. अत्यंत धार्मिक वृत्तीचा त्याचा पाया होता. तो महान शिवभक्त होता. त्याला तपोबलाची पूर्ण जाण होती. त्यानी ब्रह्मदेवाला प्रसन्न करुन घेण्यासाठी कठोर तप केले. ब्रह्मदेवाकडून त्यानी अमरत्वाचा वर मागीतला. अमरत्व हे कुणालाही दिले गेले नव्हते. निसर्ग नियमांच्या ते एकदम विरोधी होते. परंतु रावणाची तपश्चर्या देखील दुर्लक्ष करण्यासारखी साधी बाब नव्हती.

रावणाला दशानन अथवा दशग्रीव्हा ( दशमुखी )देखील नांव पडले होते. याच्या अर्थ ज्याला दहा तोंडे मिळाली आहेत असा. दहा तोंडे ह्याचा शाब्दीक अर्थ त्याच्या महानतेकडे घेऊन जातो. रावण अतिशय विद्वान पंडीत होता. त्याला चार वेद आणि सहा उपनिषद यांचे सखोल व संपुर्ण ज्ञान होते. प्रत्येक विषयामधील एक एक विद्वान

( Total Ten Scholars ) ह्यांची बौद्धीक योग्यता केवळ एकट्या रावणामध्ये एकवटली होती. हीच १० पंडीतांची विद्वाता एकाच व्यक्तीमध्ये असल्यामुळे, त्याला १० तोंडांची उपमा दिली जाते. अविचारी लोक १० तोंडाची संकल्पना त्याच्या असूर असण्यावर लावतात. टिका करतात. त्याच्या पांडीत्याची जाण रामाला देखील होती. राम त्याला आदराने महाब्राह्मण (Mahabrahmin ) संबोधीत असे.  म्हणूनच जेंव्हा रावण शरपंजरी पडला, तेंव्हा रामाने त्याला अभिवादन केले.

रामाने लक्ष्मणालास आज्ञा केली   ” तू रावणाजवळ जा आणि रावणाकडून जीवनाचे गुपित आणि महानता ही समजून घे. ”   रामाने जो अश्वमेध यज्ञ केला होता त्याचे एक कारण होते ब्रह्महत्या दोशाचे पापक्षालन करणे हे ही होते.( ती त्या काळानुरुप संकल्पना होती. गुरु वशिष्ठ यानीच रामास तसे सुचविले होते.

रावण, लंकाधीपती, उत्युंग, भव्य, दिव्य  व्यक्तीमत्व प्राप्त रुपरेखा होता. रावणाचे पिता ऋषी विश्रवा हे वेद उपनिषीदे  ह्या शास्त्रांत पारंगत होते. त्यानीच रावणाला हे शास्त्र ज्ञान दिले. त्याच प्रमाणे शस्त्र विद्येतही तरबेज केले होते. रावणाचे एक आजोबा अर्थात आईचे वडील राजा सुमाली यानी त्याला दैत्य संकल्पनेंत शिक्षण दिले होते.

कुबेर याला देवांचा धन खजाना बाळगणारा समजले गेले. ( A treasure of God ). हा रावणाचा थोरला भाऊ म्हणजे विश्रवा ऋषींचा पहीला मुलगा होता. कुबेर हा लंकाधीपती होता. परंतु रावणाने लंकेचे राज्य मागीतले. ऋषी विश्रवा याना रावणाचे शक्तीसामर्थ व महान बुद्धीमत्ता ह्यावर विश्वास होता. यांनी कुबेराची समजुत घातली व राज्य रावणास देऊ केले.  एक मात्र सत्य होते की रावणाने लंकेचे राज्य अत्यंत यशस्वीपणे केले. सर्व गरीब जनता, सामान्यजण, धार्मिक ऋषीमुनी त्याच्यावर खूश होती. तो सर्वावर प्रेम करी. त्या काळी प्रत्येकाकडे सोन्याची भांडी होती.

त्रेतायुगाच्या मानवी वैचारीक निती अनीतीच्या संकल्पनेतील फक्त एक अघोरी व दुष्टकृत्य रावणाच्या हातून घडले. नितीमत्ता व निरोगी समाज धारणा ह्याची लिखीत वा अलिखीत मुल्ये ही सुसंस्कृतपणाची लक्षणे.  ही सनातनी व म्हणून अतीप्राचीन समजली गेली.

रावण अयुर्वेद शास्त्र ( Ayurveda Science ) संपन्न होता. त्याला राजशास्त्राचे ( Political Science ) प्रचंड ज्ञान होते. हिंदू फल ज्योतीष्य शास्त्र ( Astrology ) ह्या विषयांत तो तज्ञ होता.

रावण सहिंता (Ravana Sanhita a powerful book on the Hindu astrology) .

संगीताची त्याला खूप आवड होती. तो चांगला विणावादक कलाकार He was maestro of the VEENA  होता.

फार पुरातन संस्कृतीमध्ये अवयवांची बहूसंख्या हे दिव्यत्वाचे व त्याप्रकारच्या शक्तीचे दर्शक मानले जात असे. ( The metaphor  of supernatural number of body parts to symbolize powers is an ancient  one in Indian mythic depictions )  जसे चतूर भूजा, शष्ट भूजा, आष्ट भूजा,  दशभूजा ह्या देवदेवतांचे  स्वरुप वर्णात आहे. दोन मुखी, त्रीमुखी, चतुरमुखी हे वर्णनपण येते. हे सारे शक्ती, बुद्धी ह्यांचे द्योतक समजले जात असे. रावणाचे  वर्णन दशानन हे देखील ह्याच संदर्भात प्रसिद्ध पावले आहे. ” दहा विद्वतापूर्ण बुद्धीमत्तेचा ठेवा ”   ही त्यामागची संकल्पना होती. रावण विरोधकानी त्यात वैचित्रता आणून त्याला दहा तोंडाचा आसूर हे नाव त्याच्यावर थोपविले.

काहीं इतिहास संशोधक रावणकथा ही पौराणीक न समजता घडलेला इतिहास मानतात. त्यांच्यामते हा काळ इ.स. पूर्वी २५५४ ते २५१७ B.C. ह्या काळातील असावा.

तिबेटमध्ये हिमालयाच्या पर्वतमय उंच पठारी प्रदेशांत कैलास पर्वतानजीक मानसरोवर हा प्रचंड मोठा पाण्याचा साठा असलेला तलाव आहे. ते पाणी अतिशय चवदार व गोड आहे. त्याच्याच शेजारी तसाच एक मोठा पाण्याचा साठा असलेला तलाव आहे. मात्र हे पाणी खारे आहे. जगामध्ये एक वैचित्रपूर्ण आणि विशीष्ठ असा हा परिसर. जेथे प्रचंड व्यासाचे दोन तलाव जवळ जवळ आहेत. एकाचे पाणी गोड तर दुसऱ्याचे खारे. ह्याच परिसरांत रावणाने तपश्चर्या केली होती असे म्हणतात.         ( खाऱ्य़ा पाण्याच्या तलावाला कांहीनी राक्षसताल नांव दिले.)

 

दसऱ्याच्या मुहूर्तावर चांगल्या वृत्तींचा वाईट वृत्तींवर विजय ( Symbolization of Triumph over Evil ).   हे व्यक्त करण्यासाठी रावणप्रतीमा करुन तीचे दहन करतात. ही एक सामाजीक प्रथा झालेली आहे. हा ज्याचा त्याचा वैयक्तीक विचार असू शकतो. आपल्याकडे वाईट विचारांचे प्रतिकात्मक दहन  “होळी पेटवून ”  त्यामध्ये केली जाते. प्रत्येकजण ह्या रुढीमध्ये सहकार्य करतो. त्यांत उत्साह, आनंद, आणि वाईट गोष्टी सोडून देण्याची मानसिकता व्यक्त केली जाते. वाईट वृत्तीचे दहन त्या होळीला देवी समजून समर्पण केली जाते. त्यांत कुणा व्यक्तीला टार्गेट केले नसते. दुर्दैवाने कांही लोक रावणाच्या प्रतीमेचे दहन करतात. अर्थात हा प्रतीमा दहन कार्यक्रम खूपच सिमीत आहे. कारण कोणत्याही वाईट विचारांचे दहन मान्य. परंतु अनेक विद्वान समाजमने रावणाच्या प्रतीमा दहनाला मान्यता देत नाही. फक्त ती रुढी पडली आहे जी लोप पावत आहे.

थायलंड मध्ये रावणाचे शिल्प आढळते. त्याचे शिवभक्त  म्हणून शिवलिंगासह कलाकृती आहेत. काकींद्रा, आंद्रप्रदेश येथे त्याची पूजा कोळी समाज करतो. हजारो कन्याकुब्जा ब्राह्मण समाज त्याला देव मानतात. ही वस्ती मध्य प्रदेशातील विदीशा रावणग्राम नेत्रात येथील आहे. त्याला दररोज जेवण्याचा भोग दिला जातो. राजा शिवकरण याने रावणाचे मंदीर उत्तर प्रदेशांतील कानपूर येथे बांधले होते. हे फक्त वर्षातून एकदा दसऱ्याच्या दिवशी उघडले जाते. त्याची पूजा अर्चा होते. गुजराथ मधील दवे ब्राह्मण जे मुद्गल गोत्राचे आहेत ते स्वतःला रावणाच्या वंशाचे समजतात.

५                               एक प्रचंड समुदाय असा आहे की जो रावणाला देवत्व देणारा आहे. इतर देवांसारखी त्याचीपण व्यवस्थीत व नियमीत पुजा केली जाते. प्रार्थना होते. खाण्याचे भोग लावले जातात. विशेष म्हणजे आपल्याच देशांत नव्हे तर अनेक देशांत केल्याचे दिसते.

 

४      सीता हरणाचे सत्य अर्थात  शुर्पणखाची एक सुडकथा

 

विचार व भावना यांचा संघर्ष हा तर  देहाचा प्राथमिक गुणधर्म असतो. निसर्ग वा ईश्वर निर्मित ह्या गोष्टी जीवन जगण्यांत प्रामुख्याने भूमिका करतात. रावणाच्या एका भावनीक लाटेमधून जे तुफान निर्माण झाले, त्याने संपूर्ण रामायण पिंजून काढले. सीता हरण        अर्थात सीतेला पळवून नेणे ह्या घटनेमुळे.

त्या काळच्या अत्यंत हीन समजल्या गेलेल्या, प्रसंगाने एक काळ्याकुट्ट इतिहासाची नोंद झाली. सुर्याच्या महान प्रकाशाला सुद्धा रात्रीच्या अंधाराने झाकून टाकावे, तसेच कांहीसे हे घडले असे वाटते. रावणचेही व्यक्तीमत्व सुर्याप्रमाणे प्रखर व दिव्य होते. ते जाणले पाहीजे. रात्रीच्या अंधाराची संकल्पना ही त्यासाठी बाजूस सारावी लागेल अथवा दु्र्लक्षीत करावी लागेल. तरच रावणाच्या अप्रतीम श्रेष्ठत्वाला न्याय देता येईल.

रामायणातील एक प्रसंग अत्यंत महत्वाचा समजला जातो. सीता हरण ह्यावर सतत चर्चा होते. रावणाच्या संपूर्ण कालखंडात त्याच्या वैयक्तीक जीवनावर आघात करणारा हा एक डाग समजला जातो.

रावणावर जो टिकेचा गदारोळ केला जातो, त्याचे सर्व दिशानी दिसणारे पैलू अभ्यासले पाहीजे. त्याला सीता हरण टाळता आले असते कां ? प्रत्येक व्यक्ती निसर्गाने देऊ केलेल्या मुळ स्वभाव गुणधर्मावरच अवलंबून असतो. परिस्थिती प्रमाणे तो त्यांत फरक करण्याचा प्रयत्न करतो. घटना घडतात त्याला फक्त तीन कारणे असतात.

१ वातावरण जे निसर्ग निर्मित असते.

२ परिस्थिती जी मानव निर्मित असते.

३ व्यक्ती स्वभाव विशेष.

सीता हरणाच्या घटणेत ह्याच कारणांचा उहापोह व्हावा. तेंव्हा लक्षांत येईल की निसर्ग, मानव व रावण ह्यापैकी कुणाचे वर्चस्व ती घटना होण्यामध्ये प्रमुख होते.

प्रथम प्रमुख संदर्भ कथाप्रसंगाचा वेढ घेऊ.

राम लक्ष्मण सीता हे वनांत होते, त्यावेळची ही गोष्ट.

लंकेचा राजा रावण, याच्या लहान बहीणीचे नांव मिनाक्षी. ती अतीशय सुंदर होती. तीचे डोळे मत्सा अर्थात माशाप्रमाणे होते, म्हणून तीचे नांव मिनाक्षी ठेवले. सौंदर्याचा अभिमान, प्रचंड अहंकार, हट्टीपणा, आणि आवडलेली कोणतीही गोष्ट हस्तगत करण्याची जीद्द हे तीच्या स्वभावांत होते. मिनाक्षीमध्ये आई केकसी दैत्य व वडील ऋषी विश्रवा ब्राह्मण , म्हणून ह्या दोघांचे वैचारीक व भावनिक गुणधर्म उतरले होते. एक गमतीची गोष्ट म्हणजे तीची नखे पसरट सुपाप्रमाणे होती ( winnow- like nails ). ती तिक्ष्ण होती. म्हणून तीचे टोपण नांव

शुर्पणखा पडले. ह्याच नांवाने ती पूढे ओळखली जावू लागली.

 

६                        तीने लक्ष्मणाला बघीतले. ती लक्ष्मणावर मोहित झाली. तीने लक्ष्मणाकडून प्रेम व तीच्याशी विवाह करण्याची अपेक्षा व्यक्त केली. लक्ष्मणाने तीचा विचार फेटाळून लावला. दोघांचा वैचारीक संघर्ष झाला. लक्ष्मण हा त्याच्या विचारावर ठाम होता. तर ती अत्यंत आग्रही होती. तीची आई केकसी दानव कुळातली असल्यामुळे मिनाक्षीतही असूरी वृत्ती आली होती.

ती गर्व, अभिमान, व अहंकार याने ती भारलेली होती.

लक्ष्मण आपल्या विचाराला साथ देत नाही, हे समजताच ती आक्रमक झाली. घटनेचे रुपांतर हातघाईवर झाले. लक्ष्मणाच्या हातून तीला शारिरीक इजा झाली. तीच्या चेहऱ्यावर वार लागला. नाकाला दुखापत झाली. शुर्पणखा किंचाळत तेथून पळून गेली. ती खवळली होती. सुडाने पेटली होती. तीच्यावर वार करणाऱ्याला नष्ट करण्याचे तुफान तीच्यांत पेटले होते. पण तशी ती असाहाय्य होती.

ती त्याच क्षणी तीचाच भाऊ रावण याच्याकडे गेली. नुकताच घडलेला सर्व वृतांत त्याला सांगितला. तीने त्याच्याकडे मदतीची अपेक्षा केली. रावण लंकाघीश होता. एक पराक्रमी बलाढ्य होता. युद्धांत त्याने सर्व देवाना देखील पराजीत केले होते. नवग्रह यांना बंदी केले होते. त्याक्षणी त्याकाळी रावणाला आपल्या सामर्थ्याची जाण होती. त्याच बरोबर प्रचंड आत्मविश्वास त्याच्याजवळ होता. बहीण शुर्पणखा हीची विटंबना झालेली त्याच्या लक्षांत आली. परंतु हा संघर्ष केवळ त्यांच्यातील दोघांचा होता.

 

एका बलाढ्य राजाने तीच्यासाठी ह्या अवहेलनेत सहभाग घ्यावा ही अत्यंत क्षुल्लक बाब त्याचासाठी होती. त्याने स्वताः कोणतीही मदत देण्यास ठाम नकार दिला. शुर्पणखा निराश झाली. रावणाकडून तीला मदत मिळण्याची शक्यता नव्हती मात्र ती चतूर होती, शाहाणी होती थोडीशी राजकारणीही होती. तीने रावणाला दुसऱ्या मार्गाने छेडण्याचा प्रयत्न केला. ती म्हणाली  ”  रावणा एका गोष्टीची मी तुला आज आठवण देऊ इच्छीते. रामाची पत्नी सीता ही त्यांच्या बरोबर आहे. ती अतीशय देखणी आहे. सुंदर आहे. तुला ती तुझी राणी म्हणून खूपच शोभणारी आहे. तू तीला घेऊन ये. वेळ पडल्यास तू तुझ्या बळाचा शक्तीचा वापर कर. ”           रावणाला हा सल्ला मुळीच आवडला नाही. रावण एक महान राजा होता. मन्दोदरी ही त्याची पत्नी होती. महाराणी होती. तो तीला अत्यंत आदराने व प्रेमाने वागवीत असे.

मन्दोदरी देखील एक आदर्श स्त्री म्हणून समजली गेली. तीचे नांव पंचकन्या म्हणून प्रसिद्ध आहे. मान्यता पावलेली आहे. ( तारा, सीता, मंदोदरी, अहील्या, द्रौपदी ).

अशा महान मन्दोदरीचा रावण हा पती. रावण चवचाल, वाईट नजर असलेला कोठेही संदर्भ रामायणात नाही. शुर्पणखेच्या विचीत्र व विक्षीप्त अशा विचारसरणीला रावणाने रागाने धुडकावून लावले. शुर्पणखा निराश झाली. तरीही तीने आपला विचार सोडला नाही. ती अतीशय चाणाक्ष्य होती. तीचे सर्व वार खाली जात होते. हे जाणून तीने वेगळीच चाल खेळली. तीला हे संपूर्ण माहीत होते की रावण तीचा भाऊ जेवढा पराक्रमी तेवढाच अत्यंत अहंकारी व अभिमानी स्वभावाचा आहे. तीने शांत होत त्याला एक आठवण करुन दिली. त्याच्या मनाला छेडले.      ”   रावणा आठव तुझा त्या सभाग्रहांत झालेला उपमर्द. तु जनक राजाच्या मुलीच्या स्वयंवरासाठी गेला होतास. तेथे ठेवलेल्या शिवधनुष्याला प्रत्यंचा बांधणे हा पण ठेवलेला होता. दिसायला सोपा परंतु अत्यंत आवघड ही गोष्ट होती. तेथील जमलेल्या कुणालाही ते धनुष्य  किंचीत देखील हालवता आले नव्हते. तू तो प्रयत्न केलास.

तू ते धन्युष्य  उचललेस. त्याला प्रत्यंचा लावण्याचा प्रयत्न करु लागलास. परंतु ते प्रचंड जड असल्या कारणाने तुझा तोल गेला. तू पडलास. सारी सभा, तेथील जमलेले राजे तुला हासले. त्या हासण्यांत वधू मुलगी सीता ही देखील सहभागी झाली होती. ती पण कुत्सितपणे हासली. तुझा असा अपमान झाला होता. ते अपयश हा एक डाग होता.  ” मी याचा बदला घेईन ”  अशी गर्जना करीत तू त्यावेळी स्वयंवर मंडप सोडून गेलास. आठव ते सारे. जागृत कर तुझ्या ठेच पोंहोंचलेल्या स्वाभिमानाला. ज्या स्त्रीने तुझी हेटाळणी केली,  त्यावेळी जी तुला हासली तीच सीता मला वनांत दिसली. ती राम लक्ष्मणाबरोबर आहे. मला दिली गेलेली वागणूक कदाचित् तुला क्षुल्लक वाटेल. भले तू राम लक्ष्मण यांना कोणतीही शिक्षा करु नकोस. परंतु त्या सीतेला प्रथम लंकेत घेऊन ये. तीला बंदीवासांत ठेव. तीला योग्य ती शिक्षा कर. हेच तुझ्या जनक राज्याच्या दरबारांत स्वयंवराच्या वेळी झालेल्या अपमानाचे परिमार्जन असेल.  ”

रावण हे सर्व वर्णन ऐकत होता. त्याच वेळी तो शिवधनुष्य पेलता न आल्यामुळे पडला, सभागृहातील इतर राज्यांचे हासणे, सीतेचेही कुत्सीतपणे बघत हासणे, हे प्रसंग आठवू लागला. त्याचा अहंकार चेतावला गेला. बहीणीच्या विचारामधला गर्भीत आशय त्याच्या लक्षांत आला. राम लक्ष्मणाचा येथे कोणताच सहभाग नव्हता. त्यांच्याशी संघर्ष करण्यासारखे त्याला कांहीच वाटले नाही. मात्र जो त्याचा अपमान सीतेकडून स्वयंवरप्रसंगी झाला, तो दुर्लक्ष करण्यासारखा   नव्हता.

तीला लंकेच्या एका महान राजाचा अपमान करण्याची सजा दिली गेलीच पाहीजे. रावणाच्या मनांत हे पक्के झाले. आत्मविश्वास, सैनबळ, युद्धनिती, ही रावणाची नेहमीची चाल असे. परंतु ह्या गोष्टी त्यानी टाकल्या. शिवाय राम लक्ष्मण ह्याना तो फक्त दोन विरपुरुष समजत होता. ते फार पराक्रमी आहेत असा कोणताच प्रभावी प्रसंग तोपर्यंत दिसण्यांत आला नव्हता. त्यांच्याशी युद्ध करण्याची संकल्पना त्याला त्याक्षणी आलीच नाही. त्याचे फक्त एकच ध्येय बनू लागले. आणि ते म्हणजे सीतेला लपून, पळवून आणणे. व बंदी करणे. राम लक्ष्मणाशी संघर्ष टाळणे. येथेच त्याने कपटनिती अनुसरली. शुर्पणखेच्या विचारांना त्याने एका दृष्टीकोणातून मान्यता दिली.

त्या तथाकथीत कुकर्मासाठी तो एकटाच निघाला. फक्त एक सहकारी त्याचा मामा मारीच  ह्याला त्याने बरोबर घेतले. ते ह्या साठी की एखादे मायावी रुप घेऊन राम लक्ष्मणाला सीतेपासून तात्पूरते अलग करता यावे. आणि तसेच घडले देखील.

मारीच ह्याला मायावी शक्ती आवगत होती. तो सुवर्ण हरीण बनला. सातेच्या हट्टापायी राम त्याला पकडण्यासाठी धावला. रामाचा आवाज काढीत त्याने लक्ष्मणाला मदतीला बोलाऊन घेतले.  अशा तऱ्हेने मारीचने राम लक्ष्मणाला सीतेपासून वेगळे केले.

रावणाने साधूचा वेष धारण केला. कारण सीतेला त्याचा विश्वास वाटावा. लक्ष्मणाने आपल्या दिव्य शक्तीने सीतेच्या रक्षणासाठी झोपडी भोवती आखलेली लक्ष्मण रेषा  ह्याची पण जाण त्याला आली होती. त्यानेच सीतेला भिक्षा देण्यासाठी पद्धतशीर ती लक्ष्मणरेषा ओलांडण्यासाठी उद्युक्त केले. ह्याच दुर्दैव क्षणाला सीता फसली. ती जीवनांत येणाऱ्या संकटाला समजू शकली नाही.  ती जागृत राहीली नाही. गाफील राहीली. हीच सतर्क न राहण्याची तीची चूक तीला पुढील संपूर्ण आयुष्यभर भोगावी लागली. थोड्याशा चुका, छोटासा चुकीचा अंदाज, अविच्यारी निर्णय, जीवनामध्ये कसे तुफान निर्माण करतो हे ह्याचे उदाहरण.

अशीच अनेक उदाहरणे आपण सतत बघत असतो. अनुभव घेत असतो. हे सत्य आहे. आपल्या अशा चुकांचे बोल आपण नशीबाला, दैवाला लावतो. कारण ही वृत्ती व प्रवृती असते. कुणीही त्याची जीम्मेदारी स्वतःवर घेत नसतो. येथे तर सीता ही महान व दिव्य भूमिकेतली होती. मग सारे खापर रावणाच्या माथी मारणे सहज व सोपे होते.

रावणाने डाव साधला. सीतेला शक्तीनीशी उचलले. पुष्पक विमानानी आकाशमार्गे तो तेथुन निसटला. थेट लंकेत आला. रावणाने सीतेला बळजबरीने पळविले. हे सत्य होते. परंतु त्याने तीच्यावर कोणतीही जबरदस्ती केली नाही. कोणताही अतिप्रसंग केला नाही. अथवा विनयभंग केला नव्हता. लंकेला सीतेला बंदीस्त करुन वेगळे अशोक वनांत ठेवण्यांत आले. तीला राजमहलमध्ये केंव्हाच ठेवले नव्हते. ज्या परिसरांत राजा रावण स्वतः रहात होता, त्या वास्तुपासून दुर अंतरावर त्याने सीतेची राहण्याची सोय केली होती. अशोक वनांत अनेक फळझाडे, फुलझाडे, लता वेली, पशुपक्षी, पाण्याचे झरे इत्यादी यांचा विलक्षणसुंदर निसर्ग निर्मण केला होता. त्या आनंदमय वातावरणांत सीतेला प्रसन्नतेने राहता येईल याची सर्वतोपरी काळजी घेतली गेली. अनेक दासदासी यांचा पहारा तीच्या सभोवताली ठेऊन तीच्या रक्षणाची संपूर्ण काळजी घेतली जात असे. ( दुर्दैवाने ह्या दासीना राक्षसीनी ही उपाधी लाऊन त्या वातावरणाला दुषित करण्याचा प्रयत्न केला गेला. ) सीतेच्या सहवासांत असलेल्या रावणाच्या सेविकांनी सीतेला अतिशय प्रेम जीव्हाळा व आदराची वागणूक दिली.

तीच्या सर्व वैयक्तीक गरजा सतत पूर्ण करण्यांत लक्ष दिले. अर्थात ह्या सर्व बाह्य सुखसोई केलेल्या होत्या. तरी सीता स्वतःला निराश, दुःखी, असहाय्य आणि सतत असुरक्षीत समजे. ती आनंदी केंव्हाच झाली नाही.

झालेल्या अपमानाचा बदला, एक सुडाची तिव्र भावना, अहंकाराला बसलेली ठेच, ह्याचा प्रचंड मानसिक परीणाम रावणाच्या मनावर होणे केव्हांही गैर म्हणता येणार नाही. ती एक मानवी जीवनाची नैसर्गिक प्रतिक्रीया म्हणावी लागेल. रावण हा कांही संतमहात्मा नव्हता.की त्याने पडती बाजू घेत उदारमनाने सर्व सहन करावे. एक बलाढ्य पराक्रमी राजा, त्याच्या हातून अशाच प्रकारे होणार हे निरीक्षण असते. परंतु तो जेंव्हा राजा ह्या भूमिकेमधून सिंहासनावरुन उतरतो व रावण ह्या भूमिकेत येतो, त्यावेळी त्याच्या स्वभाव विशेषावर प्रकाश टाकणे योग्य होईल. सीतेला त्याने अत्यंत सन्मानाने अशोक वनांत बंदीस्त केले होते. तीच्यावर केंव्हाही, व कधीही अत्याचार, अन्याय, जबरदस्ती, वा भावनीक हल्ला केला नाही. तीला केव्हांही स्पर्श देखील केला नाही. सीतेला तीच्या विचारांचे संपूर्ण स्वातंत्र दिले गेले होते.

जर सीतेचा सहकार असेल, मान्यता असेल, उत्स्फूर्त इच्छा असेल तरच रावण तीला राणी मंदोदरीच्या रांगेत बसण्याची परवानगी देणार होता. राणीचा सन्मान मिळणार होता. रावण शक्तीशाली होता. लंकाधीश राजा होता. सीतेवर बळजबरी करुन हे त्याला साध्य करणे ही क्षुल्लक बाब होती. परंतु रावणाच्या महान व अध्यात्मिक व्यक्तीमत्वाला हे केव्हांच मान्य नव्हते.

रामायणाचा शेवटचा संदर्भ समजणे महत्वाचे ठरते. घडत जाणाऱ्या सर्व प्रसंगाच्या शेवटी जी घटना घडली ती देखील चिंतनीय बाब ठरते. राम रावण युद्ध झाले. रावण मारला गेला. सीतेची सुखरुप सुटका झाली. आयोध्येला परतण्यापूर्वी रामाने सीतेच्या पावित्र्याची शंका घेत, अग्नी परीक्षा घेतली.

सीता त्यांत यशस्वी झाली. ती संपूर्ण पावित्र्याची देवता ठरली. सीतेची  अग्नीपरीक्षा ही जशी तीची महानता दर्शीत करते, त्याच प्रमाणे ती राजा रावण ह्याच्या बंधणात देखील किती सुरक्षीत होती व पवित्र जीवन जगू शकली हे तिव्रतेने दाखविते. राजा रावण ह्याची महानता आपण खऱ्या अर्थाने जाणली पाहीजे.

 

विरोध-भक्तीतून मुक्ती      

आत्मिक स्थरावर विचार करता, सत्य स्थिती अशी आहे की रावण रामावर प्रेम करीत होता. त्याला रामाविषयी नितांत आदर होता. कारण –

 विरोधा-भक्तीतून मुक्ति

 भक्ति करुन प्रभुसी मिळवी   दिसले आम्हां ह्या जगती

परि त्याचाच विरोध करुनी   कांहीं पावन होऊन जाती

लंकाधिपती रावणाने     रोष घेतला श्रीरामाचा

जानकीस पळवून नेई     विरोध करण्यास प्रभूचा

झाली असतां आकाशवाणी    कंसास सांगूनी मृत्यु त्याचा

तुटून पडला देवकीवरी     नाश करण्या त्याच प्रभूचा

प्रभू अवताराचे ज्ञान होते    परि विरोध करीत राही

होऊन गेले तेच प्रभूमय    सतत त्याचाच ध्यास घेई

रोम रोम तो शोधत होता    कोठे लपला आहे ईश्वर

भक्ति असो वा विरोध असो    तन्मयताच करी साकार

 

रावणाला स्वतःला ह्याचे ज्ञान होते की ” राम ” हा विष्णूचा अवतार आहे. तो मानवी रुपांने लंकेत येणे, त्याचा सहवास लाभणे ही रावणाची अंतरीक ईच्छा होती. जीवनाचे जे अंतीम ध्येय जे धर्माने सुचविले ते जन्म-मरण चक्रातून मुक्ती. ही अत्यंत अवघड गोष्ट आहे. त्या ईश्वराच्या प्रत्यक्ष हातून जर मृत्युलाभ झाला तर त्यालाच हे साध्य होऊ शकते. रावण महा पंडीत, तत्ववेत्ता, ब्रह्मज्ञानी होता. ब्रह्माच्या वरदानाने त्याने अमरत्व हा वर स्वतःच्याच हाती ठेवला होता. त्याच्या नाभीजवळ ठेवलेल्या अमृत कुपी मुळे. ती फक्त रामाच्याच बाणाने फूटली जावी ही त्याची संकल्पना. ह्यासाठी त्याने त्याच्याकरीता सुयोग्य परंतु यशस्वी योजना व प्रयत्न केले. त्यांत होती  ” विरोधाभास भक्ती. ”   रावणाने रामाचा प्रचंड असा विरोध केला. त्यासाठी त्याने अपप्रवृतीचा, दुष्टता, असहीष्णूता, तिकस्कार या मार्गाचा अवलंब केला. जगाच्या इतिहासांत परमेश्वर प्राप्तीसाठीचे जे भव्य दिव्य प्रेमाने भरलेले भक्तीने ओतप्रोत समजले गेलेले मार्ग त्यानी बाजूस सारले. एकदम विरोधांत मुक्ती ही संकल्पना यशस्वी केली. कदाचित् सर्व सामान्याना ह्यांत विक्षीपतता वाटेल. परंतु रावणाने हे साध्य करुन दाखविले.

 

 

१०

 

त्याने रामाच्या आगदी  वैयक्तीक जीवनाला जाणून बुजून धक्का लावला.

 

जसे आजकालच्या काळांतील म्हण आहे

”  आ बैल मुझे मार ”   असेच.   ” सीता अपहरण ”  ही संकल्पना यातूनच उदभवली.

मात्र त्याने सीतेला आदराने, सन्मानाने, देवी शक्तीच्या स्वरुपांत जाणून वागविले. कोठेही अतीप्रसंग वा घृणा वाटेल अशी वर्तणूक दिली नाही.

फक्त मुळ उद्देश मनी बाळगून  ” रामाला विरोध करणे ” . त्याला दुःखी करणे. हे फक्त तेंव्हांच जेंव्हा त्याच्या आपल्या आदरणीय गोष्टीवर हल्ला केला जाईल. रामाच्या अहंकारावर अघात केला जाईल. तसेच घडले. रामाला लंकेत येणे रावणाने भाग पाडले. त्याच्याशी युद्ध करणे हा पर्याय करुन ठेवला. त्यांत राम विजयी झाला आणि रावणाचा अंत रामाच्या बाणाने झाला. ह्या सर्वांत रावण खऱ्याअर्थाने जींकला. रावणाने प्रथम अमरत्वाची कुपी ब्रह्मदेवाकडून मिळवली. तिचे आपल्या नाभीखाली जतन केले. आणि तिलाच श्री विष्णूचा अवतारी पुरुष राम याजकडून फोडले. हे सारे तो जाणीवेने आणि जागृकतेने करीत राहिला. रावणाने त्यातच खऱ्या अर्थाने जीवनमुक्तता मिळवून आनंद व आत्मिक चिरशांती मिळवली.

राम तर मान्यता पावलेला आदरणीय ईश्वरीय व्यक्तीमत्व होते. तरी देखील रावण ह्या महान दशग्रंथी विद्वान पंडिताला, वीर पुरुषाला समजले पाहीजे. जगाच्या इतिहासामधली एकमेव थोर व्यक्ती म्हणून त्याचे अभिवादन करावे वाटते.

 

( सुचनाः –   रावणावर केलेल्या लिखाणाचा आधार- – Google & Wikipedia)

 

 

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

e-mail-  bknagapurkar@gmail.com

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 2132 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

1 Comment on मला कळलेला रावण

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..