संगीतकार रवींद्र जैन यांचा जन्म २८ फेब्रुवारी १९४४ रोजी झाला. भावमधूर संगीताची कास कायम धरत भाषा कुठलीही असो, सहजी लोकांच्या ह्रदयाला भिडेल अशा संगीतातून त्या भावना पोहोचवणे ही संगीतकार रवींद्र जैन यांची खासियत होती. अभिनेता राज कपूर यांनी रवींद्र जैन यांना खूपच मदत केली. ‘राम तेरी गंगा मैली’, ‘दो जासूस’, ‘हिना’ अशा राज कपूरच्या चित्रपटांना जैन यांनी संगीत दिले.
राजश्री प्रॉडक्शन आणि रवींद्र जैन यांचे एक समीकरण बनले होते. याशिवाय, सुजाता, सुखम सुखकरम, आकाशा थिंटे निरम अशा प्रादेशिक चित्रपटांनाही त्यांनी संगीत दिले. हिंदी चित्रपटांमध्ये जम बसत असताना रवींद्र जैन यांनी एक वेगळा प्रयोग करत धार्मिक चित्रपट आणि मालिकांच्या गीतांना संगीत देण्यास सुरुवात केली. ‘वनरात्री’, ‘गोपाल कृष्ण’, ‘जय करोली माँ’, ‘हर हर गंगे’ अशा चित्रपटांना त्यांनी संगीत दिले. रामायण, श्रीकृष्ण, साईबाबा, श्री ब्रह्मा विष्णू महेश, द्वारकाधीश, जय गंगा मैय्या, वीर योद्धा पृथ्वीराज चौहान अशा मालिकांना त्यांनी संगीत दिले आणि मालिकांची गीतेही बरीच गाजली. दाक्षिणात्य गायक येसुदासला हिंदी चित्रपटसृष्टीत ब्रेक देण्याचे संपूर्ण श्रेय रवींद्र जैन यांना जाते. ओ गोरिया रे, बीती हुअी रात की, गोरी तेरा गाव अशी रवींद्र जैन यांनी संगीत दिलेली गाणी येसूदास यांनी गायली. त्यांनी संगीत दिलेल्या गाण्यांमध्ये सचिन आणि रंजीतावर चित्रित झालेले ‘अखियों के झरोकोंसे..’ हे गाणे खूप लोकप्रिय ठरले.
विरोधाभास एवढाच की दोन्ही डोळ्यांनी अंध असणाऱ्या या संगीतकाराने आपल्या संगीतामधून कधीच आपली वेदना जाणवू दिली नाही. सत्तरच्या दशकातील हिंदी चित्रपटांमधून रविंद्र जैन यांनी अनेक हळूवार भावगीतांमधून सुरांची पखरण केली. प्रत्येक संगीतकाराचा आपला एक आवडता गायक किंवा गायिका असते. जैन यांच्या संगीताचे नाते जोडले गेले ते गायक येसूदास यांच्याशी.. किंबहूना दक्षिणेकडच्या या गायकाला हिंदी चित्रपटांमध्ये आणणाऱ्या जैन यांचे त्यांच्याशी इतके घट्ट नाते होते की जर आपल्याला दृष्टी मिळालीच तर पहिले येसूदास यांचा चेहरा पहायला आवडेल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली होती.
रवींद्र जैन यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. बदलत्या काळानुसार त्यांनी आपल्या संगीतात बदल केला तरी त्यांनी संगीत दिलेल्या गाण्याची गोडी सुरेख होती. संगीतकार जैन यांनी फक्त चित्रपटांमधील गीतांना नव्हे तर प्रायव्हेट अल्बम, गझल, पौराणिक मालिकांनाही त्यांनी दिलेल्या संगीताला वेगळे महत्त्व होते. मा.रवींद्र जैन यांचे ‘दिल की नजर से’ हे शायरीवर आधारित पुस्तक प्रकाशित झाले आहे. शायरीवर पुस्तक लिहिणारे ते पहिले संगीतकार आहेत.मा.रवींद्र जैन यांचे ९ ऑक्टोबर २०१५ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
संदर्भ:- इंटरनेट
रवींद्र जैन यांची गाजलेली गाणी
’आजसे पहेले आजसे जादा
’गोरी तेरा गाव बडा प्यारा
जब दिप जले आना
’राम तेरी गंगा मैली,
सुन सायबा सुन
Leave a Reply