मराठी वाङ्मयातील एक लोभसवाणे आणि सर्वांचे आवडते नांव म्हणजे -रवींद्र पिंगे ! हात बहुप्रसवा आणि अतिशय प्रासादिक !! सहज सोपे लेखन -पटकन जीवाला भिडणारे . आणखी त्यांचे एक वैशिष्ट्य होते-गुणग्राहकता. एखाद्या नवोदिताचे काही चांगले कोठेही वाचनात आले की (ओळखदेख नसताना)पिंगेंचे पत्र त्या व्यक्तीला जायचे. छान रसग्रहणात्मक ! नवोदित (आपली अशी नोंद, एखादा मातब्बर साहित्यिक घेतो आहे या कल्पनेने) भारावून जायचा आणि आजन्म त्यांचा होऊन जायचा.
ही व्यक्ती सतत पायाला भिंगरी लावून महाराष्ट्रभर फिरत असे. तरीही लेखनाला त्यांना कधी वेळ मिळत असे, हे कोडेच होते.
एकदा बोरगावच्या शारदीय व्याख्यानमालेत त्यांचे व्याख्यान होते. संयोजकांनी त्यांची राहण्याची व्यवस्था आमच्या महाविद्यालयाच्या गेस्ट हाऊस वर करण्यासंबंधी आमच्या प्राचार्यांना विनंती केली. प्राचार्य जोगळेकर “काव्यशास्त्रविनोदेन “क्षेत्रातील असल्याने त्यांनी लगेच या प्रस्तावाला मंजुरी दिली आणि मला पिंग्यांच्या दिमतीला नेमले.
दुपारी पिंगे इस्लामपूरला आले. आम्ही त्यांचे स्वागत केले. गेस्ट हाऊस ला विश्रांती घेण्यासंदर्भात त्यांना सुचवले. सायंकाळी त्यांचे बोरगावला व्याख्यान होते. पण त्यांनी गप्पांचा पर्याय काढला- माझ्या मनात एक कल्पना आली. दरवर्षी महाविद्यालयाच्या नियतकालिकात आम्ही एक मुलाखत प्रकाशित करीत असू. यंदा पिंगेंची घेतली तर?
तेही तयार झाले. मी आणि माझे विद्यार्थी सज्ज झालो. आकाशवाणीवर त्यांनी अनेक वर्षे काम केले होते .
” आकाशवाणीवरील कारकिर्दीतला एखादा संस्मरणीय प्रसंग आठवतोय ? ” मी विचारले.
“दुर्गाबाई भागवतांचे एक भाषण मला रेकॉर्ड करायचे होते.बाईंचा दरारा मोठा. नुक्तेच कराडचे साहित्य -संमेलन त्यांनी (सर्वार्थाने) गाजविले होते. त्या आल्यावर मी भीत -भीत त्यांना रिहर्सल करण्याबाबत विचारले. त्या म्हणाल्या – ‘पिंगे त्याची गरज नाही. तुम्ही खूण केली की मी सुरुवात करेन आणि पाच मिनिटांनी संपवेन.”
बाईंच्या हातात कागद वगैरे काहीही नव्हते. मी खूण करताच त्यांनी डोळे मिटले. वाङ्मयाचा एक निखळ धबधबा माझ्या नजरेसमोरून वाहायला लागला.
मी भान हरपून ऐकत राहिलो. वेळ संपल्याची खूण करायचेही लक्षात राहीले नाही. पण बरोबर पाच मिनिटे संपल्यावर त्या थांबल्या. दुर्गेमधील सरस्वतीचे शांत ,विलोभनीय रूप मी अनुभवले.
“पिंगे, बरोबर झाले ना, का अजून एकदा ? ”
मी त्यांच्यासमोर हात जोडले. “बाई का लाजवताय ?” एवढेच शब्द कसेबसे बोलू शकलो.
बाई मंद स्मित करीत स्टुडिओमधून निघून गेल्या. ”
एका अभिजात साहित्यिकाकडून दुसऱ्या अभिजात साहित्यिकाला मिळालेली ही मानवंदना आमच्या नियतकालिकाच्या पानांना कायमची सुगंधित करून गेली.
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply