रवींद्र पिंगे यांचे बालपण मुंबईत गिरगावात गेले. पिंगे अर्थशास्त्राचे पदवीधर होते. त्यांचा जन्म १३ मार्च १९२६ रोजी कोकणातील उफळे गावी झाला.सुरुवातीला काही वर्षे ते रेशन विभागात नोकरीस होते. पुढे ते आकाशवाणीवर नोकरीस होते. सातत्याने “ललितगद्य’ हा वाङ्मयप्रकार हाताळणार्यात आणि आपल्या परीने त्यात भरही घालणार्या लेखकांत रवींद्र पिंगे हे नाव ठळक होते. रवींद्र पिंगे एक कृतार्थ लेखक, माणूस होते.१९७८ मध्ये प्रकाशित झालेल्या “मोकळं आकाश’ या पहिल्या ललित लेखसंग्रहापासून “शकुनाचं पान’ या ललित लेखसंग्रहापर्यंत त्यांचे एकूण तेरा संग्रह प्रसिद्ध झाले होते.
रवींद्र पिंगे दुर्बिण, कॅमेरा, टिपण वही आणि जागृत नजर घेऊन भारताच्या या टोकापासून त्या तटापर्यंत आपल्या लिखाणा साठी हिंडले. आसाम, अरुणाचल, अंदमान पाहून ते कच्छच्या चिखल-वाळूच्या रणात गेले/. नर्मदेच्या तीरावर भटकले. दक्षिणेतला श्रुंगेरीचा सुळका सर करून ते तुंगभद्रेच्या किनार्याणवरल्या श्रीशंकराचार्यांच्या मठापर्यंत पोहोचले. कृष्णेच्या डोहाकाठचं कविवर्य मर्ढेकरांचं चिमुकलं खेडं त्यांनी पाहिलं तसंच अयोध्येला जाऊन त्यांनी बंदीवान श्रीरामाला दंडवत प्रणिपात केला.
“शकुनाचं पान’ या त्यांच्या संग्रहात प्रवासवर्णनपर लेख (नर्मदेच्या उगमापाशी, मुक्काम झांशी, गणपती पुळे इ.) स्थलवर्णनपर (सानेगुरुजींचा जन्मगाव, हृदयाची हाक घालणारी ठिकाणं, अबूच्या पहाडावरील सूर्यास्त इ.), आत्मपरलेखन (माझी भूमिका, निवृत्तीतलं भाग्य, आकाशवाणीवरले उमेदवारीचे दिवस इ.) असे विविध प्रकारचे ३० लेख होते. यातील अनेक लेख वेगवेगळ्या दैनिकांसाठी, नियतकालिकांसाठी लिहिलेले असल्यामुळे छोटेखानी आहेत. विविध विषयांवरचं हलकंफुलकं प्रसन्न शैलीतलं लिखाण असं त्यांचं स्वरूप असलं, तरी लेखकाचा मराठी व इंग्रजी साहित्याचा व्यासंग त्यामधून जाणवतो. विविध संदर्भांनी या लेखनाची गुणवत्ता उंचावली आहे. विशेष म्हणजे हे संदर्भ लेखनाच्या ओघात सहजपणे येतात. गोडसे भटजींच्या “माझा प्रवास’चा उल्लेख त्यात येतो तसा प्रिस्टले, ग्रॅहम ग्रीन यांच्या लेखनाचाही येतो. वेणूबाई पानसे लिखित हरिभाऊ आपटे यांच्या चरित्राचा येतो, तसा मेरी हिगीन्स क्लार्क या अमेरिकन लेखिकेच्या “माय वाईल्ड आयरिश मदर’चाही येतो. योगी अरविंदांचा येतो तसा श्रीगोद्याच्या शेख महंमद या सूफी संतकवीचाही येतो. प्रवास करताना पिंगे यांची रसिक, जिज्ञासू वृत्ती जे टिपते ते शब्दांत उतरविण्याचे कसब “मुक्काम झांशी’, “मधुर सुखाचा नजराणा’ यांसारख्या लेखांतून नजरेत भरते. “लेखकांच्या दुनियेतला गारठा आणि ऊब’, “संधिप्रकाशातलं समाधान’, “लेखक-कलावंतांचं जग’ आणि भाषणबाजीचं भन्नाट वारं’ यांसारख्या लेखांतून साहित्यजगातल्या विसंगतीचं, विरूपतेचं दर्शन ते घडवतात. हरिभाऊ आपट्यांचं अद्भुत चरित्र’, हीरकमहोत्सवी गीताप्रवचने, “श्री. कृ. कोल्हटकरांचं आत्मवृत्त’, “आई, ती आईच’ इ. लेख म्हणजे नावीन्यपूर्ण माहितीचा खजिना आहे.
कथा,कदंबरी,प्रवासवर्णन,ललित असे विविध साहित्य प्रकार हाता़ळणारे,विविधांगी लेखन करुन आपल्या प्रतिभेचा साक्षात्कार करुन देणारे प्रख्यात शैलीदार ललित लेखक रवींद्र पिंगे यांनी ‘प्राजक्ताची फांदी’,’मोकळ आकाश’,’मुंबईचं फुलपाखरु’,’आनंदपर्व’, ‘आनंदाच्या दाही दिशा’ देवाघरचा पाऊस’ असे ३२ पुस्तकांचे लेखन त्यांनी केले होते. निवडक पिंगे या पुस्तकात मा.रवींद्र पिंगे यांनी लिहिलेल्या ३०० व्यक्तिरेखांपैकी निवडक २६ व्यक्तिरेखांचा समावेश आहे. रवींद्र पिंगे यांना आपल्या जीवनात वेळोवेळी पु. ल. देशपांडे, कुसुमाग्रज, व. पु. काळे, व्यंकटेश माडगूळकर, दुर्गा भागवत, विजय तेंडुलकर, जयवंत दळवी, मंगेश पाडगावकर, ज्ञानेश्वर नाडकर्णी, मर्ढेकर, चि. त्र्यं. खानोलकर, वसंत बापट, इंदिरा संत अशा अनेक श्रेष्ठ साहित्यिकांचा तसेच पंडित भीमसेन जोशी, कुमार गंधर्व, जितेंद्र अभिषेकी, किशोरी आमोणकर, प्रभा अत्रे, यशवंत देव, सुधीर फडके या गानतपस्वी मंडळींचादेखील दीर्घ सहवास लाभला. शिवाय प्रकाशन क्षेत्रातील केशव कोठावळे, दिलीप माजगावकर आणि श्रेष्ठ संपादक श्री. पु. भागवत, माधव गडकरी व दीनानाथ दलाल यांचा सहवास पण लाभला. या समृद्ध व्यक्तिरेखांच्या संकलनात १३ प्रसिद्ध साहित्यिक, ५ संपादक, ७ गायक आणि १ समाजसेवक अशा बहुविध क्षेत्रातील व्यक्तींचे हुबेहूब व्यक्तिपर चित्रण पिंगे यांनी आपल्या लालित्यपूर्ण शैलीत त्यांच्या स्वभावाच्या अनेक बारकाव्यानिशी तितक्याच समर्थपणे सादर केले आहे. रवींद्र पिंगे यांचे निधन १७ ऑक्टोबर २००८ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
रवींद्र पिंगे यांचे लेखन.
कादंबरी – परशुरामाची सावली
कथा – प्राजक्ताची फांदी, सुखाचे फूल
ललित लेख – मोकळं आकाश, बकुळफुलं – फुलं मोहाची, प्रकाशाची खिडकी, आनंदपर्व, रिमझिम पाऊस, मुंबईचं फुलपाखरू, आनंदाची फुलं, केशरी कमळ, सुखाचे पदर, माळावरली फुलं.
व्यक्तिरेखा – शतपावली , दिवे-लामण दिवे, तुषार आणि तारे, देवाघरचा पाऊस, अंगणातलं चांदणं, अत्तर आणि गुलाबपाणी, जिवलग सारे.
प्रवास वर्णन – आनंदाच्या दाही दिशा, आनंदव्रत, दुसरी पौर्णिमा
पाश्चात्त्य साहित्य परिचय – पश्चिमेचा पुत्र, पिंपळपान, हिरवी पानं, काही चंदेरी काही सोनेरी अनुवाद, संपादन इ.
मुंबईचे फुलपाखरू
संजीवजी नमस्कार. श्री पिंगेंविषयी अत्यंत छान माहिती मिळाली. १९९० च्या दशकात शाळा पाठ्यपुस्तकात त्यांचा एक धडा होता- ‘कोकणातले दिवस’. तो लेख त्यांच्या कोणत्या पुस्तकात आहे हे सांगू शकाल का कृपया. धन्यवाद
दोन वर्षापूर्वी त्यांचा एक पाठ इयत्ता १२ वि साठी होता तो सुखाचे पदर पुस्तकातील होता त्यात कोकणातलं वर्णन आल आहे
‘मुंबईचं फुलपाखरु’बहुतेक
मी सुद्धा तोच धडा शोधतोय…
कोकणातले दिवस….
धड्याची सुरुवात अगदी मला चांगली आठवते….
दिवस सरत्या उन्हाचे होते. आम्ही बापलेक कोकणात वस्ती करून होतो. सकाळी खरपुस पेजची भरपेट न्याहारी असायची तोंडी लावायला घेतला आंबट दही…
कोकणातले दिवस हा पाठ पुन्हा वाचन्याची इच्छा आहे. कस ते मी पूर्ण करू शकतो.
Visit ebalbharati site, go to archive, old books, select your tentative school year, select प्रथम भाषा, विषय मराठी.
बहुतेक जुनी पुस्तके pdf मध्ये उपलब्ध आहेत. इतर पुस्तके ही आहेत.