आज मराठी सृष्टीवर श्री. जयवंत वानखडे ( रहाणार : कोपरना) यांची एक सुंदर गझल (गज़ल) वाचली. कोपरना महाराष्टात कुठे आहे, मला माहीत नाहीं.( हा हन्त हन्त !) . मात्र तें, मंबई-पुणे-नागपुर-कोल्हापुर-सोलापुर-नाशिक-औरंगाबाद-रत्नागिरी वगैरेंसारखे नाहीं, हें मात्र मला कळतें आहे. वानखडे प्रोफेशननें कवी नाहींत. ते शाळेचे मुख्याध्यापक होते. हें सर्व लिहिण्यांचें कारण की, मनाला भिडेल असें कांहींहीं लिहायला व्यवसाय, निवासाचें गांव/शहर अशा गोष्टी आड येत नाहींत.
– मराठी सृष्टीच्या वाचकांनी मूळ गझल वाचावी. तसें तर, सुंदर बांधलेल्या गझला बरेच जण लिहितात, ( हें मी एक गझलप्रेमी व गझलगो म्हणुन सांगत आहे). पण त्यांतही, एखादा शेर मनाला असा भिडतो की, ‘वाह् क्या बात है!’ असा उद्गार काढणेंही आपण विसरून जातो. इथें माजें तेंच झालें.
– वानखडे यांच्या गझलचा अंतिम शेर पहा –
‘भूकेस शरण गेली आज माय कोणी
ओट्यात (ओच्यात ?) दडवलेले पाव पाहिले मी’ .
एक आई आपल्या भुकेल्या कच्चा-बच्चांसाठी, कुणीतरी तिला दिलेले , किंवा कुणीतरी फेकून दिलेले, किंवा तिनें चोरलेले, पाव दडवून नेते आहे ! चोरले असतील तर, तौ ते पाव दडवणारच. पण चोरले बसले, आणि तरीही ती दडवत असली तर तें अधिकच करुण आहे, कारण तिला त्याची स्वत:लाच लाज वाटते आहे . रस्त्यात किंवा कचर्यात कुणीतरी अर्धवट खाऊन फेकलेले पाव, किंवा बुसटलेले म्हणून कुणीतरी फेकून दिलेले पाव नेणें, हें लज्जास्पसदच की ! गरिबांनाही अब्रू असतेच ! फक्त , ती त्यांना गुंडाळून बाजूला ठेवावी लागते,केवळ नाइलाजानें.
– भारतातील बहुतांशी अस्तित्वात असलेल्या या ‘कुरूप सत्या’चें ( अग्ली ट्रुथ) वानखडे यांनी अल्प शब्दांमध्ये अगदी तथार्थ दर्शन घडवलें आहे.
– आपण सिनेमात अशी दृश्यें पाहतो , की एका कुणीतरी ( सहसा लहान मुलानें किंवा मुलीने, किंवा आई किंवा बापानें, ) एक पाव चोरला, मग मार खाल्ला , वगैरे वगैरे. त्यावेळी आपण तें दृश्य पाहतो, आणि नंतर विसरूनही जातो, कारण सिनेमा हा केवळ कल्पनेचा खेळ आहे ! मात्र, वानखडे यांनी केलेला उल्लेख वाचला तर स्पष्ट जाणीव होते की हें, आणि केवळ हेंच, आपल्या देशातले सत्य आहे!
आज आय्. टी. वगैरेंमुळे मध्यमवर्गीयांना भरपूर पगार मिळताहेत ( अर्थात, माझी त्याबद्दल अजिबात तक्रार नाहींच ), पण होतें काय की , त्यामुळे, देशातील अन्यांच्या दैन्यावस्थेकडे आपलें दुर्लक्ष तर होत नाहीं ना ? अशा वेळी वानखडे यांचा शेर आपल्याला अंतर्मुख करतो; मला केलें, तुम्हांलाही करेल.
– या प्रसंगीं मला असाच एक शेर आठवला, जो मी बर्याच वर्षांपूर्वी वाचला होता, हृदयाला भिडला होता, व आजही तो माझ्या मनावर परिणाम करतो. श्री. अनिल कांबळे यांच्या एका गझलमधील तो शेर असा आहे –
‘खोकल्यानें बाप मेला, माय आजारात गेली
घेउनी देहास आपल्या, लेक बाजारात गेली’
किती विदारक सत्य ! नेकेड-अग्ली ट्रुथ !
– अखेरीस : ‘सोशली सिग्निफिकंट’ शेरासाठी वानखडे यांचे अभिनंदन आनि आभारही.
— सुभाष स. नाईक,
मुंबई, पुणें.
९८६९००२१२६