शहापूर जिल्हा ठाणे. शासकिय ग्रामीण रुग्णातयांत वैद्यकीय अधिकारी असतानाचा प्रसंग. शवविच्छेदनासाठी एका पन्नाशीतील व्यक्तीचा मृतदेह आणला होता. पोलीस पंचनामा रिपोर्ट वाचला. त्या प्रमाणे घटनेचा तपशील अंतर्मुख करायला लावणारा खचितच असा होता.
भास्कर बहिर व त्याचा मित्र सुनील जाधव दोघेजण बागेतील एका बाकड्यावर बसले होते. मंद मंद वारे वाहत होते. भास्करला आळस आला होता. आळेपिळे देत शरिराला शिथील करण्यासाठी त्याने तोंड उघडून वर बघत जांभई दिली. अचानक त्याचक्षणी हवेमुळे उडत आलेली एक छोटी वस्तू त्याच्या तोंडात शिरली. बघता बघता ती गिळले जाऊन घशांत शिरली. त्याने भास्कराला श्वास घेणे कठीण करून टाकले. भास्करची तगमग झाली. खोकून ओकून ते काढण्याचा प्रयत्न झाला. तोंडात बोटे घालून ते काढणे व श्वास मोकळा करणे याची घडपड केली गेली. कांही मिनीटे तडफड झाली. सुनील जाधव भास्कराला त्याच्या श्वासोच्छास करण्यासाठी आपल्यापरी मदत करु लागला. जवळचे इतरही जमले होते. कुणी वारा घाल, कुणी त्याची छाती दाबून कृत्रिम श्वासोच्छास करण्यास मदत कर, हवा घाल, तोंडावर पाणी मार हे झाले. एकाने तर कांदा आणून फोडून नाकाला लावला. परंतु सारे सारे प्रयत्न व्यर्थ गेले. कांही हलचाली वा रुग्णालयीन मदत मिळण्यापूर्वीच , एक सशक्त आणि निरोगी भास्करचा,केवळ थोड्याश्या मिनीटांत अंत झाला.
खूप बारकाईने शवविच्छेदन ( Post Mortem ) केले गेले. विच्छेदनांत त्याच्या शवनलिकेच्या सुरवातीच्या तोंडावर, स्वरयंत्राजवळ Near the Vocal Cord एक झाडाचे छोटेसे पान दबून बसलेले सापडले. त्याला व्यवस्थीत काढून बाटली मधील फॉर्म्यालीनमध्ये (Formalin) सीलबंद केले.
एका मृत्युला कारणीभूत होणारे ते पान होते. मी बारकाईने त्या पानाचे निरीक्षण करु लागलो.
माझ्या डोळ्याना दिसले नाही. परंतु निश्चीत भासले की त्या पानांत काळपुरुष लपून बसला होता. वेळेची त्याला चाहूल लागतांच त्याने अलगदपणे झडप घातली.
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
Leave a Reply