नवीन लेखन...

शेतकरी पाल्यांचे शिक्षणवास्तव

दरवर्षी शालेय सत्राच्या सुरूवातीस जशी मुलांची, पालकांची शाळासुविधेसाठी धावपळ असते. तशीच रानातदेखील शेतकर्‍यांची धावपळ सुरू होते. नवा वर्ग, नवे मित्र, नवी शाळा, नवे दप्तर , नवे कपडे. सारे काही नवे नवे. या नवेपणाच्या नवलाईत खूप काही बाबी लक्षात घ्याव्या लागतात. शेतातही तसेच असते. नवा पाऊस, नवी पालवी, खते पिके आणि नवे बियाणे.

हा काळ महत्वाचा याचसाठी की नविन काही करताना, निवडताना काळजी घेणे गरजेचे ठरते. शेतकरी वर्ग दिवसेंदिवस हलाखीच्या जीवनशैलीकडे वाटचाल करत आहे. पावसाची अनियमितता आणि व्यवस्थेची उदासिनता हे प्रमुख कारणं यामागची आहेत. योग्य हमीभाव नसणे, शेतीप्रश्नावरील राजकारण , कर्जाचा विळखा अशा काही कारणांनी कास्तकार प्रभावित झाला आहे. मुलांचे शिक्षण आणि आरोग्याचे रक्षण करण्यासाठी उभी हयात खर्च होते. उत्पादित मालाला भाव मिळाला तर जीवनमान उंचावण्याला मदत होईल. शेतजीवनाचे वास्तव खूप भयानक आहे. वरिष्ठ नोकरी, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ शेती अशा अवस्थेत आज शेती आहे.

मशागत आणि गुंतवणूक यांच्या बदल्यात उत्पन्न यात खूप मोठी तफावत आहे. उर्वरीत व्यवस्था शेतीजीवनाच्या शोषणावरच उपजिवीका भागविते. शाश्वतच्या नावाखाली शेतकरी वर्गाचे भांडवल करून समाजकारण केले जाते.चळवळीत राजकारण भरलेले.बियाणे निवडीपासून खते पेरण्यांपर्यंत संघर्ष करावा लागतो. शेजार्यास शेजार्याची आस नाही. गावात मोक्कार फिरणारी तरूणांची टोळी असते पण रानात काम करायला माणूस भेटत नाही. शेतमजुराची मजुरी देणे परवडत नाही.शेतकर्याच्या मुलांस नोकरी करावी वाटते. गार सावलीत बसावे वाटते. ते गैर नाही. शेतजीवनातून जे नोकरी, व्यवसायाकडे वळाले त्यांनी शेतीकडे ढुंकूनही पाहिले नाही. शेतीबाबतची अनास्था इथे सुरू होते.शेतीत पिकत नाही.पिकलेले विकत नाही. शेतकरी पाल्याचे शिक्षण सुरू होते आणि त्यातच त्याची पिळवणूकही सुरू होते. शेतकरीवर्गांच्या मुलांचे शिक्षण आणि इतर वर्गातील मुलांचे शिक्षण यात तफावत निर्माण होते.नोकरी, व्यवसायाच्या मागे पळताना दमछाक होते.दहा एकरावरचा शेतकरी अर्ध्या एकरावर येऊन ठेपला आहे. शेतकरी म्हणून शिक्षण आणि नोकरीत कुठलेही आरक्षण नाही. भूमीपुत्रांचे शिक्षण बोजड होऊन जाते. शेतीमातीला शिक्षणात प्राधान्य नाही.

शाळेच्या बाबतीत खाजगी शाळांत भरमसाठ फीस आकारली जाते. तिथे कपडे, बुट विकले जातात. शिक्षण महाग बनते. शिक्षण क्षेत्रात स्वप्न दाखवून व्यवसाय केला जातो. शिकवणी , क्लासेस, ट्यूशन्सच्या नावाखाली आर्थिक पिळवणूक होते. अनेकविध मार्गाने पैसा हा अंतिम ध्येय बनविले जाते.मुलांची स्पर्धा लावली जाते. रेस का घोडा बनवतात.वैयक्तिक भावभावनांना किंमत राहत नाही.शिक्षणात मानवी जीवनमुल्यांचे स्थान राहत नाही.मुलांच्या करिअर निवडीसाठी पालकांवर अतिरिक्त तणाव असतो.योग्य दिशा न मिळाल्याने मानसिकता राहत नाही. दिवास्वप्ने दाखवून आर्थिक लूट केली जात आहे. पालकांना आपल्या मुलांचे भविष्य महत्वाचे वाटते. सर्वच शिक्षण मोफत नाही. भेदभाव ठरलेला. शिक्षणातही जातीव्यवस्था भक्कम आहे. भेदभावाचे शिक्षण रूजवण्याची दाट शक्यता निर्माण होते. एकास शिष्यवृत्ती मिळते.दुसर्यास मिळत नाही. सारख्याच गुणवत्तेच्या मुलांस शिक्षणक्रमासाठी एकास प्रवेश मिळतो.दुसर्यास मिळत नाही. ही तफावत लक्षात घेता पदवीपर्यंत गुणवत्तेनुसार सर्वांना शिक्षणाच्या समान संधी मिळायला काय हरकत आहे ?

प्राथमिक स्तरापासूनच पालक भितीने ग्रासलेले आढळतात. सर्वांसाठी मोफत शिक्षण ही घोषणा हवेतच विरते. शाळेत फीस दिली नाही म्हणून प्रवेश नाकारलेले अनेक उदाहरणे आहेत. शिक्षण व्यवस्था धनिकांच्या ताब्यात जाऊ पाहत आहे. प्रात्यक्षिकपेक्षा थेअरी जास्त महत्वाची वाटते. अशा संक्रमण काळात रोजगाराच्या अधिक संधी निर्माण व्हायला हव्यात. भारतीय शिक्षणप्रणालीत अमुलाग्र बदल अपेक्षित आहेत. तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अधिकाधिक दर्जेदार शिक्षणाचा समावेश करून परदेशात शिक्षणासाठी न जाता परदेशातील गुणवत्तेपेक्षा भारतीय शिक्षणाची गुणवत्ता वाढवल्यास परदेशी विद्यार्थी भारतात अधिक शिकतील अशी व्यवस्था निर्माण करणे महत्वाचे आहे. ते एक आव्हान आहे. आपल्या व्यवस्थेने ते स्विकारायला हवे.हे सर्व एका दिवसात शक्य नाही. त्या दिशेने वाटचाल तर करू शकतो ना? नवतरूणांचे लोंढे तयार करून त्यांना गैरमार्गास लावणारांची कमी नाही. तरूण हा सर्वात जास्त प्रवास करतो. त्यास खरी अर्ध्या तिकीटाची गरज आहे. पंधरा ते पस्तीस वयाच्या युवकास प्रवास सवलतीची खरी गरज आहे.त्यांच्या आरोग्य आणि शिक्षणासाठी जाणिवपुर्वक प्रयत्न होणे महत्वाचे आहे. विमासंरक्षणही मिळावे. शेतकरी व त्याचा पाल्य यांना जातीभेद न करता सवलत देता येईल. ते आजमितीस आवश्यक आहे. शेतकर्यांची मुलं शिकली तर जगात कुठेच कमी पडत नाहीत हा इतिहास आहे. भारतामध्ये आणि त्यातही महाराष्ट्र हे राष्ट्र ज्ञानवंत, गुणवंत आणि किर्तीवंत आहे. त्याची मान उंचावण्याचे काम आणि स्वाभिमान जागृत ठेवण्याचे काम शिक्षणच करू शकते. दुसरे कुणी नाही. म्हणून शिक्षण प्रणालीत आवश्यक ते बदल करावेत.

जून-जूलैची लगबग महत्वाची आहे. जसे रानात बियाणे उगवण्याची आणि रोपे व्यवस्थित वाढण्याची शेतकरी काळजी घेतो तशीच काळजी आपल्या पाल्यांच्या शिक्षणातही घ्यायला हवी. बालकांचे संगोपणही पिकांइतकेच महत्वपुर्ण आहे. रोज वेळेवर शाळेत पाठविणे, शालेय गणवेशात पाठविणे. रात्री किमान एक तास अभ्यास घेणे.दप्तर , वही , पेनांसह भौतिक सुविधा देऊन शाळेस सहकार्य करणे, बालकांचे अधिकार आणि हक्क अबाधित ठेवू शकतो. या छोट्या कितीतरी बाबी आपण करू शकतो. बालकांचा आहार आणि शिक्षण महत्वपुर्ण आहे.गरज आहे ती समाजाच्या सकारात्मक प्रतिसादाची.

— विठ्ठल जाधव
शिरूरकासार, जि.बीड
संपर्क: 9421442995

 

Avatar
About विठ्ठल जाधव 57 Articles
श्री विट्ठल जाधव हे अनेक मराठी पुस्तकांचे लेखक आहेत. ते बीड जिल्ह्यातील शिरुरकासार येथील रहिवासी असून पुण्यनगरी आणि इतर वृत्तपत्रांमध्ये नियमित लेखन करत असतात. त्यांना साहित्यविषयक अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..