रेकॉर्ड्स कलेक्टर अजित प्रधान यांचा जन्म ४ सप्टेंबर १९४९ रोजी झाला.
सध्या ‘टी-ट्वेंटी’ किंवा ‘वन डे’ क्रिकेटचा जमाना असला तरी अजूनही टेस्ट मॅच पाहण्याची आवड असणारे बरेच लोक आहेत. त्याप्रमाणेच कितीही खासगी रेडिओ वाहिन्या असल्या तरी ‘रेडिओ सिलोन’ ऐकल्याशिवाय चैन पडत नाही, असे म्हणणारेही बरेच जण आहेत! कारण नवीन सिनेमे, नवीन अल्बम कितीही आले तरी जुन्या गाण्यांची मजा काही औरच असते. ‘रेडिओ सिलोन’ ऐकण्याच्या आवडीतून एखाद्या माणसाचा आयुष्यभराचा छंद कसा निर्माण होऊ शकतो ते डोंबिवलीच्या अजित प्रधान यांच्याशी बोलताना जाणवलं! प्रधानकाकांच्या घरी गेल्यावर सगळ्यात आधी लक्ष वेधून घेतलं ते कोपऱ्यातल्या ‘फोनो’ने. ‘‘हा फोनो आणि अजून सहा टर्न टेबल आमच्याकडे आहेत आणि सगळी चालू स्थितीत आहेत” असं काकूंनी- म्हणजे संध्या प्रधान यांनी सांगितलं आणि काकांच्या रेकॉर्डस कलेक्शनच्या छंदात काकूंचाही मनापासून सहभाग असणार हे लक्षात आलं! प्रधानकाकांकडे प्रामुख्याने १९८०पर्यंतच्या हिंदी चित्रपट संगीताचा संग्रह आहे. शंकर-जयकिशन आणि ओ. पी. नय्यर या दोन संगीतकारांचं जवळजवळ सगळं कलेक्शन त्यांच्याकडे आहे. त्याशिवाय सी. रामचंद्र, एस. डी. बर्मन आणि त्या काळातल्या बहुतेक सगळ्या संगीतकारांच्या रेकॉर्ड्स त्यांच्या खजिन्यात आहेत. त्यांच्या घरात जागोजागी फ्रेम करून लावलेले शंकर जयकिशन, ओ. पी. नय्यर, मोहम्मद रफी यांची मोठी छायाचित्रे, अगदी जुन्या जमान्यातील टेलिफोन, सतार, गिटार असं सगळं पाहता पाहता गप्पांना सुरुवात झाली.
प्रधानकाका म्हणाले, ‘‘माझे मोठे बंधू विजय प्रधान यांना संगीताची खूप आवड होती. ते सतत ‘रेडिओ सिलोन’ ऐकत. मी सुद्धा त्यांच्यासोबत ‘रेडिओ सिलोन’ ऐकायचो. त्यामुळे जुन्या गाण्यांची गोडी मला लहानपणीच वाटायला लागली होती. १९६९ मध्ये मला कॅनरा बँकेत नोकरी लागली आणि १९७० पासून रेकॉर्ड्स जमवायला सुरुवात केली! शंकर-जयकिशन आणि ओ. पी. नय्यर हे माझे आवडते संगीतकार. शंकर-जयकिशन यांचा विषयाप्रमाणे – कधी शास्त्रीय तर कधी पाश्चात्त्य बाजाचं संगीत देण्याचा गुण मला आवडतो आणि ओ. पी. नय्यर यांच्या संगीतातला मेंडोलीन, क्लारिनेट, ऱ्हिदमचा वापर, भारतीय-पाश्चात्त्य कॉम्बिनेशन आवडतं. त्यामुळे या दोन संगीतकारांच्या रेकॉर्ड्स विशेष करून जमवल्या. दर शुक्रवारी चोर बाजारात जाऊन इब्राहिमभाई-सलीम, अब्दुल रेहमान अशा काही निवडक दुकानदारांकडून रेकॉर्ड्स विकत घ्यायचो. पूर्वीच्या काळी पगार काही फार नसायचा पण पत्नी नोकरी करीत असल्यामुळे आणि तिलाही ही आवड असल्यामुळे रेकॉर्ड्स घेणं शक्य झालं. ‘‘काकांच्या घरच्या वॉलयुनिटचे सगळे खण रेकॉर्ड्सनी भरलेले आहेत. त्यांच्याकडच्या रेकॉर्ड्सची संख्या दोन ते अडीच हजारांच्या घरात आहे. तरीही आपल्याला कुठलंही गाणं ऐकायचं असलं तरी काका ते एका मिनिटात काढून देऊ शकतात, असं काकूंनी सांगितलं आणि नंतर वेगवेगळी गाणी ऐकताना त्याचा प्रत्ययही आला!
अमिताभ बच्चन यांच्या आवाजातल्या हरिवंशराय बच्चन यांच्या कविता, मीनाकुमारी यांनी स्वत: वाचलेल्या स्वत:च्या कविता, ‘मेरा नाम जोकर’ची डबल रेकॉर्ड, ‘मेरा नाम जोकर’ची फक्त पाश्र्वसंगीत असणारी स्वतंत्र रेकॉर्ड, ‘अयोध्येचा राजा’ या पहिल्या मराठी बोलपटाची रेकॉर्ड, भारत आणि अमेरिका यांची राष्ट्रगीतं अशा कित्येक दुर्मीळ रेकॉर्ड्स त्यांच्याकडे आहेत. बच्चन यांचे चित्रपटातले संवाद आणि मध्ये मध्ये येणारं अमिन सयानी यांचं निवेदन असणारी रेकॉर्ड ऐकून मी तर खूशच झाले! हिंदी चित्रपट संगीत तर त्यांच्याकडे आहेच, शिवाय मराठी, बंगाली, इंग्रजी भाषेतल्याही रेकॉर्डस आहेत. त्यांच्याकडच्या वेस्टर्न टय़ून्सच्या रेकॉर्ड्स ऐकता ऐकता ते त्यावरून प्रेरित होऊन केलेल्या हिंदी चालींविषयी सांगायला लागले आणि मग मूळ वेस्टर्न टय़ून आणि त्याच्यावर आधारलेली हिंदी गाणी उदा. आईए मेहेरबा (हावडा ब्रिज), मने बुलाया और कोई आया (अपने हुए पराये), बाजे पायल छम छम (छलिया), रहे ना रहे हम (ममता), बिन देखे और बिन पेहचाने (जब प्यार किसी से होता हैं) ऐकताना गंमत वाटली! प्रधानकाकांनी अशा गाण्यांचा कार्यक्रमही ‘बिदेसी संगीत देसी गीत’ या नावाने ठाण्यात कोपरीला केला होता. १९९९ पासून त्यांनी वेगवेगळे कार्यक्रम स्वत: केले आहेत, जुन्या हिंदी गीतांच्या कार्यक्रमांचं निवेदनही केलंय. इसाक मुजावर यांच्यासोबत ‘गुजरा हुआ जमाना’ हा किस्से आणि कॅसेटवरून गाणी ऐकवण्याचा कार्यक्रम त्यांनी केला होता. ‘अंदाज मेरा मस्ताना’ हा शंकर-जयकिशन यांच्या गीतांवरचा वाद्यवृंद, ‘आवाज एक, रंग अनेक’ हा महम्मद रफी यांच्या गीतांवरचा वाद्यवृंद, त्याशिवाय ‘इस दुनिया से निराला हूँ’, पाऊस, चंद्र-तारे-रात्र, अशा थीम्सवर आधारित दृकश्राव्य कार्यक्रम असे अनेक कार्यक्रम त्यांनी केलेत. कुणी आमंत्रित केलं तर ते आणि त्यांचे स्नेही नितीन मटंगे अवश्य कार्यक्रम सादर करायला जातात.
नितीन मटंगे यांनी प्रधानकाकांचं एक पुस्तकही प्रकाशित केलंय – ‘मेरे गीत तुम्हारे’ हा मोहम्मद रफी यांच्या गाण्यांचा कोश काकांनी तयार केला आहे. त्याचं प्रकाशन सुप्रसिद्ध संगीतकार ओ. पी. नय्यर यांच्या हस्ते झालं होतं आणि कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ‘रेडिओ सिलोन’चे स्टार निवेदक गोपाल शर्मा यांनी केलं होतं! काकांनी या पुस्तकासाठी ७ ते ८ वष्रे संशोधन केलं. त्या दरम्यान ‘रेडिओ सिलोन’च्या आणखी एक स्टार निवेदिका पद्मिनी परेरा यांनी त्यांना खूप मदत केली. रफींची खूप गाणी- दुर्मीळ गाणी त्यांनी ‘रेडिओ सिलोन’ वरून ऐकवली! आज हे पुस्तक अनेक संशोधक, निवेदक संदर्भग्रंथ म्हणून वापरतात. काकांनी ‘चित्रानंद’ साप्ताहिकात ‘वेगवेगळ्या संगीतकारांकडे रफी यांनी गायलेली गाणी’ या विषयावर आधारित एक सदर लिहिलं होतं, तेही खूप वाचकप्रिय झालं होतं. पुलोत्सवात काकांच्या रेकॉर्ड्सचं प्रदर्शन झालं होतं. वेगवेगळी रेकॉर्ड्स कव्हर्स बोर्डवर डिस्प्ले करून त्याद्वारे एकेक दशक प्रेक्षकांसमोर मांडलं होतं. ही कल्पनाही तेव्हा लोकांना खूप आवडली होती.
प्रधानकाकांच्या संग्रहात खूप दुर्मीळ गाणी आहेत. रंगीत रेकॉर्ड्स, प्लास्टिकच्या रेकॉर्ड्सही आहेत. ७८ rpm,, एल.पी., .पी. अशा फक्त रेकॉर्ड्सच ते जमवतात. साधारण ७०च्या दशकात ७८ rpm,,च्या रेकॉर्ड्सची निर्मिती बंद झाली आणि लाँग प्ले रेकॉर्ड्स (एल.पी.) निघायला लागल्या. कालांतराने त्यांचीही निर्मिती कमी झाली. आता तर अशा रेकॉर्ड्स फारशा बघायलाही मिळत नाहीत. शेवटची एल.पी. ‘दिल तो पागल हैं’ या चित्रपटाची निघाली होती. ती अजून काकांच्या संग्रहात नाहीये, त्यामुळे त्या रेकॉर्डच्या शोधात ते आहेत. प्रधानकाका त्यांच्या संग्रहातली गाणी ऐकवण्यासाठी अगदी उत्सुक असतात, त्यामुळे जुनी – दुर्मीळ गाणी ऐकायची असतील तर त्यांच्याशी जरूर संपर्क साधू शकता. इंग्रजी टय़ूनवरून काही मराठी गाणीही आहेत. त्यातली ‘पप्पा सांगा कुणाचे’ आणि ‘नंबर ५४’ ही गाणी त्यांच्या घरून निघता निघता त्यांनी ऐकवली आणि तीच सुरावट मनात घोळवत मी प्रधानकाका – काकूंचा निरोप घेतला.
— अंजली कुलकर्णी-शेवडे.
अजित प्रधान -९००४५६७१९१
संकलन: संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply