पान म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर हिरव्या रंगाचं पान येतं. पण तुम्ही निरीक्षण केलं आहे का? आंबा, पिंपळासारख्या झाडांची पानं कोवळी असताना लाल असतात. नेहमी हिरवी असणारी पानं कोवळी असताना लाल का दिसतात? पानाला हिरवा रंग येतो ते त्याच्यात असलेल्या हरितद्रव्यामुळं, पण फक्त वनस्पतीत रंगाचेच हिरव्या रंगद्रव्य असतं असं नाही.
वनस्पतीत मुख्यतः तीन प्रकारची रंगद्रव्ये आढळतात. पहिल्या प्रकारचं रंगद्रव्य म्हणजे हरितद्रव्य. या रंगद्रव्यामुळेच वनस्पती हिरव्या दिसतात, हे आपल्याला माहीत आहे. दुसऱ्या प्रकारचं रंगद्रव्य म्हणजे कॅरेटोनॉईड. कॅरेटोनॉईडचेही प्रकार आहेत. त्यापैकी कॅरेटोन आणि लायकोपेन या प्रकारांमुळे पिवळा, नारिंगी आणि लाल रंग येतो. तिसरा गट आहे, फ्लेवोनॉईड्सचा. त्यामध्ये प्रकार असतात. फ्लेवॉन आणि फ्लेवॉनॉलमुळे पिवळा रंग येतो, तर बीटाझायॅनिनमुळे निळा आणि ॲन्थोसायॅनिनमुळे लाल, निळा, जांभळा, कोनफळी अशा रंगछटा दिसून येतात.
‘खरं तर हिरव्या पानांमध्येही कॅरेटोनॉईड्स असतात पण ते हरितद्रव्याच्या आवरणांत लपेटून गेलेलं असल्याने पान हिरवं दिसतं. पान कोवळं असताना त्यांना लाल रंग आलेला असतो, तो अॅन्थोसायॅनिनमुळे. हे पानाचं एक प्रकारचं अनुकूलन आहे.
प्रकाशातील तीव्र अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून कोवळ्या पानातल्या पेशींचं रक्षण ॲन्थोसायॅनिनमुळे होतं. काही कीटकांना लाल रंग दिसत नाही, त्यामुळे आपसूकच कोवळ्या पानांचं रक्षण होतं. ॲन्थोसायॅनिनमुळं आलेला लाल रंग कोवळ्या पानांच्या, पर्यायानं वनस्पतींच्या फायद्याचा ठरतो. याशिवाय कोवळ्या पानांत फिनॉलही तयार होतं. फिनॉलच्या वासामुळे तीव्र वनस्पतीला घातक ठरणारे फक्त कीटकच नव्हे तर गुरं-ढोरंही पानांपासून दूर राहणंच पसंद करतात. याशिवाय बुरशीचं आक्रमणही ॲन्थोसायॅनिनमुळे रोखलं जातं. कोवळी पानं लाल असण्याचं प्रमाण उष्ण प्रदेशांत जास्त दिसून येतं. या प्रदेशांत उन्हाच्या तीव्रतेपासून कोवळ्या पानांचं रक्षण होणे गरजेचं आहे.
या प्रदेशांत जैवविविधताही चांगली आहे. साहजिकच कीटक, गुरं-ढोरं यांचंही प्रमाण लक्षणीय आहे. त्यांच्याकडून कोवळ्या पानांना जास्त धोका असतो. त्यांच्यापासून लाल कोवळ्या पानांचं रक्षण त्यांच्या लाल रंगामुळं होतं.
चारुशीला जुईकर (मुंबई)
मराठी विज्ञान परिषद
Leave a Reply