” माजी “, मोडकळीला आलेल्या इमारतींना संजीवनी देण्यासाठी कधीतरी त्या पाडून किंवा कधीतरी त्यांच्यात आधाराच्या टेकूंनी नवं प्राण ओतण्यासाठी बांधकाम व्यावसायिक शोधमोहिमेवर असतात. तेही काय करणार बिचारे? जिथे जमीनच मुदलात कमी आहे आणि तीही बऱ्यापैकी वाढत्या लोकसंख्येने व्यापत आणलेली. बरं, आम्हांला शहरातच, मध्यवर्ती ठिकाणी राहायचे आहे? मग तेथील आधी अस्तित्वात असलेल्या वास्तू ताब्यात घ्यायच्या आणि आकर्षक अटींवर रीडेव्हलपमेंट ची जाहिरात लावायची. काल डेक्कनवर अशीच काय जाहिरात वाचली.
आपले दिवस सरले तेव्हा गाशा गुंडाळलेला बरा, असं त्या वाड्याला वाटत असेल कां ? भर डेक्कनवर, चव्हाट्यावर आपलं वय झाल्याचं वर्तमान प्रसिद्ध केल्याबद्दल संकोच, किंचित उद्वेग आणि बराचसा राग त्या वास्तूच्या मनात आला असेल कां ? किंवा ” मेकअप ” मुळे आपण अधिक तरुण, चित्ताकर्षक, लोभस दिसणार म्हणून आतून नवी हिरवाई जाणवत असणार कां ?
बोलायला हवं एकदा अशा पडझडीशी!
त्यांवर अस्तित्वाच्या “युद्धाचे “ढग जमण्याआधी ! नाहीतरी गेले दहा दिवस सुखेनैव हसत खेळत जगणाऱ्या इमारती पत्त्याच्या रचनांप्रमाणे उध्वस्त होताना टीव्ही वर प्रत्यही बघतोच आहे की मी ! त्यांच्या नशिबी रिडेव्हपलपमेंट नसावे.
काही माजी,वानप्रस्थी माणसांच्या आयुष्यातही ही रिडेव्हलपमेंट नसते. डायरेक्ट कोसळणे !
पण बरीच रंगीबेरंगी माणसे नसलेले शिंग मोडून फिरत असतात आसपासच्या कळपांमध्ये आणि सेकंड होम सारखे सेकंड आयुष्य ( भलेही ते औषधोपचारांच्या किंवा जिवलगांच्या टेकूंवर पेललेले असो) जगत असतातच की.
हा ज्या त्या इमारतीचा/वाड्याचा प्रश्न असू द्यावा. आपण कां त्यावर भाष्य करावे? फारतर काही काळाने त्या परिसरातून हिंडताना चाललेलं नवं बांधकाम अपूर्वाईने पाहावं किंवा अरे, इथे नेहेमीच्या पाहण्यातील वास्तू होती, गाडली गेली दिसतेय या नव्या स्काय स्क्रॅपरखाली असं किंचित हळहळावं.
माझ्याच एका कवितेत म्हटल्याप्रमाणे-
” ज्याला जसं बोलावतंय,
क्षितीज त्याने गावीत गाणी ! ”
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply