नवीन लेखन...

अमेरिकेतील धार्मिकता – भाग १०

Religions in America - Part 10

जाता जाता, या धार्मिकतेच्या सामाजिक अंगाकडे लक्ष गेल्याशिवाय रहात नाही. मिशनरी काम, अ‍ॅडॉप्शन आणि चॅरीटी या गोष्टींना अमेरिकन जीवनामधे मोठं महत्वाचं स्थान आहे. येशु ख्रिस्ताच्या काळापासून गेली २००० वर्षे, मिशनरी काम जगाच्या कानाकोपर्‍यात अव्याहतपणे चालूच आहे. आजही अमेरिकेच्या छोट्या मोठ्या गावांतून, लोक मिशनरी काम करायला एशियन, आफ्रिकन देशांमधे जात आहेत. आमच्या बाजूच्या ऑरेंजसिटीमधल्या नॉर्थ वेस्टर्न कॉलेजमधले प्राध्यापक, पाच सहा विद्यार्थ्यांना घेऊन, तामीळनाडूमधल्या वेल्लोरला दरवर्षी जातात. वेल्लोर मेडीकल कॉलेज, मिशन हॉस्पिटल वगैरे प्रसिद्धच आहेत. तिथे जाऊन आजूबाजूच्या खेड्यापाड्यांत काम करायचे, बायबलचा प्रसार करायचा, हे चालूच असते. चर्चच्या नावाखाली, अनेक तरूण मुलं मुली, गरीब देशांत जाऊन समाजसेवा मोठ्या उत्साहाने करत असतात. कुठे गरीब वस्तीत जाऊन शौचालय बांधणे, कुठे वादळात बेघर झालेल्या लोकांना नवी घरे बांधून देणॆ, कुठे भूकंपग्रस्तांना औषधे पुरवणे, असे चालू असते.

गेल्या काही वर्षांमधे, गरीब देशांमधली लहान मुलं अ‍ॅडॉप्ट करण्याचं प्रमाण देखील जाणवण्या इतपत वाढलं आहे. आयोवा, साऊथ डकोटा, नेब्रास्कासारख्या मिडवेस्टमधल्या राज्यांमधे, छोट्या छोट्या गावांतही, एशियन, आफ्रिकन वंशाची लहान मुलं दिसायला लागली आहेत. गोर्‍या पालकांची स्वत:ची दोन, तीन मुलं आणि अ‍ॅडॉप्ट केलेली एक, दोन चायनीज किंवा आफ्रिकन मुलं, असं कुटुंब ही काही आज नवलाची गोष्ट राहिलेली नाही. यात एका गरीब घरातील/देशातील अनाथ मुलाला घर मिळवून देण्याबरोबरच, अजून एका जीवाला येशुच्या पायाशी आणण्याचा देखील हेतू असावा, असा विचार मनात आल्याशिवाय रहात नाही.

आम्ही सू सेंटरमधे २००१ साली आल्यावर, सिद्धार्थच्या सॉकरच्या प्रॅक्टीसनिमित्ताने एका अमेरिकन कुटुंबाची ओळख झाली. आम्ही भारतीय आहोत समजल्यावर त्यांनी आपणहून आमच्याशी मैत्री वाढवली. त्यांना तीन मुलं होती आणि त्यांना अजून एक मूल अ‍ॅडॉप्ट करायचं होतं. आदल्याच वर्षी, भारताच्या अरूणाचल प्रदेशातून, एक सातवी आठवीतल्या मुलामुलींचा कोरस ग्रूप अमेरिकेची ट्रीप करून गेला होता. तो ग्रूप आयोवातल्या सू सेंटरमधे येऊन गेला होता. त्यातला एक डेव्हीड नावाचा ख्रिश्चन मुलगा या अमेरिकन कुटुंबाला फारच आवडला होता. या कुटुंबाने आमच्याकडे अरुणाचल प्रदेशाची माहिती काढण्यासाठी पिच्छाच पुरवला. शेवटी दोन वर्षांनी बरीच धडपड करून, आम्ही २००३ मधे कनेक्टिकटला गेल्यावर, डेव्हीडला अमेरिकेत आणण्यात हे कुटुंब यशस्वी झालं. आता आम्ही सू सेंटरला परत आलो आहोत आणि डेव्हीड आणि त्याचं हे अमेरिकन कुटुंब कधी तरी आम्हाला भेटत असतं.

असंच २००२ साली, सू सेंटरच्या वर्तमानपत्रामधे, गावाच्या डेप्युटी शेरीफने भारतातून दोन लहान मुलं अ‍ॅडॉप्ट करून आणल्याची बातमी पहिल्या पानावर छापून आली होती. कुतुहलाने वाचताना, ती मुलं चक्क पुण्याच्या एका अनाथाश्रमातून आणली असल्याचं आणि त्यांची मातृभाषा मराठी असल्याचं समजून आम्ही थक्क झालो. ती मुलं म्हणजे पाच व तीन वर्षांची बहीण भावंड होती. आम्ही लगेच डेप्युटी शेरीफचा फोन शोधून त्याला फोन केला. मेसेज ठेवला की, “आम्ही भारतीय आहोत आणि सुदैवाने त्या मुलांची आणि आमची मातृभाषा एकच आहे. त्या मुलांना आणि तुम्हाला एकमेकांची भाषा समजायला अवघड जात असेल तर आम्ही मदत करायला आनंदाने तयार आहोत!”. दोन वेळा फोन करून मेसेज ठेवले तरी काही उत्तर नाही. मग आम्ही निराश होऊन त्यांचा नाद सोडला. त्यांना आमची मदत नको होती किंवा त्यांना आमची मदत म्हणजे त्यांच्या खाजगी जीवनात हस्तक्षेप वाटला असावा. पुढे त्या मुलांचं काय झालं कुणास ठाऊक. सुरवातीचा खडतर काळ त्यांनी कसा काढला असेल, काही कल्पना नाही. आतापर्यंत ती पूर्णपणे अमेरिकन होऊन गेली असतील. पण अजूनही कधी कधी, त्या डेप्युटी शेरीफने आम्हाला त्या मुलांच्या जवळ येऊन दिलं नाही आणि ती मुलं सुखरूप असतील ना, अशी शंका उगाचच मनात येऊन जाते.

वरवर भोगवादी, चंगळवादी वाटणार्‍या अमेरिकेच्या या धार्मिक गाभ्याच्या दर्शनाने, मी भारावून तसाच काहीसा चक्रावूनही गेलो. गेलं शतकभर विज्ञानातल्या नोबेल प्राइझेसची लयलूट करणारी आणि माणसाला चंद्रावर उतरवणारी अमेरिका खरी मानायची की अजूनही जुन्या धार्मिक विचारांना उरी कवटाळून ठेवणारी अमेरिका खरी मानायची? उच्च शिक्षणाच्या आणि संशोधनाच्या उत्तमोत्तम संस्थांमधे, जगभरातून आलेल्या संशोधकांकडून नित्यनूतन शास्त्रीय संशोधनाची पुढची पायरी गाठणार्‍या अमेरिकेला सलाम करायचा की अजूनही डार्विनच्या उत्क्रांतीवादाला शाळांच्या पाठ्यपुस्तकांमधे स्थान देण्यात खळखळ करणार्‍या अमेरिकेकडे पाहून डोक्याला हात लावायचा?

अमेरिकेत येणार्‍या देशोदेशीच्या लोकांचे उगमस्थान जसजसे युरोपकडून दक्षिण अमेरिकेकडे आणि तिथून एशियाकडे सरकू लागले आहे तसतसे, अमेरिकेचा रंग आणि चेहराच नाही तर धार्मिक अंतरंग देखील बदलू लागले आहे. पुढच्या काही दशकांमधे, अमेरिकेच्या या बदलत्या धार्मिकतेचा, तिच्या राजकीय, सामाजिक जीवनावर काय परिणाम होतोय आणि एकंदरीत जागतिक घडामोडींवर त्याचा काय प्रभाव पडतोय हे पहाणे उद्बोधक ठरेल.

— डॉ. संजीव चौबळ

डॉ. संजीव चौबळ
About डॉ. संजीव चौबळ 84 Articles
मुंबई पशुवैद्यक महाविद्यालयातून पशुप्रजनन विषयात पदव्युत्तर शिक्षण (१९८६) घेतल्यावर भारतातील विविध संस्थांमधे सुमारे १४ वर्षे काम. २००१ साली युनिवर्सिटी ऑफ कनेक्टीकटमधे डॉक्टर जेरी यॅंग या “क्लोनिंग”च्या क्षेत्रातील नावाजलेल्या संशोधकाच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. करण्यासाठी अमेरिकेत दाखल. गेली पंधरा वर्षे अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी व त्यानंतर नोकरीनिमित्ताने वास्तव्य. अमेरिकेतील उत्तम दर्जाच्या गायींमधे भृणप्रत्यारोपण (EmEmbryo Transfer Technology) तसेच टेस्ट टयुब बेबीज (In Vitro Fertilization) या क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांमधे संशोधन तसेच उत्पादनात जबाबदारीच्या पदांवर काम. आपल्या क्षेत्रातील नावाजलेल्या शास्त्रीय जर्नल्समधे व विविध राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय परिषदांमधे सुमारे २५ शोधनिबंध सादर. अमेरिकेतले वास्तव्य तसेच कामानिमित्ताने प्रवास मुख्यत्वे ग्रामीण/निमग्रामीण भागात झाल्यामुळे, अमेरिकेच्या एका सर्वस्वी वेगळ्या व अनोळखी अंगाचे जवळून दर्शन. सर्वसाधारण भारतीयांच्या अमेरिकेबद्दलच्या अतिप्रगत, अत्याधुनिक, चंगळवादी कल्पनाचित्राला छेद देणारे, अमेरिकेच्या ग्रामीण अंतरंगाचे हे चित्रण, “गावाकडची अमेरिका” या पुस्तकाद्वारे केले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..