नवीन लेखन...

अमेरिकेतील धार्मिकता – भाग २

Religions in America - Part 2

एकदा पेनसिल्व्हेनीयामधे असताना, आमच्या लॅबमधल्या टेरा नावाच्या एका टेक्नीशियन मुलीच्या लग्नाला जाण्याचा योग आला. तिचं गाव पेनसिल्व्हेनीया आणि न्यूयॉर्क या राज्यांच्या सीमेजवळ, न्यूयॉर्क राज्यात होतं. न्यूयॉर्क राज्याचा वरचा बराचसा भाग डोंगर, झाडी, शेती आणि कुरणांनी भरलेला असून हा भाग शेती आणि डेअरीसाठी प्रसिद्ध आहे. टेराच्या गावाला जायचा रस्ता असाच गर्द झाडीने भरलेल्या टेकड्यांमधून जाणारा होता. मधे मधे मोकळ्या जागेत, दुधाळ गाई लुसलुशीत गवतावर चरत होत्या. अधे मधे छोटी छोटी गावं लागत होती. टेराचं गाव देखील ४००-५०० वस्तीचं. गावातलं पांढरं सुबकसं चर्च चक्क एका मक्याच्या शेतात होतं. आजूबाजूला कापलेल्या मक्याचे खुंट शेतातून दिसत होते. चर्चमधे जेमतेम ६०-७० लोकांना दाटीवाटीने बसायला जागा. कसलं भव्य दिव्य वास्तूशिल्प नाही, प्रचंड मोठे घुमट आणि नक्षीदार कमानी नाहीत किंवा डोळे खिळवून ठेवेल असं रंगीत काचेरी कोरीव काम नाही. साधासा एक क्रॉस भिंतीवर लटकवलेला. मंद मेणबत्त्यांच्या उजेडात उभी असलेली फादरची गंभीर मूर्ती, खिडक्या-दारांतून येणारा बाहेरचा शेताचा, गवताचा वास, दूर अस्पष्टपणे ऐकू येणारं गायींचं हंबरणं आणि ट्रॅक्टरचा आवाज. अस्सल खेडवळ वातावरणातलं ते छोटंसं चर्च, लोकजीवनाचा एक अविभाज्य भाग बनून, त्यांच्या आयुष्याला आकार देत होतं.

आयोवातल्या सू सेंटरला आल्यावर, ६००० वस्तीच्या त्या छोट्याश्या गावात फेरफटका मारताना, खूपशी चर्चेस बघून मी आश्चर्यचकित झालो. हळू हळू तिथल्या वास्तव्यात, गावात एकूण १६ चर्चेस आहेत असं समजलं. ही चर्चेस न्यूइंग्लंडमधल्या ठरावीक धाटणीच्या चर्चेसपेक्षा खूपच वेगळी वाटत होती. एकतर ही चर्चेस खूपच मोठी होती. त्यांची बांधणी देखील एखाद्या आधुनिक इमारतीसारखी होती आणि त्यांची प्रांगणे देखील प्रशस्त होती. सू सेंटर आणि बाजूचं ऑरेंजसिटी ही दोन्ही प्रामुख्याने डच लोकांची गावं. आजूबाजूला देखील डच लोकांचं प्राबल्य. त्यामुळे बहुतेक सारी चर्चेस ही Reformed churches. त्यात देखील नाना प्रकार. उदाहरणच द्यायचं झालं तर सू सेंटरमधील वेगवेगळ्या चर्चेसची यादी देता येईल – फर्स्ट रिफॉर्मड्‌ चर्च, फ्रि ग्रेस रिफॉर्मड्‌ चर्च, हेरीटेज रिफॉर्मड्‌ कॉंग्रिग्रेशन, होप लुथर्न चर्च, नेदरलॅंड रिफॉर्मड्‌ चर्च, न्यू लाईफ रिफॉर्मड्‌ चर्च, पीस लुथर्न चर्च, युनायटेड रिफॉर्मड्‌ चर्च, बेथल ख्रिश्चन रिफॉर्मड्‌ चर्च, कव्हेनंट ख्रिश्चन रिफॉर्मड्‌ चर्च, फेथ ख्रिश्चन रिफॉर्मड्‌ चर्च, फर्स्ट ख्रिश्चन रिफॉर्मड्‌ चर्च, ख्राईस्ट द किंग कॅथलिक कम्युनिटी चर्च, ख्राईस्ट कम्युनिटी चर्च, कॉर्नर स्टोन रिफॉर्मड चर्च आणि सेंट्रल रिफॉर्मड चर्च.

सू सेंटरमधली चर्चेस भली मोठ्ठी. ही चर्चेस म्हणजे फक्त धार्मिक प्रार्थनास्थाने नसायची. प्रत्येक चर्चमधे मोठमोठी सभागृहे, बर्‍याच खोल्या व इतर सोयी असायच्या. त्यांचा उपयोग community centres म्हणूनच अधिक व्हायचा. सगळे वरवर ख्रिश्चनच असले तरी प्रत्येकाचा आपल्या पंथाच्या किंवा चर्चच्या वेगळेपणाबद्दल ठाम विश्वास. इतर वेळी एकत्र येणारे सारे जण आपापल्या चर्चच्या घुमटाखाली एकत्र आले, की इतरांच्या चर्चेसना नाक मुरडणार. एकाच चर्चमधे जाणार्‍या लोकांच्यात जवळीक निर्माण व्हावी यात काही नवल नाही. मग अगदी मुलांमधे किंवा तरुणांमधे देखील ही चर्चेसची भाऊबंदकी रुजवली जाते. मग आपल्याच चर्चमधे जाणार्‍या मुलांशी खेळणे, आपल्याच चर्चच्या तरुणांबरोबर सहलीला जाणे वगैरे प्रकार सर्रास चालतात. आपल्या चर्चबांधवांसाठी मदतीचा हात पुढे करणे हे ओघाने आलेच. मग नोकरी शोधणार्‍या कुण्या सोम्यागोम्याचा चुलत मेव्हणा जर तुमच्या चर्चमधे जात असेल, तर नोकरी मिळण्यासाठी एक मोठ्ठं qualification होऊन जातं.

सू सेंटरमधे आम्ही आणि आमच्या सहा महिने अगोदर आलेले सोळंकी अशी दोनच भारतीय कुटुंबं. मोठाल्या शहरांमधे, विविध देशांतल्या लोकांचा संपर्क येऊन, तेथील स्थानिक अमेरिकन्सच्या अनुभवाच्या कक्षा थोड्या विस्तारलेल्या असतात. परंतु मिडवेस्ट मधल्या छोट्या गावांत, तसे दुसर्‍या देशातून आलेले लोक विरळाच. त्यात काही असलेच तर मेक्सिको, कोलंबिया, व्हेनेझुएला, अर्जेंटिना, कोस्टारिका वगैरे मध्य आणि दक्षिण अमेरिकेतील देशांतून आलेले. बहुतांशी कॅथलिक. मध्य आणि दक्षिण अमेरिकेत स्पेनने आपले साम्राज्य स्थापन केल्यावर, आपली भाषा आणि आपला कॅथलिक धर्म मोठ्या जबरदस्तीने स्थानिक जनतेवर लादला. एक ब्राझीलचा अपवाद वगळता (जो पोर्तुगीजांच्या अमलाखाली असल्यामुळे तिथे पोर्तुगीज भाषा रूढ झाली), सार्‍या मध्य आणि दक्षिण अमेरिकन देशांत, भाषा आणि धर्म हे समान धागे निर्माण झाले. त्यामुळे मिडवेस्टमधल्या छोट्याश्या गावात, मेक्सिकन लोकांसारखे दिसणारे, गव्हाळ वर्णाचे, काळ्या केसांचे, मध्यम चणीचे भारतीय आणि त्यात हिंदू म्हणजे अपूर्वाईची गोष्ट. सुरवातीला बरेचदा, कुठे रस्त्यावर किंवा दुकानात, एखादा मेक्सिकन आमच्या जवळ येऊन ‘होला’ (स्पॅनिश भाषेतलं “हॅलो”) म्हणून संबोधायचा आणि स्पॅनिशमधे वचावचा बोलायला सुरुवात करायचा. आम्ही गोंधळून अजागळासारखे त्याच्या तोंडाकडे बघायचो आणि मग, आम्ही “इंडियन, नो स्पॅनिश” असं सांगितल्यावर, तो चालू लागायचा.

— डॉ. संजीव चौबळ

डॉ. संजीव चौबळ
About डॉ. संजीव चौबळ 84 Articles
मुंबई पशुवैद्यक महाविद्यालयातून पशुप्रजनन विषयात पदव्युत्तर शिक्षण (१९८६) घेतल्यावर भारतातील विविध संस्थांमधे सुमारे १४ वर्षे काम. २००१ साली युनिवर्सिटी ऑफ कनेक्टीकटमधे डॉक्टर जेरी यॅंग या “क्लोनिंग”च्या क्षेत्रातील नावाजलेल्या संशोधकाच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. करण्यासाठी अमेरिकेत दाखल. गेली पंधरा वर्षे अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी व त्यानंतर नोकरीनिमित्ताने वास्तव्य. अमेरिकेतील उत्तम दर्जाच्या गायींमधे भृणप्रत्यारोपण (EmEmbryo Transfer Technology) तसेच टेस्ट टयुब बेबीज (In Vitro Fertilization) या क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांमधे संशोधन तसेच उत्पादनात जबाबदारीच्या पदांवर काम. आपल्या क्षेत्रातील नावाजलेल्या शास्त्रीय जर्नल्समधे व विविध राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय परिषदांमधे सुमारे २५ शोधनिबंध सादर. अमेरिकेतले वास्तव्य तसेच कामानिमित्ताने प्रवास मुख्यत्वे ग्रामीण/निमग्रामीण भागात झाल्यामुळे, अमेरिकेच्या एका सर्वस्वी वेगळ्या व अनोळखी अंगाचे जवळून दर्शन. सर्वसाधारण भारतीयांच्या अमेरिकेबद्दलच्या अतिप्रगत, अत्याधुनिक, चंगळवादी कल्पनाचित्राला छेद देणारे, अमेरिकेच्या ग्रामीण अंतरंगाचे हे चित्रण, “गावाकडची अमेरिका” या पुस्तकाद्वारे केले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..