छोट्या गावांमधे विरंगुळ्याची दोन मुख्य साधनं म्हणजे खेळ आणि चर्च. सकाळी सहा, सात वाजल्यापासून शेतात, फॅक्टरीत, बॅंकेत, मोटारीच्या दुकानात, दिवसभर इमाने इतबारे काम केलं की चार, पाच वाजताच संध्याकाळचं जेवण आटोपून घ्यायचं. मग पावलं वळतात ती चर्चकडे किंवा शाळा कॉलेजच्या gym कडे. चर्चमधे choir मधे समूहगान करणे हा देखील एक आवडीचा विरंगुळा. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत बरेच जण त्यात सामील असतात. संध्याकाळी चर्चमधे जमायचे आणि ऑर्गनच्या तालावर येशुख्रिस्ताची स्तुतीपर कवने गायची.
सू सेंटर इतकं धार्मिक की गावातल्या वेगवेगळ्या कंपन्यांच्या बोर्ड मीटींग्ज, ख्रिसमस पार्टी किंवा गावातल्या कॉलेजमधे होणार्या संध्याकाळच्या प्रौढांसाठीच्या वर्गांची सुरुवात प्रार्थना करूनच व्हायची. सू सेंटरमधले डॉर्ट कॉलेज आणि बाजूच्या ऑरेंजसिटीमधले नॉर्थ वेस्टर्न कॉलेज ही दोन्ही ख्रिश्चन कॉलेजेस. कॉलेजच्या प्रांगणामधे छोटी चर्चेस. दररोज chappal मधे जाणे विद्यार्थ्यांवर बंधनकारक असायचे. कॉलेजमधे शिकवण्यासाठी प्राध्यापकवर्ग केवळ ख्रिश्चनधर्मीय. कॉलेजमधल्या विज्ञान विभागाच्या वेबसाईटवर देखील सुरुवात देवाच्या उल्लेखाने केलेली. आमच्या ऑफिसच्या कामानिमित्त कधी कधी बाहेर गावी जायला लागायचं आणि हॉटेलमधे रहाणं साहजिकच व्हायचं. बरेचदा सहकर्मचारी बरोबर असायचे. रात्री जेवण झालं की झोपण्यापूर्वी किंवा सकाळी उठल्यावर अर्धा एक तास बायबल नित्य नियमाने वाचणारे सहकर्मचारी काही कमी नव्हते. किंबहुना या अशा लोकांना बघूनच सगळ्या हॉटेल्स / मॉटेल्सच्या रूम्समधे बायबलची प्रत का ठेवली असते, याचा मला उलगडा झाला. याचा अतिरेक म्हणजे आमच्या लॅबमधली जेनिफर. ही फार फार तर २३ वर्षांची तरूणी. आमच्या कंपनीतर्फे सात, आठ जण, दोन आंतरराष्ट्रीय परिषदांना गेलो होतो. इतर सर्व दिवस ही मुलगी तत्परतेने शास्त्रीय परिसंवाद ऐकायला, विविध वक्त्यांशी बोलायला उत्साहाने तयार असायची. परंतु दोन्ही परिषदांना, रविवारच्या दिवशी ती गायब झाली. तिला विचारल्यावर तिनं सरळच सांगून टाकलं, “रविवारी मी येशुची असते. त्यादिवशी मी केवळ त्याचं चिंतन भजन करण्यात घालवते”. २२-२३ वर्षाच्या, विज्ञान शाखेत शिकलेल्या आणि बायॉलॉजी लॅबमधे नोकरी करणार्या एका हुशार मुलीचे हे विचार ऐकून मी गारच झालो.
कदाचित सू सेंटर आणि त्याच्या आजूबाजूचा भाग कट्टरपणाचा कळस असतील. परंतु सर्वसाधारणपणे, मिडवेस्टचा प्रचंड मोठा भूभाग हा असाच जुन्या वळणाचा आणि कट्टर धार्मिक आहे. कुटुंबनियोजनाच्या संकल्पनेकडे साशंक नजरेने बघणारा, गर्भधारणेला देवाचे वरदान समजणारा, गर्भपाताच्या विरोधात ठामपणे उभा ठाकणारा, सनातनी विचारसरणीचा हा मोठा वर्ग आहे. रिपब्लिकन पार्टीच्या एकगठ्ठा मतांचा हा मोठाच आधारस्तंभ आहे. पूर्वापार, या रुढिप्रिय आणि धार्मिक विचारसरणीच्या लोकांचा, रिपब्लिकन पक्षाला पाठिंबा राहिला आहे. तर डेमोक्रॅटिक पक्षाचे समर्थक हे सर्वसाधारणपणे अधिक आधुनिक विचारसरणीचे व सर्वधर्मसमभाव असणारे किंवा धर्माप्रती काहीसे उदासीन असे आहेत. ह्या पूर्वापार चालत आलेल्या साच्याच्या बाहेर पडून, ख्रिश्चनांव्यतिरिक्त इतर धर्मियांना आणि सेक्युलर विचारसरणीच्या लोकांना आपल्याकडे वळवणं, रिपब्लिकन पक्षाला अवघड जात आहे. त्याचप्रमाणे, कट्टर धार्मिक अमेरिकन्सना भूरळ पाडू शकेल अशी काही विचारसरणी पुढे करण्यात, डेमोक्रॅटिक पक्षालादेखील अपयश आलेलं आहे.
— डॉ. संजीव चौबळ
Leave a Reply