नवीन लेखन...

अमेरिकेतील धार्मिकता – भाग ६

Religions in America - Part 6

पेनसिल्व्हेनियामधे आमिश लोक दिसायचे. पेनसिल्व्हेनियाच्या दक्षिण भागात या लोकांची मोठी संख्या आहे. या पंथातले लोक आधुनिकतेला शक्यतो दूर ठेवणारे. हे लोक आपल्या फार्मवर राहून, अगदी जुन्या काळासारखं, घोड्यांना नांगर लावून शेती करणारे. आधुनिक तंत्रज्ञानाशी त्यांचे वाकडे. त्यामुळे ट्रॅक्टर वगैरे वापरणे दूरच, गाड्यादेखील वापरायच्या नाहीत. हे वापरणार घोड्यांच्या बग्ग्या.

या भागातून जाताना हायवेवर देखील या आमीश लोकांच्या बग्ग्यांची चित्रे लावलेले सूचनाफलक दिसतात. रस्त्यावरून जाणार्‍या काळ्या रंगांच्या या घोड्यांच्या बग्ग्या बघून, मोटारी आपला वेग कमी करून बाजूने निघून जातात. यांच्या घरात देखील अद्ययावत उपकरणे सापडायची नाहीत. घरात ना रेडिओ ना टेलीव्हीजन ना कंप्युटर. त्यामुळे बाहेरच्या जगाशी संपर्क नाही. स्वयंपाक करणार तो जुन्या पुराण्या भांड्यांमधे. यांची गावं जवळ जवळ पूर्णपणे स्वयंपूर्ण असतात. फर्निचर गावातच बनवलं जातं. कपडे गावातच शिवले जातात. कुणाचं घर किंवा गोठा बांधायचा असला की गावातले बाप्ये एकत्र येऊन सारं काही हातानं बांधणार. यांची मुलं शाळेत जाणार ती देखील गावातल्या शाळेतच – जिथे त्यांना फक्त त्यांच्या पंथाविषयीच शिक्षण मिळणार.

बाहेरच्या जगाबद्दल, आधुनिक सुधारणांबद्दल या मुलांच्या मनात एक प्रचंड मोठ्ठा बागुलबुवा निर्माण केला जातो. मग ही मुलं सोळा, सतरा वर्षांची झाली की त्यांना काही ठरावीक काळापुरतं बाहेरच्या जगात जायला दिलं जातं. आयुष्यात कधी फारसा बाहेरच्या जगाचा वारा न लागलेली ही मुलं, मुली, असं अचानक मुक्त जगात पाऊल टाकल्यावर किती भांबावून जात असतील, याची कल्पनाच केलेली बरी. मग हा बाहेरच्या जगाचा अनुभव घेऊन ही मुलं परतली, तर ती कायमची त्या आमीश जगाची होऊन जातात. स्वखुषीने ही मुलं ह्या आजन्म कारावासात रहाणं पसंत करतात. काही थोडी मुलं बाहेरचा वारा लागला की ते स्वतंत्र, मुक्त आयुष्य जगण्यास उत्सुक होतात. एकदा का या मुलांनी बाहेरच्या जगात रहायचा मार्ग स्वीकारला की त्यांच्यासाठी आमीश जगाचे दरवाजे कायमचे बंद! मोठा विचित्र आणि तेवढाच करूण असा हा प्रकार आहे.

हे लोक आपल्या शेतातला ताजा भाजीपाला, दूध, घरी बनवलेले चीज वगैरे वस्तू, आपल्या घोड्यांच्या बग्ग्यांमधे लादून, जवळपासच्या गावांमधे विकण्यासाठी जातात. कधी आठवड्यातून, महिन्यातून काही गरजेच्या गोष्टी घेण्यापुरते ते बाहेरच्या जगात जातात. पुरुषांचे साधे सुधे काळे कपडे, काळ्या टोप्या आणि वाढवलेल्या दाढी मिशा, बायकांचे अगदी जुन्या पद्धतीचे पायघोळ झगे, मुलांचे देखील असेच जुन्या वळणाचे, अजिबात फॅशनचा स्पर्श न झालेले कपडे, यामुळे हे लोक गर्दीतही चटकन लक्षात येतात. बायका मुली अजिबात मेकप करत नाहीत. या मुला मुलींच्या निरागस डोळ्यांत एकाच वेळी भयंकर कुतूहल आणि काहीसं कारुण्य बघून पोटात गलबलायला होतं.

— डॉ. संजीव चौबळ

डॉ. संजीव चौबळ
About डॉ. संजीव चौबळ 84 Articles
मुंबई पशुवैद्यक महाविद्यालयातून पशुप्रजनन विषयात पदव्युत्तर शिक्षण (१९८६) घेतल्यावर भारतातील विविध संस्थांमधे सुमारे १४ वर्षे काम. २००१ साली युनिवर्सिटी ऑफ कनेक्टीकटमधे डॉक्टर जेरी यॅंग या “क्लोनिंग”च्या क्षेत्रातील नावाजलेल्या संशोधकाच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. करण्यासाठी अमेरिकेत दाखल. गेली पंधरा वर्षे अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी व त्यानंतर नोकरीनिमित्ताने वास्तव्य. अमेरिकेतील उत्तम दर्जाच्या गायींमधे भृणप्रत्यारोपण (EmEmbryo Transfer Technology) तसेच टेस्ट टयुब बेबीज (In Vitro Fertilization) या क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांमधे संशोधन तसेच उत्पादनात जबाबदारीच्या पदांवर काम. आपल्या क्षेत्रातील नावाजलेल्या शास्त्रीय जर्नल्समधे व विविध राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय परिषदांमधे सुमारे २५ शोधनिबंध सादर. अमेरिकेतले वास्तव्य तसेच कामानिमित्ताने प्रवास मुख्यत्वे ग्रामीण/निमग्रामीण भागात झाल्यामुळे, अमेरिकेच्या एका सर्वस्वी वेगळ्या व अनोळखी अंगाचे जवळून दर्शन. सर्वसाधारण भारतीयांच्या अमेरिकेबद्दलच्या अतिप्रगत, अत्याधुनिक, चंगळवादी कल्पनाचित्राला छेद देणारे, अमेरिकेच्या ग्रामीण अंतरंगाचे हे चित्रण, “गावाकडची अमेरिका” या पुस्तकाद्वारे केले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..