नटश्रेष्ठ जयशंकर दानवे यांच्या ३० व्या स्मृतिदिनानिमित्य त्यांच्याबद्द्लच्या जागवलेल्या आठवणी.
आयुष्यभर अभिनयकलेची व्रतस्थपणे सेवा करून त्या कलेचे अनेकांना दान करून कलाकारांची ललाटरेखा कालातीत बनविणारे मराठी रंगभूमी व रुपेरी पडद्यावरील नायक,खलनायक,चरित्र नायक आणि दिग्दर्शक नटश्रेष्ठ जयशंकर दानवे हे असंच एक अनोखं व्यक्तिमत्व……..
कोल्हापूर-कलानगरी, मराठी चित्रपटसृष्टीचे माहेरघर,पंचगंगेचा अवखळपणा आणि सह्याद्रीचा कणखरपणा असा विलोभनीय संगम असलेल्या या नगरीने महाराष्ट्रालाच नव्हे तर उभ्या राष्ट्राला अनेक रत्ने बहाल केली.कलेचा समृद्ध वारसा असल्याने जुन्यांचे पडद्याआड जाणे आणि नव्यांचे चमचमणे हे नियतीचे रहाटगाडगे….असे अविरत चाललेले…ज्यांचा उमेदीचा काळ कोल्हापुरात गेला त्या सर्वांचे कार्यकर्तुत्व खरं तर बंदिस्त करणे कठीण;पण मराठी चित्रपट व नाट्यसृष्टीच्या कळसावर विराजमान झालेले आणि अभिजात शिष्य कलावंतांच्या मांदियाळीत पताका घेऊन पुढे उभे असणारे व आपल्या कसदार अभिनयाने मराठमोळ्या जनतेच्या हृदयसिंहासनावर राज्य करणाऱ्या अभिनेत्यांच्या परंपरेतील एक कलाकार म्हणजे नटश्रेष्ठ जयशंकर दानवे.
नटश्रेष्ठ जयशंकर दानवे हे उत्कृष्ट खलनायक आणि नाट्य दिग्दर्शक म्हणून प्रसिद्ध होते. त्यांचा जन्म पुणे येथे १ मार्च १९१० रोजी महाशिवरात्रीला झाला.३ सप्टेंबर १९८६ रोजी कोल्हापूर येथे त्यांचे देहावसान झाले.या ७५ वर्षांच्या कारकिर्दीत एकूण १०० चित्रपट आणि १३४ नाटके व त्यांचे असंख्य प्रयोग त्यांच्या नांवावर आहेत.त्यांनी सिनेसृष्टी उत्कृष्ट खलनायक व चरित्र अभिनेता म्हणून गाजवली तर नाट्यसृष्टीत ते उत्कृष्ट नाट्यदिग्दर्शक व खलनायक म्हणून प्रसिद्धीस आले. कोल्हापूरच्या जयप्रभा स्टुडीओत चित्रतपस्वी भालजी पेंढारकरांचे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्यांनी बराच काळ व्यतीत केला.
राजकपूरना प्रथम “वाल्मिकी” चित्रपटात नारदाचा मेकअप करून हिंदी सिनेसृष्टीला शो मन देणारे होते जयशंकर दानवे. सुलोचना या हिंदी-मराठी चित्रपटसृष्टी गाजविणाऱ्या अभिनेत्रीला “ करीन ती पूर्व ” या रंगमंचावरील नाटकाद्वारे प्रथम अभिनय क्षेत्रात आणणारे आणि “ जयभवानी ” या चित्रपटाचे दिग्दर्शक म्हणून प्रथमच त्यांना मुख्य नायिकेची संधी देणारे होते जयशंकर दानवे. “ ऐका हो ऐका ” या नाटकातून गणपत पाटील यांना नाच्याची पहिली टाळी शिकविणारे व राजशेखर यांना रंगभूमीवर याच नाटकाद्वारे प्रथम दिग्दर्शन करणारे होते जयशंकर दानवे.
चंद्रकांत,सुर्यकांत मांडरे,सोहराब मोदी,विक्रम गोखले,जयश्री गडकर,पद्मा चव्हाण, रत्नमाला,रमेश देव अशा कलाकारांना अभिनयाच्या पाउलवाटेवर प्रथम संधी देऊन सिने-नाट्य सृष्टीची कवाडे त्यांच्यासाठी खुली करणारे होते जयशंकर दानवे.त्यांनी एक काळ हैद्राबादला ‘हैम्लेट’ नाटकाचे असंख्य प्रयोग करून गाजवला होता. उर्दू आणि हिंदी भाषेवर प्रभुत्व असूनही मुंबईच्या अभिनय महासागरात न जाता कोल्हापुरात राहून त्यांनी अनेक कलाकार शिष्य घडविले.
करवीर वाचन मंदिर,करवीर नाट्य मंदिर,देवल क्लब,मेडिकल असोसीएशन, पद्माराजे गर्ल्स हायस्कूल,न्यू हायस्कूल अशा कोल्हापुरातील अनेक संस्थाना नाटकांच्याद्वारे उर्जितावस्था आणली अशा कलाकाराचे चिरंतन स्मरण करणे आवश्यक आहे.म्हणूनच २०११ सालापासून “नटश्रेष्ठ जयशंकर दानवे कलायात्री पुरस्कार ” हा मानाचा पुरस्कार दानवे परिवारातर्फे प्रदान करण्यात येतो.
आजपर्यंत रंगकर्मी “श्री.दिलीप प्रभावळकर,डॉ.मोहन आगाशे,श्री.सदाशिव अमरापूरकर,श्री.शरद पोंक्षे, श्री.अरुण नलावडे,श्री.सुबोध भावे” यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
अशा नाट्य-सिनेदिग्दर्शकाचे व कलाकाराला ही भावांजली…….
“ स्मृतीत तुमच्या मिळते स्फूर्ती, गातो आम्ही तुमची कीर्ती
भावफुले ही तुम्हास अर्पण, स्मृतीस तुमच्या शतश: वंदन ”
जयश्री जयशंकर दानवे, कोल्हापूर
(९८६०४४७५९७)
३ सप्टेंबर २०१६
Leave a Reply