प्राध्यापक मधुकर तोरडमल म्हणजे मामा तोरडमल यांचा जन्म २४ जुलै १९३२ रोजी झाला. मधुकर तोरमडल यांच्या अभिनयाची सुरुवात ही मुंबई त्यांच्या शाळेपासूनच झाली. ते दहा वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यांचे काका मुंबईत सांताक्रुझ पोलीस ठाण्यात अधिकारी होते. काकांनी त्यांना पुढील शिक्षणासाठी मुंबईत आणले. ‘ शेठ आनंदीलाल पोद्दार ’ ही त्यांची शाळा. शाळेत पहिल्या दिवशी ओळख करून देताना त्यांनी नाटकात काम करण्याचा छंद असल्याचे वर्गशिक्षिका जयकर बाईंना सांगितले. बाईंनी ते लक्षात ठेवून गणेशोत्सवात एका नाटकाची संपूर्ण जबाबदारी मामांवरच सोपविली. चिं. वि. जोशी लिखित ‘ प्रतिज्ञापूर्ती ’ हे नाटक त्यांनी बसविले. दिग्दर्शन आणि अभिनयही त्यांनी केला. पुढे शाळेचे स्नेहसंमेलन आणि अन्य कार्यक्रमातून नाटक बसविण्याची जबाबदारी ओघानेच तोरडमलांकडे आली आणि त्यांनी ती यशस्वीपणे पारही पाडली.
शालेय, महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मधुकर तोरडमल यांनी कुर्ला येथे ‘प्रीमियर ऑटोमोबाइल’ कंपनीत काही काळ ‘लिपिक’ म्हणून काम केले. त्यानंतर ते अहमदनगर येथील महाविद्यालयात इंग्रजीचे प्राध्यापक झाले. त्यांचे इंग्रजी आणि मराठीवर प्रभुत्व होते. या काळात ‘भोवरा’, ‘सैनिक नावाचा माणूस’ आदी नाटके त्यांनी केली. राज्य नाट्य स्पर्धेतूनही ते सहभागी झाले. स्पर्धेत त्यांनी ‘ एक होता म्हातारा ’ हे नाटक सादर केले होते. या नाटकात त्यांनी साकारलेल्या ‘ बळीमामा ’ या भूमिकेमुळे त्यांना ‘ मामा ’ ही नाव मिळाले आणि पुढे सगळेजण त्यांना ‘ मामा ’ म्हणायला लागले आणि अवघ्या मराठी नाट्यसृष्टीचे ‘ मामा ’ झाले. राज्य नाट्य स्पर्धेतून नाव झाल्यामुळे व्यावसायिक रंगभूमीकडून त्यांना विचारणा होऊ लागली. प्राध्यापक म्हणून नोकरी करत असल्याने नोकरी सांभाळून ते नाटक करत होते. ही कसरत महाविद्यालयाचे प्राचार्य थॉमस यांनी पाहिली. त्यांनी तोरडमलांना ‘ व्यावसायिक रंगभूमीवर जायचे असेल तर जरूर जा. एक वर्षभर काम करून बघ. नाही जम बसला तर पुन्हा इकडे महाविद्यालयात शिकवायला ये ’, असे सांगितले आणि तोरडमल मुंबईत आले आणि तिथे रंगभूमी क्षेत्रात नावलौकिक मिळवला. आपल्या उत्तर-आयुष्यातल्या आठवणी ’उत्तरमामायण’ नामक पुस्तकात सांगितल्या आहेत. मामा तोरडमलांनी स्वतःची रसिकरंजन नावाची नाट्यसंस्था होती.
मधुकर तोरडमलांनी लिहिलेल्या आणि दिग्दर्शन केलेल्या ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’ या नाटकाचे ५०००हून अधिक प्रयोग झाले आहेत. मधुकर तोरडमल, त्या नाटकात प्रोफ़ेसर बारटक्क्यांची भूमिका करत. त्या नाटकावर टीका झाली परंतु झाले भलतेच, लोकांनी त्यांचे नाटक इतके उचलून धरले की त्याचे ५००० प्रयोग झाले. समीक्षकांच्या टीकेचा फायदाच झाला. या नाटकाचे एकाच नाट्यगृहात एकाच दिवशी तीन प्रयोग झाले. ही गोष्ट त्या काळात ‘आश्चर्य’ समजली गेली. पुण्याच्या ’बालगंधर्व’ नाट्यगृहामध्ये मकरसंक्रांतीच्या दिवशी १४ जानेवारी १९७२ रोजी सकाळ, दुपार, रात्र असे हे ३ प्रयोग झाले. ‘बालगंधर्व’च्या त्या प्रयोगांना येणार्या प्रत्येक पुरुष रसिकाला गुलाबाचे फूल आणि महिलांना गजरे, तसेच तीळगूळ देण्यात आला होता. सकाळच्या प्रयोगाला शिवसेनाप्रमुख श्री. बाळ ठाकरे, दुपारी ग. दि. माडगूळकर आणि रात्रीच्या प्रयोगाला वसंत देसाई ही दिग्गज मंडळी सहकुटुंब हजर होती.
मधुकर तोरडमल यांनी ‘नाट्यसंपदा’, ‘नाट्यमंदार’, ‘धि गोवा हिंदू असोसिएशन’ या आणि प्रामुख्याने ‘चंद्रलेखा’च्या नाटय़संस्थेतर्फे सादर झालेल्या नाटकातून कामे केली. ‘गुड बाय डॉक्टर’, ‘गोष्ट जन्मांतरीची’, ‘चांदणे शिंपित जाशी’, ‘बेईमान’, अखेरचा सवाल’, ‘घरात फुलला पारिजात’, ‘चाफा बोलेना’, ‘म्हातारे अर्क बाईत गर्क’ आदी अनेक नाटके केली. ‘संगीत मत्स्यगंधा’ या नाटकात त्यांनी साकारलेला ‘ भीष्म’ही गाजला. याशिवाय प्रा. मधुकर तोरडमल यांनी ऋणानुबंध, किनारा, गगनभेदी, गाठ आहे माझ्याशी, गुलमोहोर, झुंज, भोवरा, मगरमिठी, म्हातारे अर्क बाईत गर्क, लव्ह बर्ड्स, विकत घेतला न्याय, आदी नाटकांतूनही अभिनय केला आहे. त्यांच्या ‘ गुड बाय डॉक्टर ‘ या नाटकात त्यांनी एक विलक्षण व्यक्तिमत्व उभे केले की मनाचा थरकाप उडत असे , त्या नाटकाची कन्सेप्टच इतकी भन्नाट होती की अनेकांना ती पचली नाही. विद्रुप चेहऱ्यामागचे मन आणि त्या मनाची धारणा मराठी रंगभूमीला नवीन होती. गुड बाय डॉक्टर हे नाटक त्यांनीच लिहिले होते. त्याचप्रमाणे त्यांनी भोवरा आणि काळे बेट लाल बत्ती ही नाटके लिहिली . त्यांचे ‘ तिसरी घंटा ‘ हे आत्मचरित्र प्रसिद्ध झाले होते. तर दुसरीकडे ‘ तरुण तुर्क म्हतारे अर्क ‘ या नाटकाने धमाल उडवूं दिली. सध्याच्या विनोदी नाटकाचा धांगडधिंगा त्यांना मान्य नव्हता. ते कडक शिस्तीचे म्ह्णून ओळखले जायचे.
मधुकर तोरडमल यांनी अगाथा ख्रिस्ती यांच्या पुस्तकांचा अनुवाद केला त्यांचप्रमाणे शेक्सपिअर यांच्या पुस्तकांचे त्यांनी खूप वाचन केले. त्यांनी आयुष्य पेलताना ‘ ही रूपांतरित कादंबरी लिहिली .
कमलाकर तोरणे दिग्दर्शित ‘ज्योतिबाचा नवस’ हा त्यांचा पहिला चित्रपट. त्यानंतर ‘सिंहासन’, ‘बाळा गाऊ कशी अंगाई’, राख , ‘आपली माणसं’, ‘आत्मविश्वास’, ‘शाब्बास सूनबाई’ हे मराठी चित्रपटही त्यांनी केले .
अशा मराठीतील नाटककार , कलाकार , ज्येष्ठ रंगकर्मी मधुकर तोरडमल यांचे २ जुलै २०१७ रोजी मुबंईत बांद्रा येथे आजाराने निधन झाले.
— सतीश चाफेकर.
Leave a Reply