ख्यातनाम चित्रपट अभिनेते निळू फुले यांचा जन्म २५ जुलै १९३१ रोजी पुणे येथे झाला.
मराठी चित्रपटसृष्टीमध्ये ग्रामीण खलनायकाला स्वत:च्या खास शैलीने रंगवणारे एक श्रेष्ठ अभिनेते म्हणजे निळू फुले. पुण्यातील सासवड तालुक्यात खळदखानवली येथे निळू फुले यांचा जन्म झाला. त्यांचे वडील कृष्णाजी फुले, आई सोनाई फुले आणि सहा भाऊ व चार बहिणी यांच्यासह एका छोट्याशा खोलीत त्यांचे बालपण गेले. बालवयातील काही वर्षे पुण्यातील खडकमाळ आळीत त्यांचे वास्तव्य होते. घरची परिस्थिती अत्यंत बेताची असल्यामुळे प्राथमिक शिक्षणासाठी त्यांना मध्य प्रदेशात त्यांच्या काकांकडे पाठवले होते. कलेविषयीच्या काकांच्या अभिरुचीमुळे ग्रामोफोन ध्वनिमुद्रिका ऐकणे, मोठ्या पडद्यावर मैदानात दाखवले जाणारे चित्रपट पाहणे, प्रख्यात साहित्यिकांच्या कलाकृती वाचणे या सगळ्याचा त्यांच्या मनावर एकत्रित सकारात्मक परिणाम होत होता. इयत्ता चौथीमध्ये साधारणपणे १९३८ च्या सुमाराला निळू फुले पुण्याला शिवाजी मराठा हायस्कूलमध्ये दाखल झाले. मॅट्रिकपर्यंतच्या शिक्षणाचा हा काळ निळूभाऊंना सर्वार्थाने समृद्ध करणारा ठरला.
शाळेमध्ये इतर विषयांबरोबर मोडी लिपीही शिकवली जात असे. व्हर्नाक्युलर फायनलची परीक्षाही ते उत्तीर्ण झाले. प्रख्यात कवयित्री शांताबाई शेळके त्यांना मराठी शिकवत असत. त्यांच्यामुळे निळूभाऊंची साहित्यिक जाण अधिक प्रगल्भ होत गेली. वाचनाची आवड त्यांना होतीच, तिला शाळेतल्या शिक्षकांमुळे योग्य दिशा मिळत गेली. शाळेचे मुख्याध्यापक आणि निळूभाऊंचे मार्गदर्शक गुरुवर्य बाबूराव जगताप यांच्या विचारांनी ते प्रभावित झाले. स्वातंत्र्यलढ्याच्या काळात राष्ट्र सेवादलाचे काम मोठे होते. ते भाई वैद्य, गोपाळ अवस्थी, डॉ. बाबा आढाव या आपल्या मित्रांसमवेत नेमाने राष्ट्र सेवादलात जाऊ लागले. अल्पावधीतच कलापथकाच्या पथक प्रमुखाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवली गेली. त्या निमित्ताने त्यांचे चतुरस्र वाचन सुरू झाले. नोकरी करायची नाही, हेसुद्धा तेव्हाच नक्की झाले. त्यांचे वडील उपजीविकेसाठी लोखंडाचे तसेच भाजीपाल्याचे दुकान चालवीत होते. मॅट्रिक झाल्यानंतर निळू फुले यांना उदरनिर्वाहाचा विचार करणे भाग होते. त्यासाठी त्यांनी शेतकी महाविद्यालयात माळीकामाचे शिक्षण घेतले. आर्म्ड फोर्सेस मेडिकल महाविद्यालयामध्ये त्यांनी माळ्याची नोकरी स्वीकारली. नोकरी करत असताना त्यांचे सेवादलाचे कामही सुरूच होते. सेवादलातील चर्चा, विचारमंथन याने त्यांची स्वत:ची मते निश्चिकत होत गेली. अत्यंत साधेपणाचा पुरस्कार करणार्या निळूभाऊंवर डॉ. राम मनोहर लोहियांच्या विचारांचा खोलवर प्रभाव पडला.
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत, तसेच गोवा मुक्ती आंदोलनात निळू फुले यांचा सक्रिय सहभाग होता. राष्ट्र सेवादलासाठी त्यांनी १९५७ साली ‘येरागबाळ्याचे काम नव्हे’ हा वग स्वत: लिहिला आणि सादर केला. वग असो, नाटक असो वा चित्रपट – स्वत:च्या खास शैलीने त्यांनी त्या त्या भूमिका अजरामर केल्या. केवळ चेहर्यांच्या संयत हालचाली, डोळे, पापण्या, ओठ, गाल अशा चेहर्यावरच्या सूक्ष्म हालचालींमधले संथ तरीही आशयसंपन्न फरक, त्यांच्या भूमिकेतून फार मोठा परिणाम साधत असे. सामाजिक समस्यांशी आणि त्यांच्या निराकरणासाठी झटणार्या निळू फुले यांना सामाजिक समस्यांना तोंड फोडणारी ‘सूर्यास्त’, ‘सखाराम बाईंडर’, ‘बेबी’ यांसारखी मोजकी नाटके करायला मिळाली. पण त्यांनी सहजसुंदर अभिनयाने आणि अचूक निरीक्षणाने या नाटकातल्या भूमिकांना एका उंचीवर नेऊन ठेवले. विजय तेंडुलकरांचे ‘सखाराम बाईंडर’ हे नाटक कमलाकर सारंग यांनी दिग्दर्शित करताना सखारामच्या भूमिकेसाठी ‘लोकनाट्यवाला’ म्हणून निळूभाऊंचे नाव घेतले गेले. पंचेचाळीस दिवस अथक परिश्रमाने तालमी करणार्याा निळूभाऊंच्या या भूमिकेने नाट्यक्षेत्रात इतिहास घडवला. या नाटकाने त्यांना रंगभूमीच्या प्रवाहात शिरण्याची संधी मिळाली.
विजय तेंडुलकरांच्या ‘बेबी’ या नाटकातली ‘राघव’ ही नायिकेच्या भावाची आव्हानात्मक भूमिकाही निळू फुलेंनी पेलली. त्यांच्या नाट्यकारकीर्दीतली ‘सूर्यास्त’मधील आप्पाजींची भूमिका त्यांच्या जिवंत आणि अलौकिक अभिनयकलेचा वस्तुपाठ ठरली. ‘लग्नाची बेडी’, ‘रण दोघांचं’, ‘प्रेमाची गोष्ट’, ‘राजकारण गेलं चुलीत’ यांसारख्या नाटकांमधून लहानमोठ्या भूमिका त्यांच्या खास ढंगात साकारल्या.
निळू फुले यांनी शंकर पाटील लिखित ‘कथा अकलेच्या कांद्याची’, ‘लवंगी मिरची कोल्हापूरची’ या लोकनाट्यातून महाराष्ट्रभर विनोदाची आणि नाट्याची धमाल उडवून दिली. याच धर्तीवर व्यंकटेश माडगूळकरांचे ‘बिनबियांचं झाड’, ‘कुणाचा कुणाला मेळ नाही’ आणि द.मिरासदारांचे ‘भलताच बैदा झाला’, ‘मी लाडाची मैना तुमची’ ही लोकनाट्ये गावागावात पोहोचवण्याचे श्रेय निळू फुलेंना जाते. याशिवाय ‘जंगली कबूतर’ हे वसू भगतलिखित नाटक व्यावसायिक आणि भडक होते. पण त्यांनी तीन प्रवेशांपुरते केलेले मयादित कामही प्रेक्षकांचे मन जिंकून जात असे. नाटकांच्या संदर्भात निळू फुले यांना वेगवेगळी व्यक्तिमत्त्वे साकारता आली.
बाबूराव गोखले यांच्या नाट्यसंस्थेच्या ‘मास्तर एके मास्तर’ या नाटकात निळू फुले काम करत होते. याच नाटकात काम करणार्या रजनी मुथा या अभिनेत्रीशी त्यांचा परिचय झाला आणि पुढे लग्नात त्याची परिणती झाली. अतिशय साधेपणाने त्यांचा विवाह झाला. यथावकाश त्यांना मुलगी झाली, गार्गी. नाटक, सेवादल आणि चित्रपट अशा अतिशय व्यग्र वेळापत्रकात कुटुंबाला पुरेसा वेळ देता येत नसे, पण त्यांच्या पत्नीने निळू फुले यांच्या कारकिर्दीला संपूर्ण पाठिंबा दिला.
अनंत माने दिग्दर्शित ‘एक गाव बारा भानगडी’ या चित्रपटातल्या लोकमानसात रुजलेल्या ‘झेलेअण्णा’ या पहिल्याच भूमिकेने निळू फुले यांचे चित्रपटसृष्टीतील स्थान निश्चित केले. चंद्रकांत यांनी अचानक नाकारलेली भूमिका निळू फुलेंना मिळाली. या भूमिकेसाठी त्यांच्या सहजप्रवृत्तीनुसार त्यांनी जीव ओतला. या चित्रपटातील ‘झेलेअण्णा’ लोकप्रिय झाले. पुण्यातील चित्रपटगृहात हा चित्रपट शंभर आठवडे चालला. त्यानंतर खलनायकी ढंगाचे अनेक चित्रपट त्यांना मिळू लागले. काही साचेबद्ध आणि एकाच तर्हेच्या भूमिकांमधून त्यांनी ग्रामीण इरसालपणा आणि बेरकीपणा रंगवला. पण याशिवाय असेही काही चित्रपट त्यांच्या नावे जमा झाले, जे त्यांच्या कारकिर्दीला वळण देणारे ठरले.
रामदास फुटाणेंची निर्मिती असलेला, डॉ. जब्बार पटेल यांनी दिग्दर्शित केलेला आणि विजय तेंडुलकरांच्या लेखणीने सजलेला ‘सामना’ हा चित्रपट होता. निळू फुले यांच्या संवादांसह, अभिनयासह अनेक कारणांनी हा चित्रपट गाजला. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना अभिनयाचा राज्य पुरस्कार मिळाला. ‘सिंहासन’ या चित्रपटातून त्याचे वेगळे रूप समोर आले. राजकारणावर आधारित असलेल्या या चित्रपटात ‘दिगू टिपणीस’ ही पत्रकाराची भूमिका निळू फुले यांनी केली. स्वत:च्या चिंतनातून, समाजकारणातील तसेच राजकारणातील जाणिवेतून त्यांनी दिगूची भूमिका प्रत्यक्ष उभी केली. निळू फुले यांनी साधारणपणे दोनशे चित्रपट केले. त्यामध्ये ‘सोंगाड्या’, ‘मुक्काम पोस्ट ढेबेवाडी’, ‘शापित’, ‘जैत रे जैत’, ‘थापाड्या’, ‘हर्या नार्या झिंदाबाद’, ‘पिंजरा’, ‘गाव तसं चांगलं पण वेशीला टांगलं’, ‘सोबती’, ‘पुढचं पाऊल’, ‘आई’, ‘चोरीचा मामला’, ‘पोरींची धमाल बापाची कमाल’, ‘पैंजण’, ‘भालू’, ‘सर्वसाक्षी’, ‘भुजंग’, ‘नाव मोठं लक्षण खोटं’, ‘आयत्या बिळावर नागोबा’, ‘एक होता विदूषक’, ‘साने गुरुजी’ अशा चित्रपटातल्या निरनिराळ्या भूमिकांनी प्रेक्षकांनी निळूभाऊंना मनामध्ये जागा दिली.
सामाजिक वास्तव मांडणारा ‘गोष्ट छोटी डोंगराएवढी’ (२००९) हा निळू फुले यांचा शेवटचा चित्रपट ठरला. त्यांनी ‘सोबत’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. तसेच या चित्रपटाचे संवाद व पटकथाही त्यांनी स्वत: लिहिली होती. मराठी चित्रपटांबरोबरच काही हिंदी चित्रपटातही निळू फुले यांनी भूमिका केल्या. दिलीपकुमार यांच्याबरोबर ‘मशाल’, अमिताभ बच्चन यांच्याबरोबर ‘कुली’, अनुपम खेर यांच्यासह ‘सारांश’ असे महत्त्वपूर्ण चित्रपट त्यांनी केले. ‘एक मुठ्ठी चावल’, ‘प्रेम प्रतिज्ञा’, ‘वो सात दिन’ यांसारख्या हिंदी चित्रपटातूनही त्यांनी काही छोट्या पण लक्षणीय भूमिका केल्या.
‘धग’ या उद्धव शेळके यांच्या कादंबरीवर, तसेच जयवंत दळवी यांच्या ‘धर्मानंद’ या कादंबरीवर निळू फुले यांना चित्रपट काढायचे होते. तसेच भंडारा जिल्ह्यात घडलेल्या सत्य घटनेवर आधारित ‘खैरलांजी’ या चित्रपटाची निर्मिती त्यांना करायची होती. पण त्यांचे हे स्वप्न अपूर्ण राहिले.
प्रतिभासंपन्न असलेला हा अभिनेता अत्यंत साधा, सत्शील, नि:स्वार्थी आणि माणूस म्हणून मोठा होता. आपल्या सहज आणि स्वाभाविक भूमिकांना न्याय देत जवळपास चाळीस वर्षे चित्रपटसृष्टीमध्ये प्रसंगी तीन-तीन शिफ्टमध्ये निळू फुले काम करत राहिले. विविध पुरस्कारांच्या रूपाने आणि रसिकांच्या प्रेमापोटी त्यांना त्यांच्या या भरीव योगदानाची पावती मिळाली. ‘सामना’ आणि ‘चोरीचा मामला’ या चित्रपटातील भूमिकांना विशेष उल्लेखनीय भूमिकेचा पुरस्कार मिळाला. तसेच ‘अजब तुझे सरकार’ यामधील भूमिकेसाठी आणि ‘सासुरवाशीण’ चित्रपटातील भूमिकेसाठीही महाराष्ट्र शासनाच्या विशेष पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले.
समाजकार्य व अभिनय अशा दोन्ही क्षेत्रात समरसून काम करणारा एक सक्षम कलावंत कर्करोगाच्या विकाराने काही काळ ग्रस्त झाला. निळू फुलेंनी वयाच्या अठ्ठ्याहत्तराव्या वर्षी लौकिक आयुष्याचा निरोप घेतला. “स्वत: मी कसा श्रेष्ठ आहे हे सांगणं मला जमणार नाही, त्यामुळे मी आत्मचरित्र कधी लिहिणार नाही” असे म्हणणार्या निळूभाऊंनी स्वत:विषयी खरोखरच काहीही लिहिले नाही.
निळू फुले यांचे १३ जुलै २००९ रोजी निधन झाले.
— नेहा वैशंपायन.
— संजीव_वेलणकर.
९३२२४०१७३३
पुणे.
Leave a Reply