सुप्रसिद्ध अभिनेते राहुल सोलापूरकर यांचा जन्म १७ ऑक्टोबर १९६३ रोजी झाला.
राहुल दत्तात्रय सोलापूरकर हे त्यांचे पूर्ण नाव. नूतन मराठी विद्यालय, स. प. महाविद्यालय येथे त्यांचे शिक्षण झाले असून, आंतरशालेय नाट्य स्पर्धेत सलग तीन वर्षे अभिनयाचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकाविण्याबरोबरच त्यांनी शाळेला करंडक मिळवून दिले होते. आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेत वेगवेगळी पाच बक्षिसे त्यांना मिळाली होती, १९७९ साली एन. सी. सी. तर्फे २६ जानेवारीच्या प्रजासत्ताक दिन संचालनात त्यांची निवड झाली होती. त्या वर्षी त्यांना बेस्ट कैडेट ऑफ नेव्ही (ज्युनिअर विंग) चे सुवर्णपदक तत्कालीन पंतप्रधान मोरारजीभाई देसाई यांच्या हस्ते देण्यात आले होते.
महाविद्यालयीन काळात सलग पाच वर्षे पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत सहभाग आणि अनेक बक्षिसे पटकाविली आहेत. त्याच काळात महाराष्ट्र आणि बाहेरील मिळून एकूण ६५ वक्तृत्व आणि कथाकथन स्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळविले आहेत. राज्य नाट्य स्पर्धेत ८ वर्ष सहभाग आणि अनेक बक्षिसे मिळवत २२ हौशी नाटकातून त्यांनी भूमिका साकारल्या आहेत.
पडघम, मधुसूर्य, माणूस नावाचे बेट, पूज्य गुरूजी ही नाटके त्यांची गाजली आहेत.
२५ व्यावसायिक नाटकामध्ये त्यांनी उठावदार कामगिरी केली आहे. अचानक, नाथ हा माझा, अनैतिक, राजकारण गेलं चुलित या नाटकामधील त्यांच्या भूमिकेला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहे. १०३ मराठी चित्रपटामध्ये त्यांच्या भूमिका गाजलेल्या आहेत. नशीबवान, थरथराट, धुमाकूळ, अफलातून, पळवा-पळवी, तांबव्याचा विष्णुबाळा, बालगंधर्व, भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, संघर्ष जीवनाचा, मोहिनी, व्हेंटिलेटर हे त्यांचे मराठी चित्रपट गाजलेले आहेत. होली, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, हनन, विरुद्ध, यशवंतराव चव्हाण या पाच हिंदी चित्रपटात त्यांनी भूमिका साकारल्या आहेत.
मृगनयनी, अवंतिका, बाजीराव – मस्तानी, एक लग्नाची दुसरी गोष्ट. नुपूर, नंदादीप, शोध यासह ३१ हून आदिक टी. व्ही. सीरियल्समध्ये त्यांनी काम केले आहे.
२०१७ साली त्यांना अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वतीने नेत्रदीपक ‘चित्रकर्मी’ पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. शाहू छत्रपती यांच्यावर राहुल सोलापूरकर व्याख्यान देतात ते ऐकण्यासारखे आहे, व्याख्यानाची सीडीही उपलब्ध आहे. त्यांची थरथराट चित्रपटातील टकलू हैवानची खलनायकी भूमिका खूप गाजली होती.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply