नवीन लेखन...

सुप्रसिद्ध अभिनेते शशी कपूर

शशी कपूर यांचा जन्म १८ मार्च १९३८ रोजी कोलकत्यात झाला. त्यांचे वडील पृथ्वीराज कपूर यांच्या नाटकांमधून शशी कपूर यांनी बालकलाकार म्हणून पहिल्यांदा अभिनय केला . राज कपूर यांची निर्मिती असलेल्या ‘आग’ आणि ‘आवारा’ या चित्रपटांत त्यांनी बालकलाकाराच्या भूमिका साकारल्या. या चित्रपटामध्ये त्यांनी राज यांच्या बालपणीच्या भूमिका केल्या होत्या. राजकपूर आणि शम्मीकपूर या मोठ्या भावांच्या प्रमाणे त्यांनी नायक म्हणून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. खरे तर त्यांचा ओढा रंगमंचाकडे अधिक होता. पृथ्वीराज कपूर यांचा जीव सिनेमापेक्षाही नाटकावर होता. ‘ मुघल ए आझम ‘च्या चित्रिकरणासाठी ज्यादा तारखा मागायला के. असिफ पृथ्वीराजना दौऱ्यावर भेटायला आले तेव्हा त्यांनी दौरा अर्धवट सोडायला ठाम नकार दिला होता. त्यावेळी त्यांचा धाकटा मुलगा शशीदेखील पृथ्वी थिएटरमध्ये काम करत होता. कंपनीचा असिस्टंट मॅनेजर आणि कंपनीच्या नाटकात छोट्या भूमिका करणारा कलावंत अशी दुहेरी जबाबदारी हा १८ वर्षांचा युवक पार पाडत होता. ‘ पृथ्वी थिएटर कंपनी ‘ ही प्रवासी नाटक कंपनी होती. एका शहरातून दुसऱ्या शहरात नाटकांचे दौरे करत फिरणारी. शशी कपूर यांची कलावंत म्हणून जडण घडण ह्याच नाटकांच्या दौऱ्यांतून झाली. १९५६ च्या अशाच एका कोलकात्यातील दौऱ्यात त्यांना आपली भावी जोडीदारीण यांच्याशी त्यांची भेट झाली. एकदा त्यांनी पडदा किंचित बाजूला करून पाहिलं तेव्हा त्यांची नजर एका सुंदर तरुणीवर खिळली आणि ते तिच्या प्रेमात पडले . दोन वर्षांनी त्यांनी जेनिफरशी लग्न केलं आणि त्यानंतर सासरेबुवांच्या नाटकांतून काम करत जगभर दौरे देखील केले. शेक्सपिअरच्या नाटकांनी शशीमधला नट अधिक तल्लख आणि प्रगल्भ केला. जेनिफर या आपल्या वडिलांच्या , जॉफ्री केंडॉल यांच्या, ‘ शेक्सपिअराना ‘ या टूरिंग थिएटर कंपनीतून भारताच्या दौऱ्यावर आल्या होत्या. कोलकात्यातल्या एम्पायर थिएटरमध्ये पृथ्वी थिएटरची नाटकं जोरात चालू लागली म्हणून थिएटर मालकाने पृथ्वीराजकपूर यांना तारखा वाढवून दिल्या. त्यांचा मुक्काम वाढला, पण त्यामुळे तिथे नाटक करायला आलेल्या ‘ शेक्सपिअराना ‘ कंपनीला थांबावं लागलं आणि जवळपासच्या शाळा-कॉलेजांतून आपल्या नाटकांचे प्रयोग करावे लागले.
त्यावेळी जेनिफर या एम्पायर थिएटरमध्ये येऊन पृथ्वी थिएटरची नाटकं बघायला बसत. आपल्या नाटकांना किती प्रेक्षक आलेत, हे नाटक सुरू होण्याआधी पडदा किलकिला करून बघायची शशी कपूरना सवय होती. त्यांनी स्वतःच्या अथक प्रयत्नांनी स्वत:ची कारकीर्द घडवली हे मी, महत्वाचे . आघाडीच्या सर्व अभिनेत्रींसोबत त्यांनी अनेक अविस्मरणीय चित्रपटांतून अभिनय केला. प्रेमपत्र, वक्त, जब जब फूल खिले, प्यार किये जा, कन्यादान, प्यार का मौसम, अभिनेत्री, शर्मिली, आ गले लग जा, चोर मचाए शोर, प्रेम कहानी, दीवार, कभी कभी, त्रिशूल, सत्यम शिवम सुंदरम, काला पत्थर आदी असंख्य चित्रपटांतून त्यांनी ठसा उमटवला. अशी असंख्य नवे घेता येतील. अमिताभ बच्चन यांच्याबरोबरच्या त्यांचा ‘ दिवार ‘ हा चित्रपट कुणीही विसरू शकणार नाही. १९६१ मध्ये यास चोप्रा यांच्या ‘ धर्मपुत्र ‘ या चित्रपटामधून ते हिंदी चित्रपटामध्ये नायक म्ह्णून आले. व्यावसायिक चित्रपटांमध्ये मिळालेल्या यशाचा व पैशाचा उपयोग त्यांनी अर्थपूर्ण, समांतर चित्रपटांची निर्मिती केली त्यामध्ये त्यांनी जुनून , कलयुग , ३६ चौरंगी लेन , विजेता आणि उत्सव या चित्रपटांची निर्मिती केली. नाट्यचळवळीला प्रोत्साहन देण्यासाठी खर्च केला. पृथ्वी थिएटरच्या माध्यमातून नाटकावरील उत्कट प्रेम त्यांनी कायम व्यक्त केले. त्यांनी ‘ हाऊसहोल्डर ‘ , ‘ शेक्सपिअर वल्लाह ‘ , ‘ हीट अँड डस्ट ‘ , ‘ साईड स्ट्रीट्स ‘ , ‘ इन कस्टडी ‘ , ‘ सिद्धार्थ ‘ अशा अनेक इंग्रजी चित्रपटांमधून भूमिका केल्या होत्या. त्यांनी ऐकून ६३ चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका केल्या होत्या तर ५३ चित्रपटांमध्ये सहकारी अभिनेत्यांबरोबर काम केलॆ होते तर २२ चित्रपटांमध्ये सहकलाकार म्हणून काम केले होते.
हिंदी सिनेमाच्या ग्लॅमरस दुनियेत कारकीर्द घालवूनही शशी कपूर यांचं मन घुटमळत राहिलं ते पृथ्वी थिएटरपाशी. काही वर्षांपूर्वी पं. सत्यदेव दुबे यांना मानवंदना म्हणून पृथ्वी थिएटरने महोत्सव आयोजित केला होता, तेव्हा शशी कपूर व्हीलचेअरवर बसून पृथ्वी थिएटरमध्ये आले होते एका कोपऱ्यात शांतपणे बसून नाटकवाल्यांचा चाललेला जल्लोष शांतपणे निरखत होते आणि स्मितहास्य करत होते.
पृथ्वीराज कपूर यांच्या निधनानंतर शशी आणि जेनिफर यांनी आपल्या नाट्यप्रेमाला जागत पृथ्वीराज यांच्या स्मृती चिरंतन करण्याचा ध्यास घेतला. हयातभर नाटकाचे दौरे करणाऱ्या पृथ्वीराज यांचं आपलं एक हक्काचं नाटकघर असावं, हे स्वप्न होतं. ते साकार करण्याचा चंग शशी कपूर यांनी बांधला. त्यांनी ‘ पृथ्वीराज कपूर मेमोरियल अॅण्ड रिसर्च फांऊडेशन ‘ची स्थापना केली. जुहू येथे जागा विकत घेतली आणि १९७८मध्ये पृथ्वी थिएटरची इमारत उभी राहिली . तेव्हा मुंबईत मराठी, गुजराती आणि इंग्लिश नाटकं होत. त्यांची स्वतःची नाट्यगृहं होती, पण हिंदी नाटकांसाठी हक्काची जागा नव्हती. शशी आणि जेनिफर यांनी ती निर्माण केली. त्या काळात जुहूच्या त्या भागात फारशी वर्दळ नव्हती. त्यामुळे प्रारंभीचा मोठा काळ नाटकांकडे प्रेक्षक येत नसत. पृथ्वीतल्या नाटकांना तिकीट नसे आणि नाट्यगृहाचं भाडं देखील प्रत्येक प्रेक्षकामागे फक्त एक रुपया एवढंच होतं. नाटक करणारे झोळी घेऊन उभे राहात. नसिरुद्दीन शहा, जेनिफर केंडॉल, ओम पुरी यांनी गो. पु. देशपांडेंच्या ‘ उध्वस्त धर्मशाळा ‘ या नाटकाचा केलेला हिंदी प्रयोग हा पृथ्वी थिएटरमध्ये झालेला सर्वात पहिला नाट्यप्रयोग. पुढे अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ हिंदी नाटककार, रंगकर्मींचे प्रयोग पृथ्वी थिएटरमध्ये होऊ लागले. शशी कपूर यांनी धंदेवाईक हिंदी चित्रपटांत कामं करुन मिळणारे पैसे पृथ्वी थिएटरच्या उभारणीसाठी आणि ते चालवण्यासाठी ओतले. अनेक चित्रपट अभिनेत्यांनी त्यांचा पैसा कोणत्या ना कोणत्या तरी व्यवसायामध्ये गुंतवला मात्र साक्षी कपूर यांनी मात्र स्वतः कमावलेला पैसा ‘ रंगभूमीसाठी ‘ समर्पित केला. नाट्यगृहं वा सांस्कृतिक केंद्र सरकारी भूखंडावर आणि धनाढ्यांच्या निधीतून साकारण्याची पद्धत सर्रास अवलंबिली जात असताना शशी कपूर यांनी स्वतःच्या कमाईतून आणि मालमत्तेतून ही नाट्यवास्तू उभी केली. या थिएटरची रचनाही संपूर्णपणे नाटक करणाऱ्यांना विविध प्रकारची नाटकं करण्यास सोयीची ठरेल अशा पद्धतीने केली. आपल्या तारुण्यात नाटकांचे दौरे करताना आलेल्या अडचणींचा त्यांना या कामी उपयोग झाला.
पृथ्वीमध्ये होणाऱ्या नाटकाच्या पहिल्या प्रयोगाला शशी कपूर आवर्जून उपस्थित राहात आणि महत्त्वाचं म्हणजे ते स्वतः तिकीट काढून नाट्यगृहात येत. मेकअपरूममदये येऊन कलाकारांना भेटत. तिथल्या वातावरणामध्ये रंगून जात. साक्षी कपूर यांनी इंग्रजी चित्रपटांमधून कामे केली त्याचप्रमाणे त्याने अनेक कलात्मक चित्रपटांची निर्मितीही केली. सुदैवाने शशी कपूर यांना बघण्याचा त्यांचे भाषणे ऐकण्याचा ,एकदा शूटींग बघण्याचा योग मला पूर्वी आला. ह्याबद्दल मी स्वतःला सुदैवी समजतो. माझ्याकडे त्यांच्या वेगवेगळ्या ऑटोग्राफ्सही आहेत.
शशी कपूर याना भारत सरकारने २०११ साली पद्मभूषण देऊन त्यांचा सन्मान केला तर २०१५ साली त्यांना चित्रपटसृष्टीमधला अत्यंत सन्मानाचा दादासाहेब फाळके अवॉर्ड देऊन त्यांचा सन्मान केला. त्याचप्रमाणे त्यांना तीनदा फिल्मफेअर अवॉर्ड्स मिळाले , तर फिल्मफेअर चा लाईफटाईम अचिव्हमेट अवॉर्ड मिळाला , त्याचप्रमाणे महंमद रफी अवॉर्ड मिळाले.
अशा सच्च्या ‘ रंगकर्मीचे ‘ ४ डिसेंबर २०१७ रोजी प्रदिर्घ आजाराने मुंबईमध्ये निधन झाले.
त्यांचा हा वारसा त्यांची कन्या संजना आणि पुत्र कुणाल यांनी कसोशीने जपला. आज पृथ्वी थिएटर हे मुंबईतलं सर्वात मुख्य सांस्कृतिक केंद्र झालं आहे. पृथ्वीच्या वाढत्या वलयाबरोबर त्याच्याशी निगडित शशी कपूर यांच्या स्मृतीही चिरंतन झाल्या आहेत.
— सतीश चाफेकर.
Avatar
About सतिश चाफेकर 448 Articles
सतिश चाफेकर हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. जगभरातील ३०००० पेक्षा जास्त व्यक्तींचा स्वाक्षरीसंग्रह त्यांच्याकडे आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..