रिमा लागू यांचा जन्म २१ जून १९५८ रोजी गिरगावात झाला. त्यांचे खरे नांव नयन भडभडे . त्यांच्या आई मंदाकिनी भडभडे या देखील रंगमंचावरील अभिनेत्री होत्या. रीमा लागू या बालकलाकार म्हणून अभिनयक्षेत्राशी निगडीत होत्या. त्यांना १९७० साली पुण्याचा हुजूरपागा शाळेत घातले. त्यांचे प्राथमिक शिक्षण गिरगावातील चिकित्सक आणि कमळाबाई शाळेत झाले. त्या पुण्याच्या शाळेत असताना त्यांनी ‘ वीज म्हणाली धरतीला ‘ आणि ‘ काबुलीवाला ‘ नाटकातून कामे केली.’ बेबी नयन ‘ म्ह्णून त्यांनी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला होता. शाळेच्या शेवटच्या वर्षी त्यांनी ‘ नटसम्राट ‘ मधील अप्पासाहेब बेलवलकर यांची भूमिका केली होती . पुढे त्यांनी विल्सन महाविद्यलयात प्रवेश घेतला , त्यांनी श्याम बेनेगल यांच्या एका जाहिरातीत काम केले होती , ती जाहिरात खूप गाजली. काही काळ बँकेतही नोकरी केली. परंतु त्यांना बँकेतील नोकरी आणि अभिनय एकदम करण्यास अडचण निर्माण झाली आणि मग त्यांनी अभिनयातच करिअर करण्याचे ठरवले.
रिमा लागू यांनी त्यानांतर घर तिघांचे हवे , चल आटप लवकर , झाले मोकळे आकाश , तो एक क्षण , बुलंद , पुरुष , सविता दामोदर परांजपे , विठो रखुमाय , सासू माझी ढासू , शांतेच कार्ट चालू आहे , अशा अनेक नाटकातून त्यांनी कामे केली . रिमा लागू यांची ‘ पुरुष ‘ मधील भूमिका खूप गाजली. सविता दामोदर परांजपे या नाटकातील त्यांची भूमिका आजही डोळ्यासमोर आहे. साधरणतः ८० च्या दशकात त्यांनी हिंदी चित्रपटात कामे करायाला सुरवात केली. त्यांनी मराठी चित्रपटातदखील कामे केली १९७९ साली आलेल्या ‘ सिहासन ‘ या चित्रपटातील छोटी भूमिका बरेच काही सांगून गेली. १९८० साली आलेल्या आक्रोश आणि कलयुग या चित्रपटापासून त्यांच्या वेगळया प्रवासाला सुरवात झाली. त्यानी ‘ रिहाई ‘ नावाच्या एका वेगळ्या चित्रपटात काम केले होते . त्यानंतर त्यांनी ‘ कयामत से कयामत तर् तक ‘ , ‘ मैने प्यार किया ‘ , ‘ हम आप के है कौन ‘ , ‘ वास्तव ‘, ‘ कल हो ना हो ‘ या चित्रपटापासून त्या हिंदी चित्रपटामधील ‘ आई ‘ म्ह्णून ओळखल्या गेल्या. त्यांनी साकारलेली ‘ वास्तव ‘ मधील भूमिका विलक्षण वेगळी ठरली. शूटिंगच्यावेळी त्यांतील हिरो संजय दत्त हा फक्त त्यांच्यापेक्षा वयाने एक वर्ष मोठा होता. परंतु अभिनय करताना हा फरक कधीच जाणवला नाही कारण अभिनय करताना संपूर्णपणे झोकून देऊन अभिनय करणे हे त्यांचे वैशिष्ट्य होते. एकीकडे प्रेमळ आई तर दुसरीकडे विलक्षण करारीपणा ‘वास्तव’ चित्रपटामधील त्यांच्या अभिनयातून जाणवतो. तर दुसरीकडे ग्लॅमरस आई म्ह्णून त्यांच्या भूमिका स्विकारल्या गेल्या, अर्थात निरुपा रॉय, सुलोचनाबाई ह्या हिंदी चित्रपटसृष्टीतील आई म्हणून ओळखल्या जायच्या. रिमा लागू यांनी आपल्या आईच्या भूमिकेत वैविध्य आणि कालानुरुप बदल करून ती भूमिका ‘ आजची ‘ केली हे महत्वाचे. गिरीश कुलकर्णी यांच्या ‘जाऊ द्या ना बाळासाहेब’ मधील आईची भूमिकाही तशी वेगळीच आहे. रिमा लागू यांनी केलेल्या संजय दत्त, शाहरुखखान, माधुरी दीक्षित यांच्या आईच्या भूमिका तर गाजलीच. रिमा लागू यांनी ‘ छापा-काटा ‘ या नाटकात अप्रतिम काम केले. त्याचप्रमाणे ‘ये दिल अभी भरा नाही’ मध्ये विक्रम गोखले यांच्याबरोबर केलेले कामही सर्वाना आवडले होते.
रिमा लागू यांनी अनेक मालिकांतून कामे केली त्यात खानदान , श्रीमान श्रीमती , तूतू -मैमै , दो और दो पाच , धडकन , दो हंसो का जोडा , तुझं माझं जमेना आणि हल्ली सुरु असलेली ‘ नामकरण ‘ . रिमा लागू यांनी अनेक जाहिरातीतून देखील कामे केली .
एक बुद्धीमान आणि चतुरस्त्र अभिनेत्री तर त्या होत्याच परंतु आपल्या सहकारी कलाकारांना त्या गरज पडेल तेव्हा मार्गदर्शन करायच्या , त्यांनी कधी स्वतःचा मोठेपणा मिरवला नाही. त्यांना समाजकारणाची आवड होती .’ छापा-काटा ‘ या त्यांच्या नाटकात त्यांच्याबरोबर काम करणारे आणि त्याच्याबरोबर बँकेत एकत्र काम करणारे अभिनेते नंदू गाडगीळ म्हणाले ,” रिमा लागू या अत्यंत सहजपणे माणसात मिसळत असत , तालमीच्या वेळी त्यांचा एक कटाक्ष असे की नाटकाच्या तालमीच्या वेळी फक्त नाटकाविषयी चर्चा , सजेशन्स बाकी काही नाही एकदा का तालमीची वेळ संपली . मग मात्र सर्व प्रकारच्या धमाल गप्पा होत . छापा-काटा नाटकाच्या काही प्रयोगानंतर म्हणजे तीन-चार महिन्यांनंतर काही दिवस प्रयोग थांबवून आम्ही चक्क दिनुकाकांच्या गावी पिकनिक काढली , खूप धमाल केली . मोठी गाडी केली होती. या अशा पिकनिकमुळे किंवा खेळी मेळीमुळे नाटकात काम करताना एकमेकांवर अत्यंत विश्वास निर्माण होतो एक वेगळे मैत्रीचे , विश्वासाचे बाऊंडिंग तयार होते त्याचा उपयोग नाटकात काम करताना होतो आणि एरवीही होतो. त्या नाटकाच्या आधी सुरवातीचे प्रयोग लावले होते परंतु त्यावेळेला रिमा लागूंची तब्येत बरी नव्हती , त्या म्हणत होत्या आपण प्रयोग करू परंतु मुक्ता बर्वे यांनी सांगितले, आधी तब्येत महत्वाची मग प्रयोग, त्या ऐकत नव्हत्या परंतु मुक्त बर्वे यांनी ते प्रयोग रद्द केले कारण रिमा लागूंची तब्येत बरी नव्हती.
रिमा लागू यांनी सुमारे १२५ चित्रपटात कामे केली तर १४ मालिकेत काम केले आणि असंख्य जाहिराती केल्या. रिमा लागू यांचे लग्न मराठी अभिनेते विवेक लागू यांच्याशी झाले होते.
रिमा लागू यांनी सिहासन , कलयुग , आक्रोश , कयामत से कयामत तक , मैने प्यार किया , आशिकी , हिना , जिवलगा , प्रेम दिवाने , दिलवाले , प्रेम ग्रंथ , जुडवा , येस बॉस , आंटी नंबर १ , इंडियन , जाऊ द्या ना बाळासाहेब यासारख्या अनके चित्रपटातून कामे केली आणि नुकताच २०१७ साली केलेला देवा हा चित्रपट.
रिमा लागू यांनी खानदान, महानगर, किरदार , आसमान के आगे , श्रीमान श्रीमती , तूतू -मैमै , दो और दो पांच , धडकन अशा अनेक मालिकांतून कामे केली होती.
रिमा लागू यांना अनेक अवॉर्ड्स मिळाली होती. त्यांना चार वेळा फिल्मफेअर अवॉर्डस मिळालेली होती.
रिमा लागू १७ तारखेच्या संध्याकाळी शूटिंग संपवून घरी आल्या आणि रात्री त्याच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले परंतु १८ मे २०१७ रोजी सकाळी दीड वाजता हृदयविकाराच्या झटक्याने त्याचे निधन झाले , आणि एक समर्थ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड गेली.
— सतीश चाफेकर
Leave a Reply