मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांचा जन्म ३ नोव्हेंबर १९७४ रोजी झाला.
सोनाली कुलकर्णी यांना आपण संवेदनशील अभिनेत्री सोबतच एक संवेदनशील लेखिका म्हणून ही ओळखतो. त्यांनी अनेक वर्षे लोकसत्ताच्या “विवा” या पुरवणीचे संपादन केले, त्यात त्यांनी लिहिलेल्या “सो कूल” या स्तंभावर आधारीत त्यांच नावाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे. त्या मुळे मराठी चित्रपटसृष्टीत सोनाली कुलकर्णी यांना ‘सो कूल’ नावानेही ओळखले जाते.
व्यावसायिक आणि कलात्मक असे दोन्ही प्रकारचे चित्रपट करतांना त्यात योग्य संतुलन त्यांनी साधले आहे. सोनाली कुलकर्णी या मुळच्या पुण्याच्या. गिरीश कर्नाड दिग्दर्शित ‘चेलुवी’ या कन्नड सिनेमाद्वारे आपल्या करिअरला सुरुवात करणा-या सोनालीने केवळ देशांतच नव्हे, तर परदेशातही आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. गिरीश कर्नाड दिग्दर्शित “चेलुवी’ या सिनेमात काम करण्यापूर्वी सोनाली पुण्यातील प्रेक्षकांना तिच्या प्रायोगिक नाटकांमुळे व त्यांच्या ‘समन्वय’ या नाट्यसंस्थेमुळे माहीत होती. मात्र ‘चेलुवी’मुळे तिचे नाव संपूर्ण देशभर झाले. या सिनेमावेळी तिचे महाविद्यालयीन शिक्षण सुरू होते. १९९२ साली आलेल्या या सिनेमाने राष्ट्रीय पारितोषिक मिळवले होते. इतकंच नाही, तर दिल्ली, लंडन, कान्स फेस्टिव्हलमध्ये हा सिनेमा दाखविला गेला होता.
‘फुओको दी सु’ या इटॅलियन सिनेमातील भूमिकेसाठी सोनाली कुलकर्णी यांना २००६ साली मिलन फिल्म फेस्टिव्हलमध्ये पुरस्कार मिळाला. या सिनेमाला मिळालेल्या यशानंतर सोनाली कुलकर्णी यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. मराठी, हिंदी, गुजराती, कन्नड, तामिळ, इटालियन आणि इंग्रजी सिनेमांत त्यांनी काम केले आहे. अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटातून महत्वाच्या भूमिका त्यांनी केल्या आहेत. या चित्रपटांमध्ये “अग्निवर्षा”, “कितने दूर कितने पास”, “कैरी”, “घराबाहेर”, “जहा तुम ले चलो”, “जुनून”, “टॅक्सी नंबर ९२११”, “डरना जरूरी है”, “डॉ. प्रकाश बाबा आमटे”, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर”, “दायरा”, “दिल चाहता है”, “दिल विल प्यार व्यार”, “देवराई”, “दोघी”, “प्यार तूने क्या किया”, “ब्राईड अँड प्रेज्युडिस”, “मिशन कश्मिर”, “मुक्ता”, “सखी”, “सिंघम” प्रमुख आहे. या वर्षी त्यांची प्रमुख भूमिका असणारा “अग बाई अरेच्या” हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यांना “फूक सु डी मी” या इटालियन चित्रपटासाठी मिलान अंतरराष्ट्रिय चित्रपट महोत्सावात सर्वोकृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्राप्त झाला. त्यांनी “खतरों के खिलाड़ी ” व “झलक दिखला जा” या रियलिटी शो मध्ये भाग घेऊन आपल्या एक्शन आणि नृत्य कौशल्यासाठी कौतुक मिळवले आहे.
मराठी सिनेसृष्टीतील दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांच्याबरोबर सोनालीचं लग्न झालं होतं. मात्र त्याच्यात काही मतभेद झाले त्यामुळं फार काळ त्यांचं हे नाते टिकू शकले नाही २००७ साली दोघांचा घटस्फोट होऊन दोघे विभक्त झाले. २०१० मध्ये सोनालीनं नचिकेत पंतवैद्यबरोबर आपला दुसऱ्यांदा लग्न केलं. नचिकेत फॉक्स टीव्हीमध्ये एम.डी. पदावर कार्यरत आहेत. नचिकेत यांचं देखील हे दुसरे लग्न आहे. सोनाली आणि नचिकेत यांना कावेरी नावाची एक मुलगी आहे.
www.sonalikulkarni.org ही सोनालीची वेबसाइट आहे. सोनाली कुलकर्णी यांना आपल्या समूहाकडुन वाढदिवसाच्या शुभेच्छा.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply