चंद्रकांत खोत यांचा जन्म ७ सप्टेंबर १९४० रोजी रत्नागिरी जिल्ह्यामधील देवगड येथे झाला. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने खोत यांच्या वडिलांनी मुलांना सातवीपर्यंत शिक्षण घेऊ दिले , त्यानंतर कामधंद्याचे बघा असे सांगितले. मात्र शिक्षणाची ओढ असलेले खोत थांबले नाहीत स्वकष्टाने त्यांनी पुढील शिक्षण घेतले. एम.ए. झाल्यावर त्यांनी पीएच.डी. करण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्यांनी सत्तरीच्या दशकातील कवितांचा मागोवा घेतला. पण पीएचडीसाठी गाईड न मिळाल्याने खोत यांचे स्वप्न अर्धवटच राहिले. मात्र तोवर खोत यांनी साहित्य क्षेत्रात स्वतःचे स्थान निर्माण केले. विशेष म्हणजे खोत यांना पीएचडी करता आली नसले तरी त्यांच्याच मूळगावातून येणार्या एका तरुणाने खोत आणि त्यांचे साहित्य यावर पीएच.डी. करुन डॉक्टरेटची पदवी मिळवली होती.
१९६० नंतरच्या काळात ‘ लघुनियतकालिके ‘ च्या चळवळीमधून चंद्रकांत खोत यांचे नाव सर्वाना समजले. त्यांचं सर्वात मोठं योगदान म्हणजे ‘अबकडई’ दिवाळी अंक. मराठीत दिवाळी अंकाच्या चळवळीला वेगळं वळण देणाऱ्या मोजक्या अंकांमध्ये ‘अबकडई’ची गणना करावी लागेल. खोत संपूर्ण वर्षभर या एका अंकाची तयारी करत असायचे. वेगळं लेखन कुठे मिळतं याचा ते सतत शोध घेत असत . खोतांकडे लिहायला तेंडुलकरांपासून ते नवीन लेखकापर्यंत सारे तयार असत. पत्रविशेषांक काढायचा ठरला की खोत काफ्का पासून कोणाकोणाची दुर्मीळ पत्रं मिळवत. मुलाखत विशेषांकासाठी त्यांनी रजनीश, मार्लन ब्रॅण्डो, कार्ल मार्क्स अशांच्या मुलाखती मिळवून अंक समृद्ध . एका दिवाळी अंकासाठीइतकी मेहनत करणारा असा संपादक आता मिळणार नाही . नामदेव ढसाळांची ‘ हाडकी हडवळा ‘ पहिल्यांदा खोतांनीच छापली .
चंद्रकांत खोत हे साहित्य क्षेत्रात कवी म्हणून आले. १९६९ मध्ये प्रकाशित झालेला मर्तिक हा त्यांचा पहिला कवितासंग्रह. यानंतर ते कादंबरी लिखाणाकडे वळले. पुरुष वेश्या या बोल्ड विषयावर आधारित ‘ उभयान्वयी अन्वय ‘ ही त्यांची कादंबरी प्रसिद्ध झाली आणि साहित्य क्षेत्रात एकच खळबळ माजली. त्यांची ‘ उभयान्वयी अव्यय ‘ ही कादंबरी अनेकांना अश्लील वाटली परंतु दि . के . बेडेकर , पं . महादेवशास्त्री ,जोशी पु. ल. देशपांडे यांनी त्यांच्या लेखनाला उत्तम दाद दिली. प्रा. नरहर कुरुंदकर यांनी सांगितले की त्यांचे साहित्य वेगळ्या वळणावर आहे. यानंतर दोन वर्षांनी ‘ बिनधास्त ’ आणि १९७४ मध्ये प्रसिद्ध झालेली ‘ विषयांतर ’ ही कादंबरीदेखील लैंगिक विषयावरचीच. या खोतांच्या कादंबर्यांमध्ये कामगार वस्तीतील जीवन, तेथील लैंगिक घुसमट त्यांनी बेधडक मांडली होती.
मुंबईच्या परळ-लालबागच्या वातावरणात वाढलेले खोत मालवणी मुलखातला ठसक्यात कुणाचाही मुलाहिजा न ठेवता बोलत असत. १९९५ नंतर ते अज्ञातवासात गेले होते. सुमारे १५ वर्षांनी ते प्रकट झाले तेव्हा त्यांच्या डोक्यावरील फरकॅप गायब झाली होती. पठाणी वेशातील त्यांचे व्यक्तिमत्त्व बदलले होते . डोळ्यांत सुरमा नव्हता. पांढरीशुभ्र मोठी दाढी त्यांच्या छातीवर रुळत होती. ते कुठे होते, हे त्यांनी कुणालाही सांगितले नाही. काही जण ते हिमालयात गेले होते, असे म्हणत असत. कारण आता त्यांचा ओढा आध्यात्मिकतेकडे वळला होता. भगवी वैराग्यवृत्ती अंगावर वागवत ते
चिंचपोकळीजवळच्या डिलाईल रोडवरील साईबाबा मंदिरात बसून नास्मस्मरणात काळ व्यतीत करीत. तिथे येणारे भाविक भरपूर दाढी वाढलेल्या भगव्या वेशातल्या खोतांना साधुपुरुष समजून त्यांच्या पाया पडत असत. त्यांनी अखेरचा श्वासही याच मंदिरात घेतला.
१९९३ साली प्रकाशित झालेल्या ‘बिंब-प्रतिबिंब’ या पुस्तकाने ते पुन्हा प्रकाशात आले. ह्या कादंबरीमध्ये त्यांनी ‘विवेकानंद’ हा विषय घेतला. चंद्रकांत खोत म्हणतात ह्या कादंबरेचे नाव त्यांना ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायामधील ‘उटूनि दोन्ही आरसे’ या ओवीवरून सुचले. त्याचप्रमाणे ह्या पुस्तकामध्ये त्यांनी स्वतःच्या लेखन-प्रवासाचे उल्लेखनीय टप्पे नमूद केले आहेत. ते नेहमी म्हणत माझी स्वतःची लढाई स्वतःशीच आहे. त्यांनी , कथा कादंबऱ्याही लिहिल्या. चंद्रकांत खोत यांचे लिखाण चाकोरीबाहेरचे आहे. त्यांची १९७७ आलेली ‘ उभयान्वयी अव्यय ‘ ही कादंबरी अनेकांना अश्लील वाटली परंतु दि . के . बेडेकर , पं . महादेवशास्त्री ,जोशी पु. ल. देशपांडे यांनी त्यांच्या लेखनाला उत्तम दाद दिली. प्रा. नरहर कुरुंदकर यांनी सांगितले की त्यांचे साहित्य वेगळ्या वळणावर आहे.
चंद्रकांत खोत यांनी अंकाक्षर ज्ञान , अनाथांचा नाथ (साईबाबांचे आत्मनिवेदनात्मक चरित्र) , अलख निरंजन (नवनाथांच्या जीवनावर) , गण गण गणात बोते , चनिया मनिया बोर (मुलांसाठी कथा) , दोन डोळे शेजारी , बाराखडी , मेरा नाम है शंकर , विषयांतर , संन्याशाची सावली) , हम गया नही, जिंदा है अशी त्यांची ग्रंथसंपदा आहे. त्यांची ‘ घुमला हृदयी नाद हा , धर धर धरा , माळते मी माळते ही गीतेही गाजली.
समीक्षेच्या बाबतीत ते म्हणतात ‘ समीक्षेत असायला हवं ते हे की , लेखकानं जो विषय हाताळला तो किती समर्थपणे हाताळला ? त्यानं विषयाला किती न्याय दिला ? त्याची ती कृती किती खोलवर वाचकांना भिडली .” .
सगळे सामाजिक संकेत धुडकावून वावरलेला हा अवलिया अखेरपर्यंत बेघरच राहिला. खोतांनी राज्य सरकारकडे मुख्यमंत्री कोट्यातून घर मागितले होते. पण ते मिळाले नाही. ही खंत वृत्तपत्रांनी मांडल्यानंतरही महाराष्ट्र सरकारने त्यांच्याकडे दुर्लक्षच केले. निधनाअगोदर, म्हणजे ७ सप्टेंबर २०१४ ला मित्र परिवाराने त्यांचा अमृतमहोत्सवी सोहळा साजरा केला होता.
चंद्रकांत खोत यांना मी एक-दोनदादा भेटलो होतो , त्यावेळी वेगवेगळ्या विषयांवर गप्पाही झाल्या. त्या माणसाकडे खूप काही सांगण्यासारखे होते , त्यांच्या जाण्याने खूप काही महत्वाचे त्यांच्याबरोबर गेले. कारण त्याच्या आयुष्यात एक काळ असा होता की सर्व काही होते , परंतु काही कारणामुळे गेले हे दुर्देवच म्हणावे लागेल.
चंद्रकांत खोत यांचे अचानक १० डिसेंबर २०१४ रोजी ७४ व्या वर्षी मुंबईमध्ये निधन झाले.
— सतीश चाफेकर.
Leave a Reply