गंगाधर बाळकृष्ण सरदार यांचा जन्म २ ऑक्टोबर १९०८ रोजी झाला.
त्यांच्या वडिलांचे दुकान ठाणे जिल्ह्यातील जव्हार संस्थानात होते. साहित्यातून सामाजिक दृष्टीने विचार करणारे एक महत्वाचे अभ्यासक तसेच महाराष्ट्रातील प्रबोधनकाळ , आणि त्या काळातील व्यक्तीचे कार्य , समकालीन प्रश्न याविषयी विचार करणारे विचारवंत अशी त्यांची ओळख महाराष्ट्राला आहे. त्यांचे बालपण एकत्र कुटूंबात गेले. सातवीपर्यंतचे त्यांचे शिक्षण जव्हार येथील कृष्ण विद्यालयात झाले . पुढील शिक्षणासाठी ते मुंबईला चुलत्याकडे आले. दादर येथील छबिलदास हायस्कुल मधून १९२४ साली ते मॅट्रिकची परिक्षा उत्तीर्ण झाले. १९२५ मध्ये ते महाविद्यालयीन शिक्षणासाठी पुण्याला गेले. पुण्याच्या सर परशुरामभाऊ महाविद्यालयातून १९३२ मध्ये बी. ए . आणि १९३५ मध्ये एम . ए . या पदव्या त्यांनी मिळवल्या. १९३४ ते १९४१ पर्यंत त्यांना बेकारी अनुभवावी लागली.
१९४१ ते १९४८ ह्या काळात पुण्याच्या नाथीबाई दामोदर ठाकरसी महाविद्यालयात त्यांनी मराठीचे प्राध्यापक म्हणून काम केले . १९६८ मध्ये नोकरीतून मुक्त झाल्यावर अखेरपर्यंत त्यांनी लेखन आणि समाजप्रबोधन केले. सरदार हे गांधीवाद आणि मार्क्सवाद या दोन्ही विचारसरणीचा संस्कार असणारे समाजवादी विचारवंत म्हणून ओळखले जातात. ते म्हणतात जव्हार सारख्या ठिकाणी आमचे दुकान होते , ठाणे जिल्ह्यातील ते सर्वात गरीब गाव , तेथे उघडे नागडे वारली ते लहानपणापासून बघत होते . ते म्हणत सर्व जातीतील त्यांचे मित्र होते. त्यांनी कधीच जात-पात मानली नाही. आपल्या अनेक मित्रांचे , वारल्यांचे आयुष्य मातीमोल झालेले त्यांनी पाहिलेले होते. त्याचा परिणाम त्यांच्यावर खूप झाला आणि समाजवादी प्रेरणा त्यांना तेथूनच झाली.
१९२५ च्या सुमारास महाविद्यालयीन शिक्षणासाठी पुण्यात आल्यावर स्वातंत्र्य चळवळीशी त्यांचा सतत संबध आला, १९३० मध्ये टिळक महराष्ट्र विद्यापीठाच्या तुकडीतून ते सत्याग्रहात सामील झाले आणि त्यासाठी त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. पुण्यातल्या सरकारमान्य महाविद्यालयातून सत्याग्रहात जाणारे ते पहिले विध्यार्थी होते. या कालखंडात त्यांनी गांधीवादाचा स्वीकार केला , तो केवळ वैचारिक दृष्ट्या नसून प्रत्यक्ष आचरण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. परंतु १९४२ च्या चळ्वळीनंतर त्यांचा मार्क्सवादी विचारसरणीतील लोकांशी संबध आला. त्यांनतर मात्र गांधीवाद आणि मार्क्सवाद या दोन्ही विचारसरणी माणसाला केंद्रित ठेवून विचार करण्याची पद्धत त्यांनी स्वीकारली . ते म्हणत मी मॅन ऑफ अँक्शन म्हणावा तसा नाही . त्यामुळे काही प्रमाणात चिंतन , विचार हेच क्षेत्र मी निवडले आणि ते त्यांच्या स्वभावाला मानवणारे आहे असं त्यांना वाटत होते. १९३४ ते १९४१ पर्यंत सरदार यांना नोकरी नव्हती त्या कालखंडात त्यांनी पी. एच . डी . ची पूर्वतयारी म्ह्णून एकोणविसाव्या शतकातील गद्याचा अभ्यास केला आणि त्यातून ‘ अर्वाचीन मराठी गद्याची पूर्वपीठिका ‘ हा त्यांचा ग्रंथ १९३७ साली प्रसिद्ध झाला. त्याआधी १९२२ मध्ये दत्तो वामन पोतदार यांचा ‘ मराठी गद्याचा इंग्रजी अवतार ‘ हा ग्रंथ मान्यता पावलेला होता. गं. बा. सरदार यांनी ‘ महाराष्ट्राचे उपेक्षित मानकरी ‘ हा ग्रंथ १९४१ साली लिहिला . हे दोन्ही ग्रंथ विषय आणि विवेचन पद्धतीमुळे मान्यता पावले. अनाथ विदार्थीगृहाच्या स्वाध्यायमालेसाठी त्यांनी ‘ जोतीराव फुले ‘ ही पुस्तिका १९४५ साली लिहिली तर पुढे १९८१ साली ‘ महात्मा फुले व्यक्तित्व आणि विचार ‘ या ग्रंथात महात्मा फुले यांचे कार्य आणि विचार या विषयीचे विस्तृत विवेचन सरदार यांनी केले.
मराठी समाजावरील संत साहित्याचा प्रभाव लक्षात घेऊन त्यांनी ‘ संतवाङ्मयाची सामजिक फलश्रुती ‘ हा ग्रंथ लिहिला. त्यात संतवाङ्म ही एक प्रबोधनाचीच चळवळ होती हे सागितले. तुकाराम, रामदास आणि एकनाथ या संतांच्या समग्र काव्यसंपदेतून प्रातिनिधिक वेचे निवडून त्यांचे संपादन सरदार यांनी केले. ते ‘ तुकाराम दर्शन ‘ रामदास दर्शन , एकनाथ दर्शन ‘ या नावानी १९६८ ते १९७२ मध्ये प्रकाशित झाले. पुढे त्यानी ‘ महाराष्ट्र जीवन : परंपरा ,प्रगती आणि समस्या ‘ खंड १ आणि २ प्रकाशित केले. त्यानी प्रबो धनातील पाऊलखुणा , नव्या युगाची स्पंदने , नव्या उर्मी नवी क्षितिजे , परंपरा आणि परिवर्तन ह्यामध्ये सरदार यांनी महाराष्ट्राचे समाजकारण, धर्मकारण, राजकारण आणि मराठी साहित्य या संबधी जे लेखन केले ते वरील पाचही ग्रंथात संग्रहित केले.
गं. बा. सरदार यांना आयुष्याच्या उत्तरार्धात सन्मान प्राप्त झाले . १४ जानेवारी १९७८ साली मुंबईत झालेल्या दलित साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यानी भूषवले. त्याचप्रमाणे १९८० साली बार्शी येथे झालेल्या ‘ अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले तेव्हा मला त्यांचे भाषण ऐकण्याचा योग आला .
अशा थोर विचारवंत लेखकाचे १ डिसेंबर १९८८ रोजी निधन झाले.
— सतीश चाफेकर.
Leave a Reply