अनंत आत्माराम काणेकर यांचा जन्म २ डिसेंबर १९०५ रोजी मुंबईमध्ये झाला.
त्यांचे माध्यमिक शिक्षण मुंबईच्या चिकित्सक समूह शाळेत झाले तर उच्च शिक्षण मुंबईच्या सेंट झेवियर्स आणि एल्फिस्टन कॉलेजमध्ये झाले. संस्कृत आणि इंग्रजी विषय घेऊन ते १९२७ साली बी. ए . झाले. तर १९३० साली ते एल . एल . बी . झाले. सुरवातीला त्यांनी काही काळ त्यांनी वकिलीचा व्यवसाय केला आणि त्यानंतर पत्रकारिता केली. त्यांनी खालसा महाविद्यालयामध्ये आणि त्यानंतर सिद्धार्थ महाविद्यालयामध्ये मराठीचे प्राध्यापक म्हणून होते. त्यावेळी ते त्यांचे मित्र ग. य. चिटणीस जे समाजवादी विचारसरणीचे होते यांनी सुरु केलेल्या लेबर कॉलेजमध्ये ट्रेड युनियनचे कार्यकर्ते तयार करण्यासाठी ते वर्ग घेत असत. कारण त्यांच्यावर मार्क्सवादाचा प्रभाव होता. त्याचप्रमाणे अनंत काणेकर यांना जहाल राजकारणाचे खूपच आकर्षण होते.
अनंत काणेकर यांनी सुरवातीला ‘ रत्नाकर ‘ मासिकामधून लिहिण्यास सुरवात केली. त्यांचा पहिला काव्यसंग्रह ‘ चांदरात व इतर कविता ‘ हा काव्यसंग्रह १९३३ साली प्रकाशित झाला. काणेकरांची त्या काळामध्ये के. ना. काळे , श्री . वि . वर्तक केशवराव दाते यांच्याशी परिचय होऊन त्यांच्याशी मैत्री झाली. ह्या सर्व मंडीळीनी ‘ नाट्यमन्वंतर ‘ नावाची संस्था सुरु केली. ह्याच नाट्यकलेच्या प्रेमामुळे , आकर्षणामुळे अनंत काणेकर यांनी १९२७ साली ‘ इब्सेनच्या ‘ डॉल्स हाऊस ‘ चे भाषांतर ‘ घरकुल ‘ या नावाने केले. त्यानंतर त्यांनी १९३८ साली निशिकांतची नवरी , १९५४ मध्ये झुंज अशी काही नाटकांचा अनुवाद केला. त्याचबरोबर त्यांनी काही एकांकिका लिहिल्या . १९४१ साली ‘ धूर आणि इतर एकांकिका ‘ तर १९६१ साली ‘ सांबर आणि इतर एकांकिका ह्या नावाचे एकांकिका संग्रह प्रकाशित झाले. अनंत काणेकर यांनी काही काळ ‘ चित्रा ’ साप्ताहिकाचे संपादक म्हणूनही काम केले होते. त्याचप्रमाणे ‘ आशा ‘ या साप्ताहिकाचे ते काही काळ संपादक होते.
अनंत काणेकर यांनी नभोवाणीसाठी श्रुतिका लिहिल्या त्याचप्रमाणे ‘ संजीवनी ‘ साप्ताहिकांमधून , चित्रा साप्ताहिकांमधून स्फुट आणि राजकीय स्वरूपाचे खूप लेखन केले. आचार्य अत्रे यांच्या ‘ नवयुग ‘ साप्ताहिकांमधून याच प्रकारचे विपुल लेखन केले. अनंत काणेकर यांचे लघुनिबंधही लोकांना खूप आवडत कारण त्यामध्ये खेळकर , मिस्कील वृत्तीचे लेखन असे. पिकली पाने , शिंपले आणि मोती , तुटलेले तारे , उघड्या खिडक्या , पांढरी शिडे , खिडकीतले तारे , प्रकाशाची दारे अशा अनेक संग्रहामध्ये त्यांचे लघुनिबंध वाचावयास मिळतात.
अनंत काणेकर यांनी कथालेखनही भरपूर केले त्यांच्या कथा जागत्या छाया , मोरपिसे, दिव्यावरती अंधेर , काळी मेहुणी व इतर कथा या संग्रहात समाविष्ट केलेल्या आहेत. त्याचप्रमणे त्यांनी खलील जिब्रानच्या रूपककथाप्रमाणे कथा लिहिल्या त्या १९४७ साली प्रकाशित झालेल्या रुपेरी वाळू या संग्रहात समाविष्ट केलेल्या आहेत. अनंत काणेकर यांच्या कवितासंग्रहाच्या अनेक आवृत्या निघाल्या. त्यांच्या आधीच्या संग्रहातील काही कवितांची घेऊन ‘ चौकोनी आकाश ‘ हा संग्रह प्रा. रमेश तेंडुलकर यांनी संपादित केला. अनंत काणेकर यांनी एक गोष्ट कटाक्षाने पाळली ती म्हणजे त्यावेळी जो मराठी साहित्यामध्ये साचेबंदपणा आलेला होता तो त्यांनी टाळला आणि साहित्यामध्ये नवे वारे निर्माण केले जेणेकरून तरुण पिढीला ते सर्व हवेहवेसे वाटले . परंतु कुठे त्यांच्या लेखनामध्ये तोल न ढळला मात्र नाही . त्यांच्या लेखनामध्ये प्रमुख म्हणजे त्यांची मिस्कील लेखन करण्याची पद्धत , खेळकर वृत्ती , आणि एखाद्या गोष्टीबद्दल विलक्षण जिज्ञासा होती . त्यांचे लेखन वाचताना एक वेगळीच अनुभूती मिळत असे. त्याचप्रमाणे त्यांनी तत्कालीन काव्यसंकेतांना टाळून लिहिलेल्या त्यांच्या कवितांत प्रादेशिक लोकगीतांचे विडंबन काव्याचे, पुरोगामी सामाजिक आशयाचे आणि प्रेमभावनेच्या प्रसन्न आविष्काराचे वैशिष्टयपूर्ण दर्शन आपल्या साहित्यामधून घडवले .
अनंत काणेकर यांचा ‘ चांदरात ‘ हा काव्यसंग्रह खूप गाजला. अनंत काणेकर यांनी १९३९ साली प्रदर्शित झालेल्या ‘ माणूस ‘ या चित्रपटाचे संवाद लेखन केले परंतु त्याच वर्षी तो चित्रपट हिंदीमध्येही प्रदर्शित झाला ‘ आदमी ‘ ह्या नावाने याही चित्रपटाचे संवाद लेखन त्यांनी केले.
अनंत काणेकर यांची काही गाणी ध्वनिमुद्रित झाली आहेत ती पाहिली तर त्यांच्या लेखनाचे वेगळे पैलू समजतील त्यांचे शांता हुबळीकर यांनी ‘ माणूस ‘ चित्रपटामधील ‘ आता कशाला उद्याची बात ‘ हे गाणे किंवा ज्योत्स्ना भोळे यांनी आला खुशीत् समिंदर , एकलेपणाची आग लागली , तू माझी अन् तुझा मीच , दर्यावर डोले माझं गायलेली लोकप्रिय गाणी . त्याचप्रमाणे अनंत काणेकर यांनी दोन नाटके लिहिली त्यांची नावे निशिकांताची नवरी आणि पतंगाची दोरी अशी आहेत. आमची माती, आमचे आकाश ( उत्तर भारत) , निळे डोंगर, तांबडी माती ( दक्षिण भारत) , खडक कोरतात आकाश अशी आहेत .
आचार्य अत्रे आणि अनंत काणेकर एकदा मंत्रालयात यशवंतराव चव्हाण यांच्या केबिनमध्ये बसले असताना आचार्य अत्रे म्हणाले तुम्ही कलाकारांना रहायला घरे देता आम्हा लेखकांचे काय ? तेव्हा यशवंतराव चव्हाण म्हणाले कुठे जागा हवी वगैरे विचारले . तिथल्या तिथे लेखकांच्या नावाची लिस्ट काढली आणि साहित्य संघ , गिरगाव येथे त्याची मिटींग झाली. आजही मंत्रालयामध्ये ‘ साहित्य सहवास , साहित्य संघ , गिरगाव ‘ याच पत्त्याची नोंद आहे. ही माहिती मला साहित्य सहवासमध्ये रहाणारे लेखक सिद्धार्थ पारधे यांनी दिली. परंतु वांद्रे पूर्व येथील एका ररस्त्याला अनंत काणेकर मार्ग असे नाव दिले आहे.
‘धुक्यातून लाल तार्याकडे ’ हे त्यांचे प्रवासवर्णन तर खूपच गाजले होते. अनंत काणेकरांची महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य म्हणून ही नियुक्ती झाली होती. ते साहित्य अकादमीचे सदस्य होते. इ.स.१९६५ मध्ये भारत सरकारने ‘पद्मश्री ’ हा किताब देऊन त्यांचा गौरव केला होता. १९५७ साली औरंगाबाद येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
अनंत काणेकर यांचे ४ मे १९८० रोजी मुंबईमध्ये निधन झाले.
अनंत काणेकर हे मुंबईतील वांद्रे येथील साहित्य सहवास वसाहतीत ’झपूर्झा’ या इमारतीत रहात. काणेकरांच्या निधनानंतरही त्यांच्या पत्नी कमल या तेथे रहात होत्या. कमल काणेकर यांचे वयाच्या नव्वदाव्या वर्षी १८ जानेवारी २००८ रोजी निधन झाले. त्यांनी ‘अनन्वय ‘ या अनंत काणेकरांच्या आठवणींच्या पुस्तकाचे संपादन केले.
अनंत काणेकर यांचे दोन नातू सत्यजित काणेकर आणि अमित काणेकर आजही साहित्य सहवासमध्ये रहात आहेत.
— सतीश चाफेकर.
Leave a Reply