भालचंद्र व्यकटेश पेंढारकर यांचा जन्म २५ नोव्हेंबर १९२१ रोजी झाला. भालचंद्र पेंढारकर यांचा जन्म एका विशिष्ट सुमुहूर्तावर झालेला आहे असेच म्हणावे लागेल कारण ‘ ललित कलादर्श नाटक मंडळीत ‘ त्याचे वडील बापूराव हे प्रारंभी नोकर होते . त्यांनी गुणी नट म्ह्णून लौकिक मिळवलेला होता. पुढे केशवराव भोसले यांच्या निधनानंतर ते या नामवंत नाटक कंपनीचे मालक झाले, ते ज्या दिवशी मालक झाले त्याच दिवशी भालचंद्र पेंढारकर यांचा जन्म झाला. सर्वाना आनंद झाला कारण त्यावेळच्या प्रमुख नाट्यसंस्थांच्या मालकांपैकी कुणालाही मुलगा नव्हता म्ह्णून भालचंद्राचे कौतुक होत असे.
१५ नोव्हेंबर १९३७ रोजी ग्वाल्हेरला असताना बापूरावांचे निधन झाले . कसेबसे आपल्या कुटूंबाला घेऊन भालचंद्र पेंढारकर मुबंईला आले. २८.१२.४२ या दिवशी ललितकलेचे पुनरुज्जीवन होणार म्ह्णून जाहिराती फडकू लागल्या. बापूराव पेंढारकरांचे पुत्रच हे पुनरुज्जीवन करणार हे पाहून चाहत्यांना खूप आनंद झाला. त्या दिवशी होणाऱ्या ‘ सत्तेचे गुलाम ‘ हे नाटक पाहण्यासाठी रसिकांनी वालीवाला थिएटरवर गर्दी केली. पेंढारकरांच्या मुलाला बघण्यासाठी खूप लांबून लोक आले होते. अनेकांनी ललितकलेला मदत केली . १९४७ साली त्यांनी ‘ वधुपरीक्षा ‘ या नाटकाचा प्रयोग केला त्याची सर्वानी स्तुती केली. लता मंगेशकर यांनी आपल्या वडिलांच्या , कै . मास्टर दीनानाथ यांच्या पुण्यतिथिप्रित्यर्थ १९४८ साली ‘ भावबंधनचे ‘ प्रयोग केले या प्रयोगात लता मंगेशकर यांनी ‘ लतिकेचे ‘ काम केले , भालचंद्र पेंढारकर यांनी प्रभाकरचे काम केले आणि चित्तरंजन कोल्हटकर यांनी घनश्यामचे काम केले. लता मंगेशकर यांनी काही प्रयोगातच काम केले. पुढे अनेक संस्था डबघाईला येत होत्या काळ कठीण होता. नवे नाटक मिळत नव्हते , जुनी नाटके पुरेसे उत्पन्न देऊ शकत नव्हती . म्ह्णून भालचंद्र पेंढारकरांनी ‘ ललितकला ‘ च्या बाहेरही कामे सुरु केली. व्ही. शांताराम यांच्या अमर भूपाळी या चित्रपटात त्यांना होनाजीचा दोस्त बाळा याचे छोटे काम मिळाले . ते पाहूनच ‘ मुबई मराठी साहित्य संघा ‘ ने नव्या ‘ होनाजी बाळा ‘ नाटकातील बाळाच्या भूमिकेसाठी पेंढारकरांची निवड केली. १९५४ साली ‘ होनाजी बाळा ‘ रंगभूमीवर आले आणि आपल्या जबरदस्त अभिनयाने पेंढारकरांनी प्रेक्षकांच्या हृदयात स्थान पटकवले. भालचंद्र पेंढारकर याना ‘ होनाजी बाळा ‘ ने अमाप यश दिले. त्यांना ‘ ललितकले ‘ च्या रंगभूमीवर नवी नाटके आणायची होती आणि एके दिवशी भालचंद्र पेंढारकरांना पु. भा . भावे यांची ‘ मॅडम पिशी ‘ हे गोष्ट आवडली. त्यांना जाणवले यावर उत्तम नाटक होईल . ते पु. भा. भावे याच्या मागे लागले याचे नाटक करून द्या म्ह्णून , पेंढारकरांनी चिकाटी सोडली नाही आणि १९५६ च्या मार्च मध्ये भाव्यांनी नाटक लिहिले ते होते ‘ स्वामींनी ‘. आपल्या वडलांच्या पुण्यतिथीला ‘ स्वामींनी ‘ रंगभूमीवर आणले . स्वामींनी नाटकाने इतिहास घडवला . तर १९५७ च्या वडिलांच्या पुण्यतिथीला बाळ कोल्ह्टकरांचे ‘ दुरितांचे तिमीर जावो ‘ हे नाटक आणले आणि दोन्ही नाटकांनी इतिहास घडवला. ‘ दुरितांचे तिमीर जावो ‘ मधला ‘ दिगू ‘ आजही अनेकनाच्या स्मरणात आहे. भालचंद्र पेंढारकरांनी ‘ दुरितांचे तिमीर जावो ‘ आणि पंडितराज जगन्नाथ ही नाटके दिग्दर्शित केलेली आहेत. भालचंद्र पेंढारकर यांनी महाराष्ट्रबाहेर नाटकांचे प्रयोग केले त्यात त्यांना मनस्तापही भोगावा लागला, त्याच्या नाटकाचे दिल्ली येथेही यशस्वी प्रयोग झाले .
भालचंद्र पेंढारकरांनी अनेक नाटकांना संगीत दिले आहे त्यांची नावे आकाशगंगा , आकाश पेलताना , दुरितांचे तिमिर जावो , पंडितराज जगन्नाथ बहुरूपी हा खेळ असा , रक्त नको मज प्रेम हवे , सत्तेचे गुलाम आणि स्वामिनी अशी आहेत. भालचंद्र पेंढारकर शिस्तीचे भोक्ते होतेच परंतु त्यांची रंगभूमीवर अमाप श्रद्धा होती. तिसरी घंटा जाहीर केलेल्या वेळेवरच होणार आणि त्याच क्षणी बुकिंगची पर्वा न करता नाटक सुरु करणारा एकमेव निर्माता आणि अभिनेते ते होते. मुबई साहित्य संघात त्यांची स्वतःची रेकॉर्डिंग रूम होती. त्यात त्यांनी असंख्य नाटके रेकॉर्ड करून ठेवली आहेत. त्यात प्रायोगिक नाटके , संघात झालेली नाटके रेकॉर्ड करून ठेवलेली आहेत. गिरगावातील साहित्य संघाचे आणि त्यांचे नाते शेवटपर्यंत अतूट होते. भालचंद्र पेंढारकरांनी सुमारे ५१ नाटकांतून कामे केली आहेत . त्यात आनंदी-गोपाळ , उद्याचा संसार , एकच प्याला , खरा ब्राह्मण , जय जय गौरीशंकर , दुरितांचे तिमीर जावो , पुण्यप्रभाव , भटाला दिली ओसरी , मंदारमाला , शरद , संशयकल्लोळ सुंदर मी होणार , हाच मुलाचा बाप , सौभद्र , होनाजी बाळा , श्री , होनाजी बाळा याचा समावेश आहे.
रंगभूमीची शिस्त पाळणारे , रंगभूमीसाठी झटणारे भालचंद्र पेंढारकर यांचे ११ ऑगस्ट २०१५ रोजी निधन झाले.
— सतीश चाफेकर.
Leave a Reply