कवि अनिल म्हणजे आत्माराम रावजी देशपांडे यांचा जन्म ११ सप्टेंबर १९०१ रोजी विदर्भातील मूर्तिजापूर यथे झाला. शालेय शिक्षण पूर्ण केल्यावर ते इ.स. १९१९मध्ये पुणे शहरास आले. फर्ग्युसन महाविद्यालय येथे कलाशाखेचा पदवी अभ्यासक्रम करीत असतानाच त्यांचा कुसुम जयवंत ह्या तरुणीशी परिचय झाला, त्याचे पुढे प्रेमात रूपांतर झाले आणि नंतर ऑक्टोबर ६, १९२९ ला विवाहात परिणती झाली.पदवी मिळवल्यावर भारतीय कलांचा अभ्यास करण्यासाठी कोलकाता इथे प्रयाण केले. ह्याबाबत अब्रिंद्रनाथ ठाकूर आणि नंदलाल बसु ह्यांचे मार्गदर्शन त्यांना मिळाले. त्यानंतर कवी अनिल यांनी १९३५ साली विधिशाखेची पदवी घेतली, सनद घेतल्यावर त्यांनी वकिलीचा व्यवसाय सुरु केला.
बी.ए .एल. एल . बी . करून त्यांनी अमरावती येथे वकिलीस प्रारंभ केला. पुढे सबजज्ज , समाजशिक्षण विभागाचे संचालक , दिल्ली येथे नॅशनल फंडामेंटल एज्युकेशन सेंटरचे संचालक आदी जबाबदारीच्या पदावर त्यांनी काम केले. कवि अनिल यांनी १९३० च्या सुमारास काव्यलेखनास सुरवात केली. त्या काळात जबरदस्त लोकप्रिय असणाऱ्या रवीकिरण मंडळाच्या कवितेपेक्षा त्यांची कविता वेगळी असल्यामुळे लोकांना ती आवडली. त्यांची सुरवातीची कविता ऋजू , भावपूर्ण , सौम्य शब्दाच्या कलेची होती.
‘फुलवात’ या त्यांच्या पहिल्या संग्रहानंतर तीन वर्षाने आलेल्या ‘ प्रेम ‘ आणि ‘ जीवन ‘ या संग्रहात त्यांनी मुक्तछंदात दीर्घ कविता लिहिली त्यामुळे कवि अनिल मराठी मुक्तछंदात्मक कवितांचे प्रणेते समजले जातात. त्यानंतर त्यांनी कला आणि संस्कृती यांच्या परस्पर संबंधावर भाष्य करणारे ‘ भग्नमूर्ती ‘ हे खंडकाव्य लिहिले .
त्यांनतर त्यांनी महायुद्धाच्या परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या वैचारिक आणि भावनिक प्रेरणेतून ‘ निर्वासित चिनी मुलास ‘ हे दुसरे खंडकाव्य लिहिले. ह्यातील कविता आजही जगामध्ये युद्धामुळे जी मुले पोरकी होत आहेत , त्यांना जो संघर्ष करावा लागतो त्यांनाही ही कविता आजही लागू होते. त्यांच्या ‘ पेर्तेव्हा , सांगाती ‘ या दोन्ही काव्यांतून भावना आणि सामाजिक जाणीव दिसून येते. कवि अनिल हे मराठीत मुक्तछंदाचे प्रवर्तक म्हणून अधिक प्रसिद्ध असले, तरी त्यांनी प्रचलित केलेला ‘दशपदी’ हा काव्यप्रकार देखील तितकाच लक्षणीय आहे. सुनीत ज्याप्रमाणे चौदा ओळींचे असते, तशाच दशपदी कवितेत दहा ओळी असतात. अनिलांच्या दशपदींमध्ये मुख्यतः एखाद्या निसर्गचित्राचे शब्दांकन किंवा मनाच्या भावावस्थेचे चित्रण केले आहे त्यांच्या ‘ दशपदी ‘ या संग्रहाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. पु. ल. देशपांडे यांनी एका ठिकाणी म्हटले आहे कवि अनिल यांना दशपदीची शेवटची ओळ आधी सुचत असे आणि मग नंतर ते बाकीची कविता लिहित. कवि अनिल यांनी लिहीलेली कुमार गंधर्व यांची ‘ अजुनी रुसून आहे ‘ आणि ‘ अचानक गाठ पडे ‘ ही गाणी आजही लोकप्रिय आहेत. त्यांच्या अनेक गाण्यांच्या रेकॉर्डस् झाल्या आहेत. कवि अनिल यांच्या कवितांचे इंग्रजीतही रूपांतर झालेले आहे. कवि अनिल यांचे बोलणे अघळपघळ, गमतीच्या आठवणींनी सजवलेले आणि विलंबित लयीत डुलणारे. त्यांच्या कवितेइतकाच त्यांच्या पान खाण्याने लौकिक मिळवलेला आहे. मला आठवतंय १९८० ला बार्शी येथे साहित्य संमेलन होते तेव्हा गेलो होतो , तेथे त्यांना पहिल्यांदा पाहिले होते , काळी पॅन्ट , काळा कोट , मागे फिरवलेले पांढरे केस आणि तोंड पानांमुळे लाल झालेले . त्यावेळी मला त्यांच्या कविताही ऐकता आल्या आणि त्यांची स्वाक्षरीही मिळाली .
कवि अनिल यांना समाजस्थितीचे उत्तम भान होते. त्यामुळे त्यांच्या कवितेतून मानवता हे मूल्य दिसते.
कवि अनिल यांनी १९५८ साली मालवण येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले होते.
कवि अनिल आणि त्यांच्या पत्नी कुसुमावती देशपांडे यांचा पत्रव्यवहार ‘ कुसुमानिल ‘ नावाने प्रसिद्ध आहे.
कवि अनिल यांचे ८ मे १९८२ रोजी नागपूर यथे निधन झाले.
– सतीश चाफेकर.
Leave a Reply