नवीन लेखन...

सुप्रसिद्ध कथाकार व. पु. काळे

लेखक, कादंबरीकार, कथाकथनकार अशी ख्याती असलेल्या व. पु. काळे अर्थात वसंत पुरुषोत्तम काळे यांचा जन्म २५ मार्च १९३२ रोजी झाला. वसंत पुरुषोत्तम काळे हे पेशाने वास्तुविशारद होते. व.पु. काळे हे तरुणांना, समाजाला बरोबर घेऊन जाणारे लेखक होते. त्यांनी समाज आणि समाजातील माणसे जी तुमच्या आमच्यात असतात त्याच्या कथा, व्यथा चांगल्या, आकर्षक भाषेत मांडल्या. अगदी समीक्षकांना हवी ती भाषा त्यांनी नेहमीच टाळली.

आजही ते गेल्याला जवळजवळ १६-१७ वर्षे होऊन गेली तरीही तरुण पिढी त्याचे साहित्य भरपूर वाचते हे महत्वाचे. परंतु जो समीक्षक वर्ग आहे त्याने मात्र त्यांना साडेतीन टक्क्याचे लेखक केले. खरे तर समीक्षक जे काही साहित्य लिहीतात तेच मुळी ‘ साडेतीन ‘ टक्क्यासाठीच असते हे आजच्या पिढीने कृतीने सिद्ध केले आहे. आजही त्याच्या पुस्तकातील कित्येक वाक्ये ‘ सोशल मीडिया ‘ वर सतत फिरत असतात. साहित्य हे समाजासाठी असते सगळेच अभ्यासासाठी नसते हे व. पु. काळे यांच्या साहित्याने सिद्ध केले आहे.

‘समीक्षा’ नावाचा एक जो नकारत्मक,चर्चात्मक उद्योग केला जातो त्याला व. पु काळे यांच्या पुस्तकांनी तडा दिलेला आहे. जे जास्त वाचले जाते ते साहित्य नाही असेही काही समीक्षक मंडळी म्हणतात ? पण २०१७ साली समाजाला, लोकांना, वाचकांना त्याच्याबरोबर येणारा, राहाणारा लेखक, कवी, कथाकार हवा आहे. पुस्तकांच्या कपाटातल्या फटीत राहणार लेखक, कवी ते नेहमीच नाकारतात ?

व. पु. काळे हे सर्वांचे लेखक होते. कुठेतरी क्षणभर नवीन पिढीला ते विचार करायला प्रवृत्त करतात. त्यांचे त्याकाळी ‘ कथाकथनाचे ‘ कार्यक्रम महाराष्ट्रात आणि परदेशातही झाले. सुदैवाने त्याच्या घरी एक-दोनदा मला जाण्याचा योग आला होता. तेव्हा एक गोष्ट माझ्या लक्षात आली ती म्हणजे त्यांचे स्वतःच्या आयुष्यावर नितांत प्रेम होतेच परंतु त्यांचे मनाच्या सौदर्यावरदेखील खूप प्रेम होते, आपले घर कसे असावे, आपण कसे असावे याचा त्यांनी सखोलपणे विचार केलेला होता. कोणी स्वाक्षरी मागायला आला की बहुदा त्याच्याकडे रंगीबेरंगी पेन्स असायची हे मी पाहिले आहे. शेवटी शेवटी त्याच्यावर ‘ओशो’ म्हणजे आचार्य रजनीश याचा खूप प्रभाव पडला. त्यांचे निधन होण्याआधी एक-दोन वर्षापूर्वी मी त्यांना भेटलो तेव्हा ते म्हणाले माझ्या आयुष्यात जेव्हा कठीण प्रसंग आला तेव्हा मला ‘ओशो’ च्या विचारांनी आधार दिला, मला सावरले. तेव्हा माझ्या मनात विचार आला अरे वपुच्या पुस्तकांनी अनेकांना मानसिक आधार दिला आणि त्यांनाच ओशोंच्या विचारांनी सावरले अर्थात वपु हेदेखील तुमच्या आमच्यासारखे माणूस होते आणि मग लेखक होते ही गोष्ट विसरता कामा नये.

व. पु. काळे यांनी शेकडो कथाकथनाचे कार्यक्रम सर्वत्र केले त्याला तरुण वर्गाकडूनच नव्हे तर सर्व स्तरावरून प्रचंड प्रतिसाद मिळत असे. आजही त्याच्या कथाकथनाच्या कॅसेट्स, पुस्तके प्रचंड लोकप्रिय आहेत. वपुच्या कथांमध्ये जो शेवटचा परिच्छेद असतो तो तरुण पिढीला जास्त आवडतो असे अनेकवेळा दिसून आले आहे, त्याचप्रमाणे लेखातील किंवा कथेतील मधली काही वाक्ये अनेकांवर विशेषतः तरुण पिढीवर खूप चांगला परिणाम करून जातात.

आपण सारे अर्जुन, गुलमोहर, गोष्ट हातातली होती!, बाई, बायको आणि कॅलेडर, दोस्त, माझं माझ्यापाशी ?, मी माणूस शोधतोय, वन फॉर द रोड, रंग मनाचे, माणसं, प्लेझर बाँक्स भाग १ आणि २, वपुर्वाई, वपुर्झा़, हुंकार, वपु ८५ अशी अनेक पुस्तके लोकप्रिय आहेत. त्यांचे पत्रसंग्रह, व्यक्तीचित्रे, ललितप्रकार खुपच प्रसिध्द आहेत. तसंच तप्तपदी, ठिकरी, पार्टनर, ही वाट एकटीची यासारख्या कादंबऱ्या खुपच गाजल्या. त्यांच्या अनेक कथांवर आकाशवाणी वर अनेक नभोनाट्ये झाली होती. व. पु काळें यांना ‘महाराष्ट्र शासनाचा उत्तम लेखकाचा सन्मान’, ‘पु.भा.भावे पुरस्कार’, ‘फाय फाउंडेशनाचा पुरस्कार’ हे सन्मान मिळालेच तसेच अमेरिकेत आयोजित करण्यात आलेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद दिले गेले होते.

२६ जून २००१ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने व. पु. काळें यांचे निधन झाले.

— सतीश चाफेकर.

Avatar
About सतिश चाफेकर 448 Articles
सतिश चाफेकर हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. जगभरातील ३०००० पेक्षा जास्त व्यक्तींचा स्वाक्षरीसंग्रह त्यांच्याकडे आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..