विठ्ठल दत्तात्रय घाटे यांचा जन्म १८ जानेवारी १८८५ नगर जिल्ह्यातील घोसपुरी या गावी झाला. प्रसिद्ध कवी दत्त म्हणजे दत्तात्रय घाटे हे त्यांचे वडील होते. वि. द. घाटे वयाच्या नवव्या वर्षापर्यंत नगरमध्येच होते. तेथेच त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. त्यांचे माध्यमिक आणि उच्च शिक्षण अंकलेश्वर , बडोदा , मध्य प्रदेशातील इंदोर, ग्वाल्हेर येथे झाले. १९१८ मध्ये त्यांनी तत्वज्ञान हा विषय घेऊन अलाहाबाद विद्यापीठातून एम . ए . ची पदवी घेतली. मुबई आणि लंडन येथून टी . डी सारख्या शिक्षणशास्त्रातील पदव्या प्राप्त केल्या. मुबई विभागात ते शिक्षण खात्यात अधिकारी म्ह्णून कार्य करत होते. त्याच काळात रत्नागिरी इथे ‘ डेप्युटी एजुकेशनल इन्स्पेक्टर ‘ असताना ते बी.टी . झाले. अखेरीस ते ‘ डेप्युटी डायरेक्टर ‘ पदावरून सेवानिवृत्त झाले.
१९२० साली त्यांनी ‘ दत्तांची कविता ‘ या नावाने त्यांनी त्यांच्या वडिलांच्या , कवी दत्त यांच्या कवितांचे संकलन प्रकाशित करून त्यांनी आपली कारकिर्द सुरु केली. त्याच काळातील प्रसिद्ध कवी चंद्रशेखर , माधव ज्युलियन , माधवराव पटवर्धन , रा. वि. मराठे, नामदेव भाटे हे त्यांचे साहित्यिक मित्र होते. चंद्रशेखर कवींमुळे त्यांना कवितांची गोडी लागली. १९२३ साली झालेल्या ‘ रविकिरण ‘ मंडळाचे ते सदस्य होते . ‘ मधुकर ‘ या टोपणनावाने त्यांनी कवितालेखन सुरु केले. १९२४ साली माधव ज्युलियन यांच्याबरोबर लिहिलेला त्यांचा ‘ मधुमाधव ‘ हा कवितासंग्रह प्रकाशित झाला. हा संग्रह त्यांनी कवी चंद्रशेखर यांना अर्पण केला. त्यांनी लिहिलेल्या ‘ आई ‘ , नवलाख दिवे हे तुझ्या घरी’ , आलात ते कशाला ‘ , गा यशवंता आनंदाने , आळंदीची पालखी यांसारख्या अनेक कविता गाजल्या .
घाटे यांच्या साहित्यात कविता , व्यक्तिचित्रे , ललित निबंध , नाट्यप्रवेश , नाटके , क्रमिक पुस्तके, विद्यार्थ्यांसाठी पुस्तके अशा विविध प्रकारच्या साहित्याचा समावेश आहे. त्यांचे पांढरे केस हिरवी मने , काही म्हातारे व एक म्हातारी ह्यातील व्यक्तिचित्रे अप्रतिम आहेत. त्यांची मनोगते, विचार विलासिते , टिचिंग ऑफ हिस्टरी , इतिहास शास्त्र व कला , नाना देशाचे नाना लोक , भारताची कहाणी, तांबडं फुटलं अशी विविध विषयावरची पुस्तके प्रकाशित झाली. त्यांनी यशवंतराव होळकर हे नाटक लिहिले तर बाजी व डॅडी ही नाटिका लिहिली. ‘नाट्यरूप महाराष्ट्र ‘ हा ऐतिहासिक नाट्य-प्रवेश संग्रह लिहिला. तर १९६१ मध्ये ‘ दिवस असे होते ‘ हे आत्मचरित्र लिहिले.
वि . द. घाटे यांच्या साहित्यसंपदेतून त्यांच्या लेखनातील काव्यामक्ता , नाट्यामक्ता , सौदर्यदृष्टी , इतिहासप्रेमी , जीवनाविषयी आंतरिक ओढ , अभिजात रसिकता या गोष्टी प्रकर्षाने जाणवतात. त्यांना आगळेवेगळे जीवन जगणाऱ्या विविध क्षेत्रांतील विविध माणसाविषयी प्रेम वाटत होते. माणूस हा त्यांच्या निरिक्षणाचा आणि अभ्यासाचा विषय होता.
आचार्य अत्रे यांच्या सहकार्याने ‘ अत्रे-माटे नवयुग वाचनमाला ‘ ही मराठीची क्रमिक पुस्तके तयार करून महाराष्ट्रात क्रमिक पुस्तकांचे नवयुग निर्माण केले. शिक्षकांची अर्थी स्थिती सुधारण्यासाठी ‘ घाटे-परुळेकर समिती ‘ च्या माध्यमातून शिक्षकांची वेतनश्रेणी निश्चित करण्याचे महत्वाचे कार्य केले. त्यापूर्वी अशी पुस्तके आणि अशी योजना नव्हती.
१९५३ मध्ये अलाहाबाद येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. १९५२ ते १९५५ या चार वर्षात ‘ मुंबई राज्य विधानसभेचे ‘ ते सदस्य होते. मराठी साहित्य परिषदेचे ‘ माधवराव पटवर्धन सभागृह ‘ बांधण्याच्या कामठी त्यांचे मोलाचे सहकार्य होते.
सेवानिवृत्त झाल्यावर त्यांनी आपले उर्वरित आयुष्य पुण्यात वाचन, चिंतन , ज्ञानसाधना आणि मित्रमंडळीत घालवले.
वि. द.घाटे यांचे ३ मे १९७८ रोजी निधन झाले.
— सतीश चाफेकर.
Leave a Reply