जे. कृष्णमूर्ती बद्दल सर्व काही नेटवर आहे त्यांचे व्हिडिओज , विचार , पुस्तके सर्व काही आहे. परंतु कॉलेजच्या वयात असताना ठाणा कॉलेजच्या ह. श्री. परांजपे सरांमुळे मी जे.जे. स्कुल ऑफ आर्टर्समध्ये त्यांची भाषणे होत असत ती ऐकण्यास जात असे. वर्षांतून ४ ते ६ भाषणे होत असत. हे काही तरी वेगळे आहे सतत जाणवत होते. आतापर्यंत अनेकजण बघीतले होते ज्यांचे अनेक अनुयायी होते. जेके नेहमी म्हणत तुमची भूमिका थिंकरची पाहिजे, फॉलोअर ची नसावी. त्यांच्या विचाराने माझ्यात आमूलाग्र बदल झाला आहे हे नाकारता येत नाही , ह्याचा अनुभव आजही पदोपदी घेत आहे.
त्यांच्या भाषणातून अनेक मुद्द्यांना ते हात घालत असत आणि तो अर्धवट सोडून देत असत कारण यापुढील विचार ,त्याचा निर्णय तुमचा हवा एक थिंकर म्हणून .. ते नेहमी म्हणत जर कुठला प्रॉब्लेम आला तर त्याचे व्यवस्थित विचारपूर्वक पोस्टमार्टेम करा तुम्हाला तुमच्या प्रोब्लेमचे उत्तर सापडेल. सर्व दुःखाचे मूळ आहे ते म्हणजे अटॅचमेन्ट , तुम्हाला डिटॅच होता आले पाहिजे. ते अत्यंत साध्या सोप्या भाषेत समजवत असत. अर्थात हे अनेक संतांनी सांगितले आहे असे कोणीही म्हणेल परंतु जसजसा काळ पुढे जातो तेव्हा अनेक समीकरणे बदलतात परंतु मूळ तेच असते. ते नेहमी म्हणत तुमचा मेंदू हा टेंपररेकॉर्डर आहे तो अनेक प्रकारचा कचरा रेकॉर्ड करत असतो, तो कचरा सतत साफ करता आला पाहिजे .
मी त्यावेळी त्यांचे फोटोही काढले , त्यांची स्वाक्षरी हवी होती , मी त्यांच्या हातात पेन दिले परंतु हात थरथरत असल्यामुळे म्हणाले आय कान्ट राईट. त्यावेळी त्यांचा हात हातात घेतला आणि अक्षरशः ट्रान्समध्ये गेल्यासारखे वाटले कारण एखाद्या सहा महिन्याच्या मुलासारखा त्यांचा तळहात मृदू होता. नुकतेच दिल्ली येथे झालेल्या वर्ल्ड बुक फेस्टिव्हल मध्ये त्यांचे आत्मचरित्र विकत घेतले, त्यामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत शब्द न शब्द आणि प्रसंग दिलेला आहे हे वाचून मला एक प्रसंग आठवला त्यांना जेव्हा कॅन्सर डिटेक्ट झाला तेव्हा त्याना विचारले गेले, तुम्ही मृत्यूवर अनेक वेळा भाष्य केले आहे, आता तुम्हाला काय वाटते, ते इतकेच म्हणाले ,’ आय एम पासर बाय द अर्थ, काही काळ या प्लॅनेट वर राहिलो. ‘
शेवटच्या कालखंडात त्यांना वेदना सहन होत नसत परंतु त्यांनी देहत्याग केला नाही, तर सर्व सहन केले कारण हा देह संपवण्याचा अधिकार मला नाही . त्यांची वेळोवेळी खूप भाषणे ऐकली, वेगवेगळे अनुभव आले.
असा माणूस आपल्या प्लॅनेटवर रहात होता आणि त्याना पहाण्याचे, ऐकण्याचे भाग्य मला लाभले हे महत्वाचे.
– सतीश चाफेकर.
Leave a Reply