बोसन आणि ट्रेनी सी मन ने पाण्यात काहीतरी पडले म्हणून शिप साईड ला बघितले तर इलेक्ट्रिक ऑफिसर पाण्यात पडलेला दिसला. सत्तावीस वर्षीय इलेक्ट्रिक ऑफिसर डेक वर असणारी लाईट दुरुस्त करत होता उंची जास्त नसल्याने सेफ्टी बेल्ट आणि हार्नेस न लावता तो छोटयाशा शिडीवर उभा राहून काम करत होता. मेन डेकवर शिप साईड जवळची लाईट असल्याने शॉक लागल्या बरोबर त्याचा तोल गेला आणि तो समुद्रात पडला. जहाज फुल्ल स्पीड मध्ये होते, इलेक्ट्रिक ऑफिसरच्या सुदैवाने तो जहाजापासून लांब फेकला गेला होता नाहीतर प्रोपेलर मध्ये खेचला गेला असता तर त्याची वाचण्याची शक्यताच नसती राहिली. बोसन ने वॉकी टॉकी वर ब्रिजला कळवले ट्रेनी सी मन ने जवळच असणारा लाईफ बॉया इलेक्ट्रिक ऑफिसर च्या दिशेने फेकून दिला, पण जहाजाच्या वेगामुळे आणि लाटांमुळे लाईफ बॉया इलेक्ट्रिक ऑफिसर पर्यंत पोहचला नाही. ब्रिज वरून ड्युटी ऑफिसरने जहाजाचा ईमर्जन्सी अलार्म वाजवला आणि मॅन ओव्हर बोर्ड ची अनाऊंसमेंट केली. दोन मिनिटात सगळे अधिकारी आणि खलाशी मस्टर स्टेशन वर जमा झाले. जहाज स्पेन जवळ होते हवेत प्रचंड गारवा होता समुद्रातील पाण्याचे तापमान जवळपास 04 °C होते, निरभ्र आकाश आणि लख्ख सूर्य प्रकाश अशा वातावरणात इलेक्ट्रिक ऑफिसर पाण्यात पडून जवळपास अडीच मिनिटे झाली होती. पाण्याचे तापमान कमी असल्याने एक एक क्षण महत्वाचा होता हायपोथर्मिया मुळे इलेक्ट्रिक ऑफिसरचा जीव जाण्याचा खूप मोठा धोका होता.
इलेक्ट्रिक ऑफिसरला जहाजावर बत्ती साब बोलतात. बत्ती साब वयाने सत्तावीस वर्षांचा तरुण तसेच तब्येतीने धडधाकट होता. त्याला पोहता येत असल्याने लाईफ बॉया लांब पडल्याने त्याने पोहत जाऊन लाईफ बॉया कसाबसा पकडला. कॅप्टन ब्रिजवर वरून सगळ्यांना सूचना देत होता. जहाजाची क्रेन आणि रेस्क्यू बोट तयार केली गेली. जहाजाने वळण घेतले आणि वेग कमी करून दिशा बदलली. पाण्यात रेस्क्यू बोट उतरवली गेली. बोसन, चीफ ऑफिसर आणि थर्ड इंजिनियर असे तिघे जण लाईफ जॅकेट घालून रेस्क्यू बोट पाण्यात उतरताच इंजिन सुरु करून इलेक्ट्रिक ऑफिसर कडे वेगाने निघाले. बोट जहाजावरुन पाण्यात उतरेपर्यन्त आणखी दीड मिनिट आणि इलेक्ट्रिक ऑफिसर पर्यंत पोहचेपर्यन्त आणखी एक मिनिट गेला. 04°C पाण्यामध्ये पडून जवळपास साडे पाच ते सहा मिनिटे झाली होती. बत्ती साब ला रेस्क्यू बोट मध्ये ओढले गेले आणि त्याला ब्लॅंकेट मध्ये गुंडाळले. जहाजावर क्रेन ने रेस्क्यू बोट ला लिफ्ट केले गेले. बत्ती साबला स्ट्रेचर वर टाकून हॉस्पिटल मध्ये बेडवर नेऊन त्याच्या अंगावर आणखी ब्लॅंकेट टाकले. त्याचे शरीर एकदम थंडगार झाले होते मोटरमन ने त्याचे पाय घासायला सुरवात केली तर ट्रेनी सी मन ने हात घासायला सुरवात केली. कॅप्टन आणि सेकंड ऑफिसर ने चीफ कूक ला बत्ती साब साठी काही तरी गरम लिक्विड खाण्यासाठी बनवायला पाठवले. सेकंड ऑफिसर ने ब्लड प्रेशर तपासले आणि डिजिटल थर्मोमिटर ने शरीराचे तापमान बघितले. बत्ती साब रेस्क्यू बोट मध्ये ओढून घेत असतानाच अनकॉन्शियस झाला होता. त्याचा श्वासोच्छवास व्यवस्थित सुरु होता पण डोळे बंद होते.
तासाभराने त्याने डोळे उघडले आणि केविलवाण्या नजरेने बघायला सुरवात केली. तोपर्यंतच्या तासाभरात कॅप्टन ने संपूर्ण प्रसंगाची माहिती कंपनीला कळवून जहाज पुन्हा एकदा आखलेल्या कोर्स वर घेऊन फुल्ल स्पीड मध्ये घेतले होते. बत्ती साब ची रिकव्हरी बघितली आणि कॅप्टन सह इतर सर्वजण दुपारी दीड वाजता लंच साठी मेस रूम कडे गेले.
दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता बत्ती साब काही न घडल्यासारखे ब्रेकफास्ट करून इंजिन कंट्रोल रूम मध्ये हजर झाला. बत्ती साब पाण्यात पडल्यापासूनचे प्रसंग सांगू लागला. शॉक लागल्याने संपूर्ण अंगात झिणझिण्या उठल्या हाताला जोरात झटका बसला आणि तोल जाऊन पडत असताना जहाजाच्या रेलिंग वर पाय आदळल्याने पायाला खूप वेदना झाल्या. थंडगार पाण्यात पडल्यामुळे हालचाल करणे मुश्किल होते त्यात डावा पाय मार लागल्याने एका पायावर कसाबसा पोहू लागलो. आणखीन एक दुर्दैव म्हणून की काय ट्रेनी सी मन ने फेकलेला लाईफ बॉया अजून दूर गेला. जिवाच्या आकांताने पोहत पोहत जाऊन कसाबसा तो लाईफ बॉया पकडला. शॉक लागून पाण्यात पडल्या पडल्या माझ्यावर प्रेम करणाऱ्या सगळ्या व्यक्ती माझ्या नजरे समोर आल्या. दहा वर्षांपूर्वी वारलेले माझे वडील आणि घरात एकटी असलेली माझी आई नजरे समोरून जात नव्हती. थंड पाण्यामध्ये गारठून जीव आता जातोय की नंतर जातोय असे वाटत असताना माझ्या प्रेयसीचे गोड हसणे आणि तिचे मधुर लाजणे आणि माझ्याशी बोलताना तिचे रुसणे फुगणे आणि पुन्हा खळखळून हसणे सगळं सगळं डोळ्यासमोर उभं राहिले. तेवढ्या थंडीत सुद्धा ते आठवून जगण्यासाठी धडपड करायला एक अनामिक ऊर्जा मिळाली. माझ्या माणसासाठी मला जगायचंय या जिद्दीने शरीर आणि शरीरातील रक्त थंड पडत असताना दुखरा पाय कसाबसा हलत होता. शॉक लागून देखील हातांची हालचाल करून लाईफ बॉया पर्यन्त पोचलो. रेस्क्यू बोट माझ्याकडे येताना दिसली पण डोळे बंद होताना फक्त माझ्यावर प्रेम करणारी तीच एकटी दिसत होती.
सकाळी उठल्यावर पहिले आईला फोन केला आणि नंतर तिला फोन केला. कधी नव्हे तो अचानक आणि अवेळी फोन गेल्याने ती बावरली कारण तिला कल्पना नव्हती काल काय घडले त्याची, पण जेव्हा कळले तेव्हा दहा मिनिटे तिचे हुंदके बंद होत नव्हते. कसेबसे तिला शांत केल्यावर तिला सांगितले तुझ्यामुळेच मी जिवंत आहे आणि तुझ्यासाठीच जगत राहणार आहे. नेहमी हसत खेळत संपूर्ण जहाजावर वावरणारा आमचा बत्ती साब मृत्यूशी झुंज दिल्यानंतर जीव वाचल्याबद्दल हमसून हमसून रडताना दिसला होता. एवढा जीवघेणा प्रसंग ओढवून सुद्धा लगेच रिकव्हर होऊन तो कामावर सुद्धा आला आणि सर्वांशी मनमोकळेपणाने व्यक्त झाला.
बत्ती साबला वाचवण्यात सगळ्या शिप स्टाफ ने मोलाची कामगिरी केली. आणखी एक मिनिटभर उशीर आणि थंड पाण्यात तडफडून मृत्यू अशी त्याच्यावर वेळ आली होती पण जगण्याची जिद्द आणि प्रेमाच्या महत्त्वाकांक्षेने त्याला तारून नेले.
© प्रथम रामदास म्हात्रे
मरीन इंजिनियर
B. E. (Mech), DIM
कोन, भिवंडी, ठाणे.
Leave a Reply