वसंता अठ्ठावन्न वर्षाचा झाल्यावर सरकारी नियमानुसार तो नोकरीतून निवृत्त झाला आणि त्याचं गेले पस्तीस वर्षं सुरळीत चाललेलं जग, ब्रेक लागल्यासारखं एकाएकी बदलून गेलं…
नोकरीत असताना त्याची दिनचर्या घड्याळाच्या काट्याप्रमाणे क्रमवार चालू असायची. सकाळी साडेनऊ वाजता तो घराबाहेर पडायचा. वेळेवर ऑफिसला पोहोचून, आपल्या टेबलवरचं काम शिस्तीनं उरकायचा. दुपारी जेवणाच्या सुट्टीत घरुन आणलेला डबा खाऊन इतरांसारख्या टिवल्या बावल्या न करता, पुन्हा कामाला लागायचा. साडे पाच वाजता टेबल आवरुन घरी निघायचा. वाटेत कधी कुणी भेटलं तर गप्पा मारत, रमत गमत किराणा, भाजीपाला घेऊन घर गाठायचा. घरी येताच, पत्नीने चहा दिल्यावर पेपर चाळत बसायचा. रात्रीचं जेवण झाल्यावर त्याची न चुकता, शतपावली व्हायची. काॅटवर पडल्या पडल्या त्याला, शांत गाढ झोप लागायची..
ऑफिसमधले सर्व सहकारी वसंतावर खुश असायचे. सर्वांशी मिळून मिसळून रहाण्याच्या त्याच्या स्वभावामुळे, त्याच्या निरोप समारंभाचे वेळी सर्वजण हळहळले.. परंतु सरकारी नियमानुसार त्याच्या नोकरीचा कालावधी संपलेला असल्याने तो हवाहवासा वाटूनही, त्यांचा नाईलाज होता…
एरवी आठवडाभर कामाच्या दिवसांत वसंता पूर्ण व्यस्त असल्याने, सुट्टीच्या दिवशी घरी राहून तो बेचैन होत असे. दुपार तर त्याला खायला उठत असे. सोफ्यावर बसून कंटाळा आला की, तो हळूच स्वयंपाकघरात डोकावत असे. मग ही बरणी उघड, त्या डब्यात काय आहे ते बघ.. अशा त्याच्या उचापती चालत. दरम्यान त्याच्या बायकोची वामकुक्षी झालेली असायची. तिने स्वयंपाकघरात वसंताने केलेला पसारा पाहिला की, तिला चीड यायची. सुट्टीच्या एका दिवसासाठीही हा माणूस तिला घरात, नकोसा वाटायचा..
तिनं रागावल्यावर वसंतालाही अपराध्यासारखं वाटायचं. आपण जितकं ऑफिसमध्ये व्यवस्थित वागतो तसं घरात वागू शकत नाही याची त्याला खंत वाटायची. या अपराधीपणाचा त्याला पुढे आठवडाभर मानसिक त्रास होत असे..
रिटायर्ड झाल्यापासून वसंता कायम घरातच असायचा. तिला मात्र त्याचा घरात असण्याचा त्रास व्हायचा. तिच्या हौशेमौजेचे दिवस तर कधीच संपलेले होते, जेव्हा संसारात त्याची गरज होती.. तेव्हा त्याला ऑफिस महत्त्वाचं होतं. तो राग तिच्या मनात सतत धुसमसत होता..
गेल्या पस्तीस वर्षातील त्याच्या सवयी तिला आता त्रासदायक वाटू लागल्या होत्या. तेव्हा नोकरी हे कारण तरी होतं, आता तो दिवसभर समोर असल्यानं तिची चिडचिड वाढली होती. आंघोळ केल्यावर कमरेवरचा ओला टाॅवेल, त्याला पलंगावर टाकायची सवय होती. तो ऑफिसला जात असताना, तो टाॅवेल उचलून ती धुवून टाकायची. आता वसंताला भरपूर वेळ असल्याने असली कामं त्याने स्वतःच करावीत, असं ती वारंवार त्याला बोलून दाखवू लागली.
हे तिचं म्हणणं त्यालाही मान्य होतं, मात्र तिनं ते शांतपणे सांगावं, एवढीच त्याची माफक अपेक्षा होती. परंतु तिच्या मूळच्या स्वभावाला तसं बोलणं शक्य नव्हतं..
यामागे कदाचित, वसंता रिटायर्डपणाचं आयुष्य मजेत जगतोय आणि आपल्याला त्याच्या सारखं निवांत आयुष्य मरेपर्यंत कधीच जगता येणार नाही, ही जाणीव तिला सतत बोचत असावी..
खरं तर तिचंही वय आता उताराला लागलं होतं. मुलांची लग्नं, सुनेशी जमवून घेताना तिची दमछाक होत होती. वसंता घरी असल्यामुळे त्याला भेटायला येणारी माणसं, त्यांचं चहापाणी याशिवाय तो काहीही हातभार न लावता त्याचं चोवीस तास समोर असणं, तिला नकोसं वाटू लागलं..
वसंता समोर नसला की, त्याच्या विषयी असुयेनं व समोर असल्यावर त्याचं तोंड पाहून, तिचा तिळपापड होत असे. तो साधं पाणी प्यायला जरी स्वयंपाकघरात आला तरी, ती त्याच्यावर ओरडत असे..
हळूहळू तिला तो समोर नकोसा वाटू लागला. एके दिवशी किरकोळ कारणावरून तिने त्याला रागाने बोलायला सुरुवात केली. साचलेल्या संतापाचा स्फोट झाला होता. तिने रागात त्याच्या आई-वडिलांचा उद्धार केला.. तो हादरला, मात्र ऑफिसच्या सवयीप्रमाणे निरुत्तर झाला. तो तिला चिडण्याचं कारण विचारत राहिला.. त्यावर तिने त्याला एका शब्दात उत्तर दिले की, ‘तू आता मला डोळ्यासमोर नको.. बस्स!’
त्याने ते ऐकलं व नैराश्यानं तिला विचारलं, ‘आयुष्याच्या या शेवटच्या काळात मी कुठे जाऊ?’ तिला वाटलं, वसंता असं बोलून आपल्यालाच चिडवतोय. ती अजून संतापून म्हणाली, ‘कुठेही जा..मेलास तरी बरं होईल, सुटेन मी एकदाची!’ हे तिचं बोलणं ऐकून वसंता एकदमच शांत झाला.
तशाही परिस्थितीत तो तिला म्हणाला, ‘ते माझ्या हातात नाही, पण तुझा शाप माझ्या आतपर्यंत पोहोचला. तू मात्र खूप जग, माझं उरलेलं आयुष्यही तुला मिळू दे. शतायुषी हो.’
पुढे असं वारंवार होऊ लागलं. ती क्षुल्लक कारणावरून भांडत राही व त्याला मरणाचा शाप देई. तो मात्र शांतपणे तिला ‘शतायुषी’ होण्याचा आशीर्वाद देत राही.
तिच्या अंतर्मनात तसं काही नसायचं. तिनं त्याला तीन तपांची साथ दिली होती. वटसावित्रीला त्याच्यासाठी उपवास करुन वडाची पूजा केली होती. त्याचा मृत्यू मागण्याएवढी, ती नक्कीच दुष्ट नव्हती.
तरीदेखील तो समोर दिसला की, तिची विचारशक्तीच नष्ट व्हायची. डोक्यातून सणक निघायची व तिचं शाप देणं सुरु व्हायचं. एक दिवस वसंता अचानक गेला…
सकाळी उठून त्याने चहा घेतला. नंतर नेहमीप्रमाणे बाहेर फिरुन आला आणि ‘थकवा वाटतोय’ म्हणून सोफ्यावर आडवा झाला.. तो परत उठलाच नाही.. घरात धावपळ झाली. डाॅक्टरांना बोलावलं. त्यांनी तपासून, तो ‘सुटल्या’चं सांगितलं.
त्याच्याकडे पाहून जो तो त्याच्या वेदनारहित मृत्यूचा हेवा करीत होता. असं अकाली त्याचं जाणं, कुणालाही पटणारं नव्हतं..
तिच्यासाठी खूपजण हळहळले. आताच कुठे दोघांनाही जीवनात, निवांत वेळ मिळाला होता.. तर वसंताच्या निघून जाण्याने, आता ही एकटी पडली. औपचारिक सांत्वन करुन आलेले पाहुणे, निघून गेले..
आता ती एकटीच राहिली. प्रेम, राग, विरोध, काळजी या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी हक्काचं असं जवळचं कुणीही राहिलं नाही. मुलं, सुना होत्या पण त्यांनाही त्यांचा संसार होता..
तिनं मैत्रिणींना जवळ केलं, देवळात जाऊ लागली. काही दिवस माहेरचे आले.. हळूहळू पुन्हा ती एकटीच पडली.
दिवसामागून दिवस, महिने, वर्षे गेली.. घरातील सर्वांनी तिची ‘पंच्याहत्तरी’ साजरी केली. नंतर पुन्हा सर्वजण आपापल्या कामात गुंतले.
लहानपणी जवळ बसणारी नातवंडही आता मोठी झाल्यावर हाक मारल्यास ‘ओ’ देईनाशी झाली. तिला भूतकाळ आठवून त्रास होऊ लागला. तिला नेमून दिलेल्या जागी ती शांत बसून राहू लागली.
तिच्या वयाचा आकडा हळूहळू वाढत होता आणि कार्यक्षमता कमी होत होती. उठणं, बसणं, चालणं कठीण होऊ लागलं. आता ती मरणाची वाट पाहू लागली..
तिच्याकडे कुणीही लक्ष न दिल्याने ती आता ‘देवा, मला उचल.’ अशी हात जोडून देवाला आळवणी करु लागली. आजकाल तिला फारसं काही आठवायचं नाही.. मात्र तिने वसंताला दिलेले ‘शाप’ तिचा पिच्छा सोडत नव्हते.. आणि त्यावर त्याने दिलेले ‘शतायुषी हो’ हे ‘आशीर्वाद’ आता नकोसे वाटू लागले होते…
असं वसंतासारखं रि’टायर्ड’ जीवन कुणाच्याही वाट्याला येऊ नये. निवृत्तीनंतर दोघांनीही एकमेकांना समजून घेऊन जीवन आनंदाने जगावे.. नवीन छंद, वाचन, लेखन, सहली करुन, मित्रपरिवारात मिसळून रि’टायर्ड’ नव्हे तर रि’फ्रेश’ रहावे..
© – सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
३-८-२१.
Leave a Reply