MENU
नवीन लेखन...

रि युनियन

१९७५ – १९७७ ची आमची, पोलिस ट्रेनिंग कॉलेजची… P. T. C. ची ( आताची “महाराष्ट्र पोलीस अकॅडमी ” — M. P. A.) प्रशिक्षणार्थी पोलिस सब इन्स्पेक्टर्स ची बॅच.
आमची बॅच आणीबाणीतील. त्यातही तत्कालीन मुख्यमंत्री मा. शंकरराव चव्हाण हे काटेकोर प्रशासक असल्याने भरती प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडली आणि सर्वसामान्य आणि हलाखीच्या आर्थिक थरातील कष्टाळू मुलेसुद्धा select झाली. काहींना तर P T C मधे रुजू व्हायला येताना प्रवास खर्चासाठी पैसे उधार घ्यावे लागले होते.
या आमच्या बॅचच्या प्रशिक्षणाचे उद्घाटन माननीय शंकरराव चव्हाण यांनीच केले. त्यावेळी त्यांनी केलेले फर्ड्या इंग्रजीतील भाषण अजूनही आठवते.
दोन वर्षांच्या अत्यंत खडतर प्रशिक्षणानंतर आम्ही १८८ जण Pass Out झालो.( आम्हाला PTC बाहेरील जग फक्त रविवारी काही तासांसाठी दिसत असे.बाहेर जाण्याच्या पहिल्याच प्रसंगी प्रत्येकाला Iodex ची डबी विकत घेणे क्रमप्राप्त झाले होते. यावरून ” खडतर ” म्हणजे काय याची कल्पना यावी. हल्ली प्रशिक्षण एक वर्षाचे असते.)
अलीकडे आमच्या बॅच मधील ५ जणांनी सर्वांना एकत्र आणण्याचा चंग बांधला आणि अथक परिश्रमाना नियोजनाची जोड देऊन, दिनांक १३ आणि १४ मार्च २०२२ रोजी आमच्या बॅच चे Get Together नाशिक येथे घडवून आणले.
आमच्या बॅचमधील आजमितीस ११० जण हयात आहेत. त्यातील बहुतेक जण, पोलिस अधीक्षक, पोलिस उपायुक्त, अप्पर पोलिस उपायुक्त, सहाय्यक आयुक्त अशा पदावरून निवृत्त झाले.
१३ तारखेला नाशिकच्या Express Inn Hotel च्या लॉबीमधे नुसता गोंधळ उडाला होता. येणारा एक एक जण गाडीतून उतरून आधी पोहोचलेल्या कडे धावत होता. बरेच जण तब्बल ४५ वर्षांनी समोरासमोर आले होते.
” मला ओळख पाहू! ” ” “आयला तू? पक्या?”..असे मोठ्यामोठ्याने केलेले संवाद.. हास्यकल्लोळ…. मग गळामिठ्या…..
आता सगळेच वयाच्या सत्तरीत आलेले.परंतु इतक्या वर्षांनी समोर आल्यावर मधला काळ एकदम पुसला गेल्यागत झालं.
” विल्या, दिल्या, अजू, मोन्या, पम्या, राजा, अन्या” अशा हाकानी हॉटेल लॉबी दुमदुमून गेली. हे सगळे पाहून हॉटेलच्या स्टाफलाही गंमत वाटत होती. इतक्या वर्षांनी एकमेकांना भेटून सगळेच इतके भारावले होते की काही batchmates ना इतरांना भेटण्याच्या घाईत,आपल्या बॅगा लॉबीमधे आल्याआल्या कुठे टाकल्या तेच चटकन आठवेना. मग अशाना Alzheimer झाल्याची सार्वजनिक आवईही उठली.
अत्यंत नियोजनबद्ध रीतीने ५ जणांच्या कमिटी ने बिनचूक व्यवस्थापन केले होते. आलेल्यांना Rooms allot झाल्यावर सुध्दा गप्पा संपेनात. अनंत आठवणींनी प्रत्येकाच्या मनात रुंजी घातलेली. आठवणींचे असंख्य विषय आणि प्रसंग.
आमचे तेव्हाचे कडक शिस्तीचे Law Instructors, मोठ्या Long Run दरम्यान, पुढच्या स्क्वाड पासून मागच्या स्क्वाड पर्यंत सतत धावत, कोणाची पाऊले चुकली की धावता धावताच त्याची खरडपट्टी काढणारे पन्नाशीच्या घरातील, धावताना कधीही न दमणारे Drill Instructors तुपेसर, अमरसिंग सर, एखाद्या कॅडेटला ट्रेनिंग दरम्यान चक्कर आली की ” ए.. पडला.. पडला ” ओरडत सगळेच त्याला उचलायला धावायचे (त्याला उचलून नेताना तेवढाच स्वतःला ground वरील training पासून आराम हा हेतू) असे प्रसंग, कोणा कॅडेट ऑफिसरचा त्याला नियमितपणे भेटायला येणारा आणि आपल्या भाच्यासह तर कॅडेट्ससाठीही न चुकता खाऊ आणणारा मामा, घोड्यावर बसून Parade Inspection करणारे आमचे प्राचार्य डेप्यूटी इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलिस श्री.जस्विंदरसिंग सहानी, रविवारी दुपारी शहरात गेल्यावर, जेवणासाठी भगवंतराव खानावळीत फुल थाळी मागवून १२/१५ पोळ्या सहज खाऊन वाढप्याना जेरीस आणण्याचे प्रसंग, इथपासून ते रात्री Quarter Guard मधील अंमलदार duty बदलताना, काही मिनिटात त्यांचे ब्युगल पळवून parade ground वरून Check Roll Call चा signal वाजवून पळून जाऊन, त्या काळातील नाशिकच्या थंडीत, मध्यरात्री हॉस्टेल मधील कॅडेट्सची गाढ झोपेतून उठवून उडवलेली तारांबळ (तो ठराविक ब्युगल कॉल झाला की काही मिनिटात कॅडेट्स parade ground वर हजर राहणे अपेक्षित असते.) इथपर्यंत अनंत विषय आणि मनात घर करून बसलेले प्रसंग. गप्पा संपता संपेनात. जेवणासाठी सगळ्यांना ढकलून पाठवावे लागत होते.
संध्याकाळी एका हॉलमधे जमून, आमच्यातील वयाने सर्वात ज्येष्ठ आणि सर्वात लहान अशांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून कार्यक्रमास सुरुवात झाली. सर्वप्रथम दिवंगताना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर आमच्या बॅचमधील एकूण तिघांपैकी, जे PSI झाल्यावरही पुढे स्पर्धा परीक्षा देऊन, आय पी एस होऊन Additional Director General of Police या अतिउच्च पदावरून निवृत्त झाले, त्यापैकी उपस्थित दोन, त्याचप्रमाणे बॅचमधील पदक विजेते अधिकारी, यांचा छोटेखानी सत्कार करण्यात आला. त्यानंतर हॉटेलच्या lawn वर टेबल्स लाऊन snacks, Karaoke, गप्पा, थट्टामस्करी, रात्रीचे जेवण इ. ११.३० पर्यंत चालले.
दुसऱ्या दिवशी सकाळी १०.३० ते दुपारी उशिरा पर्यंत सर्वांनी महाराष्ट्र पोलिस अकॅडमी ला भेट दिली. याच ठिकाणी अत्यंत शिस्तबद्ध प्रशिक्षणाद्वारे आमच्यामधील मातीच्या ढेकळासारख्या प्रत्येक सामान्य तरुणाचे सक्षम खडकामधे रूपांतर घडवले गेले, ज्यामुळे पोलिस अधिकारी म्हणून पार पाडलेल्या विनाकलंक नोकरीत केवळ कल्पनेत रंगवता येतील असे, मन विदीर्ण करणारे किंवा प्राणावर बेतलेले अनेक प्रसंग आम्ही खंबीरपणे झेलू शकलो.
अकॅडमीच्या संचालकांनी सर्वांचे आनंदाने स्वागत केले, प्रत्येकाची विचारपूस केली. सर्वांची जेवायची उत्तम व्यवस्था केली.त्याचबरोबर सध्याच्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांशी आमचा संवाद घडवून आणला. सध्याची, अत्याधुनिक शैक्षणिक साधनांनी सुसज्ज अशी अकॅडमी पाहताना आम्हाला आमचे इथले दिवस आठवणे साहजिक होते. सर्वांनी, त्या वेळी आम्ही राहत असलेल्या हॉस्टेलला भेट दिली. प्रत्येक जण आपापल्या तेव्हाच्या खोलीकडे गेला. सध्या तिथे राहणाऱ्या कॅडेट ऑफिसर्सनी अगदी मनापासून प्रत्येकाचे स्वागत केले. इतकेच नव्हे तर आमच्याबरोबर फोटोही काढून घेतले. दिवस कसा गेला कळले नाही.
या निमित्ताने एक सुंदर स्मरणिका छापून घेतली आहे. तीमधे प्रत्येकाचा PTC मधील ट्रेनिंग काळातील फोटो, सध्याचा फोटो, राहण्याचा पत्ता, फोन नंबर्स आणि थोडक्यात कौटुंबिक माहिती समाविष्ट आहे. प्रत्येकाला या स्मरणिकेची एक प्रत आणि एक स्मृतिचिन्ह देण्यात आले.
निघताना सर्वांचे पाय अडखळले. सर्वांनी लवकरच पुन्हा असे एकत्र यायचे आहे असं एकमेकांना बजावत प्रत्येकजण “आपल्या बॅचच्या” आठवणींचे आणखी एक गाठोडे घेऊन आपल्या दिशेला रवाना झाला.
सत्तरितील आम्हा सर्वांना, आपापली व्यवधाने एका झटक्यात विसरायला लावून विशीत आणून ठेवणारी एकमात्र मात्रा.. मैत्री…
— अजित देशमुख.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..