हि गोष्ट आहे १९६२ च्या चीनशी झालेल्या युद्धात, लडाखच्या रेझान्ग्ला खिंडीत शूर भारतीय सैनिकांनी केलेल्या, एका लढाईची. ही लढाई चुशुल जवळच्या बर्फाच्छादित पर्वतांमध्ये लढली गेली. आजही भारताच्याच नव्हे तर जागाच्या आधुनिक युद्ध इतिहासात, युद्ध शौर्याचे एक महान उदाहरण म्हणून ह्या लढाईकडे पाहिले जाते, ते भारतीय सैनिकांनी तेथे दाखवलेल्या असीम धैर्यामुळे आणि अद्वितीय पराक्रमामुळेच !
१८ नोव्हेंबर १९६२ च्या त्या बर्फाळ थंडीतल्या पहाटे, लडाखच्या संरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असलेल्या चुशूल हवाईतळावर पहारा देण्याची जबाबदारी, भारतीय सैन्यदलाच्या १३ कुमाऊ रेजिमेंटच्या चार्ली कंपनीकडे होती. १२३ जवानांच्या ह्या तुकडीचे नेतृत्व करत होते मेजर शैतान सिंग( परमवीर चक्र – मरणोत्तर ). तेंव्हा चीनच्या साधारण ५००० सैनिकांच्या ब्रिगेडने तोफांचा प्रचंड भडीमार करत चौशुलवर शक्तीमान हल्ला चढविला. खिंडी भोवतालच्या डोंगरांमुळे भारतीय तुकडीला, भारतीय तोफखान्याचे सहाय्य मिळणे दुरापास्त होते. ह्या अत्यंत विषम आणि जीवावर बेतलेल्या परिस्थितीत कुठल्याही सैन्याने माघार घेण्याचा स्वाभाविक निर्णय घेतला असता. मेजर शैतानसिंग ह्यांच्या पुढे तीन पर्याय होते. १. माघार घेणे २. शत्रूला शरण जाणे ३ लढून शत्रूला खिंडीत रोखणे आणि खात्रीचे वीरमरण स्विकारणे. त्या शूर नेत्याने त्या परिस्थितीत खिंड लढवण्याचा धाडशी पर्याय निवडला. हा निर्णय घेतला नसता तर लडाख कदाचित आज भारतात नसते.
भारतीय तुकडीच्या तुलनेत संख्येने प्रचंड असलेल्या आणि सामर्थ्यवान तोफखान्यानिशी लढणाऱ्या चीनी सैन्याशी, त्या १२३ भारतीय सैनिकांनी आपल्या तुटपुंज्या शास्त्रांनिशी झुंझार लढत दिली. तो नियोजित युद्ध डावपेच यशस्वी करताना,काही मोजके गंभीर जखमी झालेले भारतीय सैनिक सोडून बहुतांश भारतीय सैनिक धारातीर्थी पडले परंतु ते हजाराच्या वर चीनी सैनिकांना कंठस्नान घालूनच. अखेरच्या श्वासापर्यंत लढणारे या तुकडीतील बहुतांश भारतीय सैनिक हे हरयाणातील गुरगाव, रेवारी, नर्नौल, महेन्द्रगढ या प्रदेशातील लढवय्ये यादव ( अहिर ) होते. या लढाईत एकाही भारतीय सैनिकाच्या पाठीवर गोळी लागली नव्हती तर सर्वांनी समोरून छातीत गोळ्या झेलल्या होत्या. त्यांच्या शौर्याला आणि बालिदानाला सलाम !
माझी “ रेझान्ग्लाची लढाई “ कविता भारतीय सैन्याच्या त्या शूर वीरांना समर्पित.
जयहिंद.
– कॅप्टन वैभव दळवी
आम्ही साहित्यिक फेसबुक ग्रुप
Leave a Reply