कोण म्हणतं शिक्षक फक्त वर्गात शिकवतात ? या वयातही रिसबूड सरांनी मला परवा तासभर शिकवलं – अभ्यासक्रम वेगळा पण पद्धत तीच ! सांगलीत सरांना फोन करून घरी भेटायला गेलो. त्याच उबदारपणे स्वागत झाले , डोळ्यातला आनंद जुनाच -वय आणि मधला काळ हिरावून नेणारा !
” चल ,आतच गप्पा मारत बसू ! “
स्वयंपाकघरात आमची मैफिल पुन्हा नव्याने जमली. स्वहस्ते त्यांनी चहा केला , बिस्किटांचा आग्रह केला .
सेवानिवृत्तीनंतर नऊ वर्षे सांगली -पेडांबे साप्ताहिक प्रवास करीत त्यांनी अध्यापन सुरु ठेवले आणि एका क्षणी बंद केले. त्यानंतर “वालचंद “या त्यांच्या कर्मभूमीत इलेक्ट्रिकल च्या विभागप्रमुखाच्या (जो त्यांचा विद्यार्थी आहे) आग्रहाखातर तीन वर्षे अध्यापन केले. मग वयोमानानुसार रणांगण बदलत गेली काही वर्षे तमिळ भाषेचा अभ्यास ,अनुवाद सुरु आहे.
त्यासाठी यू -ट्यूब वरच्या पंचवीस दर्जेदार चित्रपटांचे वारंवार अवलोकन करून शब्दोच्चार शिकणे सुरु आहे. आज त्यांचे वय ८० च्या आसपास नक्कीच असेल.
गप्पांच्या ओघात त्यांची ३०-४० वर्षे सांगता सांगताच माझीही चौकशी सुरु होती. माझा मित्र-परिवार (त्यांचाही शिष्यवृंद) सध्या काय करतोय त्याबाबत विचारणा सुरु होती. अपरिहार्यपणे वालचंदच्या नाट्यप्रवासाची उजळणी होत होती.
तालमींच्या दरम्यान त्यांच्या घरी जमणारी आमची मैफिल ,आग्रहाची साबुदाणा -खिचडी सारं -सारं आठवून झालं .
अभ्यासक्रमात नसलेले दोन धडे (अनुभव) त्यांनी Share केले –
१) त्यांचं विश्रामबागेतील राहतं घर त्यांच्या वडिलांच्या इच्छेनुसार, बंगलोरच्या घराची प्रतिकृती आहे कारण सेवानिवृत्तीनंतर त्यांचे वडील सांगलीत सरांच्या घरी स्थायिक झाले. किती unique संकल्पना आहे ही !
२) सरांचे व्याही अमेरिकेत घरातील सर्वांचा दोनवेळचा स्वयंपाक स्वहस्ते करतात.
प्रकृती अस्वास्थ्यामुळे काकू भेटतील की नाही प्रश्न होता. मागील वर्षी फक्त सरांना भेटून मी परतलो होतो. पण यंदा माझे ग्रह उच्च स्थानी असावेत . त्यांनी आत बोलावले आणि अर्धा तास इतिहास उकरून काढत गप्पा मारल्या.
गेल्या तीन -चार वर्षात मी एखाद्या व्यक्तीशी जितकं भरभरून बोललो नसेन ,तितकं बडबडलो.
सर कौतुकाने बघत होते. हळूच म्हणाले – ” आपल्या पहिल्या भेटीत तू असंच बोलला होतास ,आठवतं ?”
राजा मेहदी खान आणि मदनमोहन डोक्यात घेऊन मी त्या सकाळी “शायद फिर इस जनम में, मुलाक़ात हो न हो ! ” म्हणत सरांकडे गेलो होतो आणि परतताना माझ्याजवळ सूर्यास्ताच्या प्रतीक्षेत असलेल्या दोन टवटवीत वृक्षांकडून मिळालेला प्राणवायूचा साठा होता.
घरी नातीला गुरुकुलाच्या गोष्टी सांगताना कायम गुरुपत्नी हा कन्सेप्ट समजावून सांगताना मी अडखळायचो. आज घरी आल्यावर तिला हा फोटो दाखविल्यावर ती समजुतीचं हसली.
ता. क .- काल फोनवर आणि WA ग्रुप वर ही भेट सांगताना नकळत TUESDAYS विथ MORRIE आणि त्याचा प्रच्छन्न मराठी अवतार ” वा, गुरू ” (दिलीप प्रभावळकर आणि अतुल परचुरे ) आठवत राहिला.
Leave a Reply