नवीन लेखन...

‘रोगा’यण !!

खूप दिवसा पासून ,म्हणजे  फेसबुक वर ती पोस्ट वाचल्या पासून ,या क्षणाची मी वाट पहात होतो . तो क्षण माझ्या आयुष्यात आलाच ! तसा तो बरेचदा आला आहे .पण आता मला ‘त्या ‘पोस्ट ‘ मुळे  नेमकं काय करायचं ते कळलंय ,आणि मी ते करण्याचा निश्चय केला आहे !

रात्री पासूनच माझ्या अंगात कणकण वाटत होती . अधन मधनं थंडीचा काटा फुलत होता . झकास ! आता ताप  येणार , मग डॉक्टर ,मग औषधाचं गाठोडं …… . हे असच मला पाहिजे .! झालं पण तसाच . किंचित अंग तापलं . श्वास उष्ण वाटू लागला . मला धीर निघेना . तडक डॉक्टर गाठला .निदान न होणाऱ्या तापला डॉक्टर व्हायरल करून टाकतात . ” व्हायरल ताप  आहे , काळजी घ्या ,वेळेवर औषधे घ्या , तीन दिवस ताप  नाही कमी झाला,  तर मात्र ब्लड करावी लागेल . ” औषधाची चिठी घेऊन दवाखाना सोडला , मेडिकल मधून औषधांचं  गाठोडं घेतलं . घरी आलो . जेवण केले . आणि डोक्यावरुन पांघरूण देऊन मस्त ताणून दिली . दुपारी केव्हातरी दरदरून घाम आला . हलके वाटू लागले ! तोंडावरुन पाण्याचा हात फिरवला . एकदम फ्रेश वाटूलागले .! चारचा चहा घेतला . टेबल वरील सकाळी आणलेले औषधाचं ते गठुडं उचललं ,नेमधरून माळ्यावर फेकून दिल ! (‘त्या ‘ पोस्ट मध्ये लेखक असाच करतो ,अन मग तो एकदम ठणठणीत होतो !…. याहू SSS  मी पण ….. ). “जरा शामू कडे चक्कर टाकून येतो गं ” बायकोला हाळी दिली अन बाहेर पडलो .

साल आता बरे वाटणार . पुन्हा ताप येणार नाही . आपण उगाच दुखण्याचा बाऊ करून घेतो . त्या पोस्ट मध्ये एकदम अनुभवाचंच लिहलंय . असल्या विचारात माझे पाय श्याम्याच्या घराकडे चालत होते . पण कसचं काय ? अचानक पाठीतून थंडगार कळ  अली ! असंख्य बर्फाचे बाण पाठीत घुसल्या सारखे वाटले . कण्यातून त्या दुष्टांनि साऱ्या शरीराचा ताबा घेतला ! तडमडत घर गाठले . मिळेल ते पांघरून ,शाल ,गोधडी ,रंग अंगावर घेतलं . थंडी थांबेना ! कशी थांबणार ? आतूनच गारांचा मारा चालू होता ! निखाऱ्या सारखा तापलो ! शरीराची प्रत्येक पेशी दुखत होते ,अंगाला ठणका लागला होता . एखाद्या रोडरोलर समोर झोपून अंग चेपून घ्यावे असे वाटत होते !
“आग ,अंग अन डोकं खूप दुखतंय ! जरा चेपून देतेस का ? ” मी क्षीण आवाजात विंनती केली . क्षणाचाहि विलंब न करता हि माझ्या उश्याशी बसली .
“मेल ,एवढंस अंग तापलतर कोण  गोंधळ ? वेळेवर औषध घ्यायला नकोत ,नुस्त्या टवाळ्या करत फिरायचं ! तुमची नेहमीचीच रड  (बोम्ब ) आहे ! पहिल्या पासून तुलु मुलू प्रकृती (किडकि )! शेजारचे माळीकाका पहा सत्तरीत आहेत . टुणटुणीत अन ठणठणीत ! ” कर्तव्यास  आमची ‘हि ‘ कधीच चुकतनाही ! बराच वेळ बायको ‘कर्तव्य ‘ करत होती पण दोन बोटाने डोकं काय चेपला नाय हो !

आमचं असच आहे . लोकांचे आठवडा आठवडा टिकलेले ताप  सुद्धा व्हायरल निघतात ,अन दोन गोळ्यात बरे होतात ! आमचा चार दिवसाचा ताप , टायफाड निघतो ! आमच्या शामूचंच पहा ना , गेल्या महिनाभर खोकतोय , बायकोचे घरचे काढे ,अद्रक ,adhulsa , दूध-हळद ,काय काय रिचवतोय , शेवटी ‘रम’वर थांबला !(तो आणि खोकला दोघेही !) तर माझा खोकला चार -सहा दिवसांनी डॉक्टरांनी ‘अलर्जीक अस्थमा ‘ वर आणून सोडला !

रम्या सारखं मला पण एकदा छातीत जळजळु लागलं . रम्या खरतर छाताड आवळून गडबडा लोळत होता ! याला हार्ट अट्याक  आला असावा म्हणून आम्ही घाबरून ते धूड दवाखान्यात नेलं . डॉक्टरांनी  निदान केलं ‘गॅस ‘च ! मी डॉक्टरांना माझ्या जळ्जळीच सांगितलं . इ सी जि ,ट्रेडमिल टेस्ट , अँजिओग्राफी तर केलीच . पण इतक्या वर न थांबता ‘बाय -पास ‘ करूनच दम खाल्ला !

‘येवा कोकण आपलोच असा ‘ असा काहीसा संदेश माझे शरीर आजारांना देत असावे !  पूर्वी एखादा आजार झाला कि तो बरा करून डॉक्टर त्याची बोळवणूक करायचे . मग  टॉनिक (‘महिन्याची बाटली ‘ ) द्यायचे . हल्ली पेशन्ट मरू देत नाहीत ! स्पेशालिस्ट तर विचारू नका . एकदा मी आमच्या कार्डिओलॉजिस्टला विचारले ‘डॉक्टर मला खोकल्याचा फार त्रास होतोय . काय करू ?’
‘तुमचे हार्ट उत्तम कंडिशन मध्ये आहे ,याची मी खात्री देतो . खोकल्यासाठी त्यातील तज्ञांचा सल्ला घ्या ‘
किती तज्ञान कडे जायचे ? जितके अवयव आहेत तितक्या ? पूर्वी अंक गणितात आम्हाला’ अवयव पाडा ‘ असा एक प्रकार होता ,हल्ली मेडिकलला पण आला असावा ! . ज्ञान विज्ञानाचा विस्तार झाला कि हे व्हायचेच म्हणा . त्यात डॉक्टरांना दोष देण्याचा मानस नाही .  असो .

सगळ्या आजारात ड्याम्बीस आजार म्हणजे सर्दी ! कॅन्सर परवडला ! जिंदगी या मौत चा फैसला करतो !पण सर्दी -न जिने देती है न मारने – लटकाके रखती है ! ह्या सर्दीने माझे भरून न येणारे नुकसान केले आहे . साधारण सर्दी सात दिवसात संपते असे त्यातील ‘दर्दी ‘ अनुभवावरून सांगतात . पण अस्मादिक त्याला अपवाद आहेत . सुरवातीस एक दोन शिंका येतात ,विक्स ,इनहेलर वगैरे पाही पर्यंत नाक चोक उप ! नाक गळू लागते . येथे डॉक्टर कडे मी जातो . त्यांच्या गोळ्याने नाकाची गळती थांबते ,पण नाका  बरोबरच घसा ,तोंड ,डोळे सगळंच दुष्काळातल्या सारखं कोरड रखरखीत होत . तरी सर्दी हटलेली नसते , नाक अजून तसेच चोंदलेले ! एखादा पफ सुरु होतो , मग पुन्हा गळती सुरु ! येरे माझ्या मागल्या !कसे बसे आवरत आले कि छातीत कफ होतो ! साथमे  खोकला ! कधी कोरडा कधी ओला ! बोनस मध्ये छातीतून शिट्या वाजू लागतात !

बहुतेकांची सर्दी खोकल्यातून गेली कि मार्गी लागते . नाकातून छातीत व तेथून बाहेर . एकदा मला या सर्दीने जबर झटका दिला . नाकातून छातीत उतरलेली सर्दी बहुदा उतू गेली असावी ,ती बाहेर जाण्या ऐवजी कानात शिरली !कानठळ्या बसल्या ! काहीच ऐकू येईना ! डॉक्टर नेहमीचे ,गावातले ,परगावचे ,पुणे ,औरंगाबाद  स्पेशालिस्ट ! कुणालाच यश येईना ! हेअरिंग एड्स उपयोगी पडेनात . बहिरा झालो याची खात्री पटू लागली. साल बर झालं ! आजवर कोणी चांगलं बोललं नाही , अन आता वाईट ऐकायची इच्छा नाही ! ‘हल्ली मी कोणाचंच ऐकत नाही !’ मी गमतीने म्हणू लागलोय . अस्तु . पण येव्हड्यावर थोडंच संपतंय ? दोन्ही कानात आवाज येऊ लागले . एका कानात ‘बिस्मिल्ला खा साहेबांची शेहनाई ‘ तर दुसऱ्या कानात रात किड्यांची कर्कश किरकिरे ! नॉन स्टॉप -रात्रनदिवस ! सोते -जगते ! हे कमी होते म्हणून ,( व्हर्टिगो ) सोबतीला-चकरा  उलट्या -कसलीही पूर्व कल्पना नसताना यायच्या ! विचित्र दहशत ! ऑफिसात ,रस्त्यांत .गाडीवर ,हॉटेलात , कुठेही आणि कधीही ! आता दहा -बारा वर्षांनी ,अथक प्रयत्नांनी व उपचारांनी थोडे थोडे ऐकू येतंय ,व्हर्टिगो पण कमी झालाय . अब (व )तन  आजाद है ! असे वाटतंय .

‘ अरे वा , तुम्ही पण आलात ?’ मी बीपी व मधुमेहाला विचारलं
‘हो ,आम्ही पण आलोय !’
‘कधी?, अन येताय  हे कळवलं नाही आधी ?’
‘त्यात काय कळवायचंय ? आम्ही तुमच्या वाडवडिलांन पासन येतच असतो कि ,आमचा परिपाठच आहे ! आता तुम्ही तयारीत नसाल याची आम्हाला काय कल्पना ?’

‘आता प्रकृती कशी आहे ?’ या शाम्याच्या प्रश्नाला मी खरे उत्तर दिले . मला काय काय त्रास होतोय ते त्याला सांगितले . म्हटलं दोस्ता पासून काय लपवायचं ?
‘सुरश्या  तुझीन बोंबाबोंबच फार असते !आबे साध्या सर्दीचा काय डांगोरा पिटतोयस ? ‘नाईंटी -नाईंटी मारू ! तुझी सर्दी कमी होईल अन मला होणार नाही !तुझंना त्या मुंगी सरक आहे . मुंगीला म्हणे मुताचा समुद्र वाटतो ! तुझी ना एकदा शाळा घ्यायला पाहिजे ! फडतूस गोष्टी साठी मिनमिन करत जाऊ नकोस, काय ? तेव्हड  ९०-९०च लवकर ठरव ‘. या अख्या जगात केवळ मीच एकटा मूर्ख आहे याची  मलाच खात्री पटवून देण्यासाठी परमेश्वराने दोन माणसे जन्माला घातली आहेत , या बद्दल मला आताशा खात्री पटू लागली आहे ! त्यातला एक हा श्याम्या ,आणि दुसरी आमची (म्हंजी माझीच ) बायकू !शाम्या म्हणतोय ते खरे हि असेल . पण मुंगीला ‘त्या ‘ समुद्रात इतरांच्या खऱ्या समुद्रा सारखाच लढा द्यावा लागतो! त्यात तरून जाण्यासाठी तीच चिकाटी ,तेच कष्ट ,त्याच यातनाना सामोरे जावे लागते ! समुद्राचा  विस्तर नव्हे  तर त्यातला लढा महत्वाचा असतो !इतरांची दुःख क्षुद्र म्हणून हिणवणाऱ्या श्याम्याला हे कळत नसावं का ? पण मला काही सुनवण्याचा ‘चानस ‘ तो सोडत नाही ! कुच्चर आहे.! पण तरी माझा मित्रच ना ? रागवून  कस चालेल ? चालता है ! मी दुर्लक्ष्य करतो म्हणा .

या प्रसंगा पासून ‘प्रकृती कशी आहे ?’या प्रश्नाला माझे उत्तर असते ‘झकास ‘. मला काय होतंय हे मी सांगणे सोडलय ! रोग्यांच्या बाबतीत एखादे ISI  सारखे प्रमाण पत्र असेल तर ते मला देण्यास हरकत नाही .

— सु र कुलकर्णी 

….. आपल्या प्रतिक्रियांची वाट पहातोय . पुन्हा भेटूच . Bye

Avatar
About सुरेश कुलकर्णी 176 Articles
मी सुरेश कुलकर्णी. . साधारण कथा , लेख ,जुन्या सिनेमाच्या (हिंदी )गण्यावर माझे लिखाण असते . एखादे छानसे पुस्तक वाचण्यात आले तर त्यावर हि लिहतो . माझ्या वाचकास एक नम्र विनंती माझे लिखाण आवडले तरी ,आणि नाही आवडले तरी जरूर कळवा माझ्या लिखाणाचा पोत त्या शिवाय सुधारणार नाही .माझे सर्व लिखाण काल्पनिक असते .. mb.6361255994. किवा srk101252@gmail --संपर्का साठी

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..