सोमालियन पायरेट्सने केलेल्या अयशस्वी हल्ल्या नंतर आमच्या जहाजावर असणारे रायफलधारी सिक्यूरीटी गार्ड श्रीलंकेच्या ग्याले बंदरात उतरणार होते. सोमालियन पायरेट्सने दिवसा ढवळ्या जहाजाला हायजॅक करायचा प्रयत्न केला होता. पण जहाजावर ए के 47 रायफल हातात घेऊन उभे असलेले सिक्यूरीटी गार्ड बघून पायरेट्स जास्त वेळ व त्यांची शक्ती खर्च न करता माघारी फिरून गेले होते. श्रीलंकेत ते जहाजावरून खाली उतरत असताना सगळे खलाशी व अधिकारी त्यांना निरोप द्यायला अप्पर डेक वर आले होते.
सोमालियन पायरेट्सने केलेल्या हल्ल्याच्या प्रयत्न आणि त्या धक्कादायक अनुभवातून बाहेर पडून चार दिवस झाले नव्हते की लगेच आणखीन एक मोठं संकट समोर उभे ठाकले होते. बंगालच्या उपसागरात हवामान खराब असल्याचा व्हेदर रिपोर्ट आला होता. मॉन्सून चा सिझन असल्याने वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता होती. सिंगापूर मार्गे जहाज तैवान मध्ये कार्गो डिस्चार्ज करण्यासाठी जाणार होते.
आमचे जहाज गल्फ मधून एव्हीएशन फ्युएल घेऊन अँटवर्प मध्ये गेले होते आणि तिथून रोटरडम ला पुन्हा एव्हीएशन फ्युएल लोड करून तैवान कडे चालले होते. युरोप मध्ये अँटवर्प ला गल्फ मधून लाखो टन एव्हीएशन फ्युएल नेले जाते आणि काही दिवसात यूरोपातील दुसऱ्या तेल कंपनीचा एव्हीएशन फ्युएल असलेला लाखो टन कार्गो रोटारडम वरून तैवान ला जातो हे व्यापाराचे गणित समजण्या पलीकडे होते.
कॅप्टन ने महिना अखेर असल्याने सकाळी दहा वाजता मंथली सेफ्टी मीटिंग क्रू मेस रूम मध्ये बोलावली. सगळे अधिकारी आणि खलाशी जमा झाल्यावर व्हेदर रिपोर्ट बद्दल माहिती दिली. उद्यापासून वादळी वारे जहाजाला भिडतील त्यामुळे प्रत्येक अधिकाऱ्याने आणि खलाशांनी त्यादृष्टीने खबरदारी घेऊन उपाय योजना करण्यासाठी सूचना देण्यात आल्या. नेहमप्रमाणे मीटिंग मध्ये इतर विषयांवर चर्चा झाली. सिंगापूर मध्ये ज्यांचा ज्यांचा कॉन्ट्रॅक्ट पूर्ण होत आला आहे त्यांचे रीलीवर येणार असल्याची माहिती सुद्धा देण्यात आली. मीटिंग आटपल्यावर सगळे जण जेवायला गेले आणि तासाभराने दिवस भरात जहाज हेलकावयाला लागल्यावर इकडून तिकडे सरकतील किंवा वरून खाली पडतील अशा सगळ्या वस्तू व साहित्याला बांधून ठेवायला लागले. सगळे अधिकारी त्यांच्या त्यांच्या डिपार्टमेंट मध्ये असलेल्या मशिनरी व्यवस्थित काम करतात की नाही ते बघून कुठेही सामानाची किंवा साहित्याची आदळआपट होणार नाही याची तपासणी करायला लागले होते. क्रेन चे हुक व्यवस्थित अडकवून ठेवले गेले. जनरेटर साठी आलेले चार हजार लिटर लुब्रीकेटींग ऑईल चे प्रत्येकी दोनशे लिटर चे वीस ड्रम ल्युब ऑईल टँक मध्ये घाई घाईत ट्रान्स्फर करण्याचे काम चीफ इंजिनियर ने फोर्थ इंजिनिअर ला सांगितले पण दोन ड्रम चे चारशे लिटर ऑईल जनरेटर ल्युब ऑईल टँक मध्ये जाण्याऐवजी, चुकीचा वॉल्व खोलल्यामुळे दुसऱ्याच टाकीत गेल्याचे सेकंड इंजिनियर च्या लक्षात आले. नशिबाने तो टँक रिकामा होता. नाहीतर दोन वेगवेगळ्या प्रकारचे ल्यूबा ऑईल मिक्स झाले म्हणून चीफ इंजिनियर ने फोर्थ इंजिनियरने 20,000 डॉलर्स च्या ऑईल ची वाट लावली म्हणून सिंगापूर हुन नक्कीच घरी पाठवले असते.
हवामान खराब होणार असल्याने चार वाजता सगळ्यांना सुट्टी करायला सांगून ब्रिजवरून कॉल आल्यावर वॉच सुरू करण्यासाठी चीफ इंजिनियर ने सांगितले. संध्याकाळी साडे सहा वाजता डिनर झाल्यावर तासभर खराब हवामानातील एक एका अनुभवाचे किस्से कॅप्टन आणि चीफ इंजिनियर सांगत होते. कॅप्टन भुमध्य समुद्रात एका जहाजावर असताना त्या जहाजाचे इंजिन बंद पडले आणि एका खडकाळ बेटावर जाऊन आदळणार की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. इंजिन बंद पडल्याने कॅप्टन नांगर टाकण्याचा विचार करत होता पण वादळाचा जोर एवढा होता की नांगर टाकून पण जहाज थांबले नसते. नांगराची जाड लोखंडी साखळी तरी तुटली असती पण असे असताना वादळाचा जोर कमी होऊन समुद्र एकदम अचानक शांत झाला आणि कॅप्टन ने कसा बसा नांगर टाकला आणि सात आठ तास जिवतोडून काम केल्यावर एकदाचे मेन इंजिन सुरू होऊन ते पुढे निघाले.
आता आपल्याला किती भयानक वादळाला सामोरे जावे लागेल असा विचार करत असताना जहाज हळू हळू हेलकवायला सुरुवात झाली. जहाज हेलकवयाला लागले की जहाज रोलिंग करतेय असे म्हटले जाते. एका बाजूकडून दुसरीकडे रोल होणे म्हणजे घड्याळाचे दोलका प्रमाणे इकडे तिकडे दोलायमान होत राहणे. बऱ्याच दिवसांनी जहाजाचे रोलिंग सुरु झाल्यामुळे डोकं गरगर करायला लागले होते, त्यातच सोफ्यावर पडल्या पडल्या कधी झोप लागली ते कळले नाही. रात्री अचानक केबिन मध्ये फोनची रिंग वाजल्याने जाग आली, झोप लागली तेव्हा लाईट चालूच होती, घड्याळात रात्रीचा दीड वाजला होता आणि रोलिंग बऱ्यापैकी वाढलेले जाणवत होते. ब्रिज वरून सेकंड मेट ने फोन करून इंजिन रूम मध्ये वॉच सुरु करण्यासाठी कॉल केला होता. थर्ड इंजिनियर असल्याने रात्री बारा ते पहाटे चार माझा वॉच होता. माझ्यासोबत वॉच मध्ये असलेल्या मोटारमन ला फोन करून खाली इंजिन रूम मध्ये यायला सांगितले. केबिन मधून खाली इंजिन कंट्रोल रूम मध्ये पोचल्यावर रोलिंग थोडस कमी जाणवते कारण केबिन जहाजाच्या खूप वरच्या भागात असल्याने जेवढे उंच तेव्हढे जहाजाचे रोलिंग जास्त जाणवते. तासाभरात मेन इंजिनवर लोड वाढू लागल्याचे जाणवायला लागले होते, इंजिन चे टेम्परेचर वाढायला सुरुवात झाली होती. ब्रिजवर फोन करून इंजिन लोड कमी करण्यासाठी इंजिन आर पी एम कमी करायला सांगितले. सेकण्ड मेट ने आर पी एम कमी केला पण तो म्हणाला जहाजाचा वेग तासाभरात बारा नॉट्स वरून चार नॉट्स पर्यंत खाली आलाय. हवेचा आणि लाटा उसळत असल्याने परिणाम वेगावर झाला होता. आमच्या शक्तिशाली मेन इंजिनची शक्ती वादळवाऱ्या पुढे नतमस्तक होत असल्यासारखं वाटायला लागले होते. फ्युएल टँक्स चे लेव्हल अलार्म टँक्स मधील फ्युएल इकडून तिकडे वर खाली व्हायला लागल्याने वाजायला लागले होते.
इंजिन रूम मधील क्रेनचा हुक रेलिंग च्या पाईपला अडकवला होता, रोलिंग मुळे लोखंडी पाईपची रेलिंग वाकली आणि हुक बाहेर पडून इकडून तिकडे हलायला लागला. मिनिट भरातच क्रेनचा हुक कंट्रोल रूमच्या काचेजवळ यायला लागला होता, काचेवर आपटून काच फुटली तर काही खरे नव्हते. इंजिन रूम ची गरम हवा कंट्रोल रूम मध्ये आली तर कंट्रोल रूमचे तापमान वाढून इलेक्ट्रॉनिक कंट्रोल सिस्टीम बंद पडण्याची शक्यता होती ज्यामुळे मेन इंजिन सह इतर सगळ्या मशीनरी पण बंद पडल्या असत्या. माझ्या वॉच मधील मोटारमन अनुभवी होता. त्याने तेवढ्या वजनी हुकला जोरात इकडून तिकडे हलत असताना सुद्धा एका मोठ्या दोराच्या साहाय्याने फास टाकून अडकवले आणि खाली जाणाऱ्या जिन्याला बांधून टाकले. या गडबडीत सेकंड इंजिनियरला वेक अप कॉल द्यायचा राहून गेला पण चार वाजता सेकंड इंजिनियर कंट्रोल रूम मध्ये स्वतःहून हजर झाला होता. केबिन मध्ये बेड वरून रात्री तीन वाजताच खाली पडलो आणि गप्प बसून होतो तासभर असे तो हसत सांगू लागला आणि बोलला तू वर न जाता इथेच झोप खाली, वर केबिन मध्ये झोप येणे शक्यच नाही. मध्ये मध्ये एखाद दुसरा अलार्म वाजत होता तरीपण झोप लागली तेवढ्या रोलिंग मध्ये. सकाळी आठ वाजता फोर्थ इंजिनियर वॉच करायला आला त्याने हलवून जागे केले आणि वर केबिन मध्ये जाऊन झोपायला सांगितले. डोळे चोळत चोळत वर जाताना रोलिंग होत नसल्याचे जाणवले. केबिन मधून पोर्ट होल बाहेर पाहिले तर क्षितिजा पर्यंत एका बाजूला दाटलेले काळे मेघ तर एका बाजूला मान्सूनच्या हलक्या सरिंचा उन्हासोबत खेळ चालला होता. जहाज रात्रभर पावसात भिजून ओलेचिंब होऊन न्हाऊन निघाल्यासारखे स्वच्छ आणि ताजे तवाने असल्यासारखं भासत होते.
© प्रथम रामदास म्हात्रे
मरीन इंजिनियर
B. E. (mech), DIM.
कोन, भिवंडी, ठाणे.
Leave a Reply