नवीन लेखन...

ऋण

मुंबई-गोवा हायवे वर सुसाट जाणारी एक अलिशान गाडी एका फाट्यावर आत वळते. मोठा रस्ता, मग डांबरी छोटा रस्ता, मग कच्चा रस्ता असं करत करत कोकणातल्या एका छोट्याश्या गावात शिरते आणि गावकऱ्यांचं लक्ष वेधून घेत घेत; एका खडकाळ जागेवर येऊन थांबते…. तो चारचाकी गाडीसाठी Dead end असतो. तिथून पुढच्या ८-१० घरांमध्ये जाण्यासाठी पायवाट हा एकंच पर्याय असतो. शाळकरी मुलांपासून अंगणात बसलेल्या जेष्ठांपर्यंत सगळे जण गाडीतून उतरणारी असामी कोणाकडे जाणार, याचे अंदाज बांधत असतात. गाडी व्यवस्थित पार्क होते. आता मागच्या सीटवरून कोणीतरी सुटाबुटात उतरेल आणि ड्रायव्हरला काहीतरी सूचना देईल असं सगळ्यांना वाटत असतानाच; चालकाच्या सीटवरूनच साधारण ६०-६२ वर्षाचे एक “आजोबासदृश काका” उतरतात. थोडेफार शिल्लक असलेले पण पांढरे झालेले केस, तेजस्वी आणि रुबाबदार गोल चेहरा, साधे कपडे, आऊट शर्ट, पायात चपला आणि सोबत एक साधी छोटीशी बॅग… गाडी लॉक करून पायवाट धरत काका शेवटच्या घराच्या दिशेनी जातात.

सगळा सस्पेन्स संपल्यामुळे गावकरी एव्हाना पांगलेले असतात. शेवटच्या घरात, अंगणात एक आजी, उन्हं ओसरल्यामुळे कोकमाचं वाळवण आवरत असतात आणि हे काका आत शिरून जोरात म्हणतात….

“काय गो मामे.. येऊ का??”

काडी तुटलेला चष्मा एका हातानी धरत,सावरत ही म्हातारी मामी वर बघते…

“कोण रे??… नंदू तू???… अरे असा कसा अचानक… काही कळवलंन नाहीस ते… ये ये.. सगळं ठीक न रे बाबा???”

मामीला काय करू आणि काय नको असं होतं…

“हो हो…सगळं उत्तssम… तू मस्त चहा पाज आधी तुझ्या हातचा”….

“म्हणजे काय, टाकतेच लगेच… मोटार घेऊन आलास ना…तूच चालवित आला असशील… तू बस ये आत.. अहो sss बघा कोण आलंय ते… भाच्याला वेळ मिळाला आज.. म्हातारा म्हातारी जिवंत आहेत का ते बघायला ”… हसत हसत मामी स्वयंपाक घरात गेली…

“हां sss… आता कसं मला कोकणात आल्यासारखं वाटलं!!….मामी काय तू पण?? अगदी आहेस तशीच आहेस अजून”….

मामी बोलायला फटकळ. आवाजही जरा वरच्या पट्टीत पण अगदी निर्मळ मनाची आणि स्वभावानी तितकीच चांगली… आत उजवीकडे पलंगावर मामा झोपले होते… एकेकाळी “हाडाचे शिक्षक” असलेले मामा आता मात्र वार्धक्यामुळे शब्दशः “हाडापूरतेच” राहिले होते. पण स्मृती आणि बुद्धी मात्र अजूनही तल्लख…

थोडावेळ मामाशी बोलून, सगळं आवरून, चहा वगैरे होतो न होतो तोच हातात सुरी घेऊन तुरुतुरु धावत मामी घराच्या मागच्या बाजूस गेली आणि चार अळूची पानं कापून घेऊन आली..

“मस्तपैकी अळूचं फदफदं करते, छान दाणे वगैरे घालून…. जरा लवकरच बसू जेवायला…. चालेल ना नंदू??…. म्हणजे मग नंतर निवांत गप्पा मारता येतील”….

“चालेल म्हणजे काय… धावेल!!… पोटात ओरडणाऱ्या कावळ्यांना तुझ्या फदफद्याचं आमिष दाखवून तात्पुरतं गप्प केलंय आत्ता….”

“पापड पण भाज गं!!”….. मामानी हळूच पुष्टी जोडली…

या वयात सुद्धा मामीचा कामाचा उरक आणि लगबग वाखाणण्याजोगी होती….

” वाह!! झक्कपैकी जेवण झालं!!”.. असं म्हणत आणि आपल्या सुटलेल्या पोटावर हात फिरवत नंदू बाहेर मामाजवळ आला.

“जरा धर रे मला… आत्ताच जेवण झालंय … जरा शेजारच्या खोलीत जाऊन बसू!”………

अशक्त झालेल्या मामाला नंदूनी अलगद पलंगावरून उठवत शेजारच्या खोलीत नेलं, खुर्चीवर बसवलं आणि त्याचा तो थरथरणारा हात आपल्या हातात घेत

स्वतः खाली जमिनीवर ; मामाच्या पायापाशी बसला……..

“तुझ्या वेळेस तुझ्या आईचे बाळंतपण याच खोलीत झाले बरे!!!… म्हणजे तुझे जन्मस्थान म्हणायचे हे!!”

खरं तर नंदूला हे आधी माहिती असूनही आज आईच्या पश्चात मात्र तो संदर्भ ऐकून खूप गहिवरून आलं…इतक्यात मामी मागचं सगळं आवरून पदराला हात पुसत पुसत आली…

“सगळ्या बहिणींमध्ये या वन्सबाईंवर तुझ्या मामाचा भारी जीव हो!!!… असं म्हणत मामीसुद्धा नंदुसमोरच खाली बसली….

“हं…. बोला नंदुशेठ कसं काय येणं केलंत एकदम??”

नंदू काही सहज आला नव्हता हे चाणाक्ष मामीनी केव्हाच ताडलं असल्याने थेट मुद्द्यालाच हात घालत नंदूला बोलतं करू लागली… नंदुनी देखील क्षणाचाही विलंब न लावता खिशातून एक पाकीट काढलं आणि मामाच्या हातात ठेवलं..

“काय रे हे??”

“३००० रुपये आहेत मामा!!”

“कसले रे? आणि आत्ता काय त्याचं मध्येच??”…. प्रश्नार्थक चेहरा करत मामानी विचारलं…

“मामा ss.. काल माझ्या कंपनीत एक मुलगा आला होता मला भेटायला…. नोकरीसंदर्भात… आमच्याच एका निवृत्त स्टाफचा लांबचा नातेवाईक होता…. पर्सनॅलीटी चांगली होती, विनम्र होता, हुशार आणि जिद्दी वाटला बोलण्यावरून.. १०वी-१२वी चे मार्क सुद्धा चांगले होते… पण घरातले प्रोब्लेम, इतर जबाबदाऱ्या आणि आर्थिक चणचण असल्याने १२वी नंतर शिक्षण घेऊ नाही शकला.. शिक्षण नसल्यामुळे नोकरी देणं शक्य नाहीये… त्याला जुजबी काहीतरी सांगून पाठवलं मी परत…. पण तेव्हापासून जरा अस्वस्थ वाटत होतं… काय ते कळत नव्हतं.. मग त्या मुलाच्या जागी मला तरुणपणीचा मी आठवलो…तुला आठवतंय मामा??… माझी पण त्यावेळेस थोडीफार अशीच परिस्थिती झाली होती… आई अण्णांकडे तेव्हा पुरेसे पैसे नव्हते इतके, पुढचं शिक्षण घ्यायला. तेव्हा तू मला ३००० रुपये दिले होतेस. तेच परत करतोय मी आज!!”…

“छे रे!!… त्यास चाळीस-पंचेचाळीस वर्ष झाली असतील आता…काय उगाच जुन्या गोष्टी काढतोयस आता??… मी काही घेणार नाहीये हे… आणि मी परत घेण्यासाठी म्हणून दिलेच नव्हते ते!!”…

“मामा… असं म्हणून मला लाजवू नकोस अजून….शिक्षण पूर्ण झाल्यावर मी एक एक पायरी चढत गेलो… चांगली नोकरी, मोठा पगार,स्वतःचा व्यवसाय, लग्न, मुलं, संसार, परदेश वाऱ्या, बिझनेस वाढवणं या सगळ्यात मी अगदी रममाण झालो होतो इतकी वर्ष… पण तू केलेली ती मदत,ते पैसे नसते तर माझंही शिक्षण अर्धवट झालं असतं…. आणि हे सगळं यश जे आज मी संपादन केलंय ते नक्कीच मिळवू शकलो नसतो….. मामा sss…. आज मी जो काही आहे तो तुझ्याच मुळे…. नाहीतर मी सुद्धा त्या मुलासारखा दारोदारी नोकरीसाठी फिरत बसलो असतो आणि पात्रता असूनही इथपर्यंत पोचू शकलो नसतो….पण मनापासून सांगतो… कृतघ्नपणे नाही रे…पण तू दिलेल्या त्या ३००० रुपयांचा मला विसर पडला हे मात्र खरं!!…. माझ्याच यशाच्या धुंदीत आणि व्यापात गुरफटलो होतो… काल त्या मुलामुळे मला ही गोष्ट आठवली; मग हे सगळे विचार आले मनात आणि तुझं माझ्यावर किती मोठं “ऋण” आहे याची जाणीव झाली. तेव्हाssपासून चैन नाही रे मला… कधी सकाळ होतेय असं झालं….रात्री सगळं हिच्या कानावर घातलं आणि जरा फटफटल्यावर तडक गाडी काढून निघालो…. चाळीसेक वर्षाचं “ऋण” एकदम एकत्रित पणे साठून आलं…त्या ओझ्याखाली कशीबशी कालची रात्र ढकलली मी…. मला कल्पना आहे ; हे तुझं “ऋण” इतकं मोठं आहे की मी पैशांनी खरं तर ते कधीच फेडू शकणार नाही…. पण माझ्या मनाला थोडं तरी हलकं वाटावं म्हणून घे हे पैसे!!”…..

वातावरण एकदम भावूक झालं… सगळ्यांचेच डोळे साहजिकच पाणावले…

आपला हात नंदूच्या पाठीवर ठेवत मामा म्हणाला….”सगळं कबुल!!… पण हे पाकीट तू घे परत!!”…

“अहो sss… लक्ष्मी आहे ती… येतेय तर घ्या….तेवढीच घराची कौलं बदलून होतील!!”…. मामीनी तिच्या शैलीत दटावलं….म्हणून मामाला त्याच्या इच्छेविरुद्ध ते पैसे घ्यावेच लागले आणि काहीशा नाराजीनेच त्यानी ते पाकीट मामीकडे सोपवलं… मामी आत देवघरापाशी जाऊन काहीतरी घेऊन आली….

“देवाच्या चरणी स्पर्श करून आणले… तुझं ऋण फिटलं रे ss बाबा…. आता खुश ना??”…. असं म्हणत हातात गुंडाळून आणलेले ५१ रुपये त्या पैशाच्या पाकिटात टाकले आणि ते पाकीट पुन्हा नंदुकडे देत म्हणाली..

“आता हे ३०५१ रुपये घे आणि त्या मुलाला दे…आमच्याकडून!!…… म्हणावं शिक्षण सुरु कर पुन्हा… मला माहिती आहे आजच्या काळात हे काही खिसगणतीत सुद्धा येणार नाहीत पण आज मामामामीच्या अंथरुणात पाय पसरायला इतकीच जागा आहे बाबा!!! “…

नंदूच्या लेखी मामीचा आदर आता कैकपटीनी वाढला होता आणि मामाच्या चेहऱ्यावर देखील आपल्या पत्नीचा वाटणारा अभिमान त्यांच्या कवळी नसलेल्या स्मितहास्यातून अगदीच झळकत होता…..

“…आणि काय हो???… तुम्हाला काय वाटलं??…. खरंच घराची कौलं बदलायला ते पैसे घ्या म्हणाले का मी??… अहो तो पोर बिचारा पोटतिडकीनी सांगत होता… त्याला त्या ऋणाचं किती ओझं वाटत होतं…. त्याच्या बोलण्यात आणि चेहऱ्यावर जाणवत होतं…. मग त्याचं ते ऋण फेडून त्याला मोकळं करायला नको का आपण?…आणि तुम्ही तर ते घ्यायला तयार नाहीत.शेवटी काहीतरी कारण सांगायचं म्हणून म्हणाले मी कौलांचं…. अहो ss…सगळं आयुष्य दारिद्रयात गेलं आपलं…आता आर्धी लाकडं गेली… श्रीमंती आली तरी “परवडणार” नाही आता. “दारिद्रयाची सुद्धा सवय जडते माणसाला”!!…. “एव्हढं वाटतं त्याला म्हणून इतक्या लांब आला ना नंदू?… त्याला ते “कर्ज” नाही तर “ऋण” वाटतंय….तोंडदेखलं कर्ज फेडायचं असतं तर पैसे बँकेत टाकून मोकळा झाला असता…. सगळ्या सोयी आहेत आता…. आणि ३ हजार काय ३ लाख देण्याची ऐपत आहे त्याची…. पण तुमच्या तेव्हाच्या मदतीची अशी पैशात किंमत करून तुमचा स्वाभिमान सुद्धा दुखवायचा नव्हता त्याला हे लक्षात आलं का तुमच्या?… म्हणून मी ते घ्या म्हणाले तुम्हाला!!”…

नंदू कदाचित जे कधी बोलूच शकला नसता ते शब्दनशब्द…अगदी त्याच्या मनातलं ओळखून… त्याच्या भावनांना वाट करून दिल्यामुळे नंदूचा चेहरा थोडा खुलला…..

“तू माघारी गेलास की त्या मुलाचं काय ते बघ रे!!… आजकाल म्हणतात ना पार्ट टाईम का काय ते? तसा लाव त्याला कुठेतरी. मला माहितीये अशी शेकड्यान मुलं सापडतील, आपण काही सगळ्यांना पुरे पडणार नाही… पण एकाला शक्य आहे… ते तरी करू.!!”. आता अगदी आपल्या मनातलीच इच्छा प्रदर्शित केल्यामुळे मामांनाही समाधान वाटलं…

एकाच वेळेस भाचा आणि पती यांच्या मनातलं जाणत, संयमाने सगळी परीस्थिती हाताळणारी अशी ही मनकवडी मामी… खरंच एक विलक्षण व्यक्तिमत्व…

आता मामाही व्यक्त झाला….“हे बघ नंदू…. मामाचं ऋण तर फेडलंस पण आता सामाजिक ऋण फेडायचं आहे तुला… तुझ्या या धनाचा काही अंश समाजाच्या विकासासाठी उपयोगात आण.. आपल्या उत्कर्षात या समाजाचंही ऋण आहे हे लक्षात ठेव!”…

स्वतःच्या शारीरिक व्याधी आणि सुमार आर्थिक परिस्थितीतही मामा-मामी त्या मुलाचा, त्याच्या शिक्षणाचा, सामाजिक ऋणाचा विचार करत होते… असं हे व्यापक दृष्टीकोन असलेलं मामा-मामीचं जबरदस्त combination विधात्यानी घडवलं होतं…

त्या रात्री नंदू शांत आणि गाढ झोपला… दुसऱ्यादिवशी उठून प्रसन्न अंतःकरणाने, सगळं ओझं हलकं झालेल्या, निश्चिंत मनाने… नंदू परत निघाला… एका ऋणातून मुक्त होत सामाजिक ऋण फेडण्याच्या दिशेनी….

आपल्या ऋणाची जाणीव ज्या मुलामुळे झाली त्या मुलाचा शिक्षणाचा सगळा खर्च उचलण्याबरोबरच नंदुनी होतकरू विद्यार्थ्यांसाठी मामाच्या नावे वार्षिक शिष्यवृत्ती देखील सुरु केली…..

“विस्मृतीत गेलेलं “मामाचं ऋण” ते व्यापक स्वरूपाचं “सामाजिक ऋण” हा प्रवास त्याच्या आयुष्याला एक वेगळीच कलाटणी देऊन गेला…..

©️ क्षितिज दाते.

ठाणे.

Avatar
About क्षितिज दाते , ठाणे 79 Articles
केवळ एक हौस म्हणून लिखाण सुरू केलं . वेगवेगळ्या विषयांवर पण साध्या सोप्या भाषेत लेखन . आकाशवाणीवरील कार्यक्रमात काही लेखांचं प्रसारण झालं आहे .काही लेख/कथा पॉडकास्ट स्वरूपात देखील प्रसारित झाल्या आहेत . Snovel या वेबसाईट / App वर "सहज सुचलं म्हणून" या शीर्षकाखाली तुम्ही ते पॉडकास्ट ऐकू शकता.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..