जन्म. २२ फेब्रुवारी १९२० ला जालंधर येथे.
पडद्यावरचे देखणे व रुबाबदार पोलीस इन्स्पेक्टर म्हणून इप्तेखार यांची सिनेविश्वात ओळख होती. इप्तेखार हे असे अभिनेते असे होते की त्यांना पोलीस इन्स्पेक्टरांच्या भुमिकेत पहायला प्रेक्षक आतुर असायचे. इप्तेखार यांचे पूर्ण नाव सय्यदाना इप्तेखार अहमद. ते उत्तम अभिनेते तर होतेच पण ते स्वतः उत्तम चित्रकार तसेच गायक पण होते. सुरुवातीच्या काळात नायक म्हणून सिनेमात आले होते. त्यांचे वडिल कानपूरच्या कंपनीत अधिकारी होते. पाच भावंडात इप्तेखार सगळ्यात मोठे. इप्तेखार यांचे शिक्षण कानपूर ला झाले. मॅट्रीक पास झाल्यावर लखनौ काॅलेज मधून चित्रकलेची पदवीका घेतली. गाण्याची आवड इप्तेखार यांना लहानपणा पासूनच होती. प्रसिध्द गायक सैगल चा प्रभाव त्यांच्या मनावर होता. सैगल सारखे आपण गायक व्हावे असे त्यांना सारखे वाटायचे. त्या काळी कलकत्ता येथे बहुसंख्य रेकाॅर्ड कंपन्या होत्या. त्यामुळे वयाच्या विसाव्या वर्षी त्यांनी कलकत्त्याचा रस्ता पकडला. त्या वेळी एच.एम.व्ही.कंपनीत संगीतकार कमल दासगुप्ता काम करत होते. १९४२ साली एम.पी.प्राॅडक्शनच्या त्यांनी दिलेल्या जवाब सिनेमातले काननदेवी ने गायलेले गाणे दुनिया तुफान मेल खूप लोकप्रिय झाले होते. कमल दासगुप्तांनी एच.एम.व्ही. साठी इप्तेखार यांची आॅडिशन घेतली. त्यात पास झाल्यावर त्यांच्या आवाजात दोन खाजगी रेकाॅर्डस् एच.एम.व्ही.ने काढल्या. इप्तेखार कानपुर ला परतले.
इप्तेखार यांचे व्यक्तीमत्व पाहून कमल दासगुप्ता प्रभावित झाले. त्यांनी इप्तेखार यांची अभिनेता म्हणून एम.पी. प्राॅडक्शन कडे शिफारस केली. कंपनी ने तार करुन इप्तेकार ना बोलावून घेतले. तो पर्यंत कानपूर च्या सईदा शी त्यांची एंगेजमेंट झाली होती. कलकत्त्याला आले खरे पण बराच काळ त्यांना काहीच काम नव्हते. या काळात त्यांच्या बिल्डिंगमधे रहाणाऱ्या हॅना जोसेफ या ज्यू मुलीच्या प्रेमात ते पडले. सईदा बरोबर संबंध तोडून त्यांनी हॅना बरोबर लग्न केले. लग्नानंतर हॅना झाली रेहाना अहमद.
इप्तेखार असलेला पहिला सिनेमा तक्रार १९४४ साली आर्टस् फिल्म कंपनीने निर्माण केला. यात नायिका होती जमुना. १९४५ साली एम.पी.प्राडक्शन चे दोन सिनेमे रिलिज झाले ज्यात इप्तेकार नायक होते. पहिला होता घर ज्यात नायिका होती जमुना आणि दुसरा होता राजलक्ष्मी. यात नायिका होती काननदेवी. राजलक्ष्मी हा तलत मेहमूद चा अभिनेता म्हणून पहिला सिनेमा होता. १९४७ साली इप्तेखार यांचे दोन सिनेमे रिलिज झाले. ऐसा क्यूं आणि तुम और मै.
१९४६ साली त्यांच्या मोठ्या मुलीचा सलमा चा जन्म झाला आणि १९४७ साली धाकट्या मुलीचा सईदाचा जन्म झाला. फाळणीनंतर त्यांचे बहुतेक नातेवाईक पाकिस्तानात निघून गेले. इप्तेखार यांनी मात्र भारतात रहाणे पसंत केले. जातीय दंगली मुळे कलकत्ता सोडून त्यांना मुंबईत यावे लागले. खारच्या एव्हरग्रीन हॉटेल मधे काही काळ या कुटुंबाने वास्तव्य केले खरे पण काम न मिळाल्याने काही काळ उपासमारीची पाळी पण आली. मग पत्नीने रेहाना ने पाटणवाला कुटुंबात हाऊसकिपर ची नोकरी धरली. ते स्वतः छोटे मोठे रोल करत होते. तरीपण कुटुंबाचा खर्च भागणे कठीण होते.
कलकत्याला असताना काननदेवींनी अशोककुमारांशी ओळख करुन दिली होती. मुंबईत आल्यावर इप्तेखारांनी अशोककुमारांची भेट घेतली. अशोककुमारांनी बॉम्बे टोकीज च्या १९५० च्या मुकद्दर मधे त्यांना काम दिले. इप्तेखारांची चित्रकलेची आवड समजल्यावर अशोककुमारांना त्यांच्या विषयी आपुलकी वाटायला लागली. ते स्वतः उत्तम चित्रकार होते आणि वयाने मोठे असुनही इप्तेखारांना चित्रकलेत गुरु मानत. इप्तेकारांच्या चित्रकलेचा नमुना १९६४ साली आलेल्या दूर गगन की छाओमे सिनेमाच्या टायटल्स मधे पहायला मिळतो.
५० आणि ६० च्या दशकात सगाई, साकी, आबशार, आबोश, विराज बहू, मिर्झा गालिब, देवदास, श्री ४२०, समुद्री डाकू, जागते रहो, अब दिल्ली दूर नही, दिल्ली का ठग, रागिणी, बेदर्द जमाना क्या जाने, कंगन, छबेली, कल्पना, कानून प्रोफेसर, रंगोली, बंदिनी, मेरी सूरत तेरी आंखे, दूर गगन की छाओमे, संगम, शहीद, तिसरी कसम, फूल और पत्थर, तिसरी मंझिल, हमराज, संघर्ष, आदमी और इंसान , इंतकाम सिनेमात अविस्मरणीय भुमिका केल्या.
या नंतर आला इत्तफाक. यातल्या सी.आय.डी. इन्स्पेक्टर कर्वें या भुमिकेने त्यांचे आयुष्य बदलून टाकले. धुम्मस या गाजलेल्या गुजराती नाटकावर आधारित हा सिनेमा एकाच सेटवर संकलनासह आठ दिवसात तयार झाला. इन्स्पेक्टर चा युनिफॉर्म त्यांच्या व्यक्तीमत्वाला इतका शोभला की तश्याच भुमिकेचे सिनेमे भरभर मिळत गेले. खारमधे स्वतःचा फ्लॅट इप्तेकारनी घेतला.याचे सगळे श्रेय ते अशोककुमारांना देत कारण अशोककुमारांच्या शिफारसी मुळेच बी.आर. फिल्मस् मधे इप्तेखारांचा प्रवेश झाला. त्यांच्या मोठ्या मुलीचा प्रेम विवाह १९६४ साली डेहराडून येथले धनीक विपिनचंद्र जैन यांच्या बरोबर झाला. लग्नानंतर डेहराडून ला स्थायिक झालेली मुलगी सलमा घरगुती कारणाने १९७९ साली मुंबईत परत आली. पुढली वीस वर्षे ती निर्माते एन.सी.सिप्पी यांची सेक्रेटरी म्हणून काम करत होती. १९७० आणि १९८० चे दशक इप्तेखार ना फारच भरभराटीचे गेले. शर्मिली,मेहबूब की मेहंदी,गॅम्बलर,कल आज और कल, हरे राम हरे कृष्ण, जवानी दिवानी, अचानक, जंजीर, मजबूर, दिवार, धर्मात्मा, शोले ,कभी कभी, दुल्हन वोही जो पिया मन भाये, डाॅन, त्रिशूल, नुरी, काला पत्थर, कर्ज, दोस्ताना, राॅकी, साथसाथ, राजपूत, सदमा, इंकीलाब, जागिर, तवायफ, अंगारे आणि आवाम सारख्या सिनेमात अविस्मरणीय कामे केली.
पाच दशकात तीनशे हून अधिक सिनेमात त्यांनी कामे केली. १९९२ चा बेखुदी आणि १९९३ चा कालाकोट हे त्यांचे शेवटचे सिनेमे. इप्तेखारांचे पाकिस्तानात गेलेले त्यांचे कुटुंबीय त्यांच्या संपर्कात असे. त्यांचे बंधू इम्तियाज अहमद पाकिस्तानी टीव्ही चे गाजलेले कलाकार होते.
इप्तेखार यांचे ४ मार्च १९९५ रोजी निधन झाले.
संकलन: संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply