नवीन लेखन...

रुद्रा – कादंबरी – भाग १४

मनोहर ‘पंजाब ढाब्या’च्या मागच्या लॉनवर आला, तेव्हा जसवंत अधीरतेने एका कोपऱ्यातल्या टेबल जवळ  उभा असलेला दिसला. मनोहरने आसपासचे निरीक्षण केले. लॉनवर फारशी गर्दी नव्हती. बहुतेक सुटे सुटे टेबल होते. जसवंतच्या टेबलच्या आसपास कोणी नव्हते. दूर एक मुसलमान आपल्या मुलासोबत काहीतरी खाण्यात दंग होता. मनोहर निश्चित मनाने जसवंतच्या टेबलवर जाऊन समोर बसला.
“जसवंत, राघवला तुझा संशय आला आहे! कारण सापडलेल्या पुराव्या नुसार समभाव्य खून्याचे वर्णन तुझ्याशी तंतोतंत जुळतंय म्हणे!”
” येऊ दे मला पकडायला! मी तयार आहे! तो आला तर मी सांगेन कि खुनाच्या रात्री तू आऊट हाऊस मध्ये गेला होतास!”
” तू पेपर वाचत नाहीस का? आजच्याच पेपरमध्ये संतुकरावांचा खून साडे दहा ते साडे अकराच्या दरम्यान झालाय! अन त्या पूर्वीच मी निघून गेल्याचे तू पहिले आहेस. ”
“हो! हे फक्त मला माहित आहे! आणि मी ते पोलिसांना सांगू शकतो! अजून एक महत्वाचे भलेही तू खून केला नाहीस, पण तुझा अन खुनाचा खूप जवळचा संबंध आहे. आणि खुनी कोण हे ही तुला माहित आहे!   अर्थात ते तुझ्याच तोंडून कसे वदवून घ्यायचे हे राघवाचे काम आहे. आणि तुला माहीतच आहे राघव असल्या कामात वाकबगार आहे!”
” जसवंत बहुदा तू लहानपणी डोक्यावर पडला असावास! तू काहीही सांगशील आणि पोलीस तुझ्यावर विश्वास ठेवतील असे तुला वाटते का? त्यांना पुरावा लागतो!”
” पुरावा! आहे ना माझ्या कडे!”
“तुझ्या असल्या पोकळ धमक्यांना मी भीक घालेन असे तुला वाटते का ?”
“नको घालूस! तू मूर्ख आहेस! तुला ठाऊक नाही माझ्या केबिन मध्ये सीसीटीव्हीचा कॅमेरा आहे! तू आल्याची, गेल्याची तारीख, वार, वेळ त्यात आणलेली आहे! पोलिसांना फक्त ती दिली कि —-” हे शंभर टक्के खरे होते. त्याच्या केबिन मध्ये कॅमेरा होता. फक्त तो गेल्या वर्षभरा पासून बंद होता! जसवंतनेच एकदा गांजाच्या तारेत कॅमेऱ्याच्या तारा तोडून टाकल्या होत्या!
” बरं मग? तुझं काय म्हणणं आहे?” मनोहरने चटकन माघार घेतली. खरे तर मनोहर हादरला होता. जसवंतच्या केबिनच्या कॅमेरा दुर्लक्षित राहिला होता!
“मग, काही नाही! आता मी ‘माल’ मागत रहाणार आणि तू तो देत रहाणार! ”
“म्हणजे तू मला गांज्यासाठी ब्लॅकमेल करणार?”
” साली गांज्याची लत वाईट असते! तू काहीही समज! आत्ता मला ‘माल’ दे!” जसवंत जगजेत्यांच्या सुरात म्हणाला.
मनोहरने तोंड कडवट केले. खिशातल्या तीन पुड्या जसवंतच्या समोर फेकल्या. त्या जसवंतने अधाश्या सारख्या झडप धालून ताब्यात घेतल्या.
मनोहर शर्ट झटकत खुर्चीतून उठला आणि तोंड फिरवून चालू लागला. चार पावले गेल्यावर त्याने वळून जसवंत कडे नजर टाकली.
“जसवंत, हि तुझी माझी शेवटची भेट!” तो स्वतःशीच पुटपुटला.

जसवंत आणि मनोहर काय बोलत होते ते राघवला ऐकू येत नव्हते, पण त्यांच्या अविर्भावावरून विषय खूप गंभीर असावा असे वाटत होते. राघवने मनाशी काही निर्णय घेतला.
“शकील, तुझ्या कडे गन आहे का?” राघवने अचानक विचारले.
“गन?नाही! मी जसवंतच्या मागावर होतो, गन घरीच आहे! पण का?”
“या दोघांना आत्ताच ताब्यात घ्यावे म्हणतोय!”
“पण सर,तयारी? आपण दोघा शिवाय येथे डिपार्टमेंटच कोणीच नाही! अन कॉल केला तरी फोर्स पोहचायला  किमान वीस मिनिटे तरी लागतील! तोवर हे दोघे थांबणार नाहीत! सटकतील!”
“शकील तू म्हणतोयस ते खरे आहे! पण या दोघांचा खुनात सहभाग होता हे नक्की! या दोघांचा आपसात सबंध असल्याचे आता स्पष्ट झालंय. आता याना फारकाळ मोकळे सोडून चालणार नाही. म्हणून हा क्षण महत्वाचा वाटतोय!”
“मग, करू का फोर्स साठी फोन?”
“नको! तितका वेळ नाही आपल्या कडे. तू तयार आहेस का? आपण दोघे हे काम करू शकतो! मी जसवंतला टार्गेट करतो, तू मनोहरला पकड! जसवंत तुला झेपणार नाही!”
“ओके, सर!” राघव सोबत एक साहस करायला मिळतंय म्हणून शकील खुश होता.
तेव्हड्यात मनोहर खुर्ची मागे सारून जाण्यासाठी उठताना राघवला दिसला.
“शकील गेट रेडी! रन! “राघव जागेवरून उठत ओरडला. शकील लुंगी वर खोचून पळे पर्यंत राघव पळत सुटला होता. शकील मनोहरच्या दिशेने पळत होता. राघवच्या एका झेपेच्या टप्प्यात मनोहर आला होता. शकीलला दिलेल्या सूचना विसरून त्याने मनोहरवर झेप घेतलीच. पण मनोहरला धोका जाणवला होता. तो पलीकडल्या टेबलवरला म्हातारा आपल्या दिशेने धावत येतोय हे त्याने डोळ्याच्या कोपऱ्यातून पहिले होते. तो सुसाट धावत सुटला. त्याच्या मागे धावणाऱ्या म्हाताऱ्याची दाढी गालापासून सुटून हनुवटीवर लोम्बत होती, पायातील लाल पोलिसी बूट पण दिसत होते! राघव! क्षणात मनोहरने ओळखले होते!
राघवच्या मागेच शकील होता. दोन माणसे मनोहरच्या मागे त्याला पकडण्यासाठी धावत आहेत हे पाहिल्यावर जसवंतने धोका ओळखला. तो तसाच मागल्या मागे सटकला. राघव आणि शकील दोघेही मनोहरच्याच मागे लागल्याने जसवंतचे फावले होते. राघवच्या अपेक्षे पेक्षा मनोहर अधिक चपळ निघाला होता. तो बेभान होऊन जिवाच्या आतंकाने पळत होता, वेडा -वाकडा! त्याला त्याची बाईक काढणेही शक्य नव्हते. तो तसाच ढाब्या बाहेरच्या हाय-वे वर आला. मागे राघव होताच. आणि राघवला टाळण्यासाठी त्याने तो गाढवपणा केलाच! तशाच वेगात त्याने हाय वे क्रोस करण्यासाठी धाव घेतली, जमतें निम्मा रस्ता पारहि केला. ——- स्टील प्लेट्सचे रोल्स असलेला, हेवी लोडेड चौदा चाकाचा तो ट्रक, हेड लाईटचा फुल फोकस रस्ताभर मारून येत होता! फक्त क्षणभरच मनोहरचे डोळे दिपले. मग अंधार झाला. पळणारा राघव हायवेच्या कडेला गप्पकन जागेवरच थांबला! डोळे फाडून मनोहरकडे पाहतच होता. त्या ट्रकच्या धक्क्याने मनोहर दहा फूट हवेत फेकला गेला.त्याच ट्रकच्या हेड लाईटच्या प्रकाशात रस्त्यावर आपटला.  त्याला चाकाखाली चिरडून ट्रक आपल्याच गतीने अंधारात अद्रष्य झाला!
काही क्षणात राघव भानावर आला. शकील हि तोवर तेथे आला. राघवने मोबाईल काढला. आणि अपघाताची माहिती कंट्रोल रूमला दिली!
या सर्व नाट्याचा अजून एक साक्षीदार होता. आपल्या दांडग्या स्पोर्ट्स बाईक जवळ, काळ्या हुडीची कॅप नाका पर्यंत ओढून सिगारेट पीत ऐटीत उभा होता. तो रुद्रा होता! त्याने मनोहरची पाठ सोडली नव्हती!

संबंधी पोलीस पार्टी येऊन परिस्थितीचा ताबा घेई पर्यंत बराच वेळ मोडला होता. राघव सर्व मार्गी लावून मोकळा झाला तेव्हा रात्रीचे बारा वाजून गेले होते. राघवने शकीलला घरी जाण्यास सांगितले. तो हि थकला होता. राघवची हि खेळी वायाच गेली होती. दोन्ही ‘पंछी’ उडाले होते. मनोहर हाती लागण्या पलीकडे गेला होता. पण जसवंतचे फावले होते. राघवने जसवंतचा फोन लावला. रिंग वाजत होती. नो रिप्लाय! त्याने पुन्हा दोनदा ट्राय केला अन मग नाद सोडून दिला. सकाळी पहिले काम जसवंतला ताब्यात घ्यायचे जेव्हा ठरवले तेव्हा कोठे त्याला बरे वाटले. तरी एक शेवटचा प्रयत्न म्हणून त्याने सायबर सेलला फोन केला.
” सर?”
“मी राघव बोलतोय. मला एका मोबाईलचे लोकेशन हवे आहे. ताबडतोब! देऊ शकाल?”
” नम्बर?”
राघवने जसवंतचा नम्बर दिला. दोन मिनिटात लोकेशन त्याच्या मोबाईलवर झळकले. ‘पंजाब ढाबा’ म्हणजे जसवंत अजून जवळच दबा धरून बसलाय तर! शकीलला घरी सोडून चूक झाली होती. त्याची आता खूप मदत झाली असती. पण राघव सहजा सहजी हार मानणाऱ्यातला नव्हता. त्याने स्वतःच शोधायला सुरवात केली. तासाभरात जसवंतच्या फोनचे लोकेशन सापडले. जसवंत ज्या टेबलवर मनोहरशी बोलत होता, त्याच टेबल खाली गवतात तो मोबाईल पडला होता! राघवने तो उचलून खिशात टाकला.

(क्रमशः)

— सुरेश कुलकर्णी 

Avatar
About सुरेश कुलकर्णी 176 Articles
मी सुरेश कुलकर्णी. . साधारण कथा , लेख ,जुन्या सिनेमाच्या (हिंदी )गण्यावर माझे लिखाण असते . एखादे छानसे पुस्तक वाचण्यात आले तर त्यावर हि लिहतो . माझ्या वाचकास एक नम्र विनंती माझे लिखाण आवडले तरी ,आणि नाही आवडले तरी जरूर कळवा माझ्या लिखाणाचा पोत त्या शिवाय सुधारणार नाही .माझे सर्व लिखाण काल्पनिक असते .. mb.6361255994. किवा srk101252@gmail --संपर्का साठी

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..