वेळ सकाळी अकराची होती.
न्यायमूर्ती श्री हरिप्रसाद यांचे कोर्ट, खचाखच भरलेले होते. त्याला तसेच कारणही होते. कोट्याधीश संतुकराव सहदेव यांच्या खुनाची केस त्या दिवशी सुनावणीस असणार होती. न्याय निष्टुर जजेस मध्ये हरिप्रसादांचे नाव बरेच वरच्या बाजूस होते. अपराध्याला जास्तीजास्त शिक्षा सुनावण्याकडे त्यांचा कल असतो, असा आजवरचा इतिहास सांगत होता. त्याच बरोबर ते आरोपीस निरपराधत्व सिद्ध करण्याची संधी पण आवर्जून देत, हे हि खरे होते.
दुसरी महत्वाची बाब होती ती संतुकराव सहदेव यांचे जगजाहीर ‘इच्छापत्र!’. आरोप सिद्ध होऊन, जर आरोपी सही सलामत सुटला तर, पंधरा शे कोटीचे साम्राज्य त्याचे स्वागत करण्यास सज्ज होते, पण ते अशक्य होते! आणि न्या. हरिप्रसादजी असताना तर केवळ अशक्य!!
तिसरी महत्वाची बाजू होती ती म्हणजे, सरकारी वकील, अडोव्हकेट दीक्षित! दीक्षित म्हणजे क्रिमिनल केसेस मधला किडा!. इन्स्पे. राघव आणि अडव्हो. दीक्षित म्हणजे पुराव्याची आणि पैरवीची भक्कम तटबंदी!
आणि या सर्वान विरुद्ध होता रुद्रप्रताप रानडे! ज्याने ‘माझ्या हातून खून झाला आहे!’ हे लिहून दिले होते.
‘कोर्टाने सलग वेळ दिला तर फक्त चारच दिवसात हि केस निकाली लागेल!’ असे दीक्षित राघवला म्हणाले होते.
पट्टेवाल्याने पुकार केला, तशी इतकावेळजी कोर्टात कुजबुज चालू होती ती क्षणात शांत झाली. सर्व जण उठून उभे राहिले. कोर्ट स्थानापन्न झाले तशे सर्वजणहि आपापल्या जागी बसले. कार्यवाही सुरु करण्याचा आदेश कोर्टाने दिला. सुरवातीच्या औपचारिकता सम्पल्या.
“आरोपी रुद्प्रताप रानडे, आपला कोणी वकील आहे का?” कोर्टाने विचारले.
‘इतका सज्जड पुरावा असताना आणि अपयशाची खात्री असताना कोण घेणार याची केस?’ दीक्षित जरी स्वतःशीच पुटपुटले तरी ते अख्या कोर्टानी ऐकले. रुद्राने क्षणभर दीक्षितांच्या कडे अश्या नजरेने पहिले कि दीक्षितांच्या अंगावर काटा आला.
” नाही. माझा कोणी वकील नाही!”
“आपणास कोर्टाकडून वकील मिळू शकतो. तुम्ही घेणार का?”
“धन्यवाद. पण मला वकील नको!”
” मग, तुमची बाजू कोर्टा समोर कोण मांडणार?”
“माननीय न्यायमूर्तीनी परवानगी दिली तर मीच माझी बाजू मांडीन!” रुद्रा नम्रपणे म्हणाला.
प्रेक्षकात कुजबुज वाढली. हा तरुण कशी काय केस लढवणार? न्याय. हरिप्रसादजी समोर आणि दीक्षितांन सारख्या नामवंत वकिलांविरुद्ध?
“ऑर्डर! ऑर्डर!! शांतता पाळा!” कोर्ट आपला लाकडी हातोडा मेजवर आपटत गरजले,आणि रुद्राकडे वळून म्हणाले.
“आरोपी रुद्रप्रसाद आपण पुरेसे गंभीर आहेत ना?हा तुमच्या जगण्या मरण्याचा प्रश्न आहे!”
” महोदय,मला याची पूर्ण जाणीव आहे. फक्त एकच विनंती आहे!”
“बोला!”
” महोदय, मी ज्ञानाने किंवा पेशाने वकील नाही. मी न्यायदेवतेचा आदर करतो. माझा, न्यायव्यवस्थेवर आणि आपल्या न्यायदानावर पूर्ण विश्वास आहे. पण बोलण्याच्या ओघात कधी अनुचित बोलून गेलो तर मला समजून घ्यावे.”
“आपण सर्वजण समजूतदार आहोतच. आणि दीक्षित आहेतच तुम्हाला ट्र्याकवर ठेवायला!”
कोर्टात नर्महश्या पिकला.
” तर मग ठीक. आरोपी वरील आरोपांचे वाचन करण्यात यावे!” कोर्टाने सुनावले.
” आरोपी रुद्रप्रसाद रानडे ,वय २९वर्ष, रा. मुंबई, यांनी दि १२ जानेवारी रोजी रात्री अकराच्या सुमारास श्री संतुकराव सहदेव यांच्या, नाक तोंड दाबून खून केला! म्हणून रुद्रप्रसाद रानडेंवर -सदोष मानव हत्येचा -आरोप आहे!”
रुद्रा वरील आरोपाचे गंभीर आवाजात वाचन झाले.
” आरोपी रुद्रप्रसाद,काय आपणास हा गुन्हा मान्य आहे?” कोर्टाने रुद्रास विचारले.
“महोदय, मी हा खून केलेला नाही! मी हा गुन्हा अमान्य करतो!”
राघव क्षणभर सुन्न झाला. रुद्रा स्वतः खुनाचा पुरावा घेऊन पोलिसांना शरण आला होता! ‘मला अटक करा’ म्हणाला होता! अटक झाल्यावर ‘माय प्लेजर! त्यासाठीच आलोय!’म्हणाला होता! आणि आता गुन्हा नाकारतोय? त्याने दीक्षितांकडे नजर टाकली. त्यांना फारसे आश्चर्य वाटल्याचे दिसत नव्हते. कारण सर्वच आरोपी सुरवातीला ‘गुन्हा’ अमान्यच करत असतात, त्यात नवल ते काय?
” कोर्ट इज ऍडजर्न टील नेक्स्ट डेट!” म्हणत कोर्ट उठले.
त्या दिवशीचे काम काज संपले होते.
— सुरेश कुलकर्णी
Leave a Reply