नवीन लेखन...

रुद्रा – कादंबरी – भाग ५

‘अब्जाधीश संतुकराव सहदेव यांची हत्या! — (आमच्या क्राईम रिपोर्टर कडून) – संतुकराव सहदेव (६५) हे ‘चहा साम्राज्याचे ‘अधिपती यांची त्यांच्या ‘नक्षत्र’ नामक बंगल्यात हत्या करण्यात आली आहे. विशेष म्हणजे त्यांचा मृत देह त्यांच्या आउट हाऊस मध्ये सकाळी त्यांच्या वॉचमनला आढळला. त्याने पोलिसांना पाचारण केले.

प्रथम दर्शनी नाकतोंड दाबून खून झाला असल्याची पोलिसांनी शंका व्यक्त केली आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.पण हा खून त्यांच्या अफाट संपती साठी झाला असावा असा आमचा अंदाज आहे. सहदेव इंडस्ट्रीज ग्रुप मध्ये चहा, कॉफीचे अनेक मळे, प्रोसेसिंग युनिटस , कोळशाच्या अनेक खाणी,आणि इतर बरेच उद्योग आहेत. या अथांग ‘साम्राज्याचे’ वारस कोण ? हा यक्ष प्रश्न. त्यांनी लग्न केले नव्हते.त्याचे नातेवाईक कोण हेही सध्या कोणास द्यात नाहीत. त्यांच्या वारसाची डोकेदुखी पोलिसांच्या मागे लागणार आहे.

या सर्व गोष्टींवर आमचे वार्ताहर लक्ष ठेवून आहेत. वेळोवेळी या प्रकरणातली अद्यावत माहिती आपल्या पर्यंत पोंचविण्याची जवाबदारी आमची आहे.

या केसची जवाबदारी, प्रसिद्ध, इन्स्पेक्टर राघव यांचावर सोपवण्यात आली आहे.’

बातमी खाली नक्षत्र बंगल्याचा आणि संतुकरावांचा फोटो छापला होता. रुद्राने रागारागाने त्या पेपरचा बोळा करून कोपऱ्यात फेकून दिला.

स्टुपिड! किती सहजपणे आपल्या हातून ‘एक म्हातारा नौकर’ म्हणून ,नवकोट नारायणाचा खून करून घेतला. एरव्ही रुद्रा ‘सावजाची’ साधारण माहिती काढायचा, त्यात त्याचे नावगाव, व्यवसाय, आणि मुख्य म्हणजे त्याची दिनचर्या असायची. येथे त्या सुपारी देणाऱ्याने हि माहिती त्याला बसल्या जागी पुरवली होती. सावजाचे राहते ठिकाण मात्र बंगल्या ऐवजी आऊट हाऊस सांगितले होते. वर सेक्युरिटी गार्ड मॅनेज करून दिला होता!  खोटी माहिती पुरवली होती! खरे तर त्याच वेळेस शंका यावयास हवी होती. पण सारे काही इतके सहज आणि वेगाने घडत गेले कि विचार करायला त्याला वेळच मिळाला नाही. तसेच आयत्या त्यावेळेस ‘खुनाचा’ मोहर्त कळवाल्याने रुद्राच्या हातून एक घोडचूक झालीच होती. बाइकसाठीचे ग्रीपर त्याने घातले ते खुनाच्या वेळेस तसेच राहिले होते. ग्लोज घालायचे राहूनच गेले होते! त्या ग्रीपरमध्ये त्याची बोट उघडीच होती. त्यामुळे खुनाच्या ठिकाणी कोठे तरी त्याच्या फिंगर प्रिंट्स राहिल्याचं असणार होत्या! फक्त एकच समाधानाची बाब होती, ती म्हणजे पोलीस रेकॉर्डला त्याच्या प्रिंट्स नव्हत्या!

महत्वाचा प्रश्न होता तो त्या बुटक्या सुपारी देणाऱ्या माणसाचा आणि संतुकरावचा काय संबंध होता? हा खून कोट्यवधीच्या इस्टेटी साठी किंवा व्यावसायिक वैमन्यस्ययातून करवून घेतला असण्याची शक्यता होती. तोच खरा वारसदार असेल का? का त्याने सुपारी फिरवली असेल? म्हणजे कोटीत घेतलेली सुपारी लाखात काम करून घ्यायचे! आता इतका श्रीमंत माणूस म्हणजे पोलीस गप्प बसणार नाहीत,आणि हे पेपरवाले-मीडियावाले त्यांना गप्प बसू देणार नाहीत.त्यात तो इन्स्पे. राघव म्हणजे ‘खावीस’ आहे! त्याचा इतिहास भयानक आहे! तो हाताखालच्या माणसावर फारसा विसंबून रहात नाही. स्वतःच्या मार्गाने तपास करतो. अंडर वर्ड मध्ये त्याला उगाच ‘वन मॅन आर्मी’ नाही म्हणत! तो पाताळातूनहि आपल्याला हुडकून काढणार हे नक्की! पिंजऱ्यात अडकलेल्या श्वापदा सारखी त्याची अवस्था झाली होती. त्याने त्या सुपारीवाल्याला रिंग केली. रिंग वाजली. रुद्राने श्वास रोखून धरला.’हा क्रमांक अस्तित्वात नाही. कृपया क्रमांक तपासून पहा!!’ हे उत्तर आले.  तो मूर्खपणा होता. त्या बेरकी माणसाने एव्हाना सिम कार्ड नष्ट करून टाकले असणार!

बेचैन रुद्राने सिगारेटचे पॅकेट चाचपले, ते रिकामे होते.

०००

इन्स्पे. राघवने समाधानाने मान हलवली. साले हे आर्टिस्ट लोक कमाल असतात. त्याने केलेल्या वर्णनावरून काढलेले ते स्केच खूप समाधानकारक निघाले होते. त्याने ते स्केच स्कॅन करून क्राईम डाटा सेंटरला पाठवले. काही क्रिमिनल रेकॉर्ड सापडते का याचा शोध घ्यावा लागणार होता. खरे तर हे कडब्याच्या गंजीत सुई शोधण्या सारखे होते. पण राघव कोणतीच शक्यता न तपासता सोडणार नव्हता. त्याने ते स्केच सर्व पोलीस स्टेशन्स आणि आपल्या सर्व इन्फर्मर्सना ‘आलर्ट ‘ म्हणून हि पाठवले होते.

राघवने सहा इंच उंचीचा कॉफी मग भरून घेतला आणि  ऑफिसच्या खिडकीतून बाहेर पडणाऱ्या पावसाकडे पहात घुटके घ्यायला सुरवात केली. डोक्यातील विचार आणि घटनांचा मेळ घालण्यात त्याचे मन गुंतून गेले होते. त्याला या प्रकरणात बरेच प्रश्न पडले होते.

इतका देखणा राज प्रसाद सोडून हा म्हातारा त्या आऊट हाऊस मध्ये का झोपत होता? लॅपटॉपवर कामुक चित्रफीत पहायला एकांत हवा म्हणून? पण त्याची काय आवशकता होती? तो एकटाच रहात होता त्या बंगल्यात! मग का तो आऊट हाऊस मध्ये येत होता? दुसरे तो बाईकच्या मिरर मध्ये दिसलेला कोण होता? तो नक्कीच ‘नक्षत्रा’वर नजर ठेवून होता. का? खुन्याने काही धागे दोरे मागे सोडले नव्हते. सराईत पणे तो वावरला होता. बंगल्याची खडा-न-खडा माहिती असल्या सारखा. एक तर तो घरातीलच कोणीतरी असावा,किंवा घराची रेकी करून घेतली असावी. कॉफी संपवून गेली होती. प्रश्नांची उत्तरे शोधावी लागणार होती.

जाधव काकांनी पोस्टमोर्टमचे आणि इतर रिपोर्ट्स टेबलवर ठेवले होते.त्यात मृत्यूचे कारण, ‘श्वास कोंडल्या ‘मुळे असे नमूद केले होते. हा अंदाज राघवने आधीच बांधला होता. म्हातारा रात्री साधारण दहाला जेवला होता,अन्नात काही आक्षेपाहार्य म्हणजे गुंगीचे रसायन किंवा घातक पदार्थ नव्हते,हे व्हिसेरा रिपोर्ट सांगत होता. मरताना त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव होते. बहुदा त्याला असे काही होईल अपेक्षित नव्हते.

फिंगर प्रिंटवाल्यानी मात्र झकास काम केले होते. म्हाताऱ्याच्या मनगटावर तर्जनीची अस्पष्ट प्रिंट होती पण नाकाच्या डाव्या नाकपुडीवर अंगठ्याची तर उजव्या नाकपुडीवर तर्जनीची स्पष्ट ठसे खुनी सोडून गेला होता. आणि बाकी तीन बोटांचे ठसे उजव्या कान जवळ होते! चिमटीत नाक दाबून धरले आणि तळवा तोंडावर दाबल्याचा तो स्पष्ट पुरावा होता! दुसरी महत्वाची गोष्ट यावरून सिद्ध होत होती कि खुनी डावखोर असावा! बुटाच्या ठश्यावरून त्या खुन्याची उंची सहा फुटाच्या आस पास होती! तेच ठसे त्या व्यक्तीचे वजन साधारण सत्तर -ऐंशी किलो असावे या कडे निर्देश करत होते ! राघवच्या नजरे समोर जसवंत उभा राहिला! त्याच बरोबर त्याच्या पायातले ते कॅनवास शूजपण ! जसवंत डावखोरा होता! वजन-उंचीच्या अपेक्षित मोजमापात होता! आणि फक्त आणि फक्त जसवंतलाच माहित होते कि संतुकराव आऊट हाऊस मध्ये झोपतात!!

राघवने फोन उचलला.

“राकेश, जाधव काकांनी जसवंतचे फिंगर प्रिंट्स घेतले आहेत. ते बॉडीवरील प्रिन्टशी जुळतात का मॅच करून पहा. ”

“ओके सर”

“आणि हो त्या स्केचच काही रेकॉर्ड सापडते का ?”

“आम्ही पहातोय पण अजून काही क्लू नाही लागलेला. काही समजले तर कळवतो.”

“ठीक , बाय .” राघवने फोन ठेवला.

(क्रमशः)

— सुरेश कुलकर्णी 

Avatar
About सुरेश कुलकर्णी 176 Articles
मी सुरेश कुलकर्णी. . साधारण कथा , लेख ,जुन्या सिनेमाच्या (हिंदी )गण्यावर माझे लिखाण असते . एखादे छानसे पुस्तक वाचण्यात आले तर त्यावर हि लिहतो . माझ्या वाचकास एक नम्र विनंती माझे लिखाण आवडले तरी ,आणि नाही आवडले तरी जरूर कळवा माझ्या लिखाणाचा पोत त्या शिवाय सुधारणार नाही .माझे सर्व लिखाण काल्पनिक असते .. mb.6361255994. किवा srk101252@gmail --संपर्का साठी

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..