नवीन लेखन...

रुद्रा – कादंबरी – भाग ९

राघवने राकेशला जसवंतचे फिंगर प्रिंट्स डेड बॉडी वरील प्रिन्टशी जुळवून पाहण्यास सांगून फोन कट केला. कॉफी मगात राहिलेल्या कॉफीचा शेवटचा सिप घेतला. काही क्षण विचार केला. मोबाईल उचलला.

“हॅलो राधा, मी राघव बोलतोय.”

“कोण राघव?मी नाही ओळखत कुण्या राघवला !” राधेने तुसडेपणाने उत्तर दिले.

“अहो मी इन्स्पे. राघव बोलतोय!”

मग मात्र राधा घाबरली. दोन दिवसाखाली पोलिसांनी तिच्या ऑफिसात येऊन सगळ्या स्टाफची जबानी घेतली होती. या मोठ्या लोकांच्या भानगडी अन मधेच बाकीच्यांना ताप होतो. तिच्या कंपनीचा मालकाचा मुडदा त्याच्याच आऊट हाऊस मध्ये सापडला म्हणे. त्याच्या चौकशीसाठी अख्या स्टाफला पोलिसांनी दिवसभर वेठीस धरले होते. सगळ्यांचे फोन नम्बर, घराचेपत्ते आणि इतर माहिती पोलीस घेऊन गेले होते. तेव्हा हा राघव कडक ड्रेसमध्ये एका खुर्चीत बसून देखरेख करत होता.

“सॉरी सर, मी पटकन नाही ओळखूशकले तुम्हाला ! का- काही काम होत का ?” राधेची घबराट तिच्या आवाजातून उतू जात होती.

“अहो, किती घाबरतंय?आधी शांत व्हा. काही नाही सहजच फोन केला होता. आज मी संध्याकाळी ‘राजयोग’ला डिनर साठी जातोय, तुम्ही जॉईन झालात तर बरे होईल!”

कसलं मेल ‘डिनर’? पोलीसी ससेमिरा! मेल्याला काहीतरी चौकशी करायची असेल. म्हणून डिनरच निमित्य! माझंच मेलीच चुकलं त्या म्हाताऱ्याची पर्सनल सेक्रेटरी झाले ते. पण तेव्हा काय माहित होत म्हाताऱ्याचा खून होईल अन पोलीस हे असे छळतील!?

“मग येताय ना ?” बराच वेळ राधाचा रिस्पॉन्स न आल्याने राघवन विचारले.

“अ — डिनर म्हणजे–रात्र होणार—”

“अहो घाबरू नका! तुम्ही येताय का गाडी पाठवू?”

“नको! नको !! तुमची गाडी-बिडी नका पाठवू ! मेल कॉम्प्लेक्स मध्ये तोंड दाखवायला जागा राहायची नाही! येते येते मी!” राधेने घाईघाईत होकार दिला. न देऊन संगतीय कोणाला?

“होकार बद्दल थँक्स! बरोबर रात्री आठला ‘राजयोग’ च्या दाराशी मी वाट पहातोय!”

“ठीक!” राधेने फोन ठेवला. राधा आपल्या आईबापा बरोबर ‘आदिशक्ती’ अपार्टमेंट मध्ये रहात होती. मध्यमवर्गीय कुटुंब. संतुकरावांची सेक्रेटरी झाल्यापासून जरा बरा  आणि वेळेवर पगार मिळत होता. आता बरे दिवस आले होते. काळ्या-सावळ्या शेलाट्या बांध्याच्या राधे साठी बरेच जण ‘झुरणी’ लागले होते. काही आडून आडून लग्नासाठी विचारत होते. पण अजून म्हणावा तसा कोणी ‘क्लिक’ होत नव्हता!

बरोब्बर आठच्या ठोक्याला राधा ‘हॉटेल राजयोग’च्या भव्य द्वारा पाशी पोहंचली.तिने क्रीम कलरचा साधा पंजाबी ड्रेस घातला होता. त्यावर ओढणी. पांढऱ्या शुभ्र पठाणी ड्रेस मध्ये राजबिंडा राघव उभा होता.

“वेलकम!” एक छोटासा टपोऱ्या गुलाबाचा बुके,किंचित कमरेत वाकून राधाला देत राघवने तिचे स्वागत केले. परफेक्ट मॅनर्स! आणि या आऊट फिट मध्ये किती हँडसम दिसतोय! हँडसम का क्युट? तिच्या मनात येऊनच गेले. खाकी वर्दीत हेकट वाटणारा राघव तिला आता चांगला मॅनर्ड आणि हि-मॅन वाटू लागला. ती येताना मणा-मणाच ओझं मनावर घेऊन आली होती ते काहीस हलकं झालं होत.

“चला राधाजी आपल्या साठी सात नंबरच टेबल आरक्षित करून ठेवलंय”

” सात? अन ते राधा ‘जी’ वगैरे नका हो म्हणू. नुस्त राधाचं म्हणा. संकोच वाटतो! उगाच प्रौढ झाल्या सारखं वाटत!”

” ओके! सात माझा लकी नम्बर, आज सात तारीख आहे. महिनाही जुलै आहे. या जगात मी याच दिवशी आलोय!”

“म्हणजे तुमचा बर्थडे?”

” हो! आणि आज तुम्ही माझे स्पेशल गेस्ट!”

“हैप्पी बर्थडे, सर! मला ठाऊक नव्हतं नसता काही तरी गिफ्ट आणलं असत!”

“तुम्ही आलात हेच माझं गिफ्ट!”

राघवचा आवाज किती सॉफ्ट आहे? पुन्हा तिच्या मनानं काही तरी सुचवलं.

दोघे त्यांच्या टेबलवर पोहंचले. राघवने राधाला विचारून तिच्या पसंतीची काजू करी मेन कोर्स मध्ये सांगितली.आणि स्टार्टर म्हणून टोमॅटो सूप. राघव तिला होईल तितकं रिलॅक्स करण्याचा प्रयत्न करत होता. तिच्या कडून हवी ती माहिती मिळवण्या साठी हे गरजेचे होते. तो ड्युटीवर आला होता, ‘डेट’वर नाही! हे तो विसरला नव्हता!

“राघव सर मला कशाला बोलावलंत?” शेवटी राधानेच विचारलं.

“अं, तुम्ही संतुकरावांच्या पर्सनल सेक्रेटरी म्हणून किती दिवसा पासून काम करताय?”

“असतील झाले पाच वर्ष.”

“माणूस म्हणून आणि एक बिझनेसमन म्हणू कसे होते?”

“बिझनेसमन म्हणून लाख मोलाचे! चाण्यक्यनीतीचा बादशहा! तुमच्या बिझनेस मॅनेजमेंट नसतील असे वस्तुपाठ त्यांच्या कडून मी शिकलीय! आणि त्याच जोरावर सध्या ‘सह्देव’ ग्रुपचा कारभार संभाळती आहे! किती तरी कम्पन्या त्यांनी टेकओव्हर केल्यात! कपटनिती, दूरदृष्टी, आर्थिकशिस्त , सबकुछ ! अफाट!  अस्सल हिरा!”

“त्यांनी एकंदर सम्पत्ती किती असेल?”

“तसे या प्रश्नाचे उत्तर गोपनीयतेत येते! पण तुम्ही विचारताय म्हणून सांगते. पंधरा शे कोटीच्या आसपास! ”  बापरे!इतकी!” राघव चाचपला!

“आणि माणूस म्हणून?”

“माझ्या पाहण्यातला समजायला सगळ्यात कठीण माणूस! त्यांच्या उद्देशाचा अन कृतीचा थांगपत्ता लागत नसे! आणि तितकेच विक्षिप्त स्वभावाचे!”

“हा, हे मात्र खरे! मला पण त्यांनी त्याची झलक दाखवली होती!”

“म्हणजे?काय झालं होत?”

राघवने मग तिला तो ‘सेल्फी’वाला किस्सा सांगितला. ‘जांबाज इस्पे. सोबत सेल्फी!त्याची एन्लार्ज कॉपी घरात! का तर? खुन्याला जरब बसावी!” राधेची हसून मुरकुंडी वळली.

” राधा, मला सांगा ते विक्षिप्त होते, तसे ते लंपट होते का?” राधा आता खूप रिलॅक्स वाटत होती. लॅपटॉप वरल्या चावट मुव्हीचे काही मूळ शोधण्यासाठी, म्हणून राघवने विचारले.

“नाही. मला तसे कधीच जाणवले नाही! मी त्यांच्या जवळ असायची, इतरहि देशी – विदेशी महिलांचे ऑफिसात वावर असायचा, पण कधीच वागण्या -बोलण्यातला तोल गेल्याचे मला आठवत नाही!”

“अजून एक शंका. इतका आलिशान बांगला सोडून ते आऊट हाऊस मध्ये का झोपत असत? काही कल्पना आहे का तुम्हाला?”

“म्हट्लना म्हातारा सनकी होता! अनप्रेडिक्टेबल! आली असेल लहर गेले महाराज आऊट हाऊस मध्ये! अरे हो, आत्ता आठवले एकदा गमतीने म्हणाले होते खरे!”

“काय?” राघव सावध झाला.

” ‘मी श्रीमंत माणूस आहे. माझ्या प्रॉपर्टीवर डोळा ठेवून, मला माहित नसलेला कोणी वारस उपटला, आणि त्याने माझा खून करण्याचा प्रयत्न केला तर? तर मी त्याला फसवू शकतो!’ ”

नेमके हेच सूत्र संतुकरावच्या ‘सेल्फी’ भेटीत होते!

“म्हणजे त्यांना, आपल्या मागावर कोणी तरी असल्याचे संकेत मिळाले होते का?”

“कसले डोम्बल्याचे संकेत?म्हातारा काही-बाही विचार करायचा! पण खरी गम्मत तर पुढेच आहे! मी त्यांना विचारलं ‘ कसे फसवणार तुम्ही त्या खुन्याला?’ त्यावर हसून त्यांनी मलाच विचारले. ‘समज तू ‘तो’ माझ्या मागावर असलेला खुनी आहेस! तू मला कोठे गाढशील?’ मी क्षणभर विचार करून म्हणाले ‘ त्यात काय एव्हडं? तुमच्या बेडरूम मध्ये!’ ‘ का?’ ‘ कारण तुम्ही घरी एकटे रहाता! काही बिनसले तर तुमचे घर खूप मोठे आहे. लपायला खूप जागा आहे! टेरेसवर आरामात पाच सहा तास लपून बसता येईल!’ त्यावर ते म्हणाले ‘हेच! येथेच मी तुला फसवणार! मी बेडरूम मधेच नसणार!’. “मग?रात्री झोपणार कोठे?’ तर म्हणाले ‘मी आऊट हाऊस मध्ये लपून बसेन!’. ”

म्हाताऱ्याला नक्की संशय आला होता! फक्त खात्री नव्हती! म्हणून सावधगिरी म्हणून तो आऊट हाऊस मध्ये झोपत होता! आणि तो तेथे झोपतोय हे एकशे एक टक्के माहित असणारा फक्त एकच माणूस होता. जसवंत!

“राधा, आत्ताच तुम्ही म्हणालात कि ते त्या बंगल्यात एकटेच रहात होते. बाय द वे, त्यांच्या खुनाने कोणाला फायदा होणार आहे? म्हणजे वारस वगैरे?”

“मला खरच माहित नाही! त्यांच्या बोलण्यात ‘घर’ हा विषय कधीच आला नाही. मी त्यांच्याकडे पाच वर्षा पासून कामाला आहे. कधी ते गावाकडे गेले नाहीत कि कधी गावचे कोणी नातेवाईक त्यांना भेटायला आले! ”

गप्पान सोबत डिनर संपले. बिल पे करून राघवने ‘ड्राय फ्रुट आईस्क्रीम ‘ डेझर्ट म्हणून मागवले. राघवने मोबाईल काढला.

“राधा या माणसाला तुम्ही कधी पाहिलंय का?’ आर्टिस्ट काढून काढून घेतलेले ते स्केच राधाला दाखवत राघवने विचारले.

“हो!”

राघव उडालाच

“कधी आणि कोठे?”

“हा आमच्या ऑफिसमध्ये आला होता! संतुकरावांना भेटायला! पण सरानी काचेतुनच पाहून भेट नाकारली. का? तर ‘नाही आवडला मला!’ म्हणाले!”

“त्याचे वर्णन करू शकाल?”

“पाच सव्वापाच फूट उंचीचा, कळकट कपडे घातलेला, वय साधारण तिशीच्या आसपास असावे. भव्य टक्कल होते, फक्त कानावर केसांचे पुंजके शिल्लक होते! किंचित फेंगडे चालत होता. आणि हो जवळून गेला तरी तंबाखूचा घाणेरडा वास यायचा. ”

“नाव सांगितले होते का ?”

“नाव असेल म्हणा विझिटर्स बुकात. काही तरी ‘म’ पासून सुरु होणारे होते. मनमोहन —हा आत्ता आठवले! मनोहर म्हणाला होता! हो मनोहरच होते त्याचे नाव!”

” Thanksराधा! खूप मोलाची माहित दिलीत! फक्त शेवटचाएक प्रश्न. हि गोष्ट केव्हाची?”

“असेल झाला एक महिना. ”

संतुकरावानी याची भेट एका महिन्या पूर्वी नाकारली होती. आणि ते आऊट हाऊस मध्ये पण एक महिन्या पासून झोपत होते! काही कनेक्शन होते का ?

“चला तुम्हाला गाडीत घरी सोडतो!”राघव म्हणाला.

“नको! नको!! अशी अपरात्री पोलिसांच्या गाडीतून मला उतरताना पाहिलं तर आमच्या ‘आदीशक्ती’ आग लागेल!” राधा घाईत म्हणाली.

“अहो, माझी ‘डस्टर’ आहे!”

“मग ठीक!”

ती दोघे पार्किंग लॉट कडे निघाले. तेव्हड्यात मागून एक उंचेला, पांढरा डगला घातलेला पारशी गृहस्थ आला. दोन पावलं त्यांच्या पुढे गेल्यावर ‘ सोनी कुडी! ‘ राधेकडे पहात म्हणाला आणि निघून गेला. राघवने कपाळावर हात मारून घेतला. तो गृहस्थ म्हणजे जाधवकाका होते! वेषांतराची दांडगी हौस !त्यांना पंजाब्यांचे नाही तर पारश्याचे गेटअप सूट व्हायचे. आज पारश्याचे गेटअप आहे हे विसरून पंजाबीत बोलून गेले होते! तेही गरज नसताना! अशी गल्लत ते नेहमीच करत म्हणा!

“सर, ते गृहस्थ पारशी असून पंजाबीत बोलले!”

” ते होय! ते नेहमी येतात या हॉटेलात! मला ओळखतात. बहुदा तुम्हाला ते ‘पंजाबी’ समजले असतील.”

राघवने वेळ मारून नेली.

(क्रमशः)

— सुरेश कुलकर्णी 

Avatar
About सुरेश कुलकर्णी 176 Articles
मी सुरेश कुलकर्णी. . साधारण कथा , लेख ,जुन्या सिनेमाच्या (हिंदी )गण्यावर माझे लिखाण असते . एखादे छानसे पुस्तक वाचण्यात आले तर त्यावर हि लिहतो . माझ्या वाचकास एक नम्र विनंती माझे लिखाण आवडले तरी ,आणि नाही आवडले तरी जरूर कळवा माझ्या लिखाणाचा पोत त्या शिवाय सुधारणार नाही .माझे सर्व लिखाण काल्पनिक असते .. mb.6361255994. किवा srk101252@gmail --संपर्का साठी

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..