नवीन लेखन...

रुखरुख

आज एक आठवडा झाला. त्या लहान मुलाला मी रस्त्यावर नकळत शोधण्याचा प्रयत्न करते आहे. पण तो कुठेही नजरेस पडत नाही आहे. कुठे असेल तो?

मागच्याच मंगळवारची गोष्ट आहे. मी सकाळी दुध आणायला गेले असताना तो माझ्या गाडीच्या समोर धावत धावत आडवा गेला होता. कसाबसा जोरात ब्रेक मारून मी गाडी उभी केली होती आणि गाडी बाहेर येऊन त्याला खूप ओरडले होते. माझा राग अनावर झाला होता.

“कळत नाही का रे? एवढी गाडी समोरून येत आहे, दिसत नाही का रे? जोरात हॉर्न वाजतोय, तुला ऐकायला नाही आले? असे गाडी समोर येतात आणि मग तुमचे आईवडील याचे भांडवल करून आमच्या सारख्या माणसांकडून पैसे काढतात. कोण आहे मोठे तुझ्याबरोबर? बोलव इकडे.”

मी तावातावाने इतके सगळे बोलत होते तरीही एक नाही की दोन नाही. तो आपला निर्विकारपणे माझ्याकडे बघत होता. जशी काही मी अगदी मूर्ख. मी जे काही बोलत होते त्याच्याशी जणू काही त्याचा संबंधच नसावा. मला अतिशय राग आला होता. त्या रागातच काहीतरी बडबड करत मी पुन्हा गाडी चालू करून घरी आले. डोक्यात राग तसाच होता. चहा केला, चहा घेता घेता माझी आपली बडबड चालूच होती. ” आज नशीब चांगलं होतं. तो मुलगा वाचला नाहीतर सकाळी सकाळी पोलीस चौकीत जायची वेळ होती.” “काय झाले? काय बडबड चालली आहे तुझी?” सासूबाई म्हणाल्या. “काही नाही” असे म्हणून समोर पेपर पडला होता तो वाचायला घेतला आणि वाचता वाचता जरा राग ही शांत झाला आणि सगळा प्रकार विसरूनही गेले. नंतर पूजा करताना मला त्याचा तो निरागस शांत, माझ्याकडे कुतूहलाने बघणारा चेहरा आठवला.

सात-आठ वर्षाचाच असावा तो. लांब, फाटका तुटका कोणीतरी दिलेला जुना कोट त्याच्या अंगात होता. पायात पायजमा होता परंतु तो देखील मापाचा नसावा. खाली खूप दुमडून दुमडून त्याने तो स्वत:च्या उंचीचा केलेला होता. पयत चप्पलही नव्हती. लांब वाढलेले काळेभोर केस. त्याला कित्येक महिन्यात तेलही लावलेले नसावे त्यामुळे ते राठ दिसत होते. शेंबडाने भरलेले नाक, काळा सावळा रंग आणि त्याच्या उंचीपेक्षाही जास्त लांब वाटणारे पाठीवर टाकलेले सिमेंटचे पांढऱ्या रंगाचे कचऱ्याने, व प्लास्टिकच्या तुटक्या फुटक्या बाटल्यांनी भरलेले पोते होते. असा तो निर्विकार चेहऱ्याचा मुलगा मला आठवला आणि काळजात चर्रर्र झाले.

असे वाटले, अरे हा एवढासा चिमुरडा इतक्या थंडीत कचरा गोळा करत फिरत होता. दिवस पूर्ण उगवलाही नव्हता. थोड्याशा अंधारातच कसलीही भीती न बाळगता तो आपल्या आईवडिलांना मदत करण्याचा प्रयत्न करत असावा. मी इतके सगळे बोलले त्याला, आरडा ओरडाही केला पण त्याला ‘आईबाबा’ तरी असतील का?”

मला गाडीत बसून, हिटर चालू ठेऊन अंगात स्वेटर घालून बाहेरच्या थंडीची कल्पनाही नव्हती आणि हा मात्र इतक्या थंडीत सकाळी सकाळी कानटोपीही न घालता, अनवाणी फिरून कचऱ्यातून काहीतरी शोधून दोन पैसे मिळतील का ते पहात होता.

कदाचित त्याने माझी समोरून येणारी गाडी पाहिलीही असेल, हॉर्न ऐकलाही असेल पण रस्त्यापलीकडे समोर पडलेला कचरा त्याला जास्त महत्वाचा वाटला असवा. किंबहुना त्यामध्ये त्याला त्या दिवसाची ‘रोजी-रोटी’ही दिसली असेल.

त्या चिमुरड्या पावलांना “अरे गाडी आहे, थांब” असा त्याच्या मेंदूचा संदेशही ऐकू आला नसेल. असे नको नको ते विचार मनात येऊन माझे मन खूप बेचैन झाले.

आपण आपल्या मुलांना किती जपतो. ‘अरे स्वेटर घाला, बूट घाला, डोक्याला टोपी घाला’. या बिचाऱ्याला असे सांगायला तरी कोणी असेल का? चपलात पावलांना जाणवणारी ऊब, डोक्यातल्या टोपीने कानांना जाणवणारा उबदारपणा कसा असतो याची त्याला कल्पना तरी असेल का? असे अनेक चटका देणारे विचार मनाला शिवून गेले आणि मला स्वत:चीच लाज वाटली.

तेंव्हापासून माझ्या मनात सारखा विचार येत आहे की तो माझ्याकडे एकटक का बघत असावा? कदाचित तो असा विचार तर करत नसेल की “काय मूर्ख बाई आहे, मला काय वेड लागले आहे की मी कारणाशिवाय गाडीसमोर पळालो? हिला दिसत नसेल की समोरच्या एवढ्या बाटल्या आणि कचरा मी उचलून पोत्यात टाकल्या आणि विकला तर मला आज पैसे मिळतील आणि आजचे जेवण मिळेल”

ह्या विचाराने माझे मन अगदी उदास झाले. असे वाटू लागले की त्या चिमुरड्या मुलाला एकदा तरी ‘Sorry’ म्हणावे. परंतु तो मला परत दिसलाच नाही. आजही त्या रस्त्यावरून जाताना माझे डोळे त्याला शोधत असतात. माझ्या मनाला एक ‘रुखरुख’ लागून राहिली आहे………….

सौ. वैजयंती गुप्ते
9638393779.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..