संत कसे बोलतात, कसे चालतात, निरनिराळ्या परिस्थितीत कसे वागतात, कसे निर्भय असतात, कसे निःस्पृह असतात, किती निरिच्छ, किती मृदू, परंतु किती निश्चयी, कसे निरहंकारी, कसे सेवासागर, किती निरलस, किती क्षमी, कसे त्यांचे वैराग्य, कशी निर्मळ दृष्टी, कसा विवेक, कसा अनासक्त व्यवहार, – हे सारे त्यांच्या सहवासात नित्य राहिल्यानेच समजत असते.
आपले गढूळ जीवन अशा सदगुरूच्या सहवासात निर्मळ होऊ लागते. पटले जातात, प्रकाश येतो. प्रत्यक्ष प्रायोगिक शिक्षण प्रत्येक क्षणाक्षणाला मिळते. सद्गुरूच्या श्वासोच्छ्वासाबरोबर पावित्र्य येत असते. आईबाप देह देतात, जन्म देतात. परंतु या मातीच्या देहाचे सोने कसे करावे, हे सद्गुरू शिकवितो. भौतिक शास्त्रांतील गुरू मातीची माणके बनवितील. परंतु सद्गुरू जीवनाच्या मातीची माणिक-मोती बनवितो, पशूचा मनुष्य करतो. वैचारिक जन्म देतो, सत्यदृष्टी देतो. अशा सद्गुरूचे उतराई कसे होणार? ज्याने माकडाचे माणूस केले, पशूंचे पशुपती होण्याची हाती किल्ली दिली, त्या सद्गुरूचे ऋण कसे फिटणार? त्याचे कोणत्या शब्दांनी स्तवन करू? त्याला किती वानू, किती मानू, किती वाखाणू?
गुरुब्रह्मा गुरुविष्णु गुरुदेवो महेश्वरः ।
गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः ।।
सद्गुरूचे वर्णन करावयास वाणी तोकडी पडते. गुरू म्हणजे देव, महादेव, गुरू म्हणजेच सर्व काही.
आपणाकडेच सद्गुरूंची परंपरा सांगण्याचा प्रघात आहे. सर्वांचा आदिगुरू म्हणजेच कैलासराणा शिव चंद्रमौळी. निर्मल, धवल अशा उंच कैलासावर राहणारा, शीलाचा चंद्र मिरवणारा, ज्ञानगंगा मस्तकी धारण करणारा, सर्पांना निर्विष करून फुलांच्या हाराप्रमाणे अंगावर खेळविणारा, सर्वस्वाचा त्याग करून विभूतींचे वैभव मानणारा, जगासाठी स्वतः हालाहल पिणारा, भुते-प्रेते-पिशाच्चे अशा पापयोनींनाही प्रेमाने जवळ घेऊन त्यांना मांगल्याचा पथ दाखविणारा, वैराग्याचा तृतीय नेत्र उघडा ठेवून वासनांचे भस्म करणारा, असा हा पशुपती मृत्युंजय शिव सर्वांचा आदिगुरू. त्यांच्यापासून सर्वांची ज्ञानपरंपरा.
जनकाचा याज्ञवल्क्य गुरू, जनक शुक्राचार्यांचा गुरू, निवृत्तींचा शिष्य ज्ञानदेव, रामानंदाचे शिष्य कबीर, असे हे संबंध शब्दांनी वर्णन करता येणार नाहीत. जीवन स्वच्छ, शुद्ध, शांत व्हावे अशी जोपर्यंत तळमळ माणसात राहील तोपर्यंत हे संबंधही जगात राहतील. हे संबंध भारतातच नाही, तर जगातही राहतील. ते राहण्यातच जगाचे कल्याण आहे.
-साने गरूजी
Leave a Reply