1975-1976 मध्ये बँकेत सहजासहजी नोकरी मिळत असे त्या काळातील गोष्ट. नोव्हेंबर 1976 मध्ये एका राष्ट्रीयकृत बँकेत नोकरीला लागलो. त्यावेळेस माझे वय अवघे 19 वर्षे पूर्ण. पहिलीच नोकरी. आधी कुठे नोकरीचा अनुभव नाही. मी ज्या दिवशी बँकेत नोकरीला रूजू झाले. त्या दिवसापासूनच एकेक काही मजेशीर, तर काही गंभीर, तर काही दुःखद असे किस्से अनुभवास आले. मी 1976 ते 1994 या कालावधीत आमच्या बँकेच्या मुंबई मेन ऑफिसमध्ये मी कार्यरत होते. तोपर्यंत माझा ग्राहकांशी समोरासमोर संबंध आला नाही. आजकालच्या भाषेत बोलायचे झाले, तर त्यावेळी मी बॅक ऑफिसला होते. ग्राहकांशी संबंध आला तो 1994 पासून विविध शाखांमध्ये बदली झाली तेव्हा.
त्यावेळची परिस्थिती अशी होती की, ग्राहक व बँक कर्मचारी यांचे आपुलकीचे, जिव्हाळ्याचे संबंध असत. मी आमच्या मुलुंड शाखेत 1994 ला आले, तेव्हा एक अशिक्षित बाई माझ्याकडे आल्या व मला म्हणाल्या, ‘मला खाते उघडायचे आहे, तर त्याचा फारम देस व लिवून भी तूच देस. मला लिवता येत नाही.’ मला हे सर्व नवीनच होते. त्यामुळे मला कळेना की मी आता नक्की काय करू. पण माझ्या एका सहकाऱ्याने मला सांगितले, ‘तुम्ही फॉर्म भरून द्या. तोपर्यंत मी तुमचा काऊंटर सांभाळतो.’ मी त्या बाईंना फॉर्म भरून दिला.त्यांचा योग्य जागी (सही करायची तिथे सगळीकडे) अंगठा घेतला व आमच्या ऑफिसरकडे दिला. त्या बाईंचे सर्व काम झाल्यावर त्या परत माझ्याकडे आल्या व माझ्या हातात 20 रुपये देत म्हणाल्या, ‘बाय माझी माझा काम केलास ना म्हणून हे तुला चायपान्याला, देव तुझा भला करील.’ माझ्या डोळ्यातून पाणी यायचे बाकी राहिले होते. तशांतच मी त्यांना म्हटले, ‘असे इथे कुणी पैसे घेत नाही व तुम्ही द्यायचेही नाहीत.’ त्यानंतर त्यांनी दिलेले उत्तर ऐकून आम्ही सर्वचजण चाट पडलो. त्यांनी सांगितले, ‘आम्ही निरक्षर मानसं. त्यामुळं आमास्नी गावाकडं असं कामासाठी पैकं द्यावेच लागतात. नाही तर आमची कामं कुनीबी करत न्हाय.’
हा किस्सा झाला अशिक्षितांसंबंधी. आता सुशिक्षतांचा किस्सा –
मी ठाणे शाखेत फिक्स डिपॉझिटचे काम करत होते. त्यावेळी एक बाई आल्या. रुपये तीन लाखाचा चेक हातात घेतलेला आणि मला म्हणाल्या, ‘मला हे पैसे फिक्समध्ये ठेवायचे आहेत, तर व्याज दरानुसार मी किती मुदतीसाठी हे पैसे ठेवून द्यायचे. जेणे करून माझा जास्तीत जास्त फायदा होईल.’ मी त्यांना त्यांना आमच्या ज्या काय स्कीम होत्या. त्यातील जास्त फायदेशीर कोणती ते सांगून त्याचा फॉर्म भरायला दिला.
फॉर्म भरताना त्यांनी त्यांच्या एकटीचेच नाव घातले, तर मी त्यांना म्हटले, ‘अहो तुमच्या मिस्टरांचे पण नाव घाला ना. सुरक्षिततेच्या दृष्टीने ते केव्हाही चांगलेच.’ झालं, त्या बाई मला एकदम खवळून म्हणाल्या, ‘मी का त्यांच नाव घालू? हे पैसे मी केलेल्या नोकरीतले. माझे आहेत. मी नाही मिस्टरांचे नाव घालत.’ मी त्यांना शांत केले व सांगितले, ‘ठीक आहे दुसरे नाव नाही घालत तर त्यांच किंवा तुमच्या मुलाबाळांचं नाव ‘नॉमिनेशन’ म्हणून लिहा.’ बाई पुन्हा नाराज झाल्या, पण आता मात्र हसत हसत म्हणाल्या, ‘ते दोघे (म्हणजे त्यांचे मुलगा व मुलगी) बसलेत तिकडे गार हवा खात अमेरिकेत. त्यांचं पण नाव घालणार नाही.’ त्या नेहमी येणाऱ्या असल्याने आमचे चांगले जिव्हाळ्याचे संबंध होते. मी त्यांना गंमतीत विचारले, ‘मग माझं नाव ‘नॉमिनी’ म्हणून टाकता का मावशी?’ तर त्या म्हणाल्या, ‘खुश्शाल लिहिते तुझं नाव.’
म्हणजेच यावरून आपल्याला कळते की, अशिक्षित/सुशिक्षित असा काही संबंध नसतो. जेव्हा नात्यांत पैसा, त्याचा हिशेब येतो तेव्हा पैसा हा वाईट ठरतो व माणसाची मने दुरावतात. कलुषित होतात. अजून भरपूर किस्से आहेत, पण शब्दमर्यादेमुळे तूर्तास एवढेच पुरे.
-अलका साठे
(व्यास क्रिएशन्स च्या पासबुक आनंदाचे दिवाळी २०२२ ह्या अंकामधून प्रकाशित)
Leave a Reply